हळद आणि हडळ - ९

Submitted by देवभुबाबा on 28 July, 2021 - 06:14

हळद आणि हडळ - ९

अमृताने मागे वळून पाहिलं. सावली तिच्या जवळच उभी होती. हसत खेळत दोघीही तिथेच उभ्या राहून गप्पा मारू लागल्या. एव्हाना अमृताचे आई, बाबा आणि आजी गेट जवळून अमृताला आवाज देऊ लागले होते. "चल बाय, नंतर बोलू" असे बोलून हातवारे करत अमृता सावलीचा निरोप घेऊ लागली. या तिघांनाही ती कुणाशी बोलते, काहीच कळत नव्हते. ती एकटीच होती. कुणाशी हसते?, कुणाशी बोलते?, कुणाला हात करते?. म्हणजे अमृता भुतांशी बोलते का? कि तिला भास होतात? सामान्य बुद्धीला न पटण्यासारखे आणि न सुटण्यासारखे कोडे होते ते. या तिघांजवळ येताच पुन्हा ती सामान्य वागू लागली. तिच्या वागण्यावरून एकच स्पष्ट होत होतं, ते म्हणजे कुणीतरी आहे ज्याच्याशी अमृता बोलते, तिला दिसते परंतु इतर कुणालाही "ती" दिसत नव्हती. बाहेरच कुणी पाहिलं तर, एकतर अमृतालाच भूत समजलं असत किंवा वेडी.

दुपारची वेळ होती. मंडप सामानाच्या गाड्या अंगणात लागल्या होत्या. अमृताचे बाबा इतर सामानाची जमवा जमव करण्यात व्यस्त होते. गावातील बाया बापड्या उटणं लावायला जमल्या. घराचा हॉल बऱ्यापैकी भरला होता. लग्नाचा वातावरण आता इथून फुलणार होता. गोंधळ, हसी मजाक, सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद झळकत होता. अवंती, आई आणि आजी मात्र दोन्ही गोष्टी अनुभवत होत्या, "सुखाचे सार आणि दुःखाचे मार". आत्ताची घडी सुरळीत चालले पणं पुढे काय? हि टांगती तलवारच.

उटण्याचा कार्यक्रम झाला. बाहेर मांडव ताणला गेला आणि घर आंगण मांडवाणे सजले., चिलया-पिल्यांच्या खेळण्याने दंगले, बाया-बापड्यांच्या आगमनाने फुलले. या अश्या वातावरणात माणूस सर्व दुःख बाजूला सारून वेगळ्याच आनंदात धावपळीत गुंतला जातो.

बापू कासाराच आगमन झालं. खांद्यावरती बांगड्यांची मांडणी अडकवून त्यावर वेगवेगळ्या रंगांच्या, वेगवेगळ्या डिझाईनच्या, वेगवेगळ्या मापाच्या बांगड्या घेऊन एका हाताने मांडणीचा तोल सावरत, दुसऱ्या हाताने मांडणीचा पट्टा आवरत, घामाने थबथबलेल्या कपाळाने, तोंडात पानाचा विडा चावत, बापू कासार मांडवात आला. अवंती, आजी आणि आईने बायकांना जमवले आणि मांडवातच एका कोपऱ्यात बापू कासार आणि त्याच्या सभोवती बायांची झुंबड बसली.

अमृताने हिरव्या बांगड्या हातात भरल्या. ती बाजूला झाली. मग एक एक करून सर्वच स्रियां, मुलीं, मैत्रिणीं बांगड्या भरू लागल्या. अमृता उठली. मोबाईल मध्ये तिच्या बांगड्यांनी भरलेल्या हाताचा फोटो काढून नवरोबाला पाठविला. नवरोबाने रिप्लाय केला,"व्वा, मस्तच... खूप छान". अमृताने smiley पाठविली.

उन्हाच्या प्रखरतेमुळे मांडव असूनही त्याखाली बऱ्यापैकी प्रकाश होताच. त्यामुळे मांडवाखाली वावरणाऱ्याची सावली स्पष्ट दिसत होती. हातात मोबाईल घेऊन अमृता मांडवात फेऱ्या मारू लागली. तिची सावलीसुद्धा त्याबरोबर तिच्या पाठोपाठ दिसू लागली. फेऱ्या मारण्याच्या ओघातच ती सावलीशी गप्पा मारू लागली. सावलीला लाल रंगाच्या बांगड्या आवडल्या. तिने अमृताला तसं सांगितलं. अमृता पुन्हा त्या घोळक्यात आली आणि लाल रंगाच्या बांगड्या भरण्यासाठी हात पुढे केला. बापू कासाराने अमृताच्या हाताला स्पर्श करताच दचकला. किती हा गरम हात?. तो सहजच बोलून गेला, "ताई, हात खूप गरम लागतोय, ताप आहे अंगात?". बाजूला बसलेल्या शेजारणीने ते ऐकले. अमृताच्या कपाळाला हात लावून पहिला तर ताप नव्हता. बापू कासाराने हाताच्या मापाप्रमाणे लाल रंगाच्या बांगड्या अमृताचा हातात घातल्या, पण काय आश्चर्य? त्याच मापाच्या बांगड्या हातात जात नव्हत्या. थोडा जोर लावून त्याने बांगड्या कश्या बश्या पुढे ढकलल्या आणि बांगड्या फुटल्या. अमृता चिडली," मोठ्या मापाच्या घ्या बांगड्या"

"अहो ताई, हिरव्या बांगड्या भरल्यात, त्याच मापाच्या आहेत ह्या बांगड्यापण, तुम्ही नका काळजी करू. मी करतो बरोबर". बापू कासार.

"तुला सांगितलं नां, मोठ्या घे", अमृताचा आवाज दुहेरी झाला होता. डोळे लाल झाले होते. चेहरा भयंकर क्रोधीत वाटत होता. बापू कासार घाबरला. अमृताची आई सर्व पाहत होती. बायकांच्यात प्रदर्शन नको म्हणून ती पुढे आली. "बापू मोठ्या घ्या हो बांगड्या".

अमृताच्या आईने वेळ सावरली. मोठ्या बांगड्या अलगदपणे अमृताच्या हातात बसल्या. बापू कासार गोंधळला. एकाच हातात दोन वेगवेगळ्या मापांच्या बांगड्या भरण्याचा त्याच्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग. पण त्याला जास्त लोड घेऊन काय करायचं होत? त्याचे पैसे मिळाले आणि तो चालता झाला.

मांडवात गर्दी कमी झाली. आई, आजी आणि अवंती इतर कामात गुंतल्या. अमृता मांडवातच फेऱ्या मारत होती. तिच्या बरोबर तिची सावली सुद्धा आनंदात बागडत होती. "एक शरीर आणि दोन मनं" अशी काहीशी अमृताची अवस्था तरीही दोन्ही मनाच्या इच्छा जपण्याचा तिचा प्रयत्न चालला होता. तिच्यासाठी तीच वागणं खूप सामान्य होत पण इतरांसाठी?

आजची शेवटची रात्र आणि उद्या हळद.....

ती मनातल्या मनात हळदीच्या रात्रीचा विचार करू लागली.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults