अन्याय का मनावर?

Submitted by निशिकांत on 13 July, 2021 - 09:09

होण्यास सभ्य, करता अन्याय का मनावर?
का सोस दावण्याचा? नाहीच जे तसूभर

कोडे जुनेच आहे, अपुले कुठे उडाले?
हे व्हायचेच असते, मग का मनात थरथर?

गरिबीत वाढलेला, होताच राज्यकर्ता
तो लागला लगेचच कमवायला भराभर

मस्तीत संपदेच्या, होतो न पुण्य संचय
पापे धुवावयाला नसते नदी, सरोवर

झाल्यास बंद दारे दोघातल्या मनांचे
नुसतेच मग खुलासे होतात व्यर्थ सादर

वास्तव जहाल असते, म्हणुनीच बालपण मी
जपले मनात, सारे दिसते जिथे मनोहर

शेजार पाक आहे अवघड जरी बदलणे
त्याला गिळून भारत करतील का खरोखर?

वर्षे अनेक झाली, हसलो कधीच नाही
जग का उगाच हसते माझ्यावरी निरंतर?

"निशिकांत" का उगा तू बघतोस खोल इतका?
आतून गाळ सारा, जल स्वच्छ फक्त वरवर

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--आनंदकंद
लगावली--गागाल गाल गागा गागाल गाल गागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.