वन वे टिकिट टू स्पिती भाग ६

Submitted by मधुवन्ती on 21 July, 2021 - 02:42
spiti peak 2

आज लवकर म्हणजे 6 वाजता काझा सोडलं.आज बराच मोठा पल्ला गाठायचा होता,असं म्हणा की पुढे काय कसा रस्ता आहे हे माहीत नसल्यामुळे आम्ही सुखात होतो.
रस्ता अतिशयच सुरेख होता...macanna's gold मधल्या सारखे उभे सोनेरी डोंगर कडे आणि त्यातुन तासुन काढलेली वाट लपंडाव खेळणारी पर्वत शिखरं आणि समोर दिसणारी शेतं आणि घरं! लोसर ह्या गावापर्यंत non stop पोचलो....पहाटे निघाल्यामुळे नाष्ता चहा झालं नव्हतंच त्यामुळे लोसर च्या एका छोट्या घरगुती होटेल मधे नाश्ता करायला थांबलो.मस्त आलु पराठा दही आणि सफ़रचंदाचं लोणचं ह्या कुटुंबाने अगदी प्रेमाने दिलं.
kunjum resized.jpg
नाश्ता करुन आता कुंजुम पास कडे निघालो. ह्या रस्त्यावर दोन चेक पोस्ट्स लागलीत.
रस्ता आता थोडा खडबडीत व्हायला लागला आहे...पण चारी बाजुने दिसणारे बर्फ़ाचे पर्वत त्याची जाणीव पुसट करुन देतात. बरीच वळणं ओलांडुन अखेर कुंजुम पास इथे आम्ही पोहोचलो....चारी बाजुने पर्वत मधे कुंजुम माता मंदिर...मंदिर कसलं तो एक स्तुप च आहे.सगळीकडे हवेवर फ़डकणारे प्रेयर फ़्लैग्स आणि शांतता.... कुंजुम पास हा दोन व्हैली लाहोल आणि स्पिती व्हैली ना जोडणारा पास...14900 फ़ुट उंचीवरचा.इथुन रस्ता थोडा उतरत जाउन आम्ही चंद्रताल च्या रस्त्याला लागलो.
चिनाब नदीचं उगम स्थान म्हणुन चंद्रा नदी ह्या चंद्र ताल जवळील ग्लेशियर पासुन उगम पावते...
चंद्रताल कडे जाणारा रस्ता खरोखरच खुप खराब धोकादायक वळणांचा...बर्याच ठिकाणी water crossings ओलांडावी लागतात. इथे दुरवर ग्लेशियर च्या जवळ दरीत एक इमारत दिसते...ती कसली ह्याचं कुतुहल ओसरत असतानाच पाटी दिसली,हिमांश हिमालयन स्टेशन...national centre for Antarctic and ocean research
ministry of Earth Sciences चं हे स्टेशन इथे ग्लेशियर चा अभ्यास करण्यात येतो आणि ह्या ग्लेशियर च्या कमी अधिक गोठण्याचा अभ्यास करुन त्याचा हवामानावर आणि अप्रत्यक्ष पणे मानवावर होणारे परिणाम अभ्यासले जातात. अशीच इंन्स्टीट्युट उत्तराखंड ला आमच्या बेस कैम्प जवळ सुद्धा बघितल्याचं आठवलं. चंद्रताल ला मुख्य ताल पासुन साधारण 5 किलोमीटर अलिकडे पर्य़ंत टेंट्स लावले जातात.इथे राहण्याची सोय होते.आम्ही मात्र इथे राहणार नसल्याने चंद्रताल च्या अलिकडे 2 किलोमीटर गाडीने पोहोचलो. उतरल्या उतरल्या एक गुरगाव चं जोडपं भेटलं आणि dont even think twice just go and see it its amazing! असा रिव्ह्यु दिला. चालायला सुरुवात केली.फ़क्त दोनच किलोमीटर चालल्यावर सुंदर पारदर्शक पाणी असलेला चंद्रताल नजरेस पडला. हा तलाव खुप खोल असल्याचं सांगितलं जातं.हा तलाव गेले काही वर्ष इथे होणारं प्रदुषण,तलावात बुडुन होणारे मृत्यु आणि त्याच प्रमाणे काही संवेदनशील प्राण्यांचे इथल्या प्रदुषणामुळे होणारे मृत्यु ह्या मुळे चर्चेत आहे.नुकताच इथे काही हिम बिबळ्यांचा मृत्यु झाल्याच्या बातम्या होत्या.
आता चंद्रताल परिसरात अनेक निर्बंध घातले गेले आहेत.
chandratal.jpg
चंद्रताल मधे आजुबाजुच्या डोंगरांचं प्रतिबिंब पडत होतं मधुनच ढग आणि उन्हाचा लपंडावही तलावात बघायला मिळत होता.
खरतर पाय निघत नव्हता परंतु निघायला हवं होतं.चंद्रताल चा रस्ता परत घेउन बताल ह्या ठिकाणी पोहोचलो.
बताल हे चंद्रताल काझा आणि मनाली च्या रस्त्यावर तिठ्यावर वसलेलं ठिकाण आहे. इथला चंद्रा ढाबा किंवा चाचा चाची ढाबा प्रसिद्ध आहे.चाचा चाची म्हणुन ओळखलं जाणारं एक जोडपं हा धाबा चालवतं.ह्या जोडप्याने वाईट हवामानात अडकलेल्या पर्य़टकांची,गिर्यारोहकांची देखील मदत,सुटका केली आहे आणि त्यासाठी त्यांना अनेक सन्मान दिले गेलेत. आम्ही इथे जेवायला थांबलो.
इथेच सावरकरांची प्रतिमा फ़ुलं वाहुन ठेवलेली दिसली.ढाब्याच्या बाहेर एका झाकलेल्या भिंतीवर सहज लक्ष गेलं आणि दृष्टीस पडलं शिखर सावरकर समिट केल्याबद्दल ची शिला.
shikhar savarkar board.jpg
मन अभिमानाने भरुन आलं.
मनोमन नमन करुन आणि भरपेट जेवुन आम्ही आता पुढे छत्रु,सिसु,ग्रांफ़ु अशा मार्गाने निघालो...खरतर रस्ता आहे का? असा प्रश्न पडावा असा रस्ता होता.चिनाब ला समांतर हा नसलेला रस्ता चालला होता. हळुहळु पहाडांवर काळवंडु लागलं होतं लवकरच पाउस पडायला सुरुवात होणार होती आणि जर तसं झालं तर ह्या कच्च्या रस्त्यावरुन गाडी चालवणं कठीण होणार म्हणुन शक्य तितक्या वेगाने निघालो.अर्थात वळणांमागुन वळणं,डोंगरांमागुन डोंगर,एक घाट चढुन परत उतरुन आम्ही फ़क्त पुढे पुढे चालत होतो.रस्ता कधी संपणार आणि चांगला रस्ता कधी लागणार असं प्रत्येकालाच झालं होतं. छत्रु आलं आणि पावसाला सुरुवात झाली. छत्रु ला असलेल्या एका छोट्या ढाब्यावर चहा पिउन त्या ढाबा मालकाला अजुन मनाली किती लांब म्हणुन विचारल्यावर अजुन तीन तास तरी नक्की असं सांगितलं तेव्हा संध्याकाळचे 5 तरी वाजले असतील.
sunset.jpg
पावसामुळे निसरड्या झालेल्या त्या रस्त्यावरुन परत एकदा यात्रेची सुरुवात झाली ती फ़क्त पक्का रस्ता दिवसा उजेडी दिसु दे या आशेत.
तरी बरं पावसाने फ़ार त्रास दिला नाही...पश्चिमेला सोनेरी झळाळी होती.डोंगररांगांवर दुरवर तो प्रकाश पसरला होता. आमच्या उत्साहात त्यामुळे भर पडली.अखेर पक्का रस्ता दिसला आणि थोडं पुढे जाउन दिसलं ते नवीन बनलेलं अटल टनल.
अटल टनल मधुन गाडी चालवणं 10-12 तासांच्या कच्च्या रस्त्यावरुन गाडी चालवल्यानंतर एक सुखद अनुभव होता. अत्याधुनिक तंत्रद्न्यानाने बनलेलं हे टनल लेह लडाख शी संपर्क कायम ठेवण्याच्या दृष्टीने आणि रोहतांग पास मुळे वाहतुकीस लागणारा वेळ कमी करण्याच्या दृष्टीने फ़ायदेशीर ठरलं आहे.
moon.jpg
टनल मधुन बाहेर पडल्यावर प्रदेश एकदम बदलल्याचं जाणवलं.सुचिपर्णी दाट वृक्ष ्राजी जी गेले बरेच दिवस आम्हाला दिसली नव्हती. सोलन आणि मग मनाली ला आम्ही दाखल झालो. मनाली ला न राहता आम्ही थोडे पुढे बबेली जवळ राहण्यासाठी होटेल शोधलं....
एकुण 14 तासांचा भयाण रस्त्याने प्रवास अखेर संपला होता.
स्पिती स्वप्न सध्या पुरतं तरी संपलं होतं पण नेहमीसाठी नाही..
स्पिती मधे अजुनही खुप काही बघण्यासारखं आहे.....पण म्हणतात न प्रत्येक ठिकाणी काही गोष्टी बाकी ठेवाव्यात म्हणजे परत जाण्याची इच्छा कायम राहते! तिबेटी भाषेत गुडबाय,हेलो ला जुले असा शब्द आहे....
लवकरच परत भेटुया! जुले!!!

WhatsApp Image 2021-06-22 at 10.45.57 PM.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users