मक्का की ' बेक्का ' ? अन्तिम

Submitted by Theurbannomad on 27 July, 2021 - 20:07

कुराणात उल्लेख असल्याप्रमाणे समस्त मुस्लिम जगताला त्यांचा नमाज ज्या दिशेला तोंड करून पढायचा आदेश प्रेषितांनी दिलेला आहे, ती दिशा आहे ' मस्जिद अल हराम ' ची. या शब्दाचा सुयोग्य अर्थ ' काबा ठेवलेलं शहर ' असा नसून पवित्र आणि वर्जित असलेलं स्थान असा होतो. विस्तीर्ण पसरलेल्या पेट्रा शहराला जर मस्जिद अल हराम मानलं, तर या शहराच्या सीमा अधोरेखित करणारे दगड साधेसुधे नक्कीच नसणार....या भागात फेरफटका मारताना गिब्सन यांना या शहराच्या किंवा ' पवित्र जागेच्या ' सीमारेषा सुनिश्चित करणारे विशिष्ट शिलाखंड सुद्धा सापडले आहेत. मक्का शहराच्या ' पवित्र भागाच्या ' सीमा सुनिश्चित करणारे असे कोणतेही शिलाखंड अजूनही सापडलेले नाहीत. पेट्रा शहरातले हे वीस शिलाखंड चाळीस - पन्नास फुटी उंचीचे आणि हत्यारांनी खोबण्या, कोरीवकाम वगैरे केलेले आहेत आणि त्यांची रचना सुद्धा अशी आहे, की त्यांना जोडणाऱ्या काल्पनिक सीमारेषेने खरोखर एक विस्तीर्ण भूभाग अधोरेखित होतो. या शिलाखंडांना ' जिन्न चट्टान ' म्हणून ओळखलं जातं.

आता प्रश्न असा येतो, की इतक्या सुरेख शहराचा त्याग करून पवित्र काबा थेट वाळवंटात हजारो किलोमीटर दूर कशामुळे गेला आणि पुढे कोणत्या कारणाने जुन्या ' मक्केच्या ' आठवणी पुसून टाकून इस्लामी जग आज ज्ञात असलेल्या मक्केला हज यात्रेसाठी जाऊ लागलं...या प्रश्नाचं उत्तरं शोधायला इस्लाम धर्माच्या खलिफापदाचा इतिहास धुंडाळायला लागतो. इस्लाम धर्मात अनेक अंतर्गत कुरबुरी झाल्या, पण ज्या घटनेने या धर्माची शकलं पाडली, ती घटना म्हणजे इस्लामचं दुसरं गृहयुद्ध बऱ्याच अंशी इस्लाम धर्माच्या आज ज्ञात असलेल्या स्वरूपाला लोकांपुढे आणण्यासाठी कारणीभूत ठरलं.

झालं असं, की प्रेषितांच्या मृत्यूंनंतर इस्लाम धर्माची धुरा सांभाळायला खलिफापद जन्माला घातलं गेलं. खलिफा म्हणजे प्रेषितांच्या शिकवणुकीनुसार इस्लामी जगताला दिशा दाखवणारा या धर्माचा सर्वोच्च नेता. या पदावर प्रेषितांनंतर वर्णी लागली प्रेषितांचे सासरे अबू बक्र यांची...पण तेव्हाच्या इस्लामी धर्मीयांमध्ये एक गट असाही होता, ज्यांना प्रेषितांच्या जावई असलेला अली इब्न अबी तालिब हा खलिफापदासाठी योग्य वाटत होता. पुढे या दोन्ही गटांच्या वादावादीत बराचसा रक्तपात झाला आणि अखेर इ.स. ६८० पासून बारा वर्षं या दोन गटांमध्ये गृहयुद्ध होऊन इस्लामची दोन शकलं झाली. या युद्धात एकीकडे होते अब्बासिद, जे प्रेषितांच्या काकांच्या थेट वंशातले होते आणि दुसरीकडे होते उम्मयाद, जे प्रेषितांच्या कुराईश कबिल्यातल्या प्रबळ अशा बानू अब्द - शम्स कुटुंबाच्या वंशजांपैकी होते. अब्बासिद इराकच्या कुफा आणि बगदादच्या भागातून आपलं राज्य चालवत होते, तर उम्मयाद सीरियाच्या दमास्कस भागातून. या दोहोंची गाठ पडली तैग्रिस नदीच्या तीरावरच्या करबला येथे. त्यात उम्मयाद यशस्वी झाले आणि त्यांनी अब्बासिदांचे सर्वोच्च नेते खलिफा अली, त्यांची दोन मुलं हसन आणि हुसेन यांना कंठस्नान घातलं. प्रेषितांच्या थेट वंशातल्या अब्बासिदांची सद्दी या युद्धानंतर काही काळ संपली खरी, पण त्यांना मानणाऱ्या गटातून पुढे ' शिया ' पंथ जन्माला आला आणि उरलेल्यांना ' सुन्नी ' पंथीय म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पण या सगळ्या घटनेआधी अब्बासिद आणि उम्मयाद भिडले होते ते एका वेगळ्याच कारणामुळे...आणि तेही इस्लामच्या स्थापनेनंतर केवळ आठ दशकांच्या अवधीत.

इस्लामच्या स्थापनेच्या नंतर साधारण ऐंशी वर्षाच्या काळात ' मक्केच्या ( म्हणजेच बहुदा पेट्राच्या ) ' शहराचा शासक होता अब्दुल्ला इब्न झुबेर. उम्मयादांनी मक्केच्या ( की पेट्राच्या ) ' mother of all cities ' च्या महत्वाला अव्हेरून दमास्कसला इस्लामी जगताचं सर्वाधिक महत्वाचं शहर म्हणून वर आणण्याचे चालवलेले प्रयत्न त्याला पसंत नव्हते. या सगळ्यामुळे इब्न झुबेर याने इस्लामी जगताच्या तोवरच्या संकेतांना झुगारून स्वतःला ' खलिफा ' म्हणून घोषित केलं. यावरून पुढे इब्न झुबेर ( म्हणजेच अब्बासिद ) आणि उम्मयाद यांच्यात जुंपल्यावर या इब्न झुबेरने एक विचित्र गोष्ट केली. त्याने ' काब्यावर ' - म्हणजेच पवित्र भूमीवर स्थित असलेल्या प्राचीन देवतांच्या मूर्त्यांवर हातोडे घालून त्या मूर्त्या जमीनदोस्त केल्या आणि पवित्र काळ्या दगडाला म्हणजेच ' हजर - अल - अस्वाद ' ला एका लाकडी चौकटीत डकवून आपल्या बरोबर ठेवलं. या घटनेने संतापून उम्मयादांनी अब्बासिदांवर हल्ला करून युद्धाला सुरुवात केली, पण अचानक दमास्कसला उम्मयादांच्या बाजूचा खलिफा याझिद मृत्यू पावल्यामुळे खलिफापदाचा पेच निर्माण होऊन उम्मयाद दमास्कसला परतले.

याझिदच्या मुलाची खलिफापदी वर्णी लागली खरी, पण केवळ चाळीस दिवसात त्याचीही हत्या झाली. या घटनेला अनुसरून हे अनुमान नक्कीच लावता येतं , की आज ज्ञात असलेलं मक्का शहर म्हणजे खरं मक्का नसावं, कारण मक्का ते दमास्कस हे जवळ जवळ दीड हजार किलोमीटर अंतर उम्मयाद सैन्याने तेव्हाच्या सैन्याच्या आवाक्यात असलेल्या सर्वाधिक गतीनेही पार करायला साठ - सत्तर दिवस सहज लागले असते...पण याझिदच्या मुलाची हत्या झाली तेव्हा तर उम्मयाद सैन्य दमास्कसला परतलेला असल्याचं स्पष्ट वर्णन कुराणात आहे. शिवाय दमास्कस येथून खलिफा वारल्याची वर्दी आणण्याची कामगिरीसुद्धा संदेश वाहकांना पार पाडायला वेळ लागला असणारच....परंतु पेट्रा ते दमास्कस हे अंतर मात्र केवळ साडेचारशे किलोमीटर असल्यामुळे वेळेची गणितं अचूक जुळून येतात.

इस्लामच्या तत्कालीन घटनांची सालावार नोंद अल तबारी या इस्लामी व्यक्तीने करून ठेवलेली आहे. डॅन गिब्सन त्याच्या या नोंदींमध्ये एक विशिष्ट घटना अधोरेखित करतात. अल तबारी याने इस्लामच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या एकोणसत्तर वर्षांच्या घाटनाक्रमाच्या नोंदी सालानुसार केलेल्या आहेत. या नोंदी त्याने जवळ जवळ पंधरा पृष्ठ भरतील इतक्या दीर्घ मजकुराद्वारे केल्या आहेत...पण बरोब्बर सत्तराव्या वर्षाच्या नोंदी अतिशय त्रोटक आणि कमीत कमी शब्दांमध्ये त्याने ' उरकल्या ' आहेत. या नोंदींमध्ये दिसून येणारी एक महत्वाची गोष्ट अशी, की या वर्षी इब्न झुबेरने ' मक्केला ' बऱ्याच मोठ्या संख्येने उंट, घोडे आणि खेचर आणले होते. या प्राण्यांचा उपयोग लढाईव्यतिरिक्त सामान वाहून न्यायलाही होतो. तबारीच्या नोंदींमधून बाकीचा मजकूर पुढे नष्ट केला गेला की त्याने स्वतःच तो लिहिला नाही, हे कळायला मार्ग नाही पण या विचित्र नोंदीवरून हे नक्की समजून येतं, की उम्मयाद सैन्य परत दमास्कसला गेल्यावर इब्न झुबेरने आपल्या ' मक्का ' शहराच्या लोकांना आणि मालमत्तेला सुरक्षित स्थानी पोचवण्याचा हालचाली केल्या होत्या.

यापुढच्या वर्षीच्या नोंदींमध्ये तबारी असं लिहितो, की इब्न झुबेर याने उम्मयाद पुन्हा हल्ला करणार नसल्याचा मागोवा घेऊन काबा पुन्हा एकदा ' बांधून ' काढायचा निर्णय घेतला....पण तबारीने ती जागा काही नमूद केलेली नाही. या सगळ्याचा गिब्सन यांनी असा अर्थ काढला आहे, की आपल्या संभाव्य पराभवाचा विचार करून किंवा युद्धात पवित्र ' मस्जिद - अल - हराम ' चा विध्वंस व्हायची भीती असल्यामुळे इब्न झुबेर याने काबा आणि पवित्र काळा दगड थेट अरबस्तानच्या आतल्या भागात दूरवर नेला असावा. जिथे त्याने हा काबा पुन्हा एकदा उभारला, ती जागा म्हणजे आज सौदी अरेबिया देशातला मुस्लिम समाज ज्या जागेला ' काबा स्थित असलेलं पवित्र शहर ' मानतो ते मक्का हे ठिकाण. मूळच्या मक्केहून - म्हणजेच बेक्का खोऱ्यातल्या पेट्रा शहरातून मस्जिद अल हराम त्याने अशा प्रकारे थेट वाळवंटात दूरवर नेऊन सुरक्षित केलं आणि ' मक्का ' अचानकपणे पुढच्या पिढीसाठी इस्लामी जगताचं सर्वोच्च महत्वाचं स्थान बनलं.

आपल्या या सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ डॅन गिब्सन काही महत्वाचे घटनाक्रम नमूद करतात. पुढे उम्मयाद जेव्हा इब्न झुबेरवर पुन्हा चालून आले, तेव्हा ते पूर्ण तयारी करूनच आलेले होते. त्यांनी बरोबर आणलेल्या भल्या मोठ्या गोफणी मोठमोठाल्या जड दगडांचा मारा करण्यास सक्षम होत्या, ज्यांना मॅनजीनी या नावाने ओळखलं जातं असे. इब्न झुबेर आणि अल हज्जाज या दोहोंमध्ये तुंबळ युद्ध झालं आणि इब्न झुबेर पराभूत झाला....पण या युद्धाने ' मस्जिद अल हराम' ची पेट्रा शहरामधली जागाही नष्ट झाली. या नंतरच्या काळात इस्लामी जगतात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असावं, कारण प्रार्थना करण्याची दिशा कोणती यावरून त्यांच्यात अर्थातच गोंधळ उडाला. मूळच्या पेट्रा शहराच्या दिशेने प्रार्थना करावी की नव्याने प्रस्थापित झालेल्या काब्याच्या शहराकडे - मक्केकडे तोंड करून या द्विधा मनस्थितीत अडकलेल्या या काळातल्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तरं शोधलं.

दमास्कसच्या उम्मयादांना पेट्राकडे तोंड करून नमाज पढायची सवय होती, पण ते त्या काळात विशेष भूभागावर पसरलेले नव्हते. इब्न झुबेरच्या बाजूचे अब्बासिद - जे इराक आणि पूर्वेकडच्या वाळवंटी भागात राज्य करत होते, त्यांना मात्र या ' उपऱ्या ' उम्मयादांचा राग आलेला होता...त्यांनी मुद्दाम आपापल्या भागातल्या मशिदींची तोंडं नव्या काब्याच्या दिशेला वळवली. त्यासाठी नव्या काब्याच्या भागावर त्यांनी आपलं राज्य प्रस्थापित केलं आणि मशिदीच्या नमाज पढण्याच्या बाजूला दिशा स्पष्ट व्हावी म्हणून ' मिहराब ' तयार करायला सुरुवात केली. या काळातच अब्बासिदांच्या प्रदेशातल्या जुन्या मशिदींची तोंडं आजच्या सौदी अरेबियाच्या मक्का शहराकडे वळवली गेली. पुढे खलिफा उथमान यांच्या काळात तर मदिनेतल्या मशिदीत सुद्धा प्रार्थक करण्याच्या दिशेला भिंतीत खिळे ठोकून सूचना लावल्या गेल्या होत्या. या सगळ्यातून झालं असं, की मशिदीच्या स्थापत्यरचनेत मिहराब अविभाज्य झाला आणि उम्मयाद - अब्बासिद यांच्यात हाडवैर निर्माण होऊन शेवटी ते विकोपाला गेलं.

या काळात अब्बासिदांनी अरबस्तानच्या वाळवंटी भागावर - आजच्या सौदी अरेबिया, आखाती देश, ओमान , येमेन भागावर , लेव्हन्ट देशांच्या भागावर आणि उत्तर आफ्रिकी देशांवर आपला अंमल प्रस्थापित केला, तर उम्मयाद थेट स्पेन, पोर्तुगाल, मोरोक्को, अल्जीरिया अशा दूरच्या भागात जाऊन स्थिरावले. इस्लामच्या स्थापनेनंतर शंभर वर्षांनी बांधल्या गेलेल्या काही मशिदीचा अभ्यास केल्यावर या तर्काला पुष्टी मिळते....उदाहरणार्थ, दक्षिण सीरियाच्या भागात बसरा येथे इस्लामच्या स्थापनेनंतर १०२ वर्षांनी बांधली गेलेली मशीद ना पेट्राकडे तोंड करून बांधलेली आहे, ना जेरुसलेमकडे ना मक्केकडे. सीरियाच्याच पाल्मारा भागात उम्मयादांनी बांधलेल्या कसर - उल - शर्की महालाचीही तीच गत झालेली दिसते. या महालाच्या मशिदीचं तोंडही भलत्याच दिशेला आहे. डॅन गिब्सन जॉर्डनच्या अम्मान शहरात असलेल्या उम्मयाद महालाकडे ( ज्याला सीताडेल म्हणून संबोधलं जातं ) घेऊन जातात, ज्यात जुनी मशीद पेट्राच्या दिशेला आणि त्यानंतर बांधलेल्या महालाच्या आतल्या प्रार्थना करण्याच्या खोलीचा मिहराब आणि त्या अनुषंगाने तो अक्खा महाल मक्केच्या दिशेला तोंड करून एकाच परिसरात उभे दिसतात.

याच काळात प्रथमतः मक्का शहराचा उल्लेख लिखित स्वरूपातल्या साहित्यात यायला सुरुवात झाली. मक्का शहराला अचानक महत्व प्राप्त होऊ लागलं आणि त्यानंतरच्या इस्लामी जगताचं लक्ष या वाळवंटातल्या रुक्ष गावाकडे जायला लागलं. परंपरावादी उम्मयाद आणि बंडखोर अब्बासिद यांच्यात आता इस्लाम वाटला गेलेला होता. पुढे याच वादातून अब्बासिद खलिफा अल मन्सूर याने बगदादला आपल्या साम्राज्याची राजधानी बनवून तिथे वर्तुळाकार रचनेत अतिशय सुरेख आणि सुबक अशी शहररचना केली. अर्थातच या शहराच्या मशिदीच्या किबलाची दिशा मक्केकडे होती.

या काळात उम्मयादांनी स्पेन, पोर्तुगाल आणि आफ्रिकेच्या उत्तर - पश्चिम भागात चांगलीच प्रगती केलेली होती. तिथल्या सुरुवातीच्या काळातल्या मशिदी पेट्राच्या दिशेला तोंड करून बांधलेल्या होत्या, पण डॅन गिब्सन यांनी अधिक खोलात जाऊन तपास केल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला....कारण तिथे काहीतरी वेगळाच प्रकार घडलेला दिसत होता. तिथल्या नंतरच्या काळातल्या मशिदीच्या प्रार्थनेची दिशा पेट्रा आणि मक्का या दोहोंच्या बरोब्बर मधली होती. याचा अर्थ त्यांनी असा काढला, की तिथल्या उम्मयाद शासकांनी पेट्रा किंवा मक्का या दोहोंचं महत्व अमान्य केलेलं होतं !

या सगळ्या संशोधनानंतर डॅन गिब्सन यांनी काही महत्वाचे सिद्धांत मांडले -

१. पेट्रा म्हणजेच इस्लामच्या पवित्र ' मस्जिद - अल - हराम ' चं स्थान असून याच जागी पूर्वीच्या काब्याची जागा होती. कुराणात वर्णन केलेल्या प्रेषितांच्या जन्मस्थानाचे वर्णन पेट्राच्या परिस्थितीशी जुळणारं आहे, मक्केच्या परिस्थितीशी नव्हे!
२. इस्लामच्या स्थापनेनंतर शंभर - एक वर्षं लिखित स्वरूपात विशेष काही कामं झालेलं नव्हतं, परिणामी प्रेषितांच्या आणि इस्लामच्या सुरुवातीच्या काळचा इतिहास काहीसा अस्पष्ट आहे...परंतु कुराणात उल्लेखलेल्या घटनांचा कालानुरूप घटनाक्रम लावल्यावर अनेक विसंगती पुढे येतात ज्यावर उत्तर शोधण्यासाठी इस्लामच्या इतिहासाचा अधिक खोलवर अभ्यास होणं आवश्यक आहे.
३. पेट्राचा विध्वंस होण्यासाठी नैसर्गिक आपत्ती आणि इब्न झुबेरसारख्या आक्रस्ताळी शासकाचा वेडेपणा कारणीभूत ठरला आणि पुढे या जागेची कधीही न भरून निघालेली हानी झाल्यामुळे तीच ऐतिहासिक महत्व कालौघात नष्ट होतं गेलं.
४. आजच्या मक्का शहराचं महत्व तिथे स्थित असलेल्या काब्यामुळे आहे, अन्यथा हे शहर इतिहासात कुठेही महत्वाचं शहर म्हणून नमूद केलेलं नाही.
५. इस्लामिक शासकांनी ज्या ज्या भागांवर आक्रमणं केली, त्या त्या भागात त्यांनी विध्वंस घडवून आणला. त्या विध्वंसात त्यांनी त्या त्या भागातल्या जुन्या पुस्तकांची, हस्तलिखितांची आणि वास्तूंची हानी केली, ज्यामुळे बरीचशी मूल्यवान माहिती नष्ट झाली. पुढे अब्बासिद - उम्मयाद संघर्षात अब्बासिदांनी बाजी मारल्यावर त्यांनी आपल्या सोयीच्या ' इस्लाम ' चा प्रसार करून मक्केला इस्लामी जगताचं केंद्र बनवलं. आज ज्ञात असलेल्या इस्लामी इतिहासात बराचसा भाग या अब्बासिदांच्या हस्ते लिहिला गेलेला भाग आहे.

या लेखमालेचा शेवट करताना डॅन गिब्सन यांनी उद्धृत केलेल्या काही ओळी सांगणं संयुक्तिक ठरेल. ते म्हणतात, की धर्माचा चष्मा उतरवून इतिहासकारांचा चष्मा लावला, की बऱ्याच घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो आणि आपण इतिहासाच्या त्याचं मजकुरांमधून नवे अर्थ लावण्यास उद्युक्त होतो. त्यांच्या या संशोधनामुळे इस्लामी जगतात काही प्रमाणात नाराजीचे सूर उमटले तरी नव्या दमाच्या अरब इतिहासकारांनी या विषयावर नव्याने संशोधन सुरु केलेलं आहे, हेही नसे थोडके ! पुढे जाऊन इस्लामच्या इतिहासाचे नवे पैलू समोर येऊ शकले, तर नक्कीच या संशोधनाचा फायदा सगळ्यांनाच होईल...पण तोवर वाचक म्हणून आपण डोळसपणे कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन अंगी भिनवावा हीच माझी सगळ्यांना विनंती असेल. असाच एखादा नवा विषय घेऊन पुन्हा एकदा नव्या लेखमालेसह मायबोलीवर व्यक्त होईन, पण तोवर अलविदा !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली संपुर्ण लेखमाला.
बरीच नवीन माहीती कळली, मनापासून धन्यवाद ह्या लिखाणाबद्दल.

छान. तुमच्या लेखमाला कायमच वेगळ्या आणी उत्कंठावर्धक असतात. बहुसंख्यवेळा "आधी माहित नव्हते" या प्रकारातल्या.

कोईभी चीज हमेशा कायम नही रहती !!!!!

तरीपण माणसाला उगाच फालतुचे गर्व असतात.

छान लेखमाला. विशेषतः इस्लाम सारख्या कट्टर आणि परंपरावादी धर्मात इतकं लॉजीकल संशोधन करणं हेच मला विशेष वाटतं!

पण मला नेहमी एका गोष्टीची नवल वाटते...की ज्यू अथवा ख्रिस्ती अथवा इस्लाम हे धर्म तुलनेने किती नवे आहेत! यांच्या स्थापने च्या वेळच्या भिंती आणि गुहा आणि मंदिरं अजून आहेत!
आपला हिंदू धर्म तर फारच प्राचीन! आपल्याकडे युगं आहेत...... सत्य, त्रेता, द्वापार, कलीयुग..... असे देवतांचे 'अ‍ॅट अ‍ॅक्च्युअल्स' मंदिरं, चबुतरे.. वगैरे नाहीत आपल्याकडे !

माहितीपूर्ण लेखमाला!
एक प्रश्न असा पडतो की पैगंबरांना प्रेषितावस्था प्राप्त झाल्यानंतरच अब्राहम आणि इतरांशी संबंध जोडला गेला का?
पैगंबरांचे पूर्वज अब्राहम आणि इतर प्रेषितांना मानत होते का? मग ते ज्यू लोकांसारख्या चालीरीती आचरणात आणत होते का? कारण बहुसंख्य अरबी लोक बहुतेक अनेकेश्वरवादी होते (इस्लामपूर्व काळात).

@ विवेक
पैगंबर प्रेषित म्हणून ओळखले जातात ते त्यांना देवाने दिलेल्या दृष्टांतामुळे. त्यांच्या आधी त्या भागातले अरब कोणत्याही धर्माला मानणारे नव्हते, तर ' पेगन ' पद्धतीच्या धार्मिक रचनेचे पाईक होते. या रचनेत अनेक वेगवेगळ्या स्थानिक ' ग्रामदेवता ' पुजल्या जायच्या. प्रत्येक टोळीचा एक विशिष्ट ' देव ' असायचा.

अरब, ज्यू आणि ख्रिस्ती धर्माच्या अनेक चालीरीती अजूनही सारख्याच आहेत - उदाहरणार्थ सुंता, एकेश्वरवाद, एका ईश्वराला आणि एका धर्मग्रंथाला मानणं, ईश्वराच्या स्वरूपाला असणारा विरोध वगैरे वगैरे. इस्लामपूर्व काळात अरबस्तानात विशिष्ट असा धर्म नव्हता, जी पोकळी प्रेषित मोहम्मदांनी इस्लामच्या स्थापनेने भरून काढली.

संपुर्ण लेखमाला आवडली. बरीच नवीन माहिती मिळाली. अनेक धन्यवाद!
प्रेषितांनी पेट्रा शहराला ' मस्जिद अल हराम ' ('पवित्र आणि वर्जित असलेलं स्थान') ठरवण्यामागे तिथे काबा चे अस्तित्व आहे म्हणुन असु शकेल का? कारण काबा इस्लामपुर्व काळा पासुन पवित्र होतेच की. तसे असेल तर आजच्या मक्केला ' मस्जिद अल हराम ' ( ' काबा ठेवलेलं शहर म्हणुन 'पवित्र आणि वर्जित असलेलं स्थान' ) ठरवणे बरोबर असु शकेल...?

पेगन ' पद्धतीच्या धार्मिक रचने मधे आपापसात कसे संबंध असायचे? रोटी बेटी व्यवहार वगैरे? ह्या विस्कळीत रानटी टोळ्या एकछत्राखाली आणण्याचे काम ज्यू धर्मापासून चालू झाले.......

@ रांचो

काबा हे स्थान इस्लामच्या स्थापनेच्याही आधीपासून होतं. ही अशी जागा होती, जिथे पेगन देवतांची पूजा व्हायची. गिब्सन यांचा सिद्धांत हाच की काबा आधी पेट्रा शहरात होता आणि पुढे तो आत्ताच्या मक्का या ठिकाणी नेला गेला.

@ आंबट गोड

पेगन पद्धत सुसूत्र कधीच नव्हती. तेव्हाचा समाज टोळ्यांमध्ये विखुरलेला होता आणि त्या त्या टोळ्यांचे आपले देव होते. त्याबरोबर व्यापारासाठी ते फिरत फिरत जिथे म्हणून जात तिथले देव ते पूजत. तेव्हा रोटीबेटी व्यवहार टोळ्यांमध्ये आपापसात होत आणि बरेचदा लढायांमध्ये पराभूत टोळ्यांमध्ल्या स्त्रिया गुलाम म्हणून जेते आपल्या पदरी घेत.

हा काला चबुतरा खूप उंच आहे का? वर चढता येते का? काय सिग्निफिकंस आहे याचा? ते तर कुठल्याच प्रतीकाला मानत नाहीत...

@आंबट गोड

काळा चबुतरा खूप उंच आहे. त्याला दरवाजा सुद्धा आहे. असं मानलं जातं, की त्या चबुतऱ्याच्या आत जुन्या पेगन देवतांचे भग्नावशेष आहेत.

धन्यवाद Theurbannomad.
गिब्सन यांची documentary पाहीली. ह्या लेखमालेमुळे बरेच मुद्दे समजणे सोपे गेले.

पेगन अशी कुठली एक पद्धत नव्हती. प्रत्येकाचे देव वेगळे. भारतातही तसंच होतं/आहे. ख्रिस्ती धर्माचा प्रसार व्हायला जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा तो किंवा ज्यू धर्म (जे जवळपास आहेत) सोडून बाकी त्यांना आढळलेल्या धर्म किंवा देव मानण्याच्या पद्धतींना त्यांनी सरसकट पेगन असं नाव दिलं. पेगन ह्या शब्दाचा मूळ अर्थ गावठी/अडाणी वगैरे होतो. त्यावेळी इतर टोळ्यांप्रमाणे वेद मानणाऱ्या टोळ्या जरी त्या लोकांना माहिती असत्या तरी त्यांनाही ते पेगन म्हणाले असते. 'आपली विचारसरणीच काय ती योग्य, बाकी सगळे गावठी' अश्या विचारातून ह्या संकल्पनेचा जन्म झाला असावा.

तुमचे बरेचसे लेख आत्ता वाचले. वेगळ्याच मातीचा सुगंध आहे आपल्या लिखाणाला. अलग मिट्टीकी भिनी भीनी खुशबू. मस्त आहे. कीप इट अप.

हे गिब्सनचे व्विडियो मी पुर्वी युट्युब्वर पाहिले होते.
लेख मस्त झाला आहे!

इस्लामचा काबाचा जो दगड आहे त्यात सर्व टोळ्यांचे देव बंद करुन ठेवलेत असे पण म्हणतात. या सर्व टोळ्यांनी आपापसात भांडणे थांबवुन एकेश्वर वाद स्वीकारावा म्हणुन असे केले अशी गोष्ट मी पुर्वी ऐकली होती. सोमनाथची जुनी पिंडीपण काबाला पाठवलेली असे मी ऐकले होते.
यात खरे खोटे माहित नाही.

बायबल वर पण अशी एक छान डॉक्युमेन्ट्री आहे ज्यात बायबलच्या देवाचे नाव एल आणि देवीचे अझरा असे सांगितले आहे. हा संदर्भ पुढे कमी करण्यात आला असे म्हणतात.
(ही गोष्ट ऐकल्यावर माझ्या मनात विचार आला होता की आपल्याकडे कशी गुणीराम, सखाराम नावे असतात तशीच मायकेल डॅनियेल नावे असावित.)
गंमत म्हणजे हा एल देव एकदम आपल्या इन्द्रा सारखा वज्र घेउन पाउस पाडणारा देव होता.

काल रात्री काही नवं वाचायला मिळतं का ते पहायला लेखांचा विभाग उघडला तेव्हा हा अंतिम भाग आधी दिसला. मग आधीचे सगळे भाग शोधून काढले आणि वाचले. मोबाईलवरून वाचत असल्याने प्रत्येक भागावर प्रतिसाद द्यायचं टाळलं. म्हणून आज सगळ्या भागांवर एकच प्रतिसाद देतेय. फार आवडली ही लेखमालिका. खूप काही नवं समजलं. डॉक्युमेंटरी शोधून काढून नक्की पाहेन. हे असं इंटरेस्टींग लिखाण करत राहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.