मन मावळतीला आले !

Submitted by _आदित्य_ on 25 July, 2021 - 08:14

मन मावळतीला आले.. दुःखाच्या क्षितिजापाशी,
अन उजाडले हलकेसे.. कैवल्यसुखाच्या देशी !

आयुष्य ऊन वाऱ्याचे.. पाऊस अचानक येतो,
जगणे व्याकुळ संध्येला.. एकांत शिकवूनी जातो !

घन आसुसलेले डोळे.. काठावर अनुभूतीच्या,
भरून आले, पणत्या.. विझताना गतजन्मीच्या !

त्या अबोल कातरवेळी.. बोलली पाखरे काही,
आकाशच अपुले घरटे.. आले कळून त्यांनाही !

ही वेळ विरोधाभासी.. सातत्य बांध पदराला,
वाटेवर सत्य अखेरी.. गवसते चालणाऱ्याला !

.. आदित्य

Group content visibility: 
Use group defaults