पुण्यात फ्लॅट घ्यावा का नाशिकमधेच थांबावे ?

Submitted by रेव्यु on 31 July, 2021 - 04:38

गेल्या 14 वर्षांपासून आम्ही नाशिक मध्ये स्थायिक झालो. येथे प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट आहे. सुंदर सूर्यप्रकाश आणि वारा आहे. सर्व खोल्यांसमोर प्रचंड मोठी बाग, जुनी झाडे, हिरवळ आहे आणि प्रसन्न सकाळ आमचे स्वागत करते. जेव्हा हा फ्लॅट विकत घेतला तेव्हा मी नोकरीत होतो आणि धाकटी कन्या इथेच नोकरीस होती. आम्ही मूळचे बेळगावचे त्यामुळे तिथे स्थायिक होणे स्वाभाविक असते परंतु धाकटी कन्या लग्नानंतर असेल तिथे जाऊन येऊन करायचा विचार होता. परंतु थोरल्या कन्येप्रमाणेच ती देखील विवाहानंतर अमेरिकेत गेली. आता आम्ही 70 व 68 वर्षांचे आहोत . प्रकृती चांगल्या आहेत. नाशकात सांस्कृतिक बाबतीत आम्ही बरेच सक्रिय व सुखात आहोत. येथील अत्यंत निष्णात डॉक्टर्स सदा मदतीला आहेत आणि मुख्य म्हणजे ते अगदी त्याच दिवशी नुसत्या एसएमएस वर उपलब्ध असतात. या झाल्या जमेच्या बाजू.
परंतु इथे आम्हाला कठीण प्रसंगात मदत करतील किंवा आजारपणात आधार काय आहे याचा भरवसा नाही. तसे परगाव आहे असे आम्हाला वाटते. आमचे बरेच नातेवाईक पुण्यात आहेत, मुलीचे सासर तिथेच आहे, माझे मेव्हणे सुध्दा तिथे आहेत म्ह्णून मुली आग्रह करत आहेत की आम्ही तिथे नविन फ्लॅट घेऊन सेटल व्हावे.
आम्हाला भिती वाटते तिथल्या वाहतूकीची, मी इथे अजूनही कारमध्ये आरामात हिंडतो. सर्व अंतरे 20 मिनिटांच्या अंतरात आहेत. दुसरे असे की खरोखरच पुण्यात नातेवाईक मदत करू शकतील का? त्या पेक्षा येथेच सामाजिक आधार व्यवस्था विकसित करावी का? अत्यंत संभ्रमात आहोत.
दुसरे म्हणजे पुण्यात फ्लॅटच्या शोधात संलग्न बाबी म्हणजे कायदेशीर रीत्या आपल्या नावावर होईल का, मी व ही सहजपणे हिंडू शकू का?
काही उमजत नाहीये.... चर्चा करता येईल का.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणी काही मदत बिदत करत नाहीत , आहे तिथेच थांबा .
मुली तशाही परदेशात आहेत , त्या मुंबई विमानतळावरूनच येणार , मग त्यांना नाशिक काय अन पुणे काय,

नवीन फ्लॅटची जी कॉस्ट होईल , त्याच्या व्याजात चांगले नरसिंग स्टाफ मिळू शकतात , तिथेदेखील नातेवाईक रोज येऊन बसणार नाहीत , बाहेरचा नोकर लागेलच,

मुलीचे सासर असेल तर विचार करू शकता. पण तरीही एखादा बाहेरचा नोकर लागेलच

आता असेही कोरोना मुळे पटकन उठून कोणाच्या घरी जाणे वगैरे होत नाही. त्यामुळे गावात नातेवाईक असणे ही फार काही जमेची बाजू नाही
आणि पुण्यातले ट्रॅफिक तर काय
दृष्ट लागावे इतके सुंदर आहे
त्यामुळे नाशिकमध्येच रहा, जीवाचा त्रास कमी होईल

नाशकात चौदा वर्षांपासून राहताहेत तर तिथले शेजारीपाजार्यांशी चांगले संबंध असतीलच ना अडीअडचणीला मदत करतील असे. काही झालं तर आधी शेजारीच कामाला येतात. पुण्यात येऊन नातेवाईकांच्या अगदी शेजारी घर घेणार असाल तर ठीक आहे नाहीतर दूर कुठे असतील तर काय उपयोगाचे. ब्लॅकॅ म्हणताहेत तशी दिवसभरासाठी किंवा तुमच्या गरजेनुसार मदतनीस ठेवता येईल. अनेकवर्ष आपण राहात असतो तिथे आपला एक कम्फर्ट झोन तयार होतो, सुरक्षित वाटतं ते सोडून पुण्यात/नवीन ठिकाणी रुजणं कितपत मानवेल त्याचा जरूर विचार करा....

, तिथेदेखील नातेवाईक रोज येऊन बसणार नाहीत , बाहेरचा नोकर लागेलच,
मुलीचे सासर असेल तर विचार करू शकता. पण तरीही एखादा बाहेरचा नोकर लागेलच>>>>> ब्लॅककॅट यांच्या प्रतिसादाशी पूर्णपणे सहमत.

इथे आम्हाला कठीण प्रसंगात मदत करतील किंवा आजारपणात आधार काय आहे याचा भरवसा नाही. तसे परगाव आहे असे आम्हाला वाटते. >>>> हा तुमचा खरा प्रश्न आहे. विश्वास ठेवा, कोणीतरी नक्की त्या त्या वेळी उभे रहाते.

माझी आई वयाच्या ७८ व्या वर्षी(२०१० साली) चिंचवडला रहायला गेली.तिथे तिचे सुटीतले घर होतेच.मी दर आठ पंधरा दिवसांनी तिथे जायची.आईचे गुडघे प्रचंड दुखायचे.तरी तिथे ती राहिली.फक्त घरामधे फक्त एकटीच बाई दिसायला नको म्हणून २ पेईंग गेस्ट्स ठेवल्या होत्या.आईला हार्ट प्रॉब्लेम्,बीपी सर्व होते.हळुहळू आईने सर्व बस्तान मांडले.माझ्या तिकडच्या एका डॉक्टरकाकांनी तिला सांगितले होते की वहिनी,कधीही गरज लागली तर मला फोन करा.तो तिला एक मानसिक दिलासा होता.
तिच्या घरामागे एका बिल्डींगचे काम चालू होते,तिथल्या वॉचमनला काही गोष्टी देऊन (झाडाचे आंबे इ.) हळुहळू ओळख वाढवली.इतकेच नव्हे तर आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून काही कामे स्वतः करायची.रिक्षावाला पण तिचा ओळखीचा होता.त्या माणसांचाही मोठेपणा आहेच.तो वॉचमन विलास त्याचे नाव, नंतर तर आईचा माळी + बरेच काही झालाय.त्याच्यामुले माझ्या आईकडच्या फेर्‍या कमी व्हायला लागल्या.नंतर नंतर तर मलाच आईच्या घरात पाहुणीचे स्वरुप आले.विलासच्या मदतीने आइने झाडे लावली.घराचा बराच कायापालट करुन घेतला.त्या दहा वर्षात आईने खूप मनासारखे जगून घेतले म्हणा ना.
त्या मागच्या करोना काळात तर बिल्डींगबाहेर कामाला जायचे नाही असं त्याला सांगितल्यावर मी आजींकडे जाणारच, नाहीतर दुसरा वॉचमन पहा म्हणून सांगितले होते.मला काहीही काळजी नव्हती.
डिसेंबर २०२०मधे आई माझ्याकडे मुंबईत आली आहे.पण तिच्या घराची चावी विलासकडे दिली आहे.पुढच्या महिन्यांत त्या पेईंग गेस्टही दुसरीकडे जातील.

हा इतका निबंध लिहिला कारण बसलेली घडी मोडून दुसरीकडे जाणे कठीण असते.

वरील सर्व प्रतिसादांशी सहमत. पुण्यात तुमचे मनाप्रमाणे वागण्याचे / फिरण्याचे स्वातंत्र खूप कमी होईल. परस्वाधिनता येऊ शकते आणि त्याचा तुमच्या confidence वर नकारात्मक परिणाम होईल अशी दाट शक्यता आहे. हे मी माझ्या आई वडिलांच्या अनुभवावरून सांगते आहे.
कराडला अतिशय confidence ने सगळे manage करणारे ते, पुण्यात येऊन खूप बावरून गेले आहेत हे खूप खूप जाणवते.
नाशिकमध्ये जर तुम्ही सुखी आहात आणि काही गैरसोय नसेल तर फक्त नातेवाईकांसाठी पुण्यात येऊ नये. इथे त्यांची इच्छा असेल तरी तुम्हाला पटकन मदत करणे त्यांना नेहमीच शक्य असेलच असे नाही. अशा वेळी जोडलेली माणसेच जास्त मदत करतात असा अनुभव आहे.

वरील प्रतिसादांशी सहमत.

रच्याकाने: नाशिकचा कुठला भाग तुम्ही वर्णन केलेला?
निवृत्ती नंतर कुठे रहावे या साठी नाशिकचाही विचार करतोय.

प्रत्येक गावाचाही एक स्वभाव असतो. त्याच्याशी जुळवून घेताना किमान सुरुवातीला त्रास होऊ शकतो.
आणि नातेवाईक काय किंवा शेजार-ओळखीचे काय; जर मैत्र चांगले असेल तर सगळे सारखेच. तेव्हा मोठा बदल टाळणेच इष्ट असे वाटते.
याबाबत तुम्ही दोघांनी मिळून जो निर्णय घ्याल; योग्यच असेल. शुभेच्छा!

वरचे सगळे प्रतिसाद पटतायत.
तुम्ही दोघेच नाशिकमध्ये राहताय आणि कुणी जवळचे नातेवाईक तिथे नाहीत, आपण परदेशी त्यामुळे तुमच्या मुलींना काळजी वाटणं मात्र साहजिक आहे. त्याला पर्याय नाही दुर्दैवाने. त्यांना काळजी कमीत कमी वाटेल अशा प्रकारे तुम्ही दोघं आनंदाने आणि स्वतःची आणि एकमेकांची काळजी घेत रहा.

नातेवाईक बोलवतात म्हणजे खरेच असेल असेही नाही

कुणी दारात भेटला तर आपणही विचारतो , चहा घेणार का ? पण ते आपण formality म्हणून विचारतो

धन्यवाद सर्वांचे!
एक महत्त्वाचे लिहिले नाही... व्याही ८४ व ७९ आहेत..... त्या मुळे सणाला वगैरे भेटी व्यतिरिक्त तसा सहारा, आजारात वगैरे कठीण आहे.
कोडे बरेच उलगडते आहे पण आणखी प्रतिसादांची वाट पाहतो.
>>>रच्याकाने: नाशिकचा कुठला भाग तुम्ही वर्णन केलेला?
निवृत्ती नंतर कुठे रहावे या साठी नाशिकचाही विचार करतोय.>>>
पृथ्वीजी.... मी महात्मानगरला राहतो, नाशिक मध्ये निवांत भाग खूप आहेत....विपू केल्यास आणखी सांगू शकेन

इथे त्यांची इच्छा असेल तरी तुम्हाला पटकन मदत करणे त्यांना नेहमीच शक्य असेलच असे नाही.>>> अगदी अगदी झाले.

नाशिक, पुणे दोन्ही ठिकाणी अगदी कमी वेळा गेलेय पण मला नाशिक भावलं पुण्यापेक्षा (पुणेकरांनो माफ करा). त्यामुळे असंच मनाने नाशिककडे माप झुकतं.

त्यातून पुण्याला जाणार असाल तर अथश्रीसारख्या प्रोजेक्टमध्ये चौकशी करून बघा, याबद्दल पण फक्त ऐकलं आहे, एकदा tv वर बघितलं आहे अगदी थोडा वेळ , चांगल्या सोयी असतात. प्रत्यक्ष काहीही माहिती नाहीये. कोणाला माहिती असेल तर लिहितील इथे.

>>> ब्लॅककॅट यांच्या प्रतिसादाशी सहमत.
पुण्यापेक्षा नाशिक अजून तरी निवांत आणि छान आहे
शिवाय वेल कनेक्टेड आहे
मी नाशिकलाच राहतोय त्यामुळे अनुभव आहे Happy

नाशिक म्हणजे पुण्यामुंबईचे सर्व फायदे व एकही तोटा नाही. खरे तर तुमच्या नातेवाईकांनाच पुण्याहून नाशिक ला शिफ्ट व्हायचा सल्ला द्या ! पुणे इतके अक्राळ विक्राळ वाढले आहे की एखाद्याला भेटायला जायचे म्हणजे दिव्यच आहे. त्यामानाने नाशिक फारच बरे आहे.

या निमित्ताने, रेव्यु यांना उद्देशून नव्हे एकंदरच, पुढे आपल्याला जेव्हा स्वतःचे स्वतः करणे अवघड होत जाईल तेव्हा काय?
असे काही वृद्धाश्रम किंवा काही सुपर सिनियर सिटीझन सोसायटी असतात, आमच्या जवळच्या भागात अशी एक सोसायटी आहे जिथे इमारती व फ्लॅट्स वयोवृद्ध लोकांच्या समस्या व निकड विचारात घेऊन बनवले आहेत.
मोठ्या लिफ्ट्स (स्ट्रेचर मावेल एवढ्या, लिफ्ट मध्ये बसायची सोय, अटेंडंट) पॅसेज मध्ये दोन्ही बाजूंनी धरायला बार्स, आपल्या फ्लॅट पासून जास्त चालावे लागू नये म्हणुन जास्त लिफ्ट्स आणि फ्लॅट्सची रचना, घरात आणि बाथरूममध्ये न घसरणाऱ्या टाईल्स, बाथरूम मध्ये कम्फर्टेबल कमोड्स बसता उठता आधार द्यायला धरायला लावलेले बार्स, बाथरूम आतून बंद करायला असे लॅच ज्याची एक साधीच किल्ली दरवाजालाच लावून ठेवलेली आपत्काली पटकन दार उघडता यावे, व्हीलचेअर सहज बाथरूम कमोड वर नेता येईल अशी सोय.
याव्यतिरिक्त ऍम्ब्युलन्स, प्रथमोपचार, नर्सिंग स्टाफ, डॉक्टर ऑन कॉल, सुपर मार्केट, कँटीन, त्याची रूम सर्व्हिस, ओळखीची टॅक्सी सर्व्हीस ज्याचे ड्रायव्हर्स रस्ता क्रॉस करवून देतील, शॉपिंगला मदत करतील वगैरे. मोलकरणा/णी विश्वासातील वगैरे, सुरक्षा कर्मचारी. बाकी रिक्रीएशन सेंटर, बाग, इत्यादि.

तिथे मी खूप वर्षांपूर्वी गेलो होतो, मेन्टेनन्स किती असतो आठवत नाही आता.

तिथे फ्लॅट्स खरेदी, लीज, रेंटवर मिळतात.

मुंबई, पुण्यात अशा सोसायटी आहेत हे ऐकले आहे, नाशिकलाही असेल.

थकलेल्या स्वतंत्र दाम्पत्याला, एकट्या व्यक्तीला हे चांगले सोयीचे आहे असे माझे मत. चौकशी करून ठेवावी आपापल्या शहरात, पुढे उपयोगी पडू शकते.

>>नाशिक म्हणजे पुण्यामुंबईचे सर्व फायदे व एकही तोटा नाही.<< आँ, पुण्याचं माहित नाहि, पण मुंबई? ऐतेन...

तुम्हि चौदा वर्षं नाशिकला रहाताय, मित्रमंडळी जोडली असतीलंच. तिच येतील अडिअडचणीत कामाला. बाकि, नाशिकमधे हॉस्पिटल्स, इमर्जंसी रिस्पाँस सिस्टम कशी आहे? हि सपोर्ट सिस्टम चांगली असेल तर उत्तम, इमोशनल सपोर्ट व्हॉट्सॅप, फेसटाइम इ. मार्फत मिळत राहिल...

मला पण नाशिक आवडलेलं (३० वर्षांपुर्वि), त्र्यंबक रोडचा भाग एस्पेश्यली. तक्रार एकच होती - प्रचंड धूळ...

जर सुखी असेल तर जिथे आहे तिथेच रहाणे चांगले.

माझे वडिल मुम्बईचे. आई गेल्यावर वडलानी माझ्या बहिणीच्या घरापासुन ५ मिनिटाच्या अंतरावर पुण्यात दुसरे घर घेतले. ह्या गोष्टीला १० वर्ष झाली आणि आज ७९ वय आहे तरीही आजुनही मुंबईत एकटे राहात आहेत. फ्रीलांसिग जॉब , मित्र , त्या शहराशी जोडलेली नाती ही ह्या वयात सोडवत नाहीत. पुण्यात आल्यावर दोन चार दिवसातच वेळ कसा घालवायचा ह्याचा प्रश्न पडतो आणि डिप्रेशन येते. कधी एकदा मुंबईत जातो असे होते.

पुण्यात राहायचे असल्यास काही दिवस जाउन राहुन बघणे. जर आवडले तरच शिफ्ट होण्याचा विचार करणे. आजकाल १-२ महिन्या करिता फर्निश रुम, फ्लॅट पण भाड्याने मिळतात.

पुण्यात जुन्या पेठा आणि कोथरुडसारखे काही भाग सोडले तर फ्रेंडली वातावरण फारसे नाही. मित्रत्वाचे नाते निर्माण होत नाही असा अनुभव आहे. तसेच नवीन भागात चांगले डॉक्टर, पथोलॉजी लॅब्स वगैरे जवळ नाहीत. मोठी आणि renowned multispeciality हॉस्पिटले दूर आहेत.

चौदा वर्षानंतरही "तसा परगाव आहे" हे शब्द येत असतील तर मुली म्हणतात तिथे जाणे श्रेयस्कर. अथश्री किंवा तत्सम सिनीयर सिटीझन सोसायटीत व्याही व तुम्ही एका जागी ( अर्थात वेगवेगळे फ्लॅट) असणे हे सर्वात उत्तम.

मुलींनी पुढे तुमच्या/पत्नीच्या सेवेवर देखरेख ठेवावी अशी अपेक्षा असेल तर त्यांना सोयीचे करणे योग्य. काही पालक स्वतःचा हेका चालवतात मग मुलांना अमेरिका-पुणे-नाशिक (किंवा इतर कुठले गाव) अशी त्रिस्थळी यात्रा नाही झेपली की 'अमेरिकेतली मुलं आई-बापाला पण विचारत नाहीत' अशी उगाच शोभा. ह्यात नवीन गाव, व्याही/पत्नीचे माहेर इ लोकांशी जुळवणे इ थोडा त्रास तुम्हाला/पत्नीला होईल हे अगदी मान्य आहे. पण आपल्याच मुलींच्या सोयीसाठी करायचं. रिटायरमेंटचा काही काळ नाशिकाला मनासारखा घालवलेला आहे असे वाटले म्हणून लिहीले. तुमच्या मनासारखी रिटायरेमेंट अजून झालेली नसल्यास आवडीच्या गोष्टी करून मग दोन-चार वर्षाने शिफ्ट होऊ शकता.

तुमच्या तब्येती चा़गल्या असतील आणि अचानक काही विपरीत झालं नाही, तर आणखी १०-१५ वर्षांचं active life तुमच्या हातात आहे. ( मी माझ्या जवळपासच्या ज्ये, अतिज्ये ना पाहत आलोय त्यावरून सांगतो)

बाणेर येथील अथश्री बद्दल सांगायचे तर व्हील चेअर, रॅम्पस् मोठमोठी आवारे, लिफ्टस् वगैरे ठीक आहे. पण bed ridden झालात तर स्वत:चे दोन मदतनीस लागतील. इथे भव्यपणाबरोबरच ते भव्य आवार रिकामे रिकामे वाटत राहाते. पंचाहत्तर वयाच्या पुढचीच माणसे साहजिकपणे इथे असतात.
स्वच्छता आहे, बॅडमिंटन, टेबल टेनिस वगैरे सोयी आहेत पण एकंदरीत उदास उदास वाटत राहाते. तरुणाईचा उल्हास (हाही साहजिकपणे) आढळत नाही.

हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येणार च असतो.
वृध्द काळासाठी धन संचय करणे इथ पर्यंत तयारी करणे आपल्या हातात असते ते तरुणपणी हल्ली खूप लोक करतात.
खरा प्रश्न असतो शरीर दीन ,कमजोर झाल्यावर आधार असल्या शिवाय जगणे मुश्किल असते.
पैसे आहेत तुम्ही नोकर ठेवू शकता पण त्यांच्या वर पूर्णतः अवलंबून राहणे शक्य नसते.
शेवटी ती पगारी लोक असतात तिथे जिव्हाळा नसतो .
शरीराची साथ जास्तीत जास्त वाय पर्यंत लाभणे हे परम भाग्यच .
पण आधार हवा त्याची गरज आहे ह्याची जाणीव सत्तरी ओलांडली की लोकांच्या लक्षात येते.
आणि वेळ निघून गेलेली असते.
मित्र जोडलेले नसतात ,नातेवाईक बरोबर जिव्ह्याळा प्रेमाचे संबंध स्थापित केलेले नसतात.
त्या मुळे ते म्हातारपणी उपयोगी पडतील हे दुर्मिळ च.
आणि त्यांचे पण वय झालेलं असते ते स्वतः त्यांच्या मुलांवर अवलंबून असतात ते नाही मदत करू शकत.
मित्र पण शरीराने दुर्बल झालेले असतात त्यांनाच आधाराची गरज लागते.
दुसऱ्याच्या भरोषावर (मित्र,नातेवाईक) म्हातारपणात आधार शोधणे ही फक्त कल्पना आहे ती प्रत्यक्षात येणे अवघड.
त्या मुळे जिथे आहात तिथे जीवनाचा आनंद घ्या.

मला अथश्रीसदृश पर्याय योग्य वाटतो. महाराष्ट्रात इतर शहरांत अशी काही व्यवस्था उपलब्ध असेल तर मला कल्पना नाही.
पूर्वी एकदा मायबोलीवर वृद्धत्वाच्या अनुषंगाने या विषयावर थोडी फार चर्चा झालेली आठवते. (मी धागा शोधला नाही. )
त्यावेळीही चर्चेचा सूर होता होईल तो आपला confort zone (आपले राहते घर, शहर ) सोडू नये असा होता. आता स्वतः ला या टप्प्यावर पाहताना मला ते पटते. आमची मुले इथे अमेरिकेत असली तरी त्यांच्या नोकऱ्या आणि वास्तव्य आमच्याच शहरात नाही आणि आम्हाला भेटायचे तर त्यांना किमान ३-४ तास विमान प्रवास करावा लागतो तेव्हा तेही तसे वारंवार ड्राईव्ह करून जाण्या - येण्या सारखे अंतर नाही.
आमच्या शहरात रहाणे आम्हाला आवडते. तसं या शहरात आमची मोजकी मित्र मंडळी आहेत पण वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे वेळ आलीच तर यापैकी कोणीच कोणाजवळ सतत राहू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे . तेव्हा आमच्यापुरते आम्ही असं ठरवले आहे की आपल्याला आपली दैनंदिन कामे -गाडी चालवणे , स्वैपाक करणे, घराची, बागेची देखभाल इ. शक्य होईनासे झाले की घर आणि मोह Happy ) सोडून वृद्धांसाठी असलेल्या वसाहतीत ( assisted living ) राहायला जायचं !
तुम्हांला जो काही निर्णय घ्याल त्यासाठी शुभेच्छा !

चांग ला धागा काढला आहे. मला पण थोडा असाच विचार डोक्यात येत होता. रिटायर झाल्यावर हैद्राबादला घरी जावे कि पुण्यात घर घेउन राहावे असा प्रश्न पडला होता. पुण्यात नातेवाईक ( वयस्कर झालेले) व मित्र मैत्रीणी भरपूर आहेत. निदान प्रभात रोड वर एक दोन वर्शे घर भाड्याने घेउन राहावे व मजा करावी पुणे परत अनुभवावे( लोक क्रुझ वर वगैरे जातात तसे) असा ही एक प्लॅन आहे. पुण्यात आरोग्य सेवा नीट मिळते का ते बघून घ्या.

इतर लोक नातेवाइक मदतीला असतील हा ऑप्शन मी ठेवलेला नाही. साने बाई एकट्या जगतात तर आपल्याला काय हरकत आहे?
हैद्राबादेस आमच्या ओळखीचे लोक्स दूर राहतात बरकत पुरा/ महा. मंडल कोठी बडी चौडी हे भाग फार दूर आहेत. रिक्षाने १५० रु मागतात.
तिथे राहायचे तरही घर भाड्याने घ्यावे लागेल.

बंजार्‍यात घराजवळ हास्पिटले मजबूत आहेत हेच काय ते बेस्ट. पण मला जुन्या मेडच्या हातात घराची सुत्रे आता द्यायची नाही आहेत. भीतिच वाट्ते.

Pages