एक 'उन्हाळ' दिवस

Submitted by अरिष्टनेमि on 11 July, 2021 - 11:59

आठेक दिवसांमागं ग्रीष्म सुरु झाला होता. आज सकाळ पासून फिरत होतो. नवाच्या सुमाराला उन्हं बम तापली. फांद्यांचे खराटे आणि सुकलेल्या बांबूच्या काड्या हे सारं सकाळी सकाळी मोठं फोटोजेनिक वाटत होतं, आता ते सारं रखरखीत वाटू लागलं. धुळभरल्या रस्त्यावर गिचमीड ओरखड्यांसारख्या या सुकल्या फांद्यांच्या सावल्या दिसू लागल्या. उन्हानं कुरतडलेल्या या अशा फाटक्या सावलीचाही उन्हाळ्यात मोठा आधार वाटतो. पण रानात थकल्यावर खरी विश्रांती इथं-तिथं पसरलेल्या मोह, बेहडा, कुसमाच्या लाल-हिरव्या झाडाखालीच.

एका कुकुडरांझीच्या सावलीला उभा राहून दोन घोट पाणी प्यायलो. बरं वाटलं. माणसाच्या स्वभावाचं मोठं हसू आलं. घरी पंख्याखाली, कुलरसमोर बसलो असताना माठातलंच पाणी प्यायचं असतं. दुस-या पाण्यानं तहान भागत नाही. इथं रानात ४५ च्या पुढं पारा तडकलेला असताना चालून चालून घामाघूम होतो. हा घामही कुठं दिसतो? ऊनच असं असतं की हा घाम वाहता वाहता सुकून जातो. अशा वेळी जे आहे तेच पाणी किती गोड वाटतं! पाण्याला जीवन हे नाव काही उगीच नाही.

पाणी पिताना वर नजर गेली. कुकुडरांझी दुर्लक्षितच. आज कदाचित पहिल्यांदाच फुलांचा मंद मिटू-मिटू गंध जाणवला. हिरव्या फुलांकडं आज पहिल्यांदा निरखून पाहिलं. त्यातलं सौंदर्य आजच जाणवलं.

_MG_8279.jpg

शेजारच्या वाटेला छेदून जनावराची सगर इथून ऐल-पैल निघाली होती. पुढं बांबूच्या रांझीखाली साठलेल्या नक्षीदार पाचोळ्यावरुन घसरत, मध्येच अंगाला उन्हाचा ताव देत पडलेल्या दगडा-गोट्यांमधून वाट काढत ही सगर बिचारी एकटीच अशी कुठं होलपटत निघाली देव जाणे!

“शत्रुघन, कुठं जाते वाट? पाण्याकडं?”
“हौ जी. थे तिकडं सामोरी हिवरनाल्याले निंगते.” कु-हाडीचं पातं पकडून दांड्यानं दिशा त्यानं दाखवली.
“कितीक आहे?”
“हे जी, इतंच. थे हिवरा-हिवरा दिसते नाय का जी? थोच नाला.”

रानातल्या माणसाचं 'इतंच' जरा अवघडच असतं. 'हे इथं' म्हणता म्हणता दणादण चालवतात पाच – पाच, सात-सात किलोमीटर. असंच एकदा मेळघाटात २८ किलोमीटर चालून आल्यावर, "हे काय या वावरापर्यंत गेलं की गाडीवाट आली" या भोळ्या आशेवर पुढचे सहा किलोमीटर चालवत गोलाईच्या डोंगरावरुन उतरवलं होतं.

शत्रुघननं दाखवल्या दिशेला बघितलं. अर्धा किलोमीटरभर असेल. झाडांचे हिरवे दाट शेंडे आकाशावर दिसत होते. 'रिक्स' वाटण्यासारखं काही नव्हतं. सगर पकडून मी चालू लागलो.

अरुंद नाला. अर्जूनाचे धिप्पाड संगी दोहो काठी. हिरवा फोफावलेला बांबू इथं-तिथं आणि लहान झुडूपांनी काठ गच्च भरलेला, हिरवागार. खाली त्या सावलीत पाणी वरुन हलक्या धारेनं वहात येत इथं समोरच्या छोट्या काळसर डोहात थांबून पुढं अंधारी नदीकडं निघालं होतं. झुडपाच्या नाजूक फांद्यांवर एक नीलमण्यांची जोडी झिम्मा खेळत होती. आम्ही पोहोचल्याबरोबर दाटवणात गायब झाली.

"वा! फार सुंदर जागा आहे ही."
शत्रुघनला आनंद वाटला. “सारी हरनं या नाल्याईच्या म्येरीले रायतात या दिसात. याचं नावच हिवरनाला हाये. इतं सगरा हिवरा हिवराच रायते जी. बांबू तोडून आन्ला तर वारल्यावर हिवराच रायते."

शत्रुघन कौतुकानं सांगत होता. सुंदर, शांत जागा. पक्ष्यांची किलबिल सोडली तर आवाज नाही. पण हो, कुठून तरी सिकाडे किरकिर करत होते. मागच्या आठवड्यातसुद्धा रान शांतच होतं. पण आज सकाळपासून फिरतो आहे, ही किर्रकिर्र जरा जास्तच वाटतेय. उन्हाळा असा मध्यावर आला की हे सिकाडे जागे होतात. रानात दुपारी सूर्य माथ्यावर घेऊन निघालं की पायाखाली चर्र-चर्र आणि झाडांवर किर्र-किर्र; दोनच आवाज.

चालता चालता मळलेल्या वाटेवर आलो. रस्त्याला अगदी लागून सेहेनाचं झाड होतं. त्याच्या फार सुंदर साली सुटतात. मला जाता जाता त्यावर बसलेला एक सिकाडा दिसला. मी थांबून बघत राहिलो. त्याच्या जवळ गेलो तरी तो शांतच. हळूच त्याला हातात घ्यायला गेलो तर भिर्र करुन पिचकारी मारत गायब झाला. शत्रुघन आणि भीमराव हसू लागले. शत्रुघननं मग सांगितलं की 'ही किरकिरी'.

“किरकिरी?”
“हौ जी. किरकिर वाजत रायते नाय का जी, म्हनून किरकीरी म्हंतो आमी. नाय तं वाजंत्री.”
हे नवीनच कळालं. किती छान नाव आहे? सिकाड्याला मराठीत शब्द मला तरी माहित नाही. पण किरकिरी आणि वाजंत्री दोन्ही नावं मला आवडली.
एका ठिकाणी शत्रुघननं दोन-तीन वेळा खूप किरकि-या पाहिल्या असं त्याचं म्हणणं होतं.

शत्रुघन म्हणाला ते ठिकाण आमच्या वाटेवरच येणार होतं. आम्ही त्या पुढच्या ठिकाणी पोहोचलो. किरकिर वाढत गेली. खांद्यावरच्या कु-हाडीच्या दांड्यानं पूर्वेकडे इशारा करीत शत्रुघन म्हणाला “थे पाहा, ह्या बेहड्याच्या झाडामांगून. थ्या झाडाले किती हाये! झाड कारा कारा दिसून रायला या किरकि-याईच्यानं.”
अबबब! हे दृश्य तर मीसुद्धा पहिल्यांदाच पाहिलं. लाखो काजव्यांच्या माळा पाहिल्या होत्या पण हजारो सिकाड्यांनी भरलेलं हे झाड पहिल्यांदाच.

_MG_9283.jpg

मी कॅमेरा सुरु करुन पुढं निघालो. झाड जवळ येऊ लागलं, तशी किरकिर वाढत गेली. कानठळ्या बसू लागल्या. थंड पाणी फवारत सिकाडे डोक्यावरुन उडू लागले. पूर्ण अंगावर, कॅमे-यावर पाणी पडू लागलं. सुर्र-सुर्र-सुर्र-सुर्र. कधी इकडून धार, कधी तिकडून धार. वरुन पडणा-या पाण्यापासून वाचवण्यासाठी मी पुढं झुकून कॅमेरा पोटाशी धरला. सिकाडे प्रकाशचित्रांत कैद करु लागलो. या इथं पहा, सिकाड्यानं उडवलेली पाण्याची धार दिसते आहे.

Cicada-spray.jpg

शांत बसलेले सिकाडे जवळ गेल्यावर उडून जात होते. काही आपली सोंड झाडात खूपसून शांत बसून रस पितच होते. सिकाडा बारकाईनं पाहिला तेंव्हा दिसलं, याला पाच डोळे. बघा ना, दोन मोठे आणि डोक्याच्या वर तीन लहान-लहान डोळे.

_MG_9287.jpg

१०-१५ मीटरवरून शत्रुघन आणि भीमराव काय बोलतात हे ऐकू येत नव्हतं. भयंकर आवाज.

रुपचंदची कहाणी आठवली. एका अशाच गिमाच्या दुपारी रुपचंद म्हणे, "चला तुम्हाला वाघाची एशी बेडरुम दाखवतो." नागझि-याच्या तळ्याच्या पलीकडल्या काठी घेऊन गेला आणि एका कुसमाजवळ उभं केलं. गच्च हिरवा कुसूम. खाली पाचोळा. दबली साफ जागा. जनावराची बैठक होती खरी. या कुसमाकडं बोट दाखवून सांगे ‘हीच ती बेडरुम’. त्याचं म्हणणं असं की उन्हाळ्यात कुसमासारखी सावली कोणीच देत नाही. कुसूम सर्वात थंड. "या झाडातून का नाय तर, पानी पडतो. म्हणून थंड रायते जागा इतं. वाग इथ्थीच बसून रायतो."
ते पाणी त्या सिकाड्यांचं होतं का? आता जाईन तेंव्हा विचारीन रुपचंदला. असो.

फोटो झाल्यावर झाडाखालून बाजूला आलो. सिरींजमधून पाणी उडवावं असं सुर्र-सुर्र पाणी ते सिकाडे अंगातून उडवतच होते. भीमराव म्हणे, "ह्ये किरकि-या पानी सोडत रायते सारकं. आंगातला पानी संपला का जाग्यावर खल्लास मंग."

इथं लाल मोह होता. त्याखाली आम्ही उभे होतो. कडकड उन्हात, रंगारंग, गंधित, थंडगार सावली. मोहाचा मोह. सकाळी याची रसार्द्र, लबलब फुलं खाल्ली होती. अहाहा! फुल तोंडात पडलं की विरघळत होतं. दिवस उजाडता टपटपलेली मोहाची ढवळी-पांढरी नक्षत्रफुलं अशा भाजणा-या उन्हात आकसून, म्लान पडली होती. आता उन्हं उतरली की इथं चितळं जमतील, एखाद-दुसरा सांबराचा जोडा येईल. नीलघोड्याच्या लेंड्यांची मखरं जाग-जागी दिसत होती; नील हजेरी लावणारच. फास्-फूस करत फेंगाडं अस्वल येईल. काड-काड काटक्या मोडत पाण्यावर निघालेल्या थोरल्या गव्यांच्या कळप इथून चरत पुढं निघेल. रात्र बहरात येण्याआधीच हा फुलांचा मेवा खतम झालेला असेल. रात्रीच्या चांदण्यांना निरोप देता-देता पुन्हा मोह जागा होईल. पहाटेच्या आभाळात हळू-हळू मिटणा-या चांदण्या मोहाची फुलं बनून पानांतून टप-टप खाली पाचोळ्यावर सांडतील, त्याचा रसदार वास आसमंतात भिनेल. पहाटेचे शिलेदार याचाही फन्ना उडवतील. मग शिळं-पाकं उरेल. माझ्यासारखा एखादा फिरस्ता पोहोचून ते वेचून खाईल.

घट-घट पाणी पिऊन, डोक्यात विचार घेऊन या लाल मोहाखाली उभा राहिलो. तोवर खाली पानात एक टुणूक-टुणूक कोळीबुवा दिसले. वाळल्या पाचोळ्यात तो दिसतच नव्हता. उडी मारेल तेंव्हाच समजायचं बस.

_MG_9316.jpg

आजकाल माझ्या डोक्यात कोळी घुसलेत. कोळी शोधत असतो. प्रेमात पडलो म्हणा ना. किती प्रकार यांचे! बघा, इवलासा डाळीएवढा कोळी जवळून किती वेगळाच; भारीभन्नाट दिसतो.

_MG_0029.jpg

कोळ्यांचा किडा चावला आहे. इतका, की काल रात्री मला फार सुंदर स्वप्न पडलं. मी असा रानात फिरतो आहे आणि मला एक सोनेरी कोळी दिसला. तो पाहतोय तोवर एक सुंदर मोरपंखी, तो पाहतोय तोवर एक मोठा केसाळ तपकिरी, लाल. कोळीच कोळी. असो.

या दशलक्ष पाचोळ्याच्या व्यूहात कोळी फरार झाला. मी उभा राहिलो. समोर हिरवंगार चाराचं झाड होतं. मी डोळ्यावर हात धरुन वर चाराचा शेंडा पाहू लागलो. चाराचे घोस लदबद होते. पण अजून हिरवट. पिक्के चार या दिवसात वानरं, पाखरं झाडावर नाही ठेवत. शत्रुघन म्हणालाच, "बंदराईने खाल्ले". बंदरा-चितराच्या तोंडातून वाचलेले चार खाली भरपूर पडलेले होते. त्यातून ओंजळभर गोळा करुन खाल्ले. चार गोड आणि मधुरच असतात. मूठभर बिया निघाल्या. त्या फोडून चारोळ्या खायच्या. बियांवर फार सुंदर नक्षी असते.

Char.jpg

या बिया पाहता-पाहता मला मेळघाटचे दिवस आठवले. या दिवसात असेच चार खायचे. जरा सपाट दगड बघून बिया फोडून आतल्या चारोळ्या खायच्या. बेहड्याच्या सावलीला बसलं तर बेहडा फोडून गर खायचा. पावसाळ्याचा जरा जम बसला की दरी-खो-यात जांभळांना ऊत. चालता चालता घोस तोडून रसदार मधुर जांभळं खायची. हातातला घोस संपेस्तोवर दुसरं झाड सेवेसी तत्पर. जेवण करायची गरजच नाही.

जांभळावरुन आठवलं. आठ-पंधरा दिवस झाले असतील. मंडपखडकाला गेलो होतो. तिथं पाण्याबरोबर वाहून आलेली एक जांभोटी दिसली. जांभळीला फळं. आं? आता या दिवसात? मग वर पहात गेलो. जांभळाचा घोस. पण पानात फरक.

_MG_9350.jpg

जवळ जाऊन पाहिल्यावर कळालं. ही लोखंडी होय. जांभळ नाही. असो.
ओंजळभर चाराच्या या मुठभर बियांनी ढीगभर आनंद दिला.

हे आता अजून आठभर दिवस. फार म्हणाल तर पंधराक दिवस. मोह संपेल, चार संपेल, टेंभरं आहेत. पण मंगाम बुढ्याचं म्हणणं असं की "आता टेंभरं मासाळली. ती नवी पानं फुटायच्या आधीच खावा लागते." मग खरंच एखाद फळ खाऊन पहावं. आपल्यासारख्या शहराळलेल्या माणसाला हेही गोडच लागतं. त्यातल्या त्यात आम्ही लकीरके फकीर. सीडलेस टेंभरं सापडली. अगदी चिकू लपवावेत अन् टेंभरं खावीत अशी सगळी मजा ती.

बरं, टेंभरं खायला काही कमी स्पर्धा नाही. अस्वलं तर या दिवसात मोह आणि टेंभरावरच जगतात जणू. रानात कुठं कुठं पडलेली अस्वलाची विष्ठा बघावी. नुसती टेंभरंच.

_MG_9408.jpg

टेंभरानं तहान भल्ली लागते पण. एकदा दुपारी भुकेपोटी किलो-दोन किलो टेंभरं खाल्ली होती, रात्र होऊस्तोवर चार-पाच लीटर पाणी पिऊन संपवलं. म्हणूनच पहाटे अन् रात्रीशिवाय न दिसणा-या अस्वली आता दुपारीसुद्धा पाण्याला येतात की काय?

तसं वाघ सोडला तर रानात पाण्याशी कोणीच थांबत नाही. उन्हाळा वाघाला सोसत नाही. कुठंही फिरला तरी आस-याला पाण्याशीच येतो. पाण्याशिवाय बाकीही कोणत्याच जनावराचं भागत नाही. पाण्याशी आल्यावर कुठं वाघ असेल सांगता येत नाही. बांबूच्या रानात वाघ दिसणं म्हणजे मुश्किल. बघा तुम्हाला दिसला तर सांगा वाघ आहे का? आम्हाला तर तो वाघ तिथून उठला तेंव्हाच दिसला.

_MG_8442b.jpg

एक दिसणं मुश्किल. एक म्हणता म्हणता पाच वाघ यातून निघाले.

_MG_8483b.jpg

रानात असेच वाघ कुठंतरी आराम करत असतात. सहज दिसणं कठीण. तेंदूपत्ता, मोहाच्या नादात लोक आपले रानात खोल जात राहतात आणि विनाकारण खेटलेलं वाघाला आवडत नाही. मग तो तुम्हाला दमात घेऊ शकतो.

_MG_8461a.jpg

पण तसं वाघाला लोक सज्जन म्हणतात. त्यामुळं गफलतीनं हल्ला झाला तरच. समजून उमजून माणसाला वाघ धरणार नाही.

ब-याचदा बरोबरचा वाटाड्या निरखून सांगतो,
“थो नाल्याच्या मोडीला हिवरा हिवरा झाड दिसते का? तथीच तं बसून हाये जी.”
“पारीच्या थ्या कोमट्यात पानी दिसतो ना? तथीच मगरबटव्यात बसून हाये. थो कान हलला बगा थो.”
नाहीतर कधी कधी नुसतंच
“थो थो थो पराला पराला बगा.”
वाघ क्षणात त्यालाही दिसेनासा होतो आणि आपल्याला तर शेपटीचा केसही दिसत नाही. अशा वेळी नुसतीच कॅमे-याची शेपटी गोंजारत डोळा लावून बसायचं.

या बोडीवर पहा. बारा महिने हिरवाई. त्यामुळं जपून. इथं वाघ कुठंही असू शकतो.
दिसला?
थो पहा थो. अस्साच सामोरी बघा. बोडीच्या थ्या अंगाले लेप्ट साईडच्या थ्या का-या साजाच्या खाली तं हाये. लेटून हाये जी.

_MG_9231.jpg

दिसला? त्या ऐनाखाली झोपलेला? तो. तो. दिसला?
नाही?
तर ठीक. नाहीच दिसला तर जरा धीर धरा, कळ काढा. कुठंही लोळला असला तरी वाघ पाण्यावर येईलच.
हे घ्या. ही तर वाघीण आहे. आली पाण्यावर. आता पाण्यात बसते की लपा-लपा पाणी पिऊन परत जाते देव जाणे?

Shivni.jpg

म्हणून रानात जीवाला सगळ्यात जास्त धोका पाण्याशी. दोनेक महिन्यापूर्वीची गोष्ट. तहानेला सांबराचा शिंगाडा सावध गतीनं पहात-हुंगत बोडी उतरुन पाण्याशी निघाला. पण त्याच्या नशीबात पाणी नव्हतं. नियतीनं त्याला शेवटचं पाणी पिऊ दिलं नाही. त्याच्या मागंच पारीवरुन वाघीण दबत चढली आणि पारीच्या उतारावरच त्याला धरला. त्याची धडपड शांत झाल्यावर वाघीणीनं ‘आंऽऽव’ करुन बोलावताच मागं दडलेले बच्चे आले. डोळे उघडे ठेवून पाणी पाणी करत प्राण सोडलेल्या त्या तहानल्या सांबराचं तोंड पाण्यात बुडालं होतं. नियतीनं क्रूर चेष्टा केली.

याच पाण्याशी चितळं मोठ्या सावधानीनं येतात. कान-नाक सारं एकदम सावधान. मागं-पुढं, डावी-उजवीकडं काही नाही याची खात्री करत पुढं सरकायचं. पण बिबट महाचतुर जनावर. मुलखाचं लबाड. रोज एक पावटी धरुन झाडावर बसायचं. झाडाखालच्या पावटीनं चितळं पाण्याकडं निघाली की कळप मोकळाणात पोहोचायच्या आधीच, हेरुन ठेवलेलं एखादं बेसावध चितळ त्याच्यावर वीजेसारखं कोसळून दाबायचं. आरडा-ओरडा होऊन जनावरं इकडं-तिकडं होऊस्तोवर आणि वाघाला पता लागेस्तोवर चितळ तसंच नरडं धरुन उचलायचं आणि झाडाच्या फांदीवर बेचकीत ठेवून निवांत खायचं. चैत्रात त्या बिबटानं आठ दिवस हा कार्यक्रम जवळजवळ दर दिवसाआड केला. यदूनं त्याला बरोब्बर कॅमे-यात कैद केला दुस-या चौथ्या दिवशी.

Leopart-Yadu.jpg

झाडाशी नाकाड वर करुन हुंगणा-या आणि तुरतुरी सोडणा-या वाघाला हे सारं दिसलंच असणार की. पण झाडावर निवांत बसलेल्या बिबटाचं तो करणार काय? हां, पण हा बिबट सवानात जर गवसला, तर वाघ त्याला सोडत नाही. अशीच कुरणात वाघीण चार बच्चे घेऊन पहुडलेली. कसा कोण जाणे बिबट तिकडून घुसला. ऐन मध्यात वाघीण उठली. एक वाघीण आणि चार जवान बच्चे. वाघीणीनं त्याला पंजानं घोळसून मुंडक्याचे मणके तोडले. बच्चे होतेच. दिवस वर येउस्तोवर अर्धा बिबट खतम.

9E3A1985.jpg

रानात असे अर्धवट खाल्लेले बिबट दिसतात कधीतरी. अगदी कधीतरी. कधी खातही नाही. आताच काही दिवसांमागं वाघानं बिबट धरला. पाठीकडून. कणाच तोडला. दोन तुकडे. सकाळच्या कोवळ्या उन्हात रक्ताळलेलं ते सोनेरी जनावर मरुन पडलेलं दिसलं. असो.

चालता चालता दुपार भगभगली. पाखरं उडून थकली, जनावरं फिरुन थकली. रांझींच्या सावलीत बसून रवंथ करता करता पेंगू लागली. पण वाट थकत नाही. एखादी जुनाट धुळभरली गाडीवाट धाडधाड आडदांड चालते. वाळली सडपातळ वाट आपली झाडा-पेडांना सैल झोकदार वळसे घालत तुरुतुरु चालतच राहते. रानात कधीही जा; झोडपणा-या पावसात, काटेदार थंडीत, लाहा-लाहा उन्हाळ्यात, पूर्वेला आभाळ लाल होताना, दुपारी सावली पायाखाली घेताना, संध्याछाया अंधारात विरघळताना, ही वाट तीच तशीच अखंड उत्साहानं रानोरान फिरवते. ती तशी जपलेली कोरीव वळणं, ती नाल्यात घेतलेली बुडी, ती गोट्या-धोंड्यांशी कुस्ती, सारं त्याच उत्साहात. या वाटेनं तिच्या आयुष्यात काय काय पाहिलं असेल? काय काय पचवलं असेल?

हिरव्यासावळ्या रानात
ही एक वाट जाते
संसार चिमुकला
हळू आटोपता घेते

कधी हरणाचे पाय
कधी वाघोबाच्या पायी
नाही कौतुक कशाचं
नाही कशाची नवलाई

जाती चोरटेही कसे
तिचा उर तुडवित
मग तुटल्या झाडाशी
उभी मुकी आक्रंदत

दिवसा रानाची या लेक
खेळत धुळमाती जाय
पुन्हा जागविते रात
होऊन रानाचीच माय

नाही हरली, बसली
रोज उत्साह नवीन
जशी दिवाळसणाला
धावे सासुरवाशीण

या वाटेचं किती कौतुक करावं? वाट थांबत नाही. घड्याळ थांबत नाही, घाम सरत नाही. पाण्याच्या राखीव बाटल्याही खाली होतात. नाल्या-नुल्याच्या शोधात नजर राहते. पक्क्या पाण्याशी पोहोचून झिरा काढावा. झाडाच्या २-३ पानाचा द्रोण हातोहात करावा, तहान भागवावी. पुन्हा बाटल्या भराव्यात आणि आळसावलेलं पाऊल वाटेवर घालावं.

कधी काही वेगळं दिसलं की चालायचा शीण हलका होतो. वेगळं म्हणजे अगदीच अफलातून न का दिसेना, पण समजा हे आता दिसलं असं कासव. सकाळी-संध्याकाळी पाण्याशी एखादं कासव दगडासारखं बसून असतं, उन्हाला. कधी नुसतं ठिपकाभर नाक वर काढून डोहात पाण्याखाली काळा गोल फिरताना दिसतो. पण कधी कधी ते रस्त्यातही चक्क मिळू शकतं. ऐन उन्हाच्या तलखीत रानात असं कासव दिसणं म्हणजे दुर्मिळ क्षण.

_MG_8053.jpg

मग “हा कोणता ‘कासू?”
“हा कुठी चाल्ला आशीन?”
“याले रोहीने पायलं तर खाईन.”

अशा अशा गोष्टी, कशा कशा गोष्टी. मी बोलणा-या बुढ्याला विचारलं, “हा इतका दुपारचा कुठं चालला पाण्याचा आसरा सोडून? अन् याला रोही खाते?”
“हौ जी.” बुढ्यानं मला शॉक दिला. त्याचं म्हणणं असं की या दिवसात कासव झाडावर चढून डिंक खातं; मोवई, धावड्याचा. सांबर आणि रोही; म्हणजे नीलगाय यांनी कासव पाहिलं की त्याला पायाखाली दाबून मुंडकं तोंडात धरुन हिसडतात. सारं कासव उपसून बाहेर आलं की खातात.
हे अविश्वसनीय असलं तरी ‘मी पाहिलं आहे’ असे सांगणारे विश्वसनीय लोक मला भेटले.

कासव पुढं गवतात दिसेनासं झालं. पुढं निघालो. हलके उतार, हलके चढ. वाट गोटाळ. फुटबॉलसारखे गोटे. या दगड-गोट्याला सांभाळत चढायचं. दोन तास चाललो आणि फ्या-फ्या झाली. बूटाचा तळ उचकटला. हरकत नाही. अजून तीनच किलोमीटर चालायचं आहे. लेस अर्धी सोडली. बुटाच्या तळाखालून दोन वेढे घेऊन बांधली. पुढचा उतार उतरुन खाली नाल्यात पोहोचलो.

एवढा झळाळ उन्हाचा महिना. झाडाला पान नाही. सावलीला जागा नाही. पण नाला वाहतोय. फार नाही, पण दोन इंची धार. खळखळ पाणी. खडकापासल्या रेतीवर हरणांचे, गव्याचे खूर उमटलेले. कधीसा वाघ येऊन गेला होता. दोन पंजे त्याचेही.

डोहाच्या खालच्या धारेला हात धुतले, चेहरा धुतला. प्रसन्न वाटलं. मग वर येऊन मी खडकावर पालथा पडलो आणि पाण्याकडं पाहिलं. पाण्यावर पाणनिवळ्या फेर धरत होत्या. पाण्याच्या खाली हिरव्यागार शेवाळाचा मखमली गालिचा, पाण्याच्या प्रवाहाबरोबर हिरवाकंच झेंडा फडकवणारा. मी पाण्याला तोंड लावून पाणी प्यायला सुरुवात केली. गोड, ताजं थंडगार पाणी. पोटभर पाणी. इतक्यात माझ्या चेह-याखालच्या खडकाच्या कपारीपाशी शेवाळ डहूळलं. पाण्यात कालवा-कालव झाली. कपारीतून एक पाणकिडा माझ्या चेह-याच्या सावलीत दिसला. त्यानं पुढच्या मजबूत पायांत एक बेडूक पकडला होता आणि त्याचे लचके तोडत होता. बेडूक सुटण्यासाठी जीवाच्या आकांतानं पाय मारत होता. मी पाणी पिता-पिता थांबलो. अजून २-३ किडे त्याला झोंबले. त्यांची पाण्यात धावपळ सुरु झाली. किडे त्या बेडकाचे लचके तोडू लागले.

1617947453682-S-G.jpg

पाण्यावर माझी हालचाल पाहिल्यावर शेवाळाच्या एका थराखाली ते सारं लटांबर गायब झालं. पाणी पिऊन मी उठलो आणि पाण्यात बघत बसलो. पाचेक मिनिटात शेवाळाच्या त्या थराखालून संथ वाहणा-या पाण्याबरोबर बेडकाचा एक पाय वहात येऊन धारेला लागला. धारेबरोबर वाहून पुढच्या प्रवासाला गेला. एक आयुष्य संपलं, तीन आयुष्यं जगली. रानाचं घड्याळ थांबत नाही. पाण्यात डूबडुब बाटल्या भरल्या आणि नाला ओलांडून पुढच्या चढणीला लागलो.

दुपार जरा-जराशी ढळताना परतीला लागलो. वाटेत बोडीकडून सहज जाता जाता सवयीनं नजर फिरवली तर दिसली अस्वल, लांब तिकडं सागाच्या खोडाआड बसली होती. किती वेळ पाहतोय. हालचाल नाही, आवाज नाही. झाडाआड थोडं काळं काही. नुसतं काळं खोड अन् सावली. हो न हो, आहे अस्वलच. हळूच त्या सावलीला लांबडं मुस्काट उगवलं, पाय फुटले, आणि अस्वल वाटेला निघाली. फास-फूस, फास-फूस. गवतकाडीतून रस्ता काढत सरळ निघाली.

रस्त्यातल्या उधईच्या घराशी थबकली. इथंच झांबल-झांबल करत बसली. मग वारुळ खणून तोंड लावलं आणि दमा-दम्मानं श्वास आत ओढू लागली. फॉं-फू, फॉं-फू अशा आवाजाबरोबर तिचं ओढलं जाणारं पोट दिसत होतं. मग ही अस्वल पाण्याकडं निघाली. बोडीत उतरायची वाट आमच्याकडून होती. अंतर बहू होतं. चिंता नव्हती. ती आम्हाला टाळत बोडीला चक्कर मारुन समोरुन आली. उतरत्या काठावरुन बोडीत उतरु लागली. हाँव- हाँव करुन फिस्कारु लागली. मग उतरुन पाण्याशी आली. भुरकून पाणी पिऊ लागली.

आमच्यापर्यंत भुरके ऐकू येऊ लागले. फुर्र-फुर्र. गमतीत मी मोजलं. बरोबर एका मिनिटात २५ भुरके मारुन ती बोडीतून वर पळाली मग फेंगाड्या पायांनी विचित्र हलत बोडीच्या पलिकडं बांबूच्या रांझीत गुडूप झाली. पण कमाल झाली, एवढं धुड किती कमी पाणी पिऊन गेलं! मी रानात कधी अस्वलाला भरपूर पाणी पिताना पाहिलं नाही. अस्वलाला पाणी कमी का लागतं हे कोडंच आहे.

_MG_3897.jpg

पुढं वाट जवळ केली आणि परत मघाच्या नाल्याशी आलो. नाल्यातल्या खडकांवर बसलो. नाल्याच्या आस-यानं तिथं अनेक पक्ष्यांनी ठिय्या केला होता. छोटा निळाशार खंड्या सूर मारुन पुढं पळाला. भेरा ट्र्या-ट्र्या क्यांक-क्यांक ओरडत होता. स्थितप्रज्ञ बगळे शांतपणे पाण्यात नजरांचे गळ टाकून बसले होते. हिरव्यागार शेवाळाच्या गालिच्यावर पाणकिडे लपाछपी खेळत होते. सावलीत आळीमिळी बसलेले पक्षी बाहेर निघून उदरभरणात मग्न होते. पाहता पाहता झाडांच्या सावल्या हातपाय पसरु लागल्या. दुरुन गव्यांचा एक कळप पाण्यावर निघाला होता. त्याआधी वाटेनं निघालेला एकुलता नीलघोडा आम्हाला पाहून बुजला आणि सनान उधळला.

जनावरांची पाण्यावर यायची वेळ झाली होती. नजरांच्या खाणाखुणा झाल्या, माना हलल्या आणि आता निघावं असं ठरलं.
आम्ही उठून निघालो. हवा थंड नसली तरी गर्मीला उतार होता, कोमट हवा सुटली होती. रानवाटांवर पडलेल्या पाचोळ्याचा पिवळा-लाल-तपकिरी रंग खुलून दिसत होता. पुढं जाऊन सहजच वळून पाहिलं. एक थोराड जुनाट गवा रस्ता ओलांडत निघाला होता.

_MG_9248.jpg

आमच्याही नकळत कधीची मागच्या रानात घुटमळत उभी राहिलेली भेडकी हळूवार एक पाऊल येताना दिसली. तिच्या निर्मळ डोळ्यात जीवन दिसत होतं. खार्र-खुर्र पाचोळा वाजवत आलेली अस्वली आमच्या वासानं बांबूच्या रांझीमागूनच उधळली. आता थांबणं बरं नव्हे. तोंडचं पाणी कोणाचं काढू नये.

सूर्य क्षितिजाकडं उतरत होता. त्यात मोहाचा असा महुआ-महुआ गंध मिसळून अवघी सायंकाळच धुंद झाली होती. पाणवठा आता असंस्कृतांकडून रानटी सुसंस्कृत जनावरांच्या ताब्यात जाणार होता. पाणवठ्याच्या वाटेला उमटलेले आमचे पाय आता हळू हळू पुसत जाणार होते आणि जनावराच्या खुरांच्या आदिम नक्षीनं रातोरात जंगल पुन्हा सजणार होतं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर लेख आणि छायाचित्रे. मिनिटांत जंगल सफारी घडवून आणली या लेखाने. वाघ/सिंह हे बिबट्या/चित्ते मारतात असे टीव्हीवर पाहिले होते पण मारून खातात हे पहिल्यांदाच कळाले. शक्यतो हिंस्त्र जनावरे दुसऱ्या शिकारी प्राण्यांना खात नाहीत. तुम्हाला कधी काळा बिबट दिसला आहे का जंगलात फिरताना ?

@ अरिष्टनेमि,
रोचक लेख आणि सुंदर प्रचि! पहिल्याच प्र चि ने इतके गारुड केले की लेख वाचून संपला म्हणून थांबले .. तरीही परत (परत) वाचेनच. निसर्गाची आवड असली आणि स्वतः असे अनुभव घ्यावेत अशी कितीही इच्छा असली तरी ते काही नजीकच्या भविष्यात तरी शक्य दिसत नाही Happy तेव्हा अशा चित्रदर्शी लेखांतून तुम्ही जी सैर घडवता आणि जो अनमोल अनुभव देता त्यासाठी तुमचे खूप खूप आभार !
( अवांतर : तुम्ही तुमच्या सगळ्या लेखांचं एक पुस्तक प्रसिद्ध करावं अशी नम्र विनंती !)

सुंदर!! फोटोही सुंदर!
स्थितप्रज्ञ बगळे शांतपणे पाण्यात नजरांचे गळ टाकून बसले होते. >> वा! वा! परफेक्ट.

वॉव
काय लिहिलयय
काय टिपलय
काय अनुभवलय
सगळच अहाहा
धन्यवाद शेअर केल्याबद्दल __/|\__
फार फार आवडलय

अतिशय सुंदर लेख.. तुमचा प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला. फोटो अगदी मन प्रसन्न करणारे...
तुम्ही ज्या फुला-फळांची चव घेतली ती चव अगदी जीभेवर तरळली.. लहानपणी शेतातून फिरताना ह्या रानातल्या फळा-फुलांचा खूप आस्वाद घेतलायं...!!

लेखातली काव्यरचना हि सुरेख..!!

जबरदस्त लिखाण. बारीक बारीक अनोळखी तपशिलांनी भरलेलं. अख्खं रान जिवंत केलंत आमच्यासमोर. माहिती, शैली, फोटो सगळं च A -1.

जबरदस्त लिखाण. बारीक बारीक अनोळखी तपशिलांनी भरलेलं. अख्खं रान जिवंत केलंत आमच्यासमोर. माहिती, शैली, फोटो सगळं च A -1. >>> +१

@ अरिष्टनेमि,
रोचक लेख आणि सुंदर प्रचि! पहिल्याच प्र चि ने इतके गारुड केले की लेख वाचून संपला म्हणून थांबले .. तरीही परत (परत) वाचेनच. निसर्गाची आवड असली आणि स्वतः असे अनुभव घ्यावेत अशी कितीही इच्छा असली तरी ते काही नजीकच्या भविष्यात तरी शक्य दिसत नाही Happy तेव्हा अशा चित्रदर्शी लेखांतून तुम्ही जी सैर घडवता आणि जो अनमोल अनुभव देता त्यासाठी तुमचे खूप खूप आभार !
( अवांतर : तुम्ही तुमच्या सगळ्या लेखांचं एक पुस्तक प्रसिद्ध करावं अशी नम्र विनंती !) >>>>>> + ९९९९९९ Happy

केवळ सुंदर.....

जबरदस्त लिखाण. बारीक बारीक अनोळखी तपशिलांनी भरलेलं. अख्खं रान जिवंत केलंत आमच्यासमोर. माहिती, शैली, फोटो सगळं च A -1.>>>>>>++++111111 नेहमीप्रमाणे अप्रतिम. जंगलाचा खास दर्प असतो तुमच्या लिखाणाला.

Happy

प्रतिसादांसाठी सर्वांना धन्यवाद
@जिद्दु - हो, काळा बिबट मी पाहिला आहे. तो एक छान अनुभव होता. पण त्या दिवशी हातात कॅमेरा नव्हता.

काय कमाल फोटो आहेत. पहिल्या फोटोनेच मूड बनवला. गंमत म्हणजे अस्वलाच्या विष्टेचाही फोटो छान निरखून बघितला गेला.
लेख आता वाचतो Happy
आणि वाचलाही..
अप्रतिम लेख !! कितीतरी नवीन आणि रोचक माहिती मिळाली
इवलासा डाळीएवढा कोळी जवळून किती वेगळाच; भारीभन्नाट दिसतो>>> अगदी अगदी
आणि ते वाघ सिंहाचे ईतके अप्रतिम फोटो काढणार्‍यांचा तर नेहमीच आदर वाटत आलाय..

Pages