वन वे टिकिट टू स्पिती भाग ३

Submitted by मधुवन्ती on 17 July, 2021 - 00:58

solan.jpg

रामपुर खुप छोटंसं गाव सतलज नदी किनारी वसलेलं.उजाडल्यापासुन पाउस होताच आणि पुढचे काही दिवस खराब हवामानाचं भाकित होतं.रामपुर ला नीट आराम करुन दुसर्या दिवशी 17 तारखेला आम्ही चितकुल कडे निघालो.हे भारताच्या सीमेवरचं शेवटचं गाव....त्यापुढे चीन ची बॉर्डर सुरु होते. रामपुर वरुन निघुन थोडाच वेळ झाला होता आणि आम्हाला आमच्या ह्या ट्रीप मधलं पहिलं स्नो पीक दिसलं....
सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र असल्यामुळे इथे आर्मी चे काही चेक पोस्ट्स लागतात,त्याच बरोबर आर्मी चे जवानांना घेउन जाणारे ट्रक्स दिसत राहतात.
road.jpg
त्याआधी आपल्याला सांगला ह्या ठिकाणी जाण्यासाठी करचम ह्या गावापासुन वेगळी वाट पकडावी लागली. इथला एक पुल ओलांडल्यावर सतलज नदीवर बांधलेलं धरण आणि हायड्रो पावर प्रोजेक्ट दिसतो. सांगला इथे एक जागा सुइसाईड पॉईंट म्हणुन प्रसिद्ध आहे. अन्य कित्येक टुरिस्ट स्पॉट सारखी ही पण एक ओवर हाइप्ड जागा. दरीत बाहेर निघालेला एक दगड जिथे उभं राहुन लोक फ़ोटो काढतात,आता तो लोखंडी रेलिंग लावुन बंद केला गेला आहे....अर्थातच काही उद्योग लोकांना महागात पडले असणार! तेवढयासाठी वाट वाकडी करण्यासारखं खचितच ते ठिकाण नाही.करचम ते चितकुल पसरलेल्या व्हॅली ला बस्पा वैली म्हणतात. किन्नौर मधे असलेल्या ह्या भागाला निसर्गरम्यतेचं वरदान लाभलं आहे.सफ़रचंद,जर्दाळु साठी प्रसिद्ध आहे. करचम,रकचम अशा गावांना ओलांडुन आपण चितकुल/छितकुल इथे पोचतो. चितकुल बसपा नदीच्या किनारी वसलेलं आहे...बसपा नदी, सतलज नदीचीच एक उपनदी आहे.
chitkul.jpg

आजचा आमचा स्टे बसपा नदी किनारी असलेल्या कॅम्प मधे होता. चितकुल गाव पर्य़टकांसाठी अजुनही बंद होतं त्यामुळे तिथले होम स्टे देखील बंदच होते.
हा आमचा कॅम्प स्टे देखील सुंदरच होता. चहुबाजुनी डोंगररांगांनी वेढलेलं हे गाव, ते पलिकडे बघा ते शिखर चायना च्या ताब्यातलं असं सहज पणे एखादा स्थानिक माणुस सांगतो.
आज देखील वातावरण खराबच होतं त्यामुळे समोरची शिखरं धड दिसत नव्हती.
11000 फ़ुटाच्याही वर असलेलं हे गाव असल्याने इथे येइपर्यंत तुमचं शरीर व्यवस्थित सरावलेलं हवं. तुम्हाला जर अल्टिट्युड सिकनेस जाणवत असेल तर इथे सुचवला जाणारा हमखास उपाय म्हणजे कच्चा लसुण चावुन खाणे! अर्थात अनेक प्रवासी आधीपासुनच डायमॉक्स घेउन निघु शकतात. एक खुप महत्वाची लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे शक्यतो इथे तब्येत बिघडु देउ नका कारण इथे मेडिकल असिस्टंस मिळणं जरा मुश्किल असतं.
क्रमशः
#onewaytickettospiti

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users