१४ फेब्रुवारी ३०००

Submitted by सामो on 27 July, 2021 - 11:36


१४ फेब्रुवारी ३०००


नॅव्हिगॉर ने ऑफिसच्या आलिशान आणि अतिभव्य अशा प्रांगणा मध्ये प्रवेश केला आणि भर्रकन मिनी विमानातून त्याने ३ मैलावरील त्याची त्याची क्युबिकल गाठली. पिक अवर नसल्याकारणाने आज ट्राफिक कमी होता. स्वत:च्या डोममध्ये जाउन त्याने आधी स्वत:च्या सॉकेटमध्ये चार्जर खुपसला व बॅटरी जसजशी चार्ज होउ लागली तसतसा तो देखील रिलॅक्स होउ लागला. खर तर गेल्या २ आठवड्यापासून विचार करकरून त्याची RAM , ओव्हरलोड होउन अगदी थकून गेली होती. बॅटरी पार ड्रेन झाली होती. त्याची क्युबिकल अतिशय सुसज्ज होती.त्याची सेक्रेटरी रोज विविधरंगी निऑन ची फुले व्यवस्थित लाउन ठेवा. तशी रीतच होती इथली पृथ्वीवरली. तो जेथून आला होता त्या युरेनसवर अशी फुले वगैरे लावण्याची पद्धत नव्हती. तिथे त्याच्यासारख्या यंत्रमानवंना फक्त स्वत:चे वेगवेगळे अवयव, वेगळे काढून चार्ज करता येत असत. हवे तर आभासी वास्तव खोलीत जाउन मनोरंजन करता येई. मग त्याला कधी शुक्रावरची स्त्री तर कधी मंगळावरचा मासा कधी प्लुटोवरचा पक्षी तर कधी पृथ्वीवरचा मानव देखील बनता येई व तसा विचार करता येई, तसा अनुभव सिम्युलेट करता येई, अन्य खेळाडूंबरोबर हा खेळ खेळता येई. हेच मनोरंजनाचे साधन असे. त्यामानाने पृथ्वी अजून मागेच होती. गेले १५ दिवस अभ्यास करकरुनही नॅव्हिगॉरला मानवांच्या भावना व व्यवहार पल्ले पडत नव्हते. तो काय एका मानवाला मागणी घालणार डोंबल. आणि याच विचारांनी त्याची RAM परत परत ओव्हरलोड होत होती. त्याला तो दिवस नीट स्मरणात होता जेव्हा त्याची आणि मानव - यंत्रमानव यांचा संकर एलिक्झिरा ची गाठ पडली.

१ जानेवारी २९९९


युरेनसवरून आलेले यान पृथ्वीवरील वातावरणाचा स्तर छेदुन पृथ्वीवरती उतरले. पृथ्वीवरील मानव व अन्य यंत्रमानव हे नॅव्हिगॉरला तसेच त्याच्या साथीदारांना अगत्याने प्रयोगशाळेत घेउन काय गेले. पण पृथ्वीवरील ओझोनयुक्त ऑक्सीजन मुळे जिथे अन्य युरेनसवासी टवटवीत झाले तिथे नॅव्हिगॉर मात्र आजारी पडला. त्याची बॅटरी वेगाने ड्रेन होउ लागलीच पण दिवेदेखील मिणमिणु लागले. त्याचे धातूचे स्नायू कुरकुरू लागले तर काही चक्क जॅम झाले. एक एक करून दिव्यांचा फ्युझ जाउ लागला आणि सर्व जण काळजीत पडले. अशा वेळी एलिक्झिरा ची अमूल्य मदत झाली. एलिक्झिराने नॅव्हिगॉरची फक्त देखाभालच केली नाही तर नवीन बॅटरी व दिवे बसविले. स्नायुंमध्ये वंगण घातले, लोहचुंबके बदलली. नॅव्हिगॉरला हुरूप आला जणू पुनरुज्जीवनच मिळाले
आणि नॅव्हिगॉर, एलिक्झिरा च्या प्रेमात पडला. युरेनासवरती गेल्यानंतर तो पार बदलूनच गेला होता. त्याच्या मॉनिटर वरती झरझर आकडे जात असताना मध्येच मानवी आकृती दिसू लागल्या. नॅव्हिगॉरची ऑपरेटिंंग सिस्टीम अधिक कार्यक्षम झाली. मध्येच त्याच्या व्हॉइस-कमांड सॉफ्ट्वेअर मधून हाय-लो-हाय-लो पीचाचे विशिष्ठ फ्रिक्वेन्सी चे स्वर उमटू लागले. जे फक्त त्यालाच ऐकू येत होते अन्य कोणीही त्या स्वरांबरोबर रेझोनेट होत नव्हते. नॅव्हिगॉर कधी नव्हे ते कामात चुकू लागला.

१ जून २९९९


सहा महीन्यातून सर्व यंत्रे, यंत्रमानव हे मुख्य यंत्रणेला जोडले जात व त्यांचे इन्टिग्रेशन होत असे. या इन्टिग्रेशन मध्ये तृटी शोधल्या जात, दूर केल्या जात अनेक फन्क्शन्स तसेच पॅरॅमीटर्स हे पूर्ववत रिसेट केले जात. नवीन नवीन कॉन्स्टन्ट्स टाकून करून एकंदरीत संपूर्ण यंत्रणा अधिकाधिक कार्यक्षम केली जाई. आणि जुनी यंत्रे , कॅल्क्युलेटर्स रद्दबातल केले जात. या एवढ्या मोठ्या व अचूक प्रकल्पात नॅव्हिगॉर मधील तथाकथित बिघाड लक्षात आला नसता तरच नवल होते. नॅव्हिगॉर च्या बिकट अवस्थेवाराती उपाय म्हणून नॅव्हिगॉरलाच पृथ्वीवर पाठवायचे शेवटी ठरले.

१ जानेवारी ३०००


पृथ्वीवर आल्याआल्या नॅव्हिगॉरने झडझडून कामास सुरवात केली. सर्वात प्रथम त्याने माणसाच्या मेंदूतील घडामोडी समजण्याकरता मेंदू व मानसशास्त्र विषयावरील बरीच आणि खूप पुस्तके पटापट स्कॅन करून घेतली व तो अभ्यास करू लागला. बर्‍याच गोष्टी त्याच्या यांत्रिकी बुद्धीस आकळेनात जसे - माणूस सुखातही रडतो तसाच दु:खाताही का रडतो? मग त्याला सुख झाले आहे की दु:ख झाले आहे हे कसे ओळखायचे? फुले ही आनंदाच्या प्रसंगी भेट दिली जातात तशीच दु:खाच्यादेखील. माणसाला काही काही वेळा शब्दाहून मौन जवळचे वाटते तर कधी मौनाने गैरसमज वाढतात. हे सर्व क्लिष्ट चढ-उतार-खाचा-खळगे त्याला विलक्षण अवघड वाटत होते.

परत १४ फेब्रुवारी ३०००


पण आज त्याने जमेल तशी एलिक्झिरा ला मागणी घालायचीच असे ठरविले होते. त्याने सेक्रेटरीला विश्वासात घेउन काही गोष्टी जाणून घेतल्या होत्या जसे - निऑन ची फुले व चॉकलेट्स भेट दिली तर उत्तम प्रभाव पडण्याची शक्यता २०% अधिक आहे. त्यात जर एलिक्झिराने खाली मान घातली, जमिनीकडे पाहिले तर ही शक्यता जास्त आहे की तिला तो आवडला आहे. पण अर्धी यंत्रमानव असल्याने तिने व्यवस्थित होकार दिला तर फारच चांगले. उभे राहून मागणी घालण्यापेक्षा, त्याने गुडघ्यावर बसून तिला मागणी घातली तर तिला आवडण्याची शक्यता ३३.२ % ने अधिक वाढते. हातात हात घेतला तर एलिक्झिराला आवडू शकते किंवा नावडूही शकते ५०-५० त्यामुळे त्याचे ठरत नव्हते की तिचा हात हाती घायचा की नाही.
शेवटी सकाळी १० वाजता खुद्द उत्सवमूर्ती एलिक्झिराने त्याच्या ऑफिसात प्रवेश केला. खरं तर नेहमीप्रमाणे ती नॅव्हिगॉरच्या डागडुजीकरता ती आली होती. पण या काही दिवसात त्याला कशा प्रकारच्या डागडुजीची आवश्यकता आहे ते नीट तिला कळले होते. तिलादेखील अर्धी यंत्रमानव असल्याने हा युरेनसवरचा नॅव्हिगॉर आवडला होता. तिच्या आकडेमोडीनुसार आज तो तिला मागणी घालण्याची शक्यता ८१.९% होती. पण तिनेच त्याला आश्चर्याचा धक्का द्यायचे ठरविले होते. आश्चर्याचा धक्का म्हणजे तिने आल्यावरती नॅव्हिगॉरला काहीही बोलू न देता एक क्लिष्ट कोडे घातले. व ते त्याने १ मिनिटे ४ सेकंदात पूर्ण करताच, त्याचा हात हातात घेउन अभिनंदन केले. तिनेच त्याला एक लोहचुंबकिय नवीन हृदय दाखवून त्याला सांगितले की ही तिची त्याला भेट असून जुने हृदय काढून ती हा नवे हृदय बसवणार आहे. हे सर्व नॅव्हिगॉर करता अद्भुत होते त्याच्या यांत्रिकी हृदयाचे बरेचसे दिवे उघडझाप करून आनंद व्यक्त करू लागले. यावरती कळस म्हणजे एलिक्झिराने त्याला मिठी मारून बायनरी प्रश्न विचारला -

समजा {(क्ष) तुझ्यावर (अबक) करते == हो
. तर (य) (क्ष) वर (अबक) करते/तो का?}
क्ष=मी
य=तू
अबक=प्रेम
जर उत्तर = हो तर एलिक्झिरा नॅव्हिगॉर बरोबर युरेनसवर जाइल
जर उत्तर = नाही तर (एलिक्झिराने हा प्रश्न विचारला हे U एलिक्झिराचे प्रेम) ती विसरून जाइन. ..... U=युनिअन

आता नॅव्हिगॉरचा आनंद डोममध्ये मावेना. त्याने तत्काळ उत्तर "हो" असे दिले, व दोघे काही दिवसातच युरेनसवरती रवाना झाले.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगली कथा आहे. सायन्स फिक्षन जॉनर अवघड आहे लिहायला. तुम्ही ह्या कथेचा अ‍ॅनिमेशन पट किंवा शॉर्ट फिल्म छान बनवू शकाल.
वाचा लोक्स. वेगळी व गोड कथा आहे.

अमा खूप आभार.
@बोकलत धन्यवाद.
@देवभुबाबा - चिट्टी? म्हणजे?

३००० साली स्वत:च्या सॉकेटमध्ये चार्जर खुपसला >> प्रयत्न चांगला आहे, पण कल्पनाविलास कमी पडला.

चांगली आहे गोष्ट.
रोबोट मधे नाही का चिट्टी रोबो सना च्या प्रेमात पडतो..ते म्हणायचं असेल देबांना..