हळद आणि हडळ - ७

Submitted by सुर्या--- on 26 July, 2021 - 07:17

हळद आणि हडळ - ७

संध्याकाळ झाली. अवंती अमृताच्या खोलीत आली. खोलीचं बदललेलं स्वरूप पाहून ती बिथरलीच. तायडी एवढं काम एकटी कस करू शकते?. दुपारपर्यंत तर ती बाहेरच होती. आणि हे काय? तिला न आवडणारे कपडे पण बाहेर का काढलेत? बेडची जागा का बदलले? माझे फोटो कुठे गायब झाले? तायडीला न आवडणारे पैंटिंग्स ईथे कसे? डोक्यात एक ना शंभर प्रश्न. ती काहीच बोलली नाही. आजी आणि आईला ती अमृताच्या खोलीत घेऊन आली.

आजी आणि आई देखील खोलीचं बदललेलं स्वरूप पाहतच राहिले. अमृताला झोपेतून उठवत आजी म्हणाली. "अमृता, उठतेस ना, बघ किती वाजलेत. जा तोंड हात पाय धुवून घे, चहा झालाय".

अमृता उठली. जोरात आळस देत, विचित्र आवाज काढत, या तिघींनाही न जुमानता ती पडवीत गेली. या तिघीही एकमेकींच्या तोंडाकडे पाहत राहिल्या. "अशी काय हि" रोज नाजूक हावभावाची पोरगी आज एकदमच विचित्र का वागते". आजीने मनातूनच जाणलं. तिने अमृतावर नज़र ठेवली. अवंतीलाही सतर्क केलं. बाहेरची बाधा झाल्याची तिला खात्री झाली होती. लग्न जवळ आलं होत. २-३ दिवसात पाहुणे येणार. मग हळद, लग्न. आणि अश्या वेळेस त्यांच्यासमोर असं विचित्र वागणं शोभेल का? आजीने अवंतीला सांगून तातडीने तिच्या बाबांना बोलावून घेतले.

रात्री उशिरा अमृताचे बाबा घरी परतले. अमृता तिच्या खोलीत एकटीच बोलत होती. अवंती आणि आजीने दाराच्या फटीतून तिचे असे प्रकार पाहिले. बाबांना बाजूला घेऊन त्यांना सविस्तर सगळं प्रकार सांगितला. अमृताच्या बाबांनीही दाराच्या फटीतून अमृताच स्वतःशीच बोलणं, हसण, हातवारे, चेहऱ्याचे हावभाव पाहिले. वेळ न दवडता त्याच रात्री अमृताचे बाबा निघाले देवभुबाबांकडे.
साधारण २ तासांचे अंतर कापून देवभुबाबांना त्या घनदाट अरण्यात शोधायचे म्हणजे दिव्यच. पण वेळ तरी कुठे होता. शिवाय अश्या प्रकाराने लग्नचं मोडलं तर?.
निवडक साथीदार सोबतिला घेऊन अमृताचे बाबा अबा पर्वताजवळील घनदाट अरण्यात पोहोचले. रात्रीचे बारा वाजले होते. इकडे घरात सर्वच चिंताग्रस्त. लग्नाची धावपळ, ते वातावरण आणि तो आनंद पूर्णपणे मावळला. तिघींनाही झोप लागत नव्हती. बाहेर कुणाला सांगायची सोय नव्हती.

पूर्ण गाव झोपी गेलं. सर्वत्र अंधार. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज या भयंकतेला सूर मिळवत होता. घरभर शांतता पसरलेली. घड्याळाच्या काट्यांचा टिकटिक आवाज ऐकू येत होता. तिघीही देवघरात देवासमोर दिवा लावून घरातील सर्व लाइट्स चालू ठेऊन बसल्या होत्या. अवंती आजीला म्हणाली "आजी, गप्प बसून रात्र कधी सरणार, मी मारुती स्तोत्र लावते". आजी घाबरलेली. "अवंती थांब इथेच, आता देवभुबाबा येईपर्यंत कुठेही जाऊ नकोस". अवंती थोडा वेळ शांत राहिली. अमृताच्या खोलीतून मध्ये मध्ये जोराने हसण्याचा, काही आदळ आपट करण्याचा आवाज येतच होता. शेवटी अमृताच्या आईला राहवले नाही. "आपल्याला काहीतरी करायलाच हवे, रात्रभरात तिने काही बरे वाईट केले तर? नाही नाही" अमृताची आई म्हणाली.

तिचे थरथरणारे हात आणि कापरा आवाज अवंतीला मदतीसाठी बोलावत होता. घाबरलेल्या अवस्थेत आवंढा गिळून अवंती आणि तिची आई एकमेकींचा हात धरून उभ्या राहिल्या. हॉल मध्ये चुपचाप येऊन मारुती स्तोत्रं लावला. मारुती स्तोत्रं च्या आवाजाने सावली बिथरली. कर्कश्श आणि विचित्र आवाजाबरोबरच दरवाज्यावर तिने लाथ मारली. मिणमिण करत लाइट्स ये जा करू लागली. धाप लागलेल्या, श्वास फुललेल्या अवस्थेत, धडपडत अवंती आणि तिची आई पुन्हा देवघरात येऊन हळू आवाजात रडू लागल्या.

अमृताच्या खोलीतून पावलांचा, हसण्याचा, बोलण्याचा आवाज अजूनही येतच होता. अवंतीने तिच्या बाबांना फोन लावला. पण त्यांचाही फोन लागला नाही. जंगलात range मिळणारही नव्हतीच. काय करावं काहीच सुचत नव्हते. आणि संकटसमयी वेळ सुद्धा संथ होतेच. एक एक क्षण मनावर ओझे घेऊन, व्याकुळ होऊन त्या देवभुबाबा येण्याची वाट पाहू लागल्या. देवभुबाबा भेटले असतील का? ते निघाले असतील का? आता कुठवर आले असतील? कधीपर्यंत पोहोचतील? आणि आलेच नाहीत तर? अनेक प्रश्न रडवेला मनाला कोंडीत टाकत होते. आता डोकंही सुन्न पडत होते. त्यातच मध्येच मांजरीच्या कर्कश्श ओरडण्याने भेदरलेले मन आणखी चिरत जात होत.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खूपच सहज आणी छान लिहीताय. मला एक प्रश्न आहे. हा जो आय डी तुम्ही घेतलाय ते देवभु बाबा खरच् आहेत का? असतील तर कुठे आहेत? म्हणजे अजूनही आहेत का?

@रश्मी
वाह्ह! खूपच भारी आहे प्रश्न?
माझी पहिली रहस्य कथा "पार्सल एक रहस्य" यातील देवभुबाबा हे एक पात्र. ती कथा वाचकांना आवडली. त्या कथेने मला थोडीफार ओळख मिळाली, लिखाणासाठी आत्मबळ मिळालं, प्रोत्साहन मिळालं आणि मग ठरवलं हे पात्र माझ्या शक्य तेवढ्या कथांमध्ये जिवंत ठेवायचं. शिवाय माझ्या आधीच्या id वर बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आल्या त्यामुळे ते नाव बदलून हेच नाव स्वीकारलं.

आता जरा गती आली कथेला>>>+१
पुढे काय लिहिणार आहात याची उत्सुकता आहे. या कथेला एक छान सकारात्मक वळण देता येईल असं मनात आलं. कथा पूर्ण झाल्यानंतर ते प्रतिसादात लिहीन. आत्ता रसभंग करु इच्छित नाही. Happy
पुभाप्र.

@हाडळीचा आशिक
वाह्ह! कथेमध्ये रमल्यावर आपापल्या कल्पक्तेनुसार वेगवेगळ्या वळणावर कथा नेता येईल नक्कीच.
तुमची कल्पकता वाचायला आवडेल. नक्की कळवा. कदाचित तुमचा आणि माझा कथेचा शेवट सारखाच असेल तर किंवा तुमच्यामुळे कथेला एक दर्जेदार आणि हटके शेवट देता तर?

हो नाव छान आहे. मला वाटले की खरच कोणी साधु वा तपस्वी असावेत. मला गुढ कथा खूप आवडतात. छान चाललीय मालिका.

मलाही असेच वाटले. आयत्या वेळेला भूत उतरवणारे सापडत नाहीत, आपल्याकडे फोन नंबर नसतो, ओळखी नसतात. मग कुणाच्याही ओळखीने आपण भोंदू बाबांकडे जातो. देवभूबाबा नावाचे खरेच कुणी जेन्युईन असतील असे अजूनही वाटत आहे. असतील तर अडीअडचणीच्या वेळी त्यांच्या सेवांचा गरजूंना लाभ व्हावा यासाठी चळवळ उभारली पाहीजे.

असतील तर अडीअडचणीच्या वेळी त्यांच्या सेवांचा गरजूंना लाभ व्हावा यासाठी चळवळ उभारली पाहीजे.>>>>
हे पा, यासाठी मी सुरुवातपण केली हाय. Proud

@रश्मी., @हाडळीचा आशिक, @शांत माणूस, @किल्ली
धन्यवाद . तुमच्या प्रतिक्रिया वाचून लिखाणाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.

@शांत माणूस
तस पार्ट टाइम मी भूत उतरवायचं काम करू शकेन, पण माझी fees तुम्हाला परवडणार नाही. त्यापेक्षा हाडळीचा आशिक आहेत तेच फुकट मध्ये भुतांना वश करू शकतील.

फुकट कोण मागतंय ? पूर्वी ११ रूपये द्यायचे. आता ५१ नाहीतर १०१ घेत असतील तरी चालेल. १५१ असेल तर पैसे उभे करायला वेळ द्यावा ही नम्र विनंती. यापेक्षा जास्त असेल फीस तर क्राऊडफंडींग करू.

@हाडळीचा आशिक
कथेचा शेवटचा भाग प्रसारित केला आहे. तुम्ही काही सकारात्मक शेवट बद्दल सांगणार होते. बघूया तुमच्या संकल्पनेतील शेवट.