पाऊस पडतो

Submitted by द्वैत on 14 July, 2021 - 08:39

पाऊस पडतो

पाऊस पडतो
वारा भिजतो
ओल मनाशी पाझरते
अशात कोणी
गातो गाणी
दुःख नव्याने अंकुरते

रुजून येती
काठावरती
जेव्हा पाती लवलवती
पुसून काजळ
डोळे निर्मळ
संध्येसमयी हळहळती

वारा गंधील
ओली किलबिल
भ्रांत सुखाची अशी पडे
समुद्रपक्षी
क्षितिजावरती
मिटून डोळे उंच उडे

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता छान आहे. पण "भ्रांत सुखाची अशी पडे" काही समजले नाही. जे मनाला वाटते ती सुखाची भ्रांती, भ्रम आहे; खरे सुख नाही असे काहीसे म्हणायचे आहे का?

वाह.....

हीरा +१
शब्दरचनेच्या दृष्टीने कविता आवडली पण अर्थाची सुसंगती लागेना. कदाचित माबुदो असेल Happy
भ्रांत हा शब्द कमतरता / उणीव या अर्थाने आणि भ्रांती हा शब्द भ्रम या अर्थाने वाचनात येतो. मला कविता समजतेय त्यानुसार तिथे भूल शब्द बरोबर वाटतोय.
@ द्वैत, तुमच्या कविता आवडतात. म्हणून जरा अधिक लिहायचं धाडस केलंय. कृ. राग / गैरसमज नसावा.

धन्यवाद हिरा, शशांक, चंद्रा
@चंद्रा ... भ्रांत हा शब्द कमतरता असणे ह्या अर्थाने घेतात हे तुमचं बरोबरच आहे, मी भ्रांत पडे हे भ्रमात पडणे, गोंधळात पडणे ह्या अर्थाने घेतल होत.. कदाचित माझं चुकत ही असेल आणि भूल हा शब्द ही अर्थाच्या दृष्टीने बसतो तिथे .. आपल्या अश्या प्रतिसादांचे नेहमी स्वागतच आहे .. धन्यवाद