काही विचारतरंग

Submitted by सामो on 5 July, 2021 - 04:25

मनोबुद्ध्यहंकारचित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानंदरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥
मी मन नाही ना बुद्धी, ना चित्त ना अहंकार, ना पंचमहाभूते ना पंचेंद्रिये. 'शिवोहम-शिवोहम' या श्लोकाचा अर्थ कळत नाही. कळेलसे वाटते पण निसटत रहातो.

आपल्या चूका म्हणजे आपण नसतो, आपले विचार म्हणजे आपण नसतो. आपला आजार आपण नसतो की आपल्या हातून घडलेली पाप-पुण्यात्मक कर्मे आपण नसतो. “The whole is greater than the sum of the parts.” म्हणजे या सर्वांची बेरीज होउन देखील आपण दशांगुळे उरतो.

माझ्या डोळ्याने मला दिसते का? तर नाही फक्त डोळा एका बशीत ठेवला तर दिसेल का? तर नाही दिसणार. मग माझ्या डोळ्याचा जो डोळा तो कोण? हा जो अनुभव आपण रोज घेतो, जगतो ते कोणापर्यंत पोचतं? ते कोण भोगतं, अनुभवतं? आपण लहान असतो, मग तरुण होतो, मध्यमवयीन होतो, वृद्ध होतो. आपले शरीर बदलते, निर्णय, अनुभवांतून शहाणे होतो - पण या सर्वांना सुसूत्र ठेवणारा, बांधून ठेवणारा एक काहीतरी असते/तो. ते नक्की काय असते. उदाहरणार्थ- आपण लहान असतो तेही आपण च अनुभवतो असे तर नाही म्हणत की हां ते उंचीने कमी कोणीतरी अन्य होते. नाही. जग बदलते परंतु आपले 'स्व' स्थिर रहाते, अविचल, अच्युत, अक्षय. आणि जर आपणच इतके 'अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला। मारिल रिपु, जगति असा, कवण जन्मला॥' असे आहोत तर मग ईश्वरास आपल्या बाहेर शोधायची गरजच काय?

हे सारे खूप गूढ वाटते नव्हे आहेच. हे जे गुपित आहे जे भल्याभल्यांना उकललेले नाही ते आपल्याला या आयुष्यात तरी उकलू शकेल की नाही हा प्रश्नच आहे. आणि मग विचार येतो हे सारे गुपित, गूढ असे कोणी ठेवले? तिलाच अविद्या, माया असे म्हटले जाते का? जी की हे ज्ञान होउ देत नाही. झिरझिरीत आवरण बनून आपल्या आणि त्या साक्षात्काराच्या मध्ये रहाते. ‘या देवी सर्व भुतेषु भ्रांतीरुपेण संस्थिता…’ तिलाच संत मूळमाया म्हणतात का? संत हे तर आपले दीपस्तंभ बरोबर, आणि तसे असेल जर तर मग 'नामस्मरण' आदि साधनांनी ते आवरण विरु लागते असेही म्हटले जाते - ते कसे घडते. क्वचित पेन्सिव्ह (चिंतनात्मक) मूडमध्ये हे असे विचारतरंग उमटतात. आणि मग परत वाटू लागते - हे विचार तरी आपले आहेत का? की आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांनी प्रभावित (कंडिशन्ड) आपण म्हणजे निव्वळ काही सान्त रसायनांचा एक पुंजका आहोत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

स्वसंवादात्मक लेख आवडला.
मूळमायेबाबत तुमचा तर्क योग्य आहे. माया म्हणजे प्रकृती. म्हणजेच हा जगाचा दृश्यमान असा पसारा. तो आपल्याला वेढून आहे. आपण त्यात गुंततो, गुंगतो, मोहित होतो, भ्रमतो. अर्थात प्रकृती ही ईश्वराचीच एक विशेषकृती, प्र- कृती आहे. हे लौकिक जग म्हणजे प्रकृती. ह्याहून जे पार आहे तो परलोक. लोक् ह्या संस्कृत धातूचा अर्थ पाहाणे असा होतो. जे आपण पाहू शकतो, पंचेद्रियांनी आकळू शकतो, ते लौकिक असा एक अर्थ लावता येईल.
मानवाला न दिसणारे जग हे मानवाला दृष्टिगोचर अशा जगाहून कितीतरी मोठे, विशाल आहे. कितीतरी सूक्ष्मही आहे. साधे उदाहरण पहा : आपल्याला दिसणारा वर्णपट (Spectrum) किती छोटा आहे! त्याहून कितीतरी अधिक प्रकाश लहरी पृथ्वीवर, अखिल विश्वात पसरत असतात. अलीकडे त्यातल्या अगदी मिनिस्क्यूल भागाचा वेध आपण अत्याधुनिक यंत्रतंत्र सामुग्रीद्वारे घेऊ शकत आहोत. पण प्रचंड भाग आपल्या जाणीवांपलीकडे आहे. त्याची जाणीव होणे म्हणजे मायेचा पडदा दूर होणे. प्राणीमात्रांना भविष्याची चाहूल लागते. त्यांना नैसर्गिक आपत्ती आपल्याआधी कळतात. त्यांचे गंध आणि ध्वनिज्ञान मानवापेक्षा तीव्र असते. पृथ्वीहून काही प्रकाशवर्षे दूर असलेल्या ठिकाणी आत्ता काय घडतंय ते आपल्याला काही वर्षांनी कळेल पण एखाद्या उच्च प्रज्ञेच्या महामानवाला ते आत्ताच कळू शकेल. म्हणजे पृथ्वीवर तो भविष्यवेत्ता ठरेल.
हेही सगळं जाऊ दे. आणखी वेगळ्या बाजूने पाहूया. आपण आपल्या मेंदूच्या एकूण कार्यक्षमतेपैकी फारच थोडी क्षमता वापरतो. जर आपण कोणत्याही साधनाद्वारे ही वापराविना पडून असलेली क्षमता थोड्याफार प्रमाणात वापरात आणू शकलो तर काय होईल? इतरांना जे अलौकिक, ते आपले लौकिक जग बनेल. आपण मायेपलीकडे पाहू शकू, जाणू शकू. जे इतरांना गूढ आहे ते आपल्याला गूढ राहणार नाही. हेच ते तादात्म्य पावणे, चैतन्याशी अथवा चित्शक्तीशी जुळून राहाणे असे म्हणता येईल. हे स्थिरबुद्धीने साधता येते.
आता थोडा उपदेश: मनाच्या स्थिरतेसाठी सहा शत्रूंना कह्यात ठेवणे ही पहिली पायरी. हे साधले, बुद्धी स्थिर झाली की आपोआपच पुढच्या पायऱ्या दिसू लागतात. भलेबुरे, सत् असत् कळू लागते. विवेक आणि तारतम्य अंगी बाणते. वागणे निर्दोष बनते. आधीच अंदाज येतो. सावधपणा येतो. alertness, proptness आणि awareness कितीतरी वाढतो; कामे वक्तशीर, सुबक, नेटकी, आखीव रेखीव घडू लागतात आणि यश मिळते. एक क्षणही वाया जाऊ न दिल्याने आणि योजनापूर्वक काम केल्याने आयुष्यात अफाट कार्य घडते.
असो. थोडक्यात, आपणास जे इंद्रियगोचर आहे ते चितशक्तीचा एक छोटासा अंश आहे. आपली इंद्रियगोचरता वाढवण्यासाठी आपली ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये धारदार, सूक्ष्मवेधी, कार्यक्षम बनवणे आवश्यक आहे. आहार विहाराचे नियम पाळले, (अतिरेक टाळणे, संतुलितपणा राखणे), मनचित्तबुद्धीचे स्थैर्य आणि कार्यक्षमता राखली, अहंकार सोडून आत्मीयतेची कास धरली तर हे शक्य होऊ शकते, मेंदूच्या by default आज्ञा देण्यावर नियंत्रण येऊ शकते.

थोडाबहुत अवांतर फापट पसारा झाला आहे त्यासाठी क्षमस्व.

@हीरा फाफटपसारा नाहीये. फार मस्त लिहीले आहेत तुम्ही. लोक म्हणजे जवळजवळ लुक या अर्थीच शब्द झाला की Happy
>>>>थोडक्यात आपणास जे इंद्रियगोचर आहे ते चितशक्तीचा....... by default आज्ञा देण्यावर नियंत्रण येऊ शकते.
छान लिहीले आहे. थोडक्यात ऑप्टिमायझेशन होते.

@जिद्दु - धन्यवाद

छान चिंतन. मलाही असेच काहीसे वाटत राहते कधीकधी.....! त्यामुळे ते शब्दात वाचायला मिळाले याचा आनंद आहे....
हिरा यांचे विवेचनही आवडले....

Happy आवडले.
पुस्तकांनी प्रभावित (कंडिशन्ड) आपण म्हणजे निव्वळ काही सान्त रसायनांचा एक पुंजका आहोत? >>> अर्थातच.
आपले सगळे ज्ञान , सेकंड हँड व भ्रष्ट आहे. जे आपण ज्ञान समजतो ती केवळ माहिती आहे.
मी हे शिवोहम् शिवोहम् ऐकते.
I am neither the mind, nor the intelligence or the ego, I am beyond birth and death, I am the ever pure blissful consciousness.
I AM SHIVA.. !

हीरा यांचा प्रतिसादही आवडला. कधीतरी वाटतं तुमच्या कडून असे सुरेख प्रतिसाद काढून घेण्यासाठी असे धागे काढावेत. Happy

I AM SHIVA.. !>> हे कुठे वाचलं मध्यंतरी एक कपल आंध्रामध्ये असेच आय अ‍ॅम शिवा आय ओन्ली गॉट करोना शिवा पार्टिकल असे करताना दिसले होते. कुठून रिलीज होतात हे ज्ञान कण?! सोर्स प्लीज

बशीतला डोळा हे लै भारी वाटलं

अहो अमा, ते वरच्या लेखांतल्या पहिल्याच ओळींचे भाषांतर आहे. तुम्ही काय लिहिले आहे ते मला काही कळले नाही. सोर्स: स्तोत्रांची आवड आणि श्रवण.

>> आपले सगळे ज्ञान , सेकंड हँड व भ्रष्ट आहे.

सेकंड हँड ठीक आहे पण भ्रष्ट का?

न्यूटन म्हणलेला "If I have seen further it is by standing on the shoulders of Giants."

ज्ञान कधीच भ्रष्ट असू शकत नाही.
बरेचदा माहिती (information) आणि ज्ञान (knowledge) ह्यात गल्लत होते.
ज्ञान हे जेव्हा second hand आहे असे म्हटले जाते तेव्हा ती माहिती असते. ज्ञान नसते. ज्ञानाची व्याख्या अनेक प्रकारे करता येईल.
ज्ञान म्हणजे revealation असेही म्हणता येईल.
ज्ञान हा शब्द आपण खूप सैलपणे वापरतो.

असं अंतर्मुख होऊन केलेलं चिंतन भावतं. ते करण्यातला आनंद हि वेगळाच Happy

>> हा जो अनुभव आपण रोज घेतो, जगतो ते कोणापर्यंत पोचतं? ते कोण भोगतं, अनुभवतं?

आपले अवयव, आपला आवाज, आपले दिसणे, आपले विचार म्हणजे 'मी' नव्हे. या गोष्टी प्रत्येकागणिक वेगवेगळ्या. अगदी म्हणूनच 'मी म्हणजे नक्की काय?' याची उत्तरे सुद्धा प्रत्येकागणिक वेगवेगळी येतील. कारण विचार/बुद्धी हे सुद्धा प्रत्येकागणिक वेगळे आहे. याबाबत प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. प्रत्येक व्यक्तीचा बोटांचा ठसा वेगळा आणि हे वेगळेपण प्रत्येक अवयवांच्या बाबतीत आहे. पण तरीही काही गोष्टी समान का जाणवतात? सहवेदना का जाणवते? 'सारी मानवजात', 'सारी जीवसृष्टी' असे का म्हटले जाते? कारण, हे शब्दप्रयोग त्या 'साम्याला' उद्देशून आहेत.

आताच्या काळात अवयवदान करतात. डोळा ज्याला दान केला त्याला दिसू लागते. डोळ्याच्या मूळ मालकाला नाही. अवयवच तो. तीच गोष्ट प्रत्येक अवयवाच्या बाबत लागू पडते. अगदी आपले अनुभव आणि स्मृती, यांना सुद्धा. डोळ्याप्रमाणेच अनुभव आणि स्मृतीसुद्धा दान करता येईल भविष्यात. त्यामुळे माझे अनुभव आणि माझ्या स्मृती अन्य कोणी अनुभवू शकेल. पण तरीही ती व्यक्ती म्हणजे 'मी' नसेल Happy ते अनुभव 'माझे' राहणार नाहीत. कारण तेच. 'मी' ची व्याख्या करणारे 'जे काही आहे ते' फक्त आपल्यातच असते. 'सारी मानवजात', 'सारी जीवसृष्टी' मध्ये ते एकच असले तरी प्रत्येक सजीवात त्याची सिग्नेचर हि वेगवेगळीच असणार. अगदी बोटांचा ठश्या सारखीच. म्हणजे बोटं तर सर्वांनाच आहेत पण ठसे वेगवेगळे. तसेच हे Happy

ध्वनीमुद्रणाचा शोध लागल्यानंतर यंत्रामधून एखाद्या मनुष्याचा आवाज यायला लागला. प्रत्येकाच्या आवाजाची 'सिग्नेचर' वेगवेगळी आहे पण मशीन त्याचे मुद्रण करू शकते. हा मला सर्वात क्रांतिकारी शोध वाटतो. याच दिशेत पुढे जाऊन द्विमितीय प्रतिमा रेकॉर्ड करता येऊ लागल्या. आणि याच दिशेने आणखी पुढे जाऊन 'मी' ची व्याख्या करणारे 'जे काही आहे ते' ते जर रेकॉर्ड करून ठेवता आले तर?

... Happy

पुढे जाऊन 'मी' ची व्याख्या करणारे 'जे काही आहे ते' ते जर रेकॉर्ड करून ठेवता आले तर? »»» The 100 या इंग्रजी मालिकेमध्ये ही संकल्पना आहे. माणसाचा कॉन्शसनेस क्लाउड वर अपलोड करतात असे दाखविले आहे.

>> पुढे जाऊन 'मी' ची व्याख्या करणारे 'जे काही आहे ते' ते जर रेकॉर्ड करून ठेवता आले तर? »»» The 100 या इंग्रजी मालिकेमध्ये ही संकल्पना आहे. माणसाचा कॉन्शसनेस क्लाउड वर अपलोड करतात असे दाखविले आहे.

हे त्यांनी कसे दाखवलेय नक्की? बघावे लागेल. इंटरेस्टिंग. कारण मी जी कल्पना केलीय त्यानुसार 'जीवा'चा (कॉन्शसनेस) त्रिमितीय पॅटर्न रेकॉर्ड करावा लागेल. आणि समजा हे जरी प्रत्यक्षात यशस्वी झाले तरी, एखादा ठराविक सिग्नेचर असलेला पॅटर्न म्हणजेच 'मी' असे का? हा प्रश्न अजून पुढे आहेच Wink

> पुढे जाऊन 'मी' ची व्याख्या करणारे 'जे काही आहे ते' ते जर रेकॉर्ड करून ठेवता आले तर? »»» The 100 या इंग्रजी मालिकेमध्ये ही संकल्पना आहे. माणसाचा कॉन्शसनेस क्लाउड वर अपलोड करतात असे दाखविले आहे. >> अपलोड या सिरीजमध्ये afterlife निवडणे अशी कल्पना आहे. पण ते ही इथल्याच लाइफचे एक्स्टेंशन. मानवनिर्मित प्रतिसृष्टी.

छान विषय आणि छान चर्चा आहे इथे. माझा याकडे बघायचा दृष्टीकोन अजिबातच आध्यात्मिक नाही.

>>हा जो अनुभव आपण रोज घेतो, जगतो ते कोणापर्यंत पोचतं
आपण पंचेंद्रियांद्वारे जे अनुभव घेतो ते मेंदुपर्यंत पोचतात, तिथे ते इंटरप्रिट केले जातात आणि साठवले जातात. शरीराचा इतर कुठलाही भाग निकामी झाला किंवा बदलला तरीही या सर्वांना सुसूत्र ठेवणारा, बांधून ठेवणारा मेंदुच असतो. पुर्ण शरीराला पॅरॅलिसीस झाला तरीही जोपर्यंत मेंदु काम करतोय तोपर्यंत "स्व" आहे. पण इतर सगळे अवयव व्यवस्थित असुनही जर मेंदु निकामी झाला असेल (ब्रेन-डेड) तर ते सर्व अनुभव उपभोगणारा "स्व" त्या शरीरात नसतो. म्हणुन 'मी' ची व्याख्या करणारे 'जे काही आहे ते' माझ्या मते मेंदु आहे.

आपण हसताना, बोलताना, स्वप्न बघताना इ. मेंदुचे कोणते भाग उत्तेजीत होतात याबद्दल काही माहीती उपलब्ध आहे. पण मेंदुबद्दल अजुन खुप काही समजुन घेणं शिल्लक आहे. मेंदुमधले अब्जावधी न्युरॉन्स एक्मेकांत केमिकल्स द्वारे संवाद साधतात असे ऐकुन आहे (synapse), हार्मोन्स नावाने ओळखली जाणारी इतर काही रसायनं देखिल मेंदुवर (म्हणुन त्या "स्व" वर) परीणाम करत असतात. हे लक्षात घेता "आपण म्हणजे निव्वळ काही सान्त रसायनांचा एक पुंजका आहोत" या विचाराशी पुर्णतः सहमत.

गंमत म्हणाजे माझ्या या पुर्णपणे भौतिक/जीवशास्त्रिय दृष्टीकोनातुन वाचल्यावरही वरचा हीरा यांचा प्रतिसाद तंतोतंत पटतो.

>>'मी' ची व्याख्या करणारे 'जे काही आहे ते' ते जर रेकॉर्ड करून ठेवता आले तर?
प्रयत्न चालु आहेत. अजुन साधारण ५० वर्षांत मेंदुची कॉपी बनवुन ठेवणं शक्य होईल म्हणतात. आणि शरीर नसलेला हा फक्त मेंदु (कॉपी) त्याला मिळणार्‍या इलेक्ट्रीक सिग्नलना इंटरप्रिट करत अनंत काळ "जिवंत" राहु शकेल.

हा ऐहीक दृष्टीकोन इथे अवांतर वाटत असल्यास क्षमस्व!

अतुल, व्यत्यय छानच माहीती मिळते आहे. बाप रे कॉन्शसनेस अर्थात चिती कशी मॅप करणार? ज्ञान ह्म्म्म!!! पक्ष्यांना स्थलांतर करण्याचे,घरटे विणण्याचे उपजत ज्ञान असते. बरोबर माहीती वेगळी व ज्ञान वेगळे.
>>>>>>डोळ्याप्रमाणेच अनुभव आणि स्मृतीसुद्धा दान करता येईल भविष्यात. त्यामुळे माझे अनुभव आणि माझ्या स्मृती अन्य कोणी अनुभवू शकेल. पण तरीही ती व्यक्ती म्हणजे 'मी' नसेल Happy ते अनुभव 'माझे' राहणार नाहीत.
बाप रे!!
>>>>आणखी पुढे जाऊन 'मी' ची व्याख्या करणारे 'जे काही आहे ते' ते जर रेकॉर्ड करून ठेवता आले तर?
मस्त कल्पना आहे.
--------------------------
@व्यत्यय - मलाही शेवटी असेच वाटते की आपण सान्त (फायनाईट) रसायनांचा एक पुंजका आहोत. औषधांनी नको असलेल्या स्मृती , विस्मृतीत टाकता येतात. स्वभाव बदलत नसेल परंतु आपला रिस्पॉन्स टु द एक्स्टर्नल स्टिम्युली बदलतो इतका की आपल्याला आपले नवल वाटते. तेव्हा औषधे मेंदूचे खूप मॅनिप्युलेशन करु शकतात. हे सत्य आहे. एकदा मेंदू काबीज झाला की व्यक्तीवरच नियंत्रण आले ना.