सिलींडर ५

Submitted by भाऊसाहेब. on 30 July, 2021 - 02:27

सिलींडर ५
आडगाव फाटा आणि बैलगाडी ब-याच अंतरावर . गाडीवाल्याला ओरडून ओरडून ओरडून आवाज दिले.
पण तो बहुतेक झोपलेला.सिलीडर तिथपर्यंत कसे न्यायचे? खरेतर मामानी सिलिंडर गाडीपर्यंत न्यायला मदत केली असती.ते तयार ही होते.आपणच लग्न जमले असे सांगून पायावर कुर्‍हाड मारून घेतली.आता
पश्चाताप करून काय उपयोग? बराच विचार केल्यावर युक्ती सुचली.सिलिंडर आडवे केले,व लहान मुले गाडी गाडी खेळतात तसे ढकलत नेऊ लागलो. संध्याकाळचे वेळी,निर्मनुष्य,शांत सडकेवर सिलिंडर घरंगळल्याचे आवाजाने वेगळेच वातावरण तयार झाले.त्या आवाजाने गाडीवाल्याने झोप मोडली.लगबग केल्याचे दाखवत जवळ आला.तो पर्यंत मी सिलिंडर ढकलत,गाडीचे जवळ आणले होते.'आत्ताच डोळा लागला'.ओशाळून हसत तो म्हणाला. मी बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतो.खूणेनेच सिलिंडर गाडीत ठेवायला सांगितले.
' फाट्यावर सकाळीच आलो होतो, लई उशीर झाला काय झालं?त्याने विचारले. मी  न बोलता सिलिंडर उचलायची खूण केली.दोघांनी उचलून सिलिंडर गाडीत ठेवले.दोरीने बांधले.गाडीला बैल जुंपले.गाडी सुरु झाली,आणि त्याची टकळी ही.'मी सकाळीच येणार म्हणून  पहाटेच बैलगाडी घेऊन फाट्यावर आला होता. फकस्त न्याहारी आणली होती.बैलांची वैरण बी थोडीच आणली .दुपारची भाकर पण खाल्ली नाही.
हाटलीत च्या अन भजी फकस्त घेतली.किती यष्ट्या,
गेल्या.हॉटेल बंद करून हाटेलवाला निघून गेला,शेवटी वाट पाहून पाहून झोपला, झाकड पडल्यावर निघून
जाणार होता',वगैरे वगैरे.निमुटपणे ऐकत होतो.आपली कहानी संपल्यावर,मला उशीर का झाला हे  पुन्हा विचारले. खरंतर सांगायसारखे खूप होते.थकून गेलो होतो,त्यामुळे प्रवासाचा थोडक्यात गोषवारा सांगून ,
सविस्तर हालहवाल घरी व मित्रांना कथन करण्यासाठी राखून ठेवला.त्याचे समाधान झाले नव्हते,त्यामुळे चौकशा सुरूच होत्या.मी जुजबी ऊत्तरे देत होतो.
पाऊण तास गाडीत वाटेवरचे धक्के खात खात एकदाचा गावी पोहचलो.अंधार झाला होता.रस्त्यावर मिनमिनते दिवे लागले होते.आमच्या घरी सिलिंडर येणार ही बातमी गल्लीत आधीच पसरलेली होती.गाडीचा आवाज येताच घरचेच नाही तर गल्लीतील बहुतेक दारे ऊघडली.चेहरे बाहेर डोकावले.अनेकजण गाडीजवळ येऊन,'कसे असते  सिलींडर बघू तरी,' म्हणून जवळ येऊन निरीक्षणकरू लागले.चौकशा सुरू झाल्या.
सिलिंडर उचलून घरात न्यायला पाचसहाजण एकदम पुढे झाले.त्या ओढाताणीत सिलिंडर पडते की काय वाटले.त्यांना कसेतरी आवरून सिलिंडर घरात नेले.
अनेकजण आताच गॅसवरच्या चहाची चव घ्यायला तयार होते.सकाळी बघू असे सांगून सगळ्यांची पाठवणी केली.घरच्यांनाही गॅस सुरू करायची घाई होती.आणि यायला एवढा वेळ का लागला ते जाणून घ्यायचीही.पण माझा थकलेला चेहरा पाहून माझी दया आली.त्यामुळे गॅस सकाळी सुरू करायचे ठरवले.आईने चुलीवरच केलेला चहा घेऊन,प्रवास वर्णन ऐकवले.'स्थळाचा'
उल्लेख तेवढा टाळला.जेवण केले आणि झोपी गेलो.
झोपेत टेम्पो,आणि सिलिंडरचीच स्वप्ने पडत होती. सिलिंडर वर,शेळ्या उड्या मारताहेत.
ड्रायव्हर,क्लिनर,मामा,भाचा ,बापूसाहेब, कमी ,कमीची आई आदी मंडळी टेम्पोत बसली आहेत,मी टेम्पो ढकलत आहे,अशी दृश्ये दिसत होते.बापरे.!पुन्हा टेम्पो! खडबडून जागा झालो.घरीच अंथरुणावर होतो हे लक्षात आल्यावर जीव भांड्यात पडला.सूर्य बराच वर आला होता. गॅस सुरू करायचा होता.काही मित्र पण त्यासाठी घरी आले होते.म्हणून ती मोहीम हाती घेतली.शेगडीला नळी जोडली.पण सिलिंडर जोडायचे कसे?रेग्युलेटरच नव्हते.शोधाशोध केली. सापडत नव्हते.अनेक शंका मनात. बीडलाच राहिले की काय?की टेम्पोत विसरले?की गॅसवाल्यानेच दिले नव्हते.विचार करूनही काहीच आठवेना.रेग्युलेटर सापडले तर  देवाला गुळाची शेरणी वाटायचेह कबुल केले.ब-याच वेळाने,खुंटीवर पिशवीकडे लक्ष गेले आले.त्यात तरी पाहू म्हणून पिशवी काढली तर रेग्युलेटर तिथे!शेवटी एकदाची गॅस जोडणी झाली.गॅस सुरू झाला.गॅसवरचा पहिला चहा.घरच्यांसह सर्वानी घेतला.चव तर आपल्या चहाचीच आहे,असे  काहींचे मत पडले.  काहींना मात्र खूपच वेगळा लागला.गॅसवर केलेले जेवण कसे लागते ते चाखून पाहायची मित्रांची इच्छा होती.परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही.कारण सिलिंडर वाहतूकीचा अनुभव लक्षात घेऊन,गॅसचा वापर फक्त चहासाठीच आणि अगदी अत्यावश्यक असेल तेव्हाच करायचा असा धोरणात्मक निर्णय आम्ही घरच्यांनी घेतला होता.
बाकी गावात पहिलीच गॅस शेगडी आल्याचा आनंद वेगळाच होता.अनेक जण पाहायला येऊ लागले.त्यांच्यासाठी चहा करण्यात आजच सिलिंडर संपते की काय अशी भिती वाटू लागली. मग नुसता गॅस दाखवायचा  व काही महत्वाचे लोकांसाठी चुलीवरच चहा करायचा असे ठरवले. आपणही आपल्याघरी गॅस घ्यायचाच असे स्त्रीहट्ट,होऊ  लागले...काहींनी तसे ठराव पण केले.आलेल्या पैकी अनेकांना सिलिंडर कसे आणले याची हकीकत सांगावी लागलो.ती  स्टोरी ऐकून ऐकून घरातीलच नाही तर मित्रांनाही पाठ  झाली.काही वेळाने माझ्या ऐवजी तेच परस्पर स्वतःची आणखी भर घालून ती स्टोरी  सांगू लागले.सिलिंडर आणणे, हे हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला तेवढे जरी कठीण नाही ,तरी बरेच कठीण काम आहे,आणि ते कठीण काम मी पार पाडले म्हणजे मी  फार युक्तीबाज आणि शक्तीमान पुरुष आहे असे काही लोकांचे मत झाले.ते त्यांनी  चहा घेताना बोलून दाखवले. चहा पिऊन गेलेल्या,आणि गॅसवरचे स्वयंपाकाचा स्वाद घ्यायला उतावीळ असणा-यांपैकी काही नतद्रष्ट मात्र,'हा सगळा फालतूपणा आहे, मुळात गॅसचा वापर शरीराला घातक आहे,तसेच सिलिंडर आणणे चुटकीचे काम आहे,मी बावळट असल्याने एवढा आटापिटा करावा लागला',असे बोलल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले अख्खा दिवस गॅसवरच गेला.दुसरे दिवशी परत जायचे होते.
संध्याकाळी गल्लीतल्या नानूकाकांनी घरी बोलावले.
गॅसची,सिलिंडरची आस्थेने चौकशी केली.मी त्यांना फायदे समजावून सांगितले.पुन्हा एकदा सिलिंडर कसे आणले त्याची उजळणी झाली.नानुकाका,काकू फारच प्रभावित झाल्याचे दिसले.काकांनी काकूंना माझ्यासाठी चहा करायला सांगितले.'काही खायला पण घेऊन ये वकील साहेबासाठी,'असेही वर सांगितले.हे नानूकाका आणि काकी,चिकट म्हणून प्रसीध्द होते.लोक उगीच
बदनामी करतात एखाद्याची,चिवडा खाताना विचार आला.चिवड्याला वास होता,पण शेवटी चिवडा तो चिवडाच की,आणि किती प्रेमाने दिलेला!चहा घेताना,मी परत कधी येणार याची काकांनी चौकशी केली.'येतोय पुढच्या शनिवारी.काही काम आहे का?' चहा चिवड्याला
जागून विचारले.'अरे बरं झालं,ते काय झालं ,हिचा भाऊ आहे ,सप्लाय खात्यात बीडला,माहीत आहेत नं?त्याच्या घरी काम होते." हे ऐकले की मनी  एकदम चांदणेच फुलले.काकूच्या या भावाची स्मार्ट मुलगी कॉलेज मधे होती,ती आठवली.धडधड वाढली.कुठल्यातरी  निमित्ताने तिच्या घरी जायची संधी मिळत असेल तर आणखी काय हवे होते?."जाईन की काय काम आहे सांगा ",मी अधीर होऊन विचारले."अरे त्याने,आमच्या नावे गॅस घेतलाय." काकानी सुरुवात केली."शेगडी अन सिलिंडर येऊन पडलंय त्याच्या घरी.ते इकडे कसे  आणायचा हाच प्रश्न होता.टेम्पोवाला तुझा मित्रच आहे म्हणल्यावर काळजीच नाही.येताना शेगडी अन सिलिंडर तेवढं घेऊन ये तुझ्या मित्राच्या टेम्पोतनं''.काकानी आपले पत्ते उघडे केले.बापरे!म्हणजे पुन्हा टेम्पो,पुन्हा सिलिंडर आणि वर शेगडी ही !
पण आता नाही म्हणणे शक्य नव्हते.मी मुकाट्याने मान हलवली.

            सहा महिन्यानंतर .........

( हे अनेक शिनुमा,शिरीयेल यांच्या सौजन्याने )
     गावात आणि आजूबाजूच्या गावी अनेकांकडे गॅस शेगड्या आल्या.सिलिंडर पुरवठा अर्थातच  बीडहून!
मी,गॅस एजंसीवाले,टेम्पोवाले,यांच्याशी वेगवेगळे  तोंडी करार करुन,टेम्पोतून सिलिंडर वहातूकीचा व ग्रामीण ग्राहकांना पुरवण्याचा बेकायदेशीर पण किफायतशीर जोडधंदा सुरू केला.तो वकीलीच्या कायदेशीर पण तोट्यातल्या धंद्यापेक्षा जोरात चालू लागल्याने,नंतर वकीली हाच जोडधंदा बनवला.
                            नीलकंठ देशमुख .
         
      (समाप्त)

..

,

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults