मक्का की ' बेक्का ' ? - भाग ०६

Submitted by Theurbannomad on 27 July, 2021 - 17:46

डॅन गिब्सन यांच्या या दाव्यांवर सगळ्यात आधी प्रश्नचिन्ह उभं झालं, ते ' मुहम्मद इब्न इस्माईल अल -बुखारी ' यांनी लिहिलेल्या ' साहिह अल - बुखारी ' च्या माध्यमातून. हे बुखारी आजच्या उझबेकिस्तानमधल्या बुखारा शहरातले प्राचीन सुन्नी इस्लामिक विचारवंत. प्रेषित मोहम्मदांच्या मृत्यूच्या २०० वर्षानंतर त्यांनी लिहिलेल्या या ग्रंथाला आजही सुन्नी इस्लामिक अभ्यासक सगळ्यात अस्सल ' हदीथ ' च्या रचनांचा दर्जा देतात. त्याव्यतिरिक्त त्यांनी अल - अदब अल - मुफराद नावाचा इस्लामिक जगताच्या अतिशय महत्वाच्या ग्रंथांपैकी एक मानला जाणारा ग्रंथही लिहिला. त्यांनी त्यांच्या ' हदीथ ' मध्ये लिहिल्याप्रमाणे इस्लामिक जगताच्या धार्मिक केंद्रांपैकी सर्वाधिक महत्वाच्या केंद्राचा दर्जा ' जेरुसलेम ' ला दिलेला आहे. त्यांनी तो दर्जा मक्केला दिला नसला, तरी पेट्रालाही दिलेला नाही.

डॅन गिब्सन या आक्षेपावर अतिशय तर्कशुद्ध उत्तर देतात. त्यांच्या मते, इस्लामच्या किबल्याच्या दिशेत फेरफार प्रेषितांच्या महानिर्वाणानंतर शंभर वर्षांच्या कालावधीत झाला आहे, तर बुखारी यांच्या हदीथची रचना त्याच्याही नंतर १०० वर्षांनी झालेली आहे...म्हणजेच बुखारी यांनी आपल्या डोळ्यांनी काहीही बघणं अशक्य आहे. त्यांच्या आणि त्या काळातल्या इस्लामच्या अनेक लिखित स्वरूपातल्या साहित्यात सतत ' बक्का ' हे नाव पुढे आलेलं आहे. आजवरच्या इस्लामिक अभ्यासकांनी या उच्चाराचाच ' मक्का ' असा पुढे अपभ्रंश झाला असा निष्कर्ष काढून मक्केला ' किबला ' चं स्थान मानलं आहे, पण याच नावाच्या अगदी जवळच असूनही ' बेक्का ' हे नाव त्यांनी अव्हेरलं आहे.

याचबरोबर त्यांनी काब्याच्या इतिहासावरही बोट ठेवून काही महत्वाची माहिती पुढे आणली आहे. मुळात प्रेषित मोहम्मदांच्या आधी काबा हा पवित्र शिलाखंड कधीही पूजला जात नव्हता...तर काबा हे नाव एका अशा पवित्र स्थानाला उद्देशून दिलं गेलं होतं, जिथे प्राचीन टोळीवाले अरब आणि इतर लोक पूजत असणारे वेगवेगळे देव स्थानापन्न होते. ' बक्का ' हे नाव मूळचं यहुदी आहे, ज्याचा अर्थ विलाप करणं असा होतो. कुराणाप्रमाणे या अर्थाची सांगड थेट हेगरच्या त्या विलापाशी घातली जाते, जो तिने आपल्या तहानेने व्याकूळ झालेल्या लहान मुलासाठी केला होता आणि त्यानंतर स्वर्गदूताने तिला ' झमझम ' द्वारे पाणी उपलब्ध करून दिलं होतं. जेरुसलेम या भागात हेगरने विलाप करण्याचा प्रश्नाचं येत नव्हता, कारण मुळात तिला तिथूनच अब्राहमने घालवून दिलेलं होतं....आणि केवळ वादविवादासाठी तिने जेरुसलेम येथेच विलाप केला असं गृहीत धरलं तरी तिथे तिला पाण्याची किंवा अन्नाची कमी भासून ती रडली हे तर्कसुसंगत ठरत नाही...काहीही झालं तरी खुद्द अब्राहमची ती बायको आहे हे तिथल्या सगळ्यांना माहित असल्यामुळे कोणी तिला मदत करायला कधीही तयार झालं असतं....याशिवाय भौगोलिक दृष्ट्या किबल्याचं स्थान डोंगरांच्या पायथ्याशी खोऱ्याच्या प्रदेशात आहे असं कुराणात स्पष्ट लिहिलेलं आहे...आणि जेरुसलेम डोंगरांच्या वरच्या पठारी भागात आहे. या सगळ्या पुराव्याच्या आधारे किबला जेरुसलेमच्या दिशेला असल्याच्या दाव्यालाही सबळ विरोध करता येतो.

बक्का म्हणजे आटा माहित असलेली ' बेक्का खोऱ्याची जागा ' असं गृहीत धरलं, तर अनेक गोष्टी आपोआप जागच्या जागी येऊन थांबतात. प्रेषित मोहम्मदांच्या जन्माच्या पंधरा - सोळा वर्षं आधी बेक्का खोऱ्याच्या भागात जबरदस्त भूकंप आल्याची नोंद अनेक प्राचीन साहित्यात आहे. या भूकंपामुळे या भागात हाहाक्कार झाला होता आणि इथली अनेक प्राचीन मंदिरं पडून ध्वस्त झाली होती असाही उल्लेख त्यात मिळतो. या प्रलयंकारी घटनेमध्ये तिथे स्थापित असलेल्या अनेक देवी-देवतांच्या मंदिरांची दुर्दशा झाल्यामुळे पुढे त्या सगळ्या देवतांच्या अवशेषांचं पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न झाले आणि ते अवशेष ज्या शिलाखंडावर एकत्र केले गेले, तो शिलाखंड म्हणजेच आज मक्केत प्रस्थापित केला गेलेला काब्याचा पवित्र शिलाखंड आहे असं डॅन गिब्सन ठामपणे सांगतात. त्यांच्या या दाव्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे असं वाटत, कारण त्यातून बऱ्याचशा अनुत्तरित प्रश्नांची समाधानकारक तर्कशुद्ध उत्तरं आपोआप सापडतात.

डॅन गिब्सन यांना आता अदेल शेमारी यांनी उपस्थित केलेला एक महत्वाचा प्रश्न सोडवायचा होता...तो म्हणजे, जर बेक्का किंवा मक्का म्हणजे आज ' पेट्रा ' या नावाने ओळखलं जाणारं जॉर्डन देशातील प्राचीन शहर आहे तर प्रेषित इथेच जन्माला आले असं मानावं लागेल...आणि जर ते खरं असेल, तर त्यांच्या कुराईशी कबिल्याच्या आणि ' बानू हाशिम ' घराण्याच्या खुणा पेट्रा येथे असायला हव्या....गिब्सन यांनी या प्रश्नाचं उत्तरं शोधलं आजच्या ' हुमैमा ' शहरात. आजच्या जॉर्डन देशाच्या दक्षिण भागात पेट्रापासून दक्षिण दिशेला ४५ किलोमीटर अंतरावर हे शहर आहे, जे पूर्वी हवारा या नावाने ओळखलं जाई. इथे अब्बासिद परिवाराची संपत्ती असलेल्या एका प्रशस्त ' फार्म हाउस ' च्या भग्नावशेशांमध्ये गिब्सन यांना त्या खुणा सापडल्या.

हे अब्बासिद म्हणजे प्रेषितांच्या काकांचे - अब्बास इब्न अब्दुल मुतालिब यांचे वंशज. हे अब्बास मुतालिब इस्लामच्या इतिहासातले तिसरे खलिफा. थेट मुहम्मद पैगंबरांच्या वंशाचे हे अब्बासिद इराकच्या कुफा आणि बगदाद भागातून आपलं राज्य चालवायचे. उम्मयाद आणि अब्बासिद या प्रेषितांच्याच दोन वंशजांमध्ये पुढे झालेल्या भीषण युद्धातून शिया आणि सुन्नी असे दोन पंथ निर्माण झाले...पण महत्वाची बाब अशी, की दमास्कसच्या उम्मयादांना हरवण्यासाठी बगदाद - कुफाच्या अब्बासिदांनी जेव्हा प्रयत्न केले, तेव्हा त्यांनी प्रेषितांच्या ज्या थेट वंशजांना आपल्या बाजूने उभं राहण्याचं आवाहन केलं, ते वंशज पेट्राच्या बाजूच्याच हुमैमा येथे होते, दक्षिणेच्या हजार - दीड हजार किलोमीटर दूर मक्का येथे नव्हे.

प्रेषित मोहम्मदांच्या जन्माच्या कहाणीतही पेट्राच्या खुणा ठळकपणे शोधता येतात. या जन्मकहाणीनुसार प्रेषितांचे वडील अब्दुल्ला शेतातून घरी आले, तेव्हा त्यांच्या हाताला लागलेल्या मातीमुळे त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना स्वच्छ होऊन येण्यास सांगितले.... का कुणास ठाऊक, पण ते हात - पाय धुवून गेले ते त्यांच्या दुसऱ्या पत्नीकडे - अमीना हिच्याकडे. त्यांच्यात तेव्हा जे संबंध आले, त्यातून मोहम्मदांचा जन्म झाला. या प्रसंगाचं जे वर्णन प्रेषितांच्या इतिहासकारांनी केलं आहे, त्यात स्पष्टपणे त्यांनी अब्दुल्ला यांच्या हाताला लागलेल्या मातीच वर्णन ' शेतातली सुपीक माती ' अशा अर्थाच्या अरबी शब्दाने केलेलं आहे. आजच्या मक्केच्या आसपास कृषी जमीन दूरदूरपर्यंत सापडत नाही....आणि तशी ती तेव्हाही नव्हती हे तिथल्या मातीच्या नमुन्यांच्या विश्लेषणातून सिद्ध झालेलं आहे. पण अशी जमीन पेट्रा येथे आजही आहे. ' मक्केत ' ( की बेक्का येथे ) पाण्याचे झरे आहेत आणि त्यांचं पाणी गावात मातीच्या वाहिन्यांमधून आणि कालव्यांमधून खेळवलं गेलं आहे हे वर्णन आजच्या पेट्रा शहराचा फेरफटका मारताना प्रत्यक्ष बघायला मिळतं. इथल्या मातीच्या नमुन्यात शेतीलायक अनेक पोषक घटक मिळतात. येथे मुबलक प्रमाणात फळांची लागवड व्हायची आणि अजूनही होते.

७०४ AD या साली जन्मलेला इब्न इशाक हा इस्लामी जगतातील एक मोठा नावाजलेला लेखक. त्याने प्रेषितांच्या जीवनचरित्रासाठी अनेक माहितीपर लेख जमवले आणि संकलित केले. त्याने लिहून ठेवल्याप्रमाणे मक्का हे चहूबाजूंनी भिंतींनी सुरक्षित केलेलं शहर असल्याचा उल्लेख मिळतो. पण एके ठिकाणी तो असंही लिहितो, की मक्का तटबंदीचं शहर नाही...या दोन उल्लेखांमध्ये विरोधाभास असला, तरी डॅन गिब्सन याचा वेगळा अर्थ लावतात. त्यांनी पेट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला, की भिंतींनी सुरक्षित शहर म्हणजे अशी जागा, जिच्या आजूबाजूला असलेल्या उंच डोंगरांनी नैसर्गिकरित्या त्या शहराला ' भिंत ' पुरवलेली आहे. रहित राहिला प्रश्न तटबंदीचा, तर ते असा दावा करतात की दोन डोंगरांच्या मधल्या जागेत तत्कालीन लोकांनी शहर सुरक्षित करण्यासाठी डोंगराच्या एका बाजूकडून विरुद्ध दिशेच्या डोंगरापर्यंत संरक्षक भिंत उभारली. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ ते या भागात फिरले तेव्हा त्यांना या दाव्याला बळकटी देणाऱ्या अनेक पुरातन खाणाखुणा सापडल्या.

काही इस्लामिक अभ्यासकांनी गिब्सन यांच्या दाव्याला खोडून काढण्यासाठी एक महत्वाचा मुद्दा पुढे केला. दोन्ही बाजूंना डोंगर आणि मध्ये दरी अशा भूरचनेत ती दरी आजूबाजूच्या उंच भागातून वाहात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग म्हणून काम करते. अशा जागी एक प्राचीन शहर असणं आणि तेही ' मक्का ' सारखं अतिमहत्वाचं हे काही तर्काला पटत नाही...पण गिब्सन यांच्याकडे त्याचंही उत्तरं आहे. या भागात आलेल्या अनेक भूकंपांमुळे इथल्या डोंगरांची आणि उतरणीच्या भागांची अशी रचना झालेली आहे, की दोन बाजूंच्या डोंगरांमध्ये खोल भेगा तयार होऊन नैसर्गिकरित्या पाणी त्या भेगांमधूनच एका डोंगराकडून दुसऱ्या डोंगराच्या दिशेने वाहू शकेल. ही प्रवाहाची दिशा बरोब्बर दरीच्या दिशेच्या काटकोनात तयार झालेली होती, जेणेकरून पाण्याचे प्रवाह दरीतून कधीच वाहत नव्हते.

इस्लामच्या मान्यतेनुसार मक्केची यात्रा करणाऱ्यांना दोन डोंगरांच्या मधल्या भागातून सात वेळा जावं लागतं. या दोन डोंगरांची नाव आहेत ' मारवाह ' आणि ' साफा ' . अल बुखारी यांनी त्यांच्या लिखाणात या दोन डोंगरांचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात की प्रेषितांना या दोन डोंगरांच्या मध्ये जमा होतं असलेल्या पावसाच्या पाण्यातून जायला खूप आवडत असे. आजच्या मक्केच्या मस्जिद - अल - हराममध्ये मारवाह आणि साफा म्हणून जे दोन उंचवटे दिसतात, ते जेमतेम पंधरा फूट उंचीचे आहेत. त्यांच्या मधल्या भागात पावसाचं पाणी साठेल आणि त्यातून चालण्याचा आनंद कोणाला अनुभवायला मिळेल ही कल्पना अतिशयोक्तीपूर्ण वाटते, परंतु पेट्रा येथे दोन बाजूंच्या उंचच उंच डोंगरांच्या मध्ये नैसर्गिक दरी असल्यामुळे येथे पावसाचं पाणी भरपूर साठतं....त्यातून आजही स्थानिक लोक आणि पर्यटक चालण्याचा आनंद घेत असतात.

कुराणात उल्लेख केल्याप्रमाणे प्रेषितांनी मक्का शहरावर जेव्हा विजय मिळवला, तेव्हा त्यांनी या शहरात उंचीवरच्या भागाकडून प्रवेश केला...आजच्या मक्का शहराला ' उंचीवरचा ' भाग असा नाही. हे शहर सपाट वाळवंटात आहे...पण पेट्रा शहराला मात्र एकीकडे उंचीवरचा आणि दुसरीकडे त्यापेक्षा कमी उंचीचा असा भाग आहे. अरबी भाषेत थानिया म्हणजे दोन डोंगरांमधल्या घळीचा भाग. अल बुखारी यांच्या लिखाणात असा उल्लेख आहे, की मक्का शहरात प्रवेश करण्याचा मार्ग ' उंच थानिया ' च्या दिशेने आणि बाहेर पडण्याचा मार्ग ' खालच्या थानिया ' च्या दिशेने आहे....हे वर्णन फक्त पेट्रा शहराला चपखल लागू होतं. आजही इथे येणारे पर्यटक अशाच पद्धतीने शहरात प्रवेश करतात आणि तिथून बाहेर पडतात. खालच्या ' थानिया ' च्या भागातून बाहेर पडल्यावर वळणावळणाची वादी येते आणि पुढे ती विस्तीर्ण पठारी प्रदेशाला जाऊन भिडते, ज्याच्या पलीकडे मृत समुद्र आहे.

इस्लामच्या सुरुवातीच्या काळातला धर्मपरिवर्तन करून मुस्लिम झालेला प्रसिद्ध मनुष्य म्हणजे ' अल तुफाईल '. याची गोष्ट अशी आहे, की याने जेव्हा धर्मपरिवर्तन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याच्या पत्नीनेही त्याच्याबरोबर धर्म बदलायचा निर्णय घेतला. त्याने तिला घरातून बाहेर जाऊन ' दुशारा ' च्या मंदिरात जाऊन तिथे टपकत असलेल्या पाण्याने स्वतःला स्वच्छ करून येण्याची आज्ञा दिली आणि त्यानंतरच तिने आपल्याबरोबर इस्लामच्या शिकवणुकीबद्दलची माहिती ऐकायला बसावं असा आग्रह केला. आजच्या मक्केपासून हे मंदीर हजारो किलोमीटर लांब आहे...तेव्हा एक तर ही कहाणी कपोलकल्पित मानायला हवी किंवा मक्का म्हणून जे स्थान आज मानलं जातं ते चुकीचं समजायला हवं हे स्पष्ट होतं. विशेष म्हणजे हे दुशारा मंदीर पेट्रा शहरात आहे !

गिब्सन यांना अजून एका गोष्टीची उकल करायची कामगिरी पार पडायची होती...आज ' हिरा डोंगर ' म्हणून प्रसिद्ध असलेला मक्केपासून जवळ स्थित डोंगर इस्लामी जगतासाठी अतिशय पवित्र मानला जातो, कारण या डोंगरातल्या एका गुहेत प्रेषितांना स्वर्गदूताने दृष्टांत दिल्याची कहाणी कुराणाच्या पवित्र संदेशाच्या मुळाशी आहे. जर हा हिरा डोंगर पेट्राच्या आसपास असेल, तर ती गुहा सुद्धा तिथेच असायला हवी...गिब्सन यांनी एका महत्वाच्या विसंगतीकडे लक्ष वेधून इस्लामी अभ्यासकांना हे दाखवून दिलेलं आहे, की हिरा डोंगराबद्दलही कुराणात लिहिलेल्या गोष्टी काहीशा वेगळ्या आहेत. कुराणात लिहिल्याप्रमाणे हा डोंगर मक्केच्या शहराच्या वरच्या भागाकडे असून त्यात मक्केच्या दिशेला तोंड असलेली ती पवित्र गुहा आहे आणि हे वर्णन भौगोलिक दृष्ट्या सध्याच्या मक्केच्या आणि गुहेच्याही भूरचनेशी जुळणारं नाही....पण पेट्रा शहरात आल्यावर मात्र अशी गुहा सापडते. इथल्या वरच्या भागातल्या डोंगरात गिब्सन यांना एक वैशिष्ट्यपूर्ण गुहा सापडलेली आहे, जिच्या आतल्या भागात भिंतींवर अनेक भौगोलिक आकृत्या कोरलेल्या आहेत. या आकृत्या इस्लामपूर्व देवतांच्या आकृत्या आहेत, ज्यांच्यात चंद्रकोरीपासून आयताकृती खोबणीपर्यंतचे अनेक आकार दिसून येतात. या गुहेचा तोंड अगदी शहराच्या प्रवेशद्वाराच्या दिशेला आहे....कुराणात वर्णन केल्याप्रमाणे !

सरतेशेवटी गिब्सन आपल्या या शोधाच्या पुष्ट्यर्थ एक असाही पुरावा सादर करतात, त्याच्यावरून आज पेट्रा या नावाने ओळखलं जाणारं स्थान खरं मक्का आहे, यावर विश्वास बसण्यासारखी परिस्थिती निर्माण होते...पण त्यावर पुढच्या लेखात. तोवर अलविदा !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप भारी झालीय ही लेखमाला.यावर रिसर्च झालेला इस्लामिक धर्माच्या मोठ्या लोकांना खपला का?कारण त्यात सध्याच्या मक्का मदिना यात्रेचा पूर्ण गाभाच बदलतो आहे. सौदीतले मक्का, हाज यात्रा यावर बरेच ट्रॅव्हल आणि फायनान्शियल मार्केट अवलंबून असेल.त्याचे काय होईल?

मह्त्वाचा प्रश्न असा की मग सद्यकालीन मक्का मक्का होण्याचे कारण काय ? ह्याचा ही उलगडा पुढे होईल असे धरूया सध्या Happy

@ mi_anu
हा असाच गहजब इस्राएलच्या गुहांमध्ये ' डेड सी स्क्रोल्स ' मिळाल्यावर झाला होता, ज्यातून येशू ख्रिस्त आणि मेरी मग्देलिन यांच्यापासून येशूची पवित्र ' ब्लडलाईन ' पुढे सुरु राहिल्याचा निष्कर्ष काढलेल्या संशोधकांना परंपरावादी कट्टर ख्रिस्ती लोकांनी भरपूर शिव्या घातल्या होत्या. शेवटी धर्म हा विषय नाजूक असतो हेच खरं !

तुम्ही अनु, हे संशोधन अजूनही सर्वमान्य नाही. संशोधकांचं म्हणणं आहे की त्यांनी धर्ममार्तंडांना त्यांचे मुद्दे खोडून काढण्याचं आव्हान दिलं होतं पण कुणी स्वीकारलं नाही. दुसऱ्या बाजूचे लोक म्हणतात की ह्यांनी ठराविक गोष्टींच्या आधारावरच हे संशोधन मांडलं आहे. त्याच्याशी अन्य अनेक पुरावे आणि घटना जुळत नाहीत. त्यामुळे काही अंशी तथ्य वाटलं तरी पूर्णपणे स्वीकारावी इतकी विश्वासार्हता त्या संशोधनात नाही.

@ हरचंद पालव
इतिहासाविषयी केलेलं संशोधन सर्वमान्य कधीच होत नसतं. एक तर इतिहास आणि धर्म हा विषय खूप नाजूक आणि त्यात थेट मक्का हा विषय एका बिगर मुस्लिम व्यक्तीने घेतलेला....

एक नक्की, की गिब्सन यांच्या दाव्यांवर प्रतिदावे तितकेच शास्त्रशुद्ध नाहीयेत. गिब्सन चुकत असेल तरी त्यांच्या तथ्यांमधल्या चुका सप्रमाण दाखवून देणं अपेक्षित आहे.

हे गिब्सनचे व्विडियो मी पुर्वी युट्युब्वर पाहिले होते.
लेख मस्त झाला आहे!

इस्लामचा काबाचा जो दगड आहे त्यात सर्व टोळ्यांचे देव बंद करुन ठेवलेत असे पण म्हणतात. या सर्व टोळ्यांनी आपापसात भांडणे थांबवुन एकेश्वर वाद स्वीकारावा म्हणुन असे केले अशी गोष्ट मी पुर्वी ऐकली होती. सोमनाथची जुनी पिंडीपण काबाला पाठवलेली असे मी ऐकले होते.
यात खरे खोटे माहित नाही.

बायबल वर पण अशी एक छान डॉक्युमेन्ट्री आहे ज्यात बायबलच्या देवाचे नाव एल आणि देवीचे अझरा असे सांगितले आहे. हा संदर्भ पुढे कमी करण्यात आला असे म्हणतात.
(ही गोष्ट ऐकल्यावर माझ्या मनात विचार आला होता की आपल्याकडे कशी गुणीराम, सखाराम नावे असतात तशीच मायकेल डॅनियेल नावे असावित.)
गंमत म्हणजे हा एल देव एकदम आपल्या इन्द्रा सारखा वज्र घेउन पाउस पाडणारा देव होता.