हळद आणि हडळ - ८

Submitted by देवभुबाबा on 27 July, 2021 - 06:05

हळद आणि हडळ - ८

तिकडे किर्रर्र काळोखात रात्रभर शोधूनही देवभुबाबांची भेट काही झालीच नाही. पहाट होईतोवर मंदिरामध्ये पोहोचून थकलेल्या, घाबरलेल्या, चिंतीत, व्याकुळ अवस्थेत अमृताचे बाबा देवासमोर उभे राहिले. मंदिरात कुणीतरी येण्याची चाहूल लागताच मंदिराची देखभाल करणारी एक वृद्ध आजी आवाज देतच तेथे आली. "कोण आलय तिकडे? एवढ्या पहाटे येण्याचं कारण"

अमृताच्या बाबांनी मागे वळून पाहिलं. बोलण्याची इच्छा झाली नाही. देवासमोर हात जोडून, डोळे बंद करून ते मनातच देवापुढे गाऱ्हाणे मांडू लागले. "देवा, महादेवा .... लग्न तोंडावर आलंय, त्यात हे न पेलवणारे संकट माथी मारलंय, काही चुकलं माकल आसलं तर माफ कर, पणं हे संकट लवकर परतायला हवं".

वाऱ्याची गार झुळूक मंदिरात येत होती. त्या झुळुकीबरोबरच देवासमोर लावलेला दिवा मंद मंद झुलत होता. आणि एक अस्पष्ट असा खुळखुळ्यांचा आवाज कानापर्यंत पोहोचत होता. आजी त्या काळोख्या उजेडातच चाचपत पुढे आली. अमृताच्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली,"संकट कितीही मोठं असल तरी, देवभुबाबांना मारलेली हाक व्यर्थ जाणार नाही. संकेत दिलेत म्हणजे ते योग्य वेळेवर कोणत्या ना कोणत्या रूपात येतीलच. तुम्ही निश्चिन्त होऊन घरी जा."

पहाट होईतोवर अमृताच्या खोलीतील गडबड शांत झालेली. रात्रभराच्या जागरणाने घाबरून, जीव मुठीत धरून देवघरात बसलेल्या तिघीही तिथेच पेंगू लागल्या. कोंबडे आरवण्याच्या आवाजाबरोबरच गायी म्हशींच्या हंबरण्याचा आवाज, गाव जागं होत असल्याची ग्वाही देत होते.

सकाळचे ७ वाजले असतील, अमृताचे बाबा घरी पोहोचले. दरवाज्याचा खटखट आवाज येताच आजीला जाग आली. अवंती आणि तिच्या आईला गडबडीने उठवत ती दार उघडायला आली.

रात्रभराच्या जागरणाने लाल झालेले अमृताच्या बाबांचे डोळे आजीची अवस्था पाहून भरून आले. देवभू बाबा सोबत आलेले नाहीत हे पाहून आजीची निराशा झाली, पण देवभुबाबांचे मिळालेले संकेत "डुबत्याला काठीचा आधार" होते. पुढे काय करायचं, काहीच नियोजन नव्हतं. तेवढ्यात अमृताच्या खोलीचा दार कडाडला. नेहमीसारख्याच अविर्भावात अमृता उठून बाहेर आली. "बाबा, माझ्यासाठी काय आणलय?" अमृताचे बाबा तिच्याकडे पाहतच राहिले. तोच तिने आजीला आवाज दिला."आजी, आज नाश्त्याला काय बनवणार?"

आजीसुद्धा तिच्या सर्वसाधारण वागण्याने चकितच झाली. पहाटेपर्यंत जीव मुठीत धरायला लावणारी ती हि नक्कीच नाही. आजीला वाटले काहीतरी चमत्कार झाला. देवभुबाबांनी हाक ऐकली असेल. अमृताच्या बाबांचाही तोच समज झाला. सुटकेचा निश्वास सोडावा आणि मनावरचे ओझे हलके व्हावे तसा दीर्घ श्वास घेत सर्वांचे चेहरे उजळले.

अमृताचे बाबा निघून गेले. आजीने सर्वांसाठी घावणे आणि खोबऱ्याची चटणी बनवली. अमृता ने तयारी केली, नाश्ता केला आणि बाहेर जायला निघाली. आजी अजूनही तिच्यावर लक्ष ठेऊनच होती.

"अमृता, आता कुठे गं जातेस? लग्न जवळ आलंय, आता बाहेर फिरू नकोस" आजी म्हणाली.

"आजी, आलेच जरा. घरी फेरी मारून येते". अमृता म्हणाली.

"घरी म्हणजे? आणखी कोणता घर" आजी.

"आजी, येते गं जरा जाऊन" अमृता आजीचे बोलणे तोडत, घाईतच निघाली. आजीला धक्काच बसला. ती अमृताच्या आई बाबांना आवाज देऊ लागली. अमृता काही क्षणातच तारासाहेबांच्या बंगल्यासमोर गेली. तिने मागे वळून पाहिलं. अमृताचे बाबा, आई आणि आजी तिला थांबायला सांगत होते. अमृताने मंद स्मित केलं आणि कर्रर्रर्र कर्रर्रर्र आवाज करत गेट उघडून ती तारासाहेबांच्या बंगल्याच्या आवारात दाखल झाली.

गुलमोहराच झाड लाल फुलांनी बहरला होता. झाडाखाली फुलांचा सडा जमिनीवर लाल शालू पांघरून पसरला होता. झाडावर चिमण्यांची चिवचिव जणू अमृताचे अनेक वर्ष्यानंतर त्या परिसरात मानवी पाऊल पडल्याचे स्वागत करत होते. अमृताच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. दोन्ही हात फैलावून, मान उंचावून, डोळे विस्फारून ती आकाशाकडे पाहू लागली. वाऱ्याच्या हलक्या सरीबरोबर लाल फुलांचा वर्षाव तिच्यावर होऊ लागला. निसर्गसुद्धा तिच्या अर्धवट ईच्छा पूर्ण होण्यासाठी तिचे जणू कौतुक करत असावे.

"अमृता, ये गं, ये ना आत" अमृताला मागून आवाज ऐकू आला.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@Rani_1, @लावण्या
धन्यवाद

@लावण्या... तुमच्या प्रतिक्रिया सकारात्मक असतात. आणि आवर्जून वाचता त्याबद्दल धन्यवाद