नय्यारा नूर - भारतात जन्मलेली पाकिस्तानी गायिका.

Submitted by बाख on 9 July, 2021 - 08:04

नय्यारा नूर - भारतात जन्मलेली पाकिस्तानी गायिका.

१९६८ साली पाकिस्तानातील लाहोरमधल्या नॅशनल कॉलेज ऑफ आर्ट्स येथे झालेल्या स्नेहसंमेलनात " झनक झनक पायल बाजे " या व्ही. शांताराम यांच्या चित्रपटातील लता मंगेशकरने गायलेले मीराबाई रचीत “जो तुम तोडो पिया” हे भजन एक विद्यार्थिनी गात होती. तिथल्याच इस्लामिया कॉलेजचे प्रोफेसर असरार जे स्वतः एक संगीतकार होते त्यांनी या मुलीची प्रतिभा ओळखली आणि तिला चित्रपटात गाण्याची संधी दिली, अगदी तिने गाण्याचे रीतसर शिक्षण घेतलेले नसताना सुद्धा. मग रेडिओ पाकिस्तानसाठी आणि पीटीव्हीच्या "अक्कड बक्कड," " टालमटोल " या सिरीयल साठी गाताना त्यातील " बरखा के लाखों तीर दिल पर कैसे सहूँ मैं " या तिने गायिलेल्या गाण्याने पाकिस्तानी संगीतकारांना भुरळ घातली.

त्यावेळी पार्श्वगायन क्षेत्रात फरीदा खानुम आणि नूरजहाँ यांचा दबदबा असताना देखील १९७३ साली या मुलीला घरांना या पाकिस्तानी चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. तिने गायिलेली गाणी लोकप्रिय झाली. त्यानंतर मात्र मेहदी हसन आणि अहमद रश्दी यांच्याबरोबर तिची जोडी जमली आणि पाकिस्तान चित्रपट सृष्टीला एक नवी गायिका मिळाली तर फरीदा खानुम आणि नूरजहाँ याना एक स्पर्धक तयार झाली. ती म्हणजे नय्यारा नूर.

फैझ अहमद फैझ या प्रख्यात कवीचा जावई, शोएब हाश्मी आणि इएमआय रेकॉर्डिंग कंपनी यांनी सयुंक्तपणे "नय्यारा सिंग्स फैझ" हे अल्बम लाँच केले, त्यातील फैझ यांचे एकमेव हिंदी गीत "बरखा बरसे छत पर" हे शहरयार झैदीसोबत गायिलेले गीत आणि अल्बम प्रचंड लोकप्रिय झाले. त्यानंतर नय्यारा नूर हे नाव घराघरात पोहोचले.

नय्यारा नूरचा जन्म गुवाहाटी (आसाम) येथे १९५० मध्ये अमृतसरहून स्थायिक झालेल्या कुटुंबात झाला. १९५८ च्या सुमारास नय्यारा नूर तिची आई आणि भावंडांसह पाकिस्तानात गेली आणि ते लाहोरमध्ये स्थायिक झाले. तिच्या वडिलांना गुवाहाटी इथल्या स्थावर मालमत्तेची विक्री करण्यासाठी १९९३ पर्यंत थांबावे लागले.

नय्यारा म्हणते, " शालेय शिक्षण घेण्याबरोबरच संगीत ऐकणे आणि गाणी म्हणणे हाच मनोरंजनासाठी विरंगुळा होता.लहानपणी, कानन देवी आणि कमला यांच्या भजनांनी तसेच बेगम अख्तरच्या गझल व ठुमरी यांनी प्रेरणा दिली. मी कानन बाला आणि बेगम अख्तर ऐकतच मोठी झाले पण लता मंगेशकर म्हणजे आमच्या सगळ्यांची ऑल टाईम फेवरीट!"

" ह्या गाण्याच्या ओढीनेच मला माझा नवरा मिळवून दिला, " ती पुढे सांगते, " शहरयार झैदी, आंतर-महाविद्यालयीन संगीत स्पर्धांमध्ये बऱ्याच वेळा माझे प्रतिस्पर्धी असायचे आणि नेहमी मला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मिळायची तर त्यांना दुसऱ्या क्रमांकाची. ते हेली कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधित्व करायचे. एकदा बेगम अख्तरची रेकॉर्ड शोधताना दुकानात आमची गाठ पडली. एकच रेकॉर्ड आणि आम्ही दोन गिऱ्हाईक! आपण लग्न करू आणि एकच रेकॉर्ड ऐकू! त्यांनी प्रस्ताव मांडला. थोड्या दिवसांनी आम्ही लग्न केलं!" शहरयार झैदी यांनी टीव्हीवर सहाय्यक अभिनेता तसेच मॉडेल म्हणून आतापर्यंत बरेच यश मिळवले आहे. तिचा धाकटा मुलगा जाफर झैदी हा काविश नावाच्या म्युझिक बँडचा मुख्य गायक आहे, तर मोठा मुलगा नाद-ए-अली पार्श्वगायक आहे.

नय्यारा हिने टेलिव्हिजनसाठी अरशद मेहमूद आणि जावेद अल्लादित्ता यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जी गाणी गायिली आहेत ती त्यांची स्वतःची आवडती गाणी आणि गझला आहेत. तानसेन मालिकेचे संगीत असो किंवा टायटल सॉंग्स “ चलो उस कोह पर," “मुझे विदा करो ” किंवा गझल “ ऐ जस्बा-ए दिल गर मैं चाहूँ ” , किंवा गीत “ फिर सावन रुत की पवन चली " ही गाणी त्यांच्या ओठावर सतत असतात. पीटीव्हीची क्लासिक मालिका धूप किनारेचे सर्वाधिक लोकप्रिय शीर्षक गीत म्हणजे फैज अहमद फैज यांचे, " रात तुम दिल मैं तेरी खोई हूई याद", " यह धुप किनारा ,श्याम ढले , मिलते हैं दोनों वक़्त जहाँ " ह्या नय्यारा हिने गायिलेल्या गझला केवळ पाकिस्तानातच नव्हे, तर भारतातही लोकप्रिय झाल्या.

सुलतान अर्शद ह्या संगीतकाराने " पहली नजर " ह्या राज कपूरच्या चित्रपटातील " उनका इशारा जान से प्यारा " हे अनिल विश्वास यांनी संगीत दिलेले गाणे नय्यारा यांच्या आवाजात रेकॉर्ड केले आणि अनिल विश्वास याना ऐकवले. अनिलदा यांचा विश्वास बसेना इतक्या गोड आवाजात नय्यारा हिने हे गाणे म्हंटले होते. ' ही चाळीसच्या दशकात असती तर किती बरे झाले असते ' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“ यादों के सायें " या गाजलेल्या अल्बम मध्ये न्यू थिएटरच्या चित्रपटातील काही गाणी नय्यारा हिने सादर केली, जी ४० च्या दशकात कानन बालाच्या आवाजात रेकॉर्ड केलेली होती आणि तेही फक्त ७८ आर पी एम रेकॉर्डवर उपलब्ध होती. रेकॉर्डची प्रत अगदीच खराब होती आणि काही शब्द तर कळतच नव्हते . हिंदीचे उत्तम ज्ञान असलेल्या काही लोकांकडे जाऊन शब्द जाणून घेतले, आणि त्यानंतर रेकॉर्डिंग केले.” नय्यारा सांगते.

आईना या पाकिस्तानी चित्रपटासाठी रॉबिन घोष यांनी एका लोकप्रिय बंगाली ट्यूनवर आधारलेले ," रूठे हो तुम तुमको कैसे मनाऊ पिया " ( https://youtu.be/RFWlpTlMy68 ) हे गाणे नय्यारा यांच्या आवडीच्या पहिल्या दहा गाण्यात येते . ती म्हणते , “रॉबिन साहेब बांगलादेशात गेले नसते तर मी त्यांच्या चित्रपटांसाठी गाणे चालूच ठेवले असते.” आपल्याकडे ओ पी नय्यर याना लताचा आवाज पसंत नव्हता तसेच रॉबिन घोष याना नूरजहाँचा आवाज आवडत नसे.

नय्यारा नूरने गाणी रेकॉर्ड करण्यापासून आता स्वत:ला दूर ठेवले आहे. ती म्हणते , “प्रत्येकाला एक दिवस कुठेतरी थांबणे भागच आहे. थांबण्याची वेळ आली आहे असे लोकांनी सांगण्यापेक्षा आपणच ती वेळ ओळखावी आणि शिखरावर असतानाच निवृत्ती घ्यावी." असे असले तरीही तिच्या चाहत्यांना मात्र ती गात राहावी असे वाटते.

ज्या लताबाईंच्या गाण्याचा आधार घेऊन नय्यारा नूर लोकप्रिय झाल्या त्यांना कुठे थांबावं हे वेळीच कळलं तसच लताबाई यांनाही वयाच्या सत्तरीत कळलं असतं तर नव्या संगीतकारांकडून एक प्रकारची उपेक्षा त्यांच्या वाटेला आली नसती. टीपेला जाताना आवाज फाटत असला तरीही त्या नव्या तरुण तारकांसाठी गात राहिल्या आणि स्वतःचं हसं करून घेत राहिल्या. " आता विसाव्याचे क्षण " असं त्या सात वर्षापूर्वी गाईल्या परंतु विसावा घेतला नाही. तिच्या भगिनी मीना मंगेशकर यांच्या म्हणण्याप्रमाणे सप्टेंबर २०१९ मध्ये लताबाईनी शेवटचे रेकॉर्डिंग केले तेंव्हा लताबाई एकोणनव्वद वर्षाच्या होत्या.

नय्यारा नूर हिच्या काही गाजलेल्या गझला :
१) हम के ठहरे अजनबी...२) तुम मेरे पास रहो...३ तेरा साया जहाँ भी...४ वह जो हम में तुम...
५ यह हाथ सलामत है...६ आ जाओ चलो आज...७ आइये अर्ज़ गुज़ारें...८ चलो फिर से...
९ खैर हो तेरी लैलो...१० उठो अब माटी से...

काही गाजलेली गाणी:
'तेरा साया जहां भी हो सजना (चित्रपट:' घराना ',),' तू ही बता, पगली पवन (चित्रपट: 'फूल मेरे गुलशन का'), 'इतना भी न चाहो मुझे ' (चित्रपट: 'परदा ना उठाओ ') 'आज गम है मुश्किल क्या' (चित्रपट: 'मस्ताना'), 'टूट गया सपना' (चित्रपट: 'सुबह का तारा'). 'बोल री गुड़िया बोल' (चित्रपट: 'आस',), 'इक अजनाबी चेहरे ' (चित्रपट: 'बागी हसीना'), 'मेरा प्यार तुम हो' (चित्रपट: 'फर्ज और ममता),' मौसम तो दीवाना है '(चित्रपट:' दो साथ '),' तेरा प्यार बन के आए '(चित्रपट:' भूल '), जरा मेरी नब्ज देख कर' (चित्रपट: 'अजनबी'), 'फूल बन जाउंगी ' (चित्रपट: 'किस्मत '), 'कुछ लोग मोहब्बत का सीला' (चित्रपट: 'गुमराह').
........................

Group content visibility: 
Use group defaults

अहा! माझी खूप आवडती गायिका! तुम्ही हा लेख लिहिलात यासाठी मनापासून धन्यवाद!
मी अमेरिकेत असताना यांची गाणी धूप किनारे मालिकेमुळे ऐकायला लागले. जेव्हा सुट्टीत भारतात परत आले होते तेव्हा गप्पा मारताना हा विषय निघाला आणि मी बाबांना युट्यूबवर नय्यारा नूर यांचे गाणे ऐकवले! आणि गंमत म्हणजे माझ्या बाबांची पण ही आवडती गायिका निघाली! इतकी आवडती की आमच्या ओळखीच्या एक भाभी होत्या त्यांचे माहेर पाकिस्तानात होते. बाबांनी त्यांना त्यांच्या पाकिस्तान भेटीत नय्यारा नूर यांच्या कॅसेट्स आणायला सांगितल्या होत्या! आणि त्या कॅसेट्स बाबांनी भरपूर ऐकल्या! मला आणि बाबांना मजा वाटली होती की कसे आम्ही दोघेही स्वतंत्रपणे नय्यारा नूर यांच्या आवाजाचे फॅन झालो!

<<<अहा! माझी खूप आवडती गायिका! तुम्ही हा लेख लिहिलात यासाठी मनापासून धन्यवाद!>>>
धन्यवाद जिज्ञासा. तुमच्या बाबांचं कौतुक आहे. खरंच ती छान गाते. मला तर उगीचच वाटत राहतं की ती भारतातच राहायला हवी होती, पण मग धूप किनारे साठी ती गाईली नसती!

छान लेख
लेख वाचून युट्युबवर- हम के ठहरे अजनबी हे गाणं ऐकलं...फारच छान वाटलं.. बाकीची पण ऐकेन निवांत.

मलाही धूप किनारे च्या खोई हुयी याद मुळेच माहित झाल्या नय्यारा नूर! आत्ता हे टाईप करत असताना तेच गाणं वाजतंय डोक्यात!

अहा! माझी खूप आवडती गायिका! तुम्ही हा लेख लिहिलात यासाठी मनापासून धन्यवाद!>>>>> +1000
(पण लतादिदिंचा उल्लेख अस्थानी वाटला. दोन महान कलाकारांची इथे गायिकांची उगीच तुलना (गायनशैली व्यतिरिक्त) करू नये असे मला वाटते). बाकी लेख छानच