संपीचं बदलतं जग (भाग १९)

Submitted by सांज on 7 July, 2021 - 08:24

‘अरे काय.. तू पण इथे?’ ब्लॅक टी-शर्ट आणि ब्ल्यु जीन्स घातलेली संपी मंदारच्या टेबलकडे येत म्हणाली.

मंदार त्याच्या तीन-चार मुलं-मुली असलेल्या ग्रुपसोबत बसून workshop सुरू होण्याची वाट पाहत होता. दुरूनच त्याला संपी येताना दिसली. पण आधी ही कोण मुलगी आणि अशी काय फार ओळख असल्यासारखी एकदम बोलतेय असं त्याला वाटलं. पण, मग ती जवळ आल्यावर ही आपली संपी आहे हे त्याच्या लक्षात आलं. आणि तो अक्षरश: अवाक झाला. त्याच्या ग्रुपमध्ये जवळ-जवळ घुसून संपी तिचं नेहमीसारखं उत्फुल्ल हसू चेहर्‍यावर झळकवत मंदारपाशी आली. तो असा अचानक भेटल्याचा आनंदही होताच त्यात. पण, तिच्यातल्या बदलांनी आश्चर्यचकित झालेल्या त्याचं मात्र ती जवळ आल्याने एकदम लाजाळूचं झाडच झालं. त्यात त्याच्या मित्र-मैत्रिणींच्या नजरा या दोघांवरच खिळलेल्या. क्षणभर त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर आले नाहीत. पण मग लगेच सावरत तो तिला म्हणाला,

‘अगं हो, अगदी लास्ट मिनिट ठरलं माझं.. तूही काही म्हणाली नाहीस रजिस्ट्रेशन केलंयस वगैरे..’

‘अरे हो.. त्याची ना गम्मतच झाली. माझंही लास्ट मिनिटच ठरलं. अॅक्चुअल्ली मीनल म्हणलेली सनडे आहे तर ट्रेकला जाऊ. तर आम्ही जाणार होतो ट्रेकला. सकाळी सहाला निघायचं ठरलेलं. पण ना अरे मी उठलेच नाही :D. नऊ वाजता रागावून तिने पाण्याची बदली ओतल्यावर मला जाग आली. मग काय मॅडम बसल्या ना माझ्यावर फुगून. तिचा रुसवा काढता काढता माझ्या नाकी नऊ यायला लागले. तितक्यात वरच्या फ्लोरवरची रेवा आली या workshop विषयी सांगत. तिच्या ग्रुपमधल्या दोघींनी ऐनवेळी तिला टांग दिली होती. मग मला संधीच मिळाली. खूप छान असतं, खूप छान असतं म्हणत मीनलला कसंतरी समजावल आणि आम्ही आलो इथे. आता कुठे ती माझ्याशी बोलायला लागलीये..:D’

संपीचं हे मोठ्या आवाजातलं आणि हशांनी भरलेलं पुराण ऐकून मंदारने डोक्यालाच हात लावला. मुख्य म्हणजे हे सगळं ती त्याच्या अख्ख्या ग्रुपसमोर सांगत होती. अर्थात त्याचं तिला काहीच गम्य नव्हतं. पण प्रत्येक गोष्ट तोलून-मापून, विचारपूर्वक, उद्या बोलायच्या गोष्टींची पण आजच तयारी करणार्‍या मंदारला मात्र उगाच कसंतरी झालं. त्यात आता त्याच्या मित्र-मैत्रिणीच्या चेहर्‍यावर अवतरलेले ‘कोणय ही?’ असं प्रश्नचिन्ह आणि ‘आम्हीही इथे आहोत!’ असं उद्गारवाचक चिन्ह दोन्ही त्याला लख्ख दिसले.

मग ती अजून काही बोलायच्या आत उगाच जरासा घसा खाकरत त्याने तिची सगळ्यांशी ओळख करून दिली. तिनेही सगळ्यांना हाय केलं. आणि ती आता त्यांच्याशीही गप्पा मारण्याच्या बेतात असताना त्याने तिला जवळपास ओढूनच बाजूला आणलं.

‘अरे! काय झालं? तू बोलायचास ती मैत्रेयी हीच का.. क्यूट ए फार.. बोलू दे ना मला..’

‘अगं हो जरा हळू.. इतक्या वेगाने तर मॅथ्सचे प्रोब्ल्म्स पण सोडवत नाही मी. एकतर धक्क्यांवर धक्के देतेयस आणि बोलणं! श्वास तरी घे.. हे सगळे आत्ता शांत वाटताहेत. नंतर चिडवतील मला..’

‘कसले धक्के? आणि तुला का चिडवतील सगळे?’

यावर मग पुन्हा स्वत:च्याच डोक्याला हात लावत हसू लपवत तो म्हणाला,

‘ते सोड.. हे इतकं बोलायला कधी शिकलीस गं तू? शाळेत तर तोंडातून शब्द फुटायचा नाही.’

‘हाहा.. कोणी सांगितलं तुला. तेव्हाही मी अशीच बडबडायचे. फक्त माझ्या ग्रुपमध्ये. आता सगळीकडेच बडबडते. हाहा एवढाच काय तो बदल.’

‘एवढाच? आणि हे काय आहे.. मी ओळखलंच नाही आधी तुला.. संपीची samy झालीयेस तू..’

मग स्वत:कडे पाहत तिची ट्यूब पेटली आणि ती म्हणाली,

‘अरे हो.. तुला सांगायचंच राहिलं ना.. ती पण फार मोठी गम्मत आहे..’

एवढ्यावर तिचं वाक्य मध्येच तोडत तो म्हणाला,

‘राहुदे राहुदे. गमती आपण नंतर डिसकस करू.. workshop सुरू होईल आता..’

इतक्यात संपी कुठे दिसत नाही म्हणून तिला शोधत मीनल तिथे अवतरली. आणि तिला पाहून पुन्हा तितक्याच उत्साहाने तिने तिची आणि मंदारची ओळख करून दिली. त्याला तिथे पाहून मग मीनल म्हणाली,

‘अच्छा.. तो इसलीये आना था तुझे यहा..’

यावर संपी, ‘अगं नाही गं.. मला माहितच नव्हतं. अगदी अचानक भेटलो आम्ही..’ असं काहीतरी म्हणाली.

मीनलकडे पाहून मंदार म्हणाला,

‘थॅंक यू..’

मीनलला प्रश्न पडला.

‘का?’

‘संपीच्या मेकओवर साठी गं.. नाहीतर हिच्या आईबाबांना प्रश्न पडला होता या गबाळीशी लग्न कोण करणार असा..आता बघ रांग लागेल.’

यावर मीनल आणि मंदार दोघेही खोखो हसले.

‘ए गप रे तू.. खडूस कुठला. असा काही प्रश्न नाही पडला बरं आईबाबांना. आणि मुळात मी लग्नच करणार नाहीये.. सो चिल्ल..’

‘ओह असं का.. हा नवीन विचार वाटत सध्याचा..’ मंदार मिश्किलपणे म्हणाला.

‘गप रे तू.. जा सुरू होईल workshop.’ संपी चिडून म्हणाली.

‘हो हो जातोय..

आणि हळूच जाता-जाता कानात, ‘छान दिसतेयस!’ असं म्हणून मंदार त्याच्या ग्रुपमध्ये जाऊन मिळाला.

नाही म्हटलं तरी संपी जराशी लाजलीच.

पुढे workshop सुरू झालं. पण दोघांचंही अर्धं-निम्म लक्ष एकमेकांकडेच लागलेलं होतं. त्यात अर्ध workshop झाल्यावर संपीच्या मोबाइलवर मंदारचा मेसेज झळकला,

‘कॉफी आफ्टर workshop? यू अँड मी..?’

संपी गालात हसली. आणि तिने रीप्लाय केला,

‘hmmm.. विल थिंक अबाऊट इट..;)’

त्यावर लगेच मंदारचा रीप्लाय,

‘तू आणि थिंक?? हाहा’

यावर मग रागाने लाल झालेली दोन तोंडं तिने त्याला रीप्लाय म्हणून पाठवून दिली.

आता दोघेही workshop संपण्याची वाट पाहू लागले होते..

क्रमश:

सांज
www.chaafa.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users