राधा-कृष्ण

Submitted by सामो on 26 July, 2021 - 09:58

अन्यत्र पूर्वप्रकाशित
-----------------------------------

खुळीबावळी राधा भोळी तिला कसे कळावे, कपटी श्रीरंगाच्या मनीची कुटील कारस्थाने.
संधीसाधू तो नसता कोणी,अवचित येऊनी मागे, करकमलांचा पाश घालुनी कानी गोड कुजबुजतसे.
.
सांग राधीके एकांती या भलत्या वेळी, आलीस ना तू भेटाया मज भीडभाड सोडोनी
का मग हा खोटा दुरावा,लटके दूर लोटणे,वाटे का मी देऊन टाकीन फुका तुझी वसने
.
कोणीही ना येथे केवळ आपण एकांती, आतातरी विसरशील का खोटी जगरीती
क्षणभर डोळे भरुनी मजला तुला पाहू दे ना, देतो मग मी तुझी वसने हे माझे वचन तुला
.
जो पुरुषोत्तम वसे जनी, मनी, कायी अंतर्यामी, त्या कृष्णाने राधेला का केली ही विनवणी,
काय असे तिजपाशी असे जे श्रीरंगाला हवे, काय असे ते तिने लपविले जे त्याला मोह पडे
.
षटऐश्वर्ये युक्त असे जरी कमलेचा कांत, गुपीत त्याचे सापडेल राधेच्या भक्तीत
ना राधा ना कृष्ण अनन्य नाते हे जाणा, भक्तावाचून जगी ना ऊरे विश्वाचा राणा
_____________
अजुनी नाही फुटली
पूर्वेला लाली,
राधा गोरी चंचल,
यमुना स्नानास्तव आली
.
स्वप्न रात्रीचे आठवुनी
मोहरली काया,
कवेत घेई श्रीरंग
पुरते रंगुनी टाकाया
.
सूर वेणूचे उमटले
तिच्या पुनःपुनः हृदयी,
ऊर धपापत होता
कोमल, मधुर आवेगी
.
असह्य होई राधेला
मग मदनाचा दाह,
जपू लागली मनात
ती श्रीरंगाचे नाव
.
यमुनाजळ काळे तिजला
कृष्णासम भासे,
काळ्यायमुने स्पर्शालागी
मन वेडे आसुसे
.
अंगावरची वस्त्रे सुटली,
अंबाडा सुटला,
कंचुकीचे उरलासुरला
बंधही मग तुटला

पुढचे येत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेखच ग
मला हे सुचले (शेवटचं कडवं रिॲरेंज करून)

अंगावरची वस्त्रे सुटली,
सुटला अंबाडा
कंचुकीचा उरलासुरला
बंधही मग तुटला

जळातला कृष्ण सावळा
चहुबाजुंनी वेढी
नेसवी वसने
चिर प्रेमाची तिजला

दोघांमधले फिटले अंतर
जीवशिव भेट
जणु साकारे
द्वैता मधले अद्वैत!

चू भू द्या घ्या