दिलीप कुमार - ०३

Submitted by Theurbannomad on 8 July, 2021 - 09:19

दिलीप कुमारच्या अभिनयाच्या कारकिर्दीतला असाच एक महत्वाचा चित्रपट म्हणजे अंदाज. यात प्रेमाचा त्रिकोण असल्यामुळे दिलीपसमोर उभा होता चित्रपटसृष्टीचा भावी शोमन राज कपूर. मेहबूब खान यांच्या दिग्दर्शनात घडलेली ही अप्रतिम कलाकृती दिलीप कुमार यांच्या संयत आणि तरीही प्रचंड प्रभावी ठरणाऱ्या अभिनयाला वेगळ्या उंचीवर घेऊन गेली. दिलीप कुमार जेव्हा जेव्हा राज कपूर यांच्याबरोबर एकाच प्रसंगात उभे राहिले, तेव्हा तेव्हा तो प्रसंग त्यांनी व्यापून टाकला. नर्गिस सारखी तगडी अभिनेत्री आणि दिलीप कुमारांसारखा नट राज कपूरला जड नक्कीच गेला असावा....पुढे 'संगम' च्या वेळी राज कपूर जेव्हा दिलीपकडे चित्रपटाची कथा घेऊन गेला, तेव्हा त्याने ' सुंदर ' आणि ' गोपाळ ' पैकी कोणतीही भूमिका दिलीपने करावी अशी खुली ' ऑफर ' दिली, तेव्हा दिलीपसाहेबांनी त्याला म्हणे एकाच अट घातली - भूमिका तू सांगशील ती, पण दिग्दर्शक मात्र तू नसशील....पुढे दिलीपसाहेबांच्या अभिनयाचा प्रचंड प्रभाव असलेल्या राजेंद्र कुमारने ही भूमिका केली. राज आणि दिलीपसाहेब ' अंदाज ' नंतर चित्रपटात कधीही एकत्र दिसले नाहीत....अगदी नर्गिसनेही दिलीपसाहेबांबरोबर पुढे काम केलं नाही....पण तरीही हे सगळे जण वैयक्तिक आयुष्यात एकमेकांचे जानी दोस्त होते हे विशेष.

दिलीप कुमार यांच्या अभिनयात त्यांनी अभिनय कलेचा केलेला अभ्यास पदोनपदी डोकावत असे. तो काळ होता कलाकृतींच्या रंगभूमीकडून चित्रपट माध्यमाकडे होत असलेल्या स्थित्यंतराचा. पूर्वी रंगभूमीवर काम केलेल्या नटांना आवाजी अभिनय करावा लगे, कारण पिटापासून शेवटच्या रांगेपर्यंत आवाज स्पष्ट ऐकू जाणं तेव्हा अनिवार्य होतं. त्यामुळे रंगभूमीचे संस्कार झालेल्या नटांमध्ये एक प्रकारचा ' लाऊड ' अभिनय मुरलेला होता. शिवाय नाटकात ' क्लोज शॉट्स ' , ' साइड प्रोफाईल शॉट्स ' , ' लॉन्ग शॉट्स ' वगैरे प्रकार नसल्यामुळे चेहऱ्यावरही थोडा जास्तीचा अभिनय आणून नटांना प्रसंग खुलवायला लागत असे.... चित्रपट हे माध्यम अतिशय वेगळं होतं. तिथे अभिनय जास्तीत जास्त नैसर्गिक ठेवणं , शरीराच्या हालचाली मर्यादेत ठेवणं , ज्या प्रकारचा शॉट आहे त्या प्रकारच्या ' सेट अप ' ला अनुसरून आपल्या देहबोलीत - संवादफेकीत बदल करणं हे चित्रपटातल्या अभिनयासाठी महत्वाचं होतं. दस्तुरखुद्द बालगंधर्व चित्रपटात रमू शकले नव्हते, तिथे रंगभूमीवर विशेष काहीही काम न केलेले दिलीप सारखे नट खरं तर कधीच डब्यात जायला हवे होते, पण दिलीप कुमार यांच्याकडे अभ्यासू वृत्ती असल्यामुळे त्यांनी चित्रपट माध्यमाचा अतिशय बारकाईने विचार केला होता. आपल्या आवाजाची पट्टी त्यांनी याच अभ्यासातून खाली आणली, कारण चित्रपटात संवाद ऐकू जाण्यासाठी वेगळे ' ऑडियो ट्रॅक ' आणि ' साउंड सिस्टिम ' असल्यामुळे उगीच शिरा ताणून संवाद बोलायची गरजच पडणार नाही हे त्यांनी ओळखलं होतं. त्यामुळे आपसूक चेहऱ्यावर योग्य ते भाव त्यांना आणता यायचे. भारत भूषण, जॉय मुखर्जी, विश्वजीत अशा मक्ख चेहऱ्याने एकसुरी अभिनय करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये म्हणूनच दिलीपसाहेब, देव आनंद, राज कपूर, बलराज साहनी असे नट उठून दिसत....पण त्यातही बलराज साहनीचा सणसणीत अपवाद वगळता दिलीपसाहेबांइतकी अभिनयाची समाज खूप कमी जणांमध्ये दिसते.

दिलीप साहेबांचा अजून एक किस्सा इथे सांगण्यासारखा आहे. ' नया दौर ' या चित्रपटाच्या वेळी प्रचंड मानी स्वभावाचे ओ.पी.नय्यर , दिग्दर्शक - निर्माते बी.आर.चोप्रा आणि दिलीप कुमार - वैजयंती माला ही तुल्यबळ जोडी असा दुग्धशर्करा योग्य जुळून आलेला होता. नय्यर स्वभावाने अतिशय विचित्र. प्रेम करेल तर जीव ओवाळून टाकेल आणि वाकड्यात जाईल तर समोरच्याच्या सात पिढ्या वरून खाली आणेल असा त्याचा लौकिक. लता मंगेशकर या चित्रपट संगीतातल्या अनभिषिक्त सम्राज्ञी असूनही त्यांच्याबरोबर फाटल्यावर आशाताईंना बरोबर घेऊन नय्यरने आपली छाप चित्रपट संगीतावर सोडली....तिथे इतरांची कथा ती काय. दिलीप कुमार वास्तविक फटकळ म्हणून कधीच प्रसिद्ध नव्हते, पण का कुणास ठाऊक, ' नया दौर ' ची गाणी त्यांना विशेष आवडली नाहीत आणि त्यांनी ते स्पष्टपणे बोलून दाखवलं. नय्यरच ते....त्यांनी चोप्रा साहेबांना लक्ष्य केलं. चोप्रांनी चित्रपटाचा धडाक्यात प्रीमियर झाल्यावर अभिमानाने नय्यरना चित्रपट कसा वाटला म्हणून विचारलं, तर त्यांनी थंडपणे ' मुझे तो सिर्फ ' नय्यर ' दौर दिखा ' म्हणून उत्तर देऊन अप्रत्यक्षपणे दिलीप कुमारला टोला हाणला. पुढे संगीत आणि अभिनय अशा दोन्हींसाठी हा चित्रपट गाजला, दिलीप कुमारला सलग तिसऱ्या वर्षी अभिनयासाठी फिल्मफेयर देऊन गेला पण त्या दिवसानंतर चोप्रा आणि नय्यर कधीही एकत्र आले नाहीत....पण दिलीप कुमार आणि चोप्रा मात्र एकमेकांचे चांगले मित्र म्हणून पुढेही वावरले....अगदी बी.आर. यांच्या निधनापर्यंत.

दिलीप कुमार यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांच्याहून तब्बल २०-२२ वर्षांनी लहान असलेली सायरा बानो आली, ती त्यांच्याबरोबर आयुष्यभर राहण्यासाठीच. लग्नाच्या वेळी सायरा बानो केवळ २२ वर्षांची होती...तर दिलीपसाहेब ४४-४५ वर्षांचे....पण सायरा आपल्या नवऱ्यासाठी आयुष्यभर झटली आणि शब्दशः त्यांची सावली होऊन त्यांना सोबत करत राहिली. दिलीपसाहेब चित्रपट सृष्टीत आब राखून असले, तरी सुरुवातीला कामिनी कौशल आणि नंतर मधुबाला यांच्याशी त्यांचं सूत जुळूनही गाठी मात्र घट्ट होऊ शकल्या नव्हत्या. मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमकहाणीचे किस्से समस्त जगाला माहित होते आणि आहेत, पण या दोघांनीही कधीही आपल्या नात्यात बाजारूपणा येऊ दिला नाही. त्यांच्यातलं प्रेम आणि वाद - दोन्ही मर्यादेतच राहिलं...प्रेम अयशस्वी होऊनही दिलीप कुमार कधी दारूच्या आहारी गेलेत किंवा त्यांच्याकडून सार्वजनिक जीवनात मारहाणीसारखी कृत्य झालीत असं मात्र झालं नाही. राज कपूर - नर्गिस, संजय खान - झीनत अमान अशांचे किस्से चवीने चघळले गेले, पण देव आनंद किंवा दिलीप साहेब यांनी आपला तोल कधी ढळू दिला नाही.

त्यांच्या आयुष्यात आलेलं एकमेव वादळ म्हणजे त्यांनी अस्मा साहिबा यांच्याशी केलेला दुसरा निकाह. अनेकांच्या मते सायराजींकडून अपत्यप्राप्ती न होऊ शकल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा, पण दोनच वर्षात त्यांनी हा निकाह संपवून उर्वरित आयुष्य सायराजींबरोबर व्यतीत केलं. सायराजी खऱ्या अर्थाने ' दिलीपमय ' आयुष्य जगल्या आणि या नाजूक क्षणीही त्यांनी दिलीपजींची साथ न सोडता त्यांना माफ केलं. जी उंची चित्रपटसृष्टीत दिलीपजींची होती, त्याहून कदाचित जास्तच उंची सायराजींनी वैयक्तिक आयुष्यात गाठून दाखवली आणि दिलीपसाहेबांनीही पुढे त्यांचे जाहीरपणे सतत आभार मानले.

दिलीपकुमार नावाच्या या नटश्रेष्ठाने पहिली ' इनिंग्स ' संपवून चार-पाच वर्षाचा ' ब्रेक ' घेतला, तो झोकात पुनरागमन करण्यासाठीच...पुढच्या टप्प्यात त्यांनी चरित्र भूमिका स्वीकारल्या, आणि त्याही जबरदस्त गाजल्या....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतोय. आणखी भाग लिहिताय का?
नय्यर म्हणायचे त्यांच्या संगीतासाठी लताचा आवाज सूट होत नाही.
वर तिलाच नंबर १ म्हणायचे.

वाह. चांगले माहितीपूर्ण लिखाण. या लेखांमुळे ते ते चित्रपट पहायची इच्छा होते. काल मधुमती बघितला, आज नया दौर बघायला होईल असे वाटतेय.

कालच सायराजी व दिलीपकुमार यांची २००६ मध्ये झालेली मुलाखत बघितली त्यामुळे या लेखाचा उत्तरार्ध अगदी मनोमन पटला.

छानच लेखमाला!

नया दौर मधलं माझं एक निरीक्षण आणि त्याबद्दल पडलेल्या प्रश्नाचं उत्तर काही केल्या कळत नाहिये... ते असं की, शंकर नावाचं टांगेवाल्याचं कॅरेक्टर असुनही दिलीप कुमारांनी गोल टोपी का घातलीय सुरुवातीपासून आणि शेवटच्या रेसमध्ये?