दिलीप कुमार - ०१

Submitted by Theurbannomad on 7 July, 2021 - 04:36

" बाबा, हा माणूस तुम्हाला हिरो म्हणून आवडतो? याच्यात आहे तरी काय इतकं? "
" अरे, तुम्ही आजकालची पोरं ' बच्चन वाली '...आणि आता तो नवा शाहरुख का काय तो आलाय तो तुमचा हीरो...पण आम्ही दिलीप कुमारचे ( च ) फॅन राहू, तुम्ही कितीही हसलात तरी "

माझ्या घरी बरेचदा दूरदर्शनवर दिलीप कुमारचं पिक्चर लागल्यावर हे संवाद इतरांच्या कानी पडत. मी आणि माझे तीर्थरूप पिक्चरचे वेडे. बाबांनी स्वतःच्या कॉलेजच्या दिवसात आपल्या ' समवयीन आणि समविचारी ' मित्रांबरोबर घरच्या वीजबिलाचे किंवा वाण्याच्या किराणा सामानाचे पैसे ' फर्स्ट डे फर्स्ट शो ' वर कसे खर्च केले होते याच्या सुरस कहाण्या पिक्चर बघता बघता ऐकायला मिळत. पण वेळप्रसंगी मार खायची तयारी ठेवून दिलीप कुमारला बघायला कोणी का जाईल, हे कोडं मला कधी सुटलं नाही.

तोंडातल्या तोंडात खर्जात आवाज लावून उच्चारलेले संवाद, एक दीर्घ श्वास घेऊन तो संपेपर्यंत आपली वाक्य खेचत नेण्याची संवादफेकीची पद्धत, वाकड्या मानेने डोळे मिचकावत काहीशा विचित्र पद्धतीने समोरच्या पात्राकडे बघूनही न बघता केलेला चमत्कारिक अभिनय मला कधीच भावला नाही. तशात दिलीप कुमार विशेष ' फायटिंग ' करत नसे, ज्याचं आम्हा शालेय पोरांना प्रचंड आकर्षण होतं. नाचाच्या बाबतीत गोविंदा किंवा जावेद जाफरी सोडल्यास बाकीचे खूप काही ' ग्रेट ' नसले तरी थोडीफार हालचाल करण्याइतपत ठीकठाक होते..( धर्मेंद्र - कुळातले सोडून.... ) दिलीप कुमार तिथेही मार खायचा. त्याची शरीरयष्टी म्हणावी तर तीही ओबडधोबड होती....सुनील दत्त, राज कुमार, शत्रुघ्न सिन्हा अशांचा अभिनय जेमतेम असला तरी त्यांची चाल, संवादफेक असं काहीतरी आकर्षक होतं.

पूर्वीचे अनेक पिक्चर मी बाबांबरोबर बघितले होते... त्यातही बाबांचे काही खास आवडते पिक्चर तर केवळ त्यांनी ' बघायला लावले ' म्हणून चार - पाच वेळा बघितले आहेत. त्यात बाबांच्या तरुण वयातल्या काळात त्यांच्या पीढीला आवडणारे अनेक जणांशी माझी ओळख झाली. त्यात ' शोमन ' राज कपूर आणि कदाचित भारतीय चित्रपट सृष्टीचा पहिला खराखुरा देखणा चॉकलेट हिरो देव आनंद या दिलीप कुमारच्या समकालीन सुपरस्टार नटांबद्दल मला कुतूहल वाटे. अभिनयाच्या बाबतीत अतिशय कृत्रिमपणे चार्ली चॅप्लिनची नक्कल करणारा राज कपूर दिग्दर्शनात मात्र बाप होता...देव आनंद ' गोल्डी ' च्या परीसस्पर्षामुळे ' गाईड ' सारखा नितांतसुंदर अनुभव देऊन गेलेला होता. किशोर कुमार या अतरंगी मनुष्याचे विनोदी पिक्चर मला प्रचंड आवडले होते. शम्मी कपूरच्या धसमुसळ्या पण ' बीट ' वर अचूक पडणाऱ्या नृत्याची नक्कल करण्यात मला खूप मजा यायची...पण...दिलीप कुमार मात्र मला अजिबात आवडला नाही....

शाळेनंतर थिएटरचं आकर्षण मला आपसूक पृथ्वी थिएटरला घेऊन गेलं आणि तिथे मी अनेक दिग्गज कलाकारांना स्टेजवर अभिनय करताना बघितलं. त्या कलाकारांच्या आपापसातल्या बोलण्यात कधी कधी अभिनय, दिग्दर्शन, स्टेज प्रेसेंस, कॅमेरा अँगल असे शब्द कानी पडत. एकदा थिएटर अभिनयाच्या क्षेत्रातले खरेखुरे पितामह नासीर साहेब तिथे NSD च्या काही उमेदवारांना अभिनय कसा करावा याचं मार्गदर्शन करत असताना त्यांनी दिलीप कुमारांचा उल्लेख केला आणि माझे कान टवकारले. या दोघांना मी तद्दन फिल्मी ' कर्मा ' मध्ये बघितलं होतं. देशभक्तीच्या नावाखाली आचरट प्रकार ठासून भरलेला तो सिनेमा डोक्याला ताप होता. त्याआधीचा तसाच आचरट सिनेमा म्हणजे मनोज कुमारचा ' क्रांती ' , ज्यात दिलीप कुमार अतिशय असह्य वाटला होता....पण आता दस्तुरखुद्द नासीर साहेब दिलीप कुमारबद्दल बोलत असल्यामुळे माझी उत्सुकता चाळवली गेली. सुदैवाने मकरंद देशपांडे, अनुराग कश्यप, टेडी मौर्य असे थिएटर दिग्गज तिथे नेहेमी येत असल्यामुळे तिथे NSD आणि FTTI चे विद्यार्थी पडीक असत. त्यातल्याच एकाला - अभिषेकला मी दिलीप कुमार विषयी छेडलं. त्याने त्या आठवड्याभरात मला जे जे काही समजावलं, ते ऐकून माझा एकंदरीतच चित्रपट किंवा अभिनय या विषयावरचा विचार करायचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला.

त्याच्याच सल्ल्याने मी आपणहून दिलीप कुमारच्या पिक्चरच्या सीडी विकत घेऊन आलो ( मुंबईच्या मनीष मार्केटच्या बाजूला एक सलीम भाई नावाचा पोरगा होता , जो जुन्या पिक्चरच्या सीडी विकायचा...). मी अभिषेकच्या सल्ल्याला शिरोधार्य मानून शुभारंभ केला दिलीप कुमारच्या ' मधुमती ' ने. प्रामाणिकपणे सांगतो, पहिल्या वेळी हे पिक्चर मला मंत्रमुग्ध करून गेलं त्यातल्या ' visuals ' मुळे. त्यानंतर क्रमांक आला गाण्यांचा....मग पुन्हा एकदा मी ते पिक्चर बघितलं ते फक्त आणि फक्त अभिनयासाठी. या वेळी माझं सगळं लक्ष होतं अभिनेत्यांकडे...पिक्चर बघून झालं आणि मी काही वेळ भारावल्यासारखा स्तब्ध झालो. दिलीप कुमार काय आहे, हे मला बहुधा समजलं होतं...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुमती एव्व्हरएव्व्हरग्रीन सिनेमा आहे. ऐन तारुण्यातले, गोड वैजयंतीमाला आणि दिलीप - सुरेख जोडी ने सजलेला सिनेमा. गूढ व सशक्त कल्पनाविलास असलेली कहाणी. प्राणचेही काम आवडते.

क्या बात है! सुंदर आणि समयोचित व्यक्तीचित्र.
दिलीपकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

+१
समयोचित आहे. मस्त अनुभव मांडला आहे. आवडले. RIP दिलीपकुमार.

क्या बात है! सुंदर आणि समयोचित व्यक्तीचित्र.
दिलीपकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!>>>>>> +११११

अमिताभ देखील दिलीपकुमार यांच्या प्रभावा खाली होता. पण तो माझा फेवरीट असला तरी शक्ती या सिनेमात दिलीपकुमारने अमिताभला अभिनयात कच्चे खाऊन टाकले होते.

छान लिहिले आहे
दिलीपकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

लेखात जे मत सुरुवातीला मांडले आहे तेच माझेही लहानपणी होते. ईतर समकालीन स्टार कलाकारांमध्ये दिलीपकुमार यांचा अभिनय समजायला मॅच्युरीटी येणे गरजेचे हेच खरे.

तू नही तो ये बहार क्या बहार है
गुल नही खिले के तेरा इंतजार है

दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!

मधुमती मला फार फार आवडतो! दिलीपकुमारचं व्यक्तिमत्त्व त्यात लोभस, रुबाबदार असं काहीसं आहे! पण सर्वशक्तिमान हिरोही नाही. सुहाना सफर, दिल तडप तडप के ही गाणी पुन्हा पुन्हा पहावी अशी!
दिलीपकुमारला श्रद्धांजली _/\_

मधुबनमें राधिका नाचे रे या गाण्यात सतार वाजवली आहे. ती दिलीपकुमारने ती स्वतः शिकुन घेतली होती. ( माफ करा तो म्हणले, पण काही लिजेंडरी व्यक्तीमत्वे आपल्याला आपलीच वाटतात. तो दिलीपकुमार, तो सचीन , ती लता, ती आशा )

दिलीपकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
हिंदी चित्रपटात सहजसुंदर अभिनयाचा पायंडा पाडणारा अभिनेता !!
' मधुमती ' इतकाच पण वेगळ्याच पठडीतला त्यांचा 'अमर' हा देखील अविस्मरणीय सिनेमा ( मधुबाला व निम्मी सोबत )

दिलीप कुमार मात्र मला कधीच आवडला नाही. कोहिनूर मध्ये सतारीवर मात्र सुरेख बोटे फिरत होती.
टिव्ही वर राम ऑर श्याम पाहिला होता.अजिबात आवडला नव्हता.शक्तिमध्ये बरेच जण म्हणाले की अमिताभला खाल्लेdilipkumarne.मला नाही पटले.
मधुमती आवडला होता.पण vaijayantimalache नृत्य,गाणी यांचाही मोलाचा वाटा होता.

श्रद्धांजली!

अमर, नया दौर, राम और श्याम, शक्ती हे आवडते चित्रपट. विशेषतः अमरमधे ग्रे शेड असलेला नायक चांगला रंगवला आहे. यातला जयंतचा खलनायकही ग्रे शेड असलेला आहे त्यामुळे सगळी खरीखुरी माणसे वाटतात. निम्मी एरवी असह्य होते पण यात चांगले काम केले आहे. मधुबालाचाही वेगळा रोल आहे.

अंदाज, दीदार, दाग, फुटपाथ हे रडके चित्रपट नाही आवडले. म्ह़णजे चित्रपट ठीक आहेत पण त्यातला दिलीपकुमार नाही आवडला.
मधुमती चित्रपट म्हणून खूप आवडतो पण त्यात दिलीपकुमारपेक्षा वैजयंतीमाला आणि गाणी, दिग्दर्शन हेच जास्त आवडले. मुगले आझमचंही तेच. अतिशय भावशून्य सलीम आणि एकाच पट्टीतील खर्जातील एकसुरी संवादफेक.

>> सुंदर आणि समयोचित
+१

मधूमती पाहिला नाही. पण ते गाणे अनेकदा पाहिलंय. "सुहाना सफ़र और ये मौसम हँसी..." हे गाणे सकाळपासून मनात रुंजी घालतंय. अन त्यातला तो उमदा दिलीपकुमार. मुकेशजींनी सुध्दा वर्णनातीत सुंदर गायलंय.

मुघल-ए-आझम पाहिला तेंव्हा दिलीपकुमार यांना अभिनयाची पाठशाळा का म्हणतात ते कळले. त्यात अर्थात सर्वच जण म्हणजे एकएक शिखरं आहेत.

पुढे मशाल मधल्या "गाडी रोको भाईसाब" या प्रसिद्ध दृश्याने हलवून सोडले आणि पाठशाळा वर शिक्कामोर्तब केले. "गाडी रोको" आजही गदगदून सोडते.

प्रसंगातील भाव प्रेक्षकांच्या थेट ह्रदयात पोहोचवण्याची ताकत त्यांच्यात होती. प्रभावी शब्दफेक, देहबोली, शून्य आक्रस्ताळेपणा आणि सर्वात महत्वाचे म्हणचे अभिनयातून दिसून येणारी कमालीची वैचारिक परिपक्वता हे सगळे म्हणजे दिलीपकुमार.

ग्रेसफुल आणि खूप काही शिकण्यासारखे होते सर्वकाही Happy दिलीपकुमार यांना श्रद्धांजली.

हे लेख आधीच ( दिलीपकुमार जाण्याआधी) ठेवलेले काय?

मला तरी आवडला नाहीच. त्याच त्याच लकबीने अभिनय वाटे.
मुळात, कलाकारांना इतके चढवून ठेवण्याइतके ( तोफ सलामी, झेंडा गुंडाळणे) कारण असायची गरज नाही( अ. आ.म.).
काही देशसेवा करत नाहीत.
अमर मूवीच मी पहिल्यांदा पाहिलेला आणि इतकव पकाव वाटलेला. तसेही त्याकाळातले, स्त्री म्हणजे दासी, त्यागी वगैरे पाहून वैतागच व्हायचा/होतो.
तसाच तो, अशोककुमार आणि मीनाकुमारी ह्यांचा एक मूवी.
त्यावेळी( माझ्या लहान्पणी, अशोककुमार म्हणजे ग्रेट हे समीकरण सुद्धा कळले नाहीच).
असोच.
गेलेल्या माणसावर काय बोलू नये( श्रद्धांजली धागा नाहीये तरी) त्यामुळे असो.