शापित स्त्री (भाग १)

Submitted by मिरिंडा on 3 July, 2021 - 11:30

शापित स्त्री (भाग १)
---------------
ती आमच्या शेजारी राहायला आली. एकदा फक्त दिसली. दिसली म्हणजे ओझरती. बदामी रंगाचा ड्रेस त्यावर लाल भडक चुन्नी. आम्ही दोघांनी हसायचा प्रयत्न केला. अगदी इलाज नाही म्हणून ओठाच्या कोपऱ्यातून अर्ध्या इंचाचच हसू .आता तुम्ही म्हणाल मी काय मोजपट्टी घेऊन बसलो होतो का . थोडक्यात अजिबातच हसू नाही. आम्ही आमच्या मुलाना ताकीद दिली. " हे बघ निशू ,(माझी मोठी मुलगी वय वर्ष आठ ) शेजारच्या काकूंच्या घरची बेल वाजवायची नाही, कडी वाजवायची नाही त्याना मुलं आवडत नाहीत. समजलं ना . तू मोठी आहेस. "....ते तेवढ्यावरच राहिलं. कधी आमच्याशी संपर्क नाही. की ओळखीचं हासूही नाही. नवरा सकाळी सहा वाजता कामावर जायचा. कदाचित
रात्री येत असावा. त्यांचं सामान रात्रीच आलं असावं. सुटीच्या दिवशीही दरवाज्या बंद. चाळीत इतरही लोकं होती म्हणून बरं. नाहीतर आमचा कोंडमारा झाला असता. घरातून कोणताही आवाज नाही . चुकून आलाच तर कधीतरी टीव्हीचा आवाज यायचा. म्हणजे टीव्ही आहे तर.
असेच काही महिने गेले.पावसाळा सुरू झाला. माझ्या खोलीला लागून असलेली खिडकी कायम बंद असायची. पलीकडची खिडकी मात्र अर्धवट उघडी असायची.त्यांची खोली शेवटची होती. संडासला जाण्यायेण्याचा सगळ्यांचाच रस्ता त्यांच्या खोलीवरुनच होता. पण अर्धवट उघडल्या खिडकीतून आत डोकावण्याची धाडस मला कधी झालं नाही....असो, जबरदस्त पावसाला सुरुवात झाली.सुरुवातीचाच पाऊस , पण असा पडू लागला की लोकांशी दुष्मनीच होती त्याची....... सगळीकडे हिरवळ माजली. गार ओलसर वारा, ठिकठिकाणी साचलेली डबकी, चिखलराड यांतून मार्ग काढीत घरी ये जा करावी लागत होती.
दोन तीन महिने असेच गेले. घडत काहीच नव्हतं. पावसाळा संपत आला. म्हणजे आपल्याला तो संपला असं वाटतं. तेव्हाच तो असा पडायला लागतो की आत्ताच पावसाळा चालू झालाय की काय असं वाटावं. शेजारच्या दोघांची काहीच खबर नव्हती. मी हल्ली बायकोला त्यांच्याबद्दल अधूनमधून विचारायचो. बायको कधी बरी उत्तरं देत असे, तर कधी ," तुम्हाला हल्ली बरा इंटरेस्ट यायला लागलाय हो त्यांच्यात ? " असं म्हणून गप्प करायची. मला स्वस्थ बसवत नव्हतं. काहीतरी पण त्या बाईबद्दल माहिती मिळायलाच हवी. त्यांना नक्कीच काहीतरी इतिहास असणार. मला फार खात्री आणि कुतूहल होतं........ मी असाच एकदा रात्रीची शिफ्ट करुन घरी आलो होतो. हातपाय तोंड धुण्यासाठी मी नळावर गेलो. जाताना माझं अजिबात लक्ष गेलं नाही. पण येताना मात्र मला आठवण झाली. त्यांची दुसरी खिडकी अर्धवट उघडी होती. मी मांजराच्या पावलांनी दबकत आलो. खिडकीच्या बंद तावदानाशी येऊन उभा राहिलो. आतमध्ये ती समोरच्या बाजूला उभी होती. तिचा नवरा खिडकीकडे पाठ करुन आरामखुर्चित बसला होता. तिचा एक हात त्याच्या डोक्यावरुन ती फिरवीत असावी. माझ्या कानावर पुढील शब्द आले. " सांगा न., लग्नाला तीन वर्ष झाली, अजूनही असेच वागणार आहात का ? मला एकदा तरी , झालं गेलं विसरून जाऊन , जवळ घ्या ना. ..." असं म्हणाल्यावर मी थोडयाशा उघडल्या तावदानातून डोकावलो. माझा चेहरा अंधारात असल्याने दिसणार नव्हता. तिने ब्रा काढली होती. तिची भरगच्च गौरवर्णीय पुष्ट छाती उघडी होती. त्यावरील कडक होत जाणारी पिंगट स्तनाग्रं पूर्णतया दिसत होती. विस्फारलेल्या अनिमिष नेत्रांनी मी पाहात होतो. माझं तोंड कोरडं पडत होतं. घोगरे आवाजात तो म्हणाला, " तुला लग्नाच्या पहिल्या रात्रीच सांगितलेलं तू विसरलीस असं दिसतंय. तुला आयुष्यात कधीही हात लावणार नाही असं सांगितलं होतं. तेच तुझ्या बापालाही सांगितलं होतं. तुझ्या मूर्खपणाची हीच शिक्षा आहे. हातापाया पडणाऱ्या तुझ्या लाचारीची दया येऊन मी वरील अटीवर लग्न केलं. " .... पण आता तरी ते विसरावं हे बरं नाही का ? " तिचे डोळे भरुन आले होते. ती पदरानी डोळे पुशीत उभी असतानाच
तो म्हणाला, " तुला फसवणाऱ्या त्या प्रोफेसरला लाज नाही वाटली. एकही पत्र ना फोन. इतका बेजबाबदार परदेशी जाऊन विसरला तला. ही कायविसरण्याची गोष्ट आहे . मी नाही म्हणजे नाही हात लावणार. मुकाट्यानं कपडे घालून झोप आणि मलाही झोपू दे. सकाळी चारला उठायचं असतं." मी तिथून निघालो होतो. माझ्या खोलीत जाऊन मी अंथरुणावर पडलो.

मी कुठेतरी सुखावलो होतो. या बाईला इतिहास निघाला हे बरं झालं, असं माझ्या मनात आलं. वरकरणी मात्र मी सहानुभूती वाटत असल्याचं नाटक करीत मनाला समजावीत होतो. पण मनाला सगळं माहीत होतं. मन मात्र खंवचटपणे हसत असल्याचा मला भास झाला. मी मनाला दडपून झोपण्याचा प्रयत्न करीत होतो. आता मला त्या बाईचं निरिक्षण करण्याची संधी मिळणार असल्याने आसुरी आनंद झाला होता. असो. झोप उशिरा लागली. सकाळी उठल्याबरोबर मी तिच्या दरवाज्याकडे पाहिलं. तो लोटलेला दिसला. पण रात्रीचे अवशेष दिसण्याचं काहीच कारण नव्हतं. दिवसभराच्या कामात हा विषय बाजूला पडला. दुपारी चार वाजता माझी शिफ्टला जाण्याची वेळ झाली. मी निघालो. बाहेर पडताना तिच्या दरवाज्याकडे परत पाहिलं. तो लोटलेलाच होता. पलीकडची खिडकी मात्र रात्री जेवढी उघडी होती तेवढीच होती. ......आठ दहा दिवस काहीच घडलं नाही. एक दिवस दुपारच्या वेळी एक आजोबा स्टाईल गृहस्थ आले. त्यांना ती कुठे राहते ते माहीत असावं. त्यांनी थेट तिच्याच घराची कडी वाजवली. दरवाज्या उघडला. आजोबा आत शिरले. दरवाज्या लागला. मला दोन वाजेपर्यंत शिफ्टसाठी निघणं भाग होतं. ..............
आत शिरल्यावर दरवाज्या लागला. मालती त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागली. बाबा तिच्या डोक्यावरुन हात फिरवीत तिला मिठीत घेत ,रडण्याचा पहिला आवेग दाबून म्हणाले," बाळा आश्रमातून पत्र आलंय. त्यांच्या अटींची प्रतही आलेली आहे. ती स्वीकारुन परत पाठवायची आहे. ही घे प्रत " . ....
" बाबा , ते ठेवणार आहेत ना अर्चूला. " मालतीने घाबरत विचारलं. ..... " हो, हो ठेवणार आहेत पण अर्चू वयात येईपर्यंत. म्हणजे अजून सहा-सात वर्षे आहेत आपल्या हातात . कदाचित प्रोफेसर साहेब परत येतीलही. तिला बरोबर घेऊनही जातील. म्हणजे सगळाच तिढा सुटेल. " बाबा व्यथित होत म्हणाले. तिनी चहाचं भांडं गॅसवर चढवलं. घाबरत बाबांनी विचारलं, " जावईबापू केव्हा येतात ? मला तेवढी ती प्रत सही करुन दे.पाठवावी लागेल. " ......एकदाचा चहा झाला. तो दोघांनी घेतला. अचानक तिनी विचारलं. " अर्चूला भेटलात का ? कशी आहे ती ? माझी आठवण काढते का ? " .... " नाही बेटी तू तिला आठवतच नाहीह. आम्हाला आजोबा आजी म्हणून ओळखते. घरी कधी नेणार म्हणून मागे लागते ग.! काय सांगणार त्या लहानगीला ...? " मग त्यांनाही अश्रू आवरेनात. मालतीने हातात सही केलेली प्रत बाबांच्या हातात कोंबली. आता ते जाणार म्हणून पुन्हा तिचे डोळे भरुन आले. प्रत खिशात ठेवीत त्यांनी दरवाज्या उघडला. आणि तिने दबक्या आवाजात त्यांना विचारलं, " कधी सुटका होणार हो इथून. ? ". .... "अगं असं काय म्हणतेस, सहवासातील प्रेम निर्माण होतं . मी आणि तुझी आई लग्नाआधी ओळखत होतो का ? " .

धोतराच्या सोग्याने डोळे कोरडे करीत त्यांनी बाहेर पाऊल टाकलं आणि ते निघाले. दरवाज्या लागला. आता आतून कडी लावल्याचा आवाज झाला. मी आणि बायको आमच्या दरवाज्याच्या फटीतून पाहात होतो. कळलं काहीच नव्हतं. पण ते तिचे वडील असणार याची खात्री झाली. मी विचार केला आज रात्रीही काहीतरी पाहायला नक्की मिळेल. बायकोला लक्ष ठेवायला सांगून मी कामावर गेलो. कामात जेमतेमच लक्ष होतं . सतत घड्याळ पाहात असल्याने सुपरवायझरने विचारलं " अरे तुला घरी जायची घाई दिसत्ये. नसता आलास तरी चाललं असतं. की ". खरंतर तिचे वडील घरात शिरल्यानंतर काय झालं हे काहीही कळलेलं नव्हतं. तरी रात्री कधी घरी जातो असं झालं होतं. घाईगर्दीने घरी पोहोचलो. गेल्या बरोबर बायकोला काही विशेष ? भुंवया उंचावून विचारलं . पण काही विशेष नाही असं म्हंटल्यावर निराशा झाली. उलट तिनी विचारलं की मी एवढा interest त्यांच्यात का घेतोय . ते काही तुमच्या ओळखीपाळखीचे नाहीत. खरंतर मला प्रत्येक गोष्ट कळायलाच हवी असा आग्रहच चुकीचा होता. मनातले असले विचार मी दाबीत राहिलो. रात्रीचे साडेअकरा होऊन गेले होते. नाहीतरी मी बारानंतरच येत असे. नळावर जाण्याच्या निमित्ताने मी पलिकडच्या खिडकीच्या उघड्या तावदानातून चोरट्या नजरेने पाहिले. आजचा शो रद्द झाला असावा. निराशेने मी येतानाही नजर मारली पण ना तो दिसला ना ती दिसली. पण माझे अंदाज नेहमीच बरोबर येतात. पुढेही चार-पाच दिवस माझी निराशाच झाली. म्हणजे लवकरच स्फोट होणार याची खात्री मला वाटू लागली......एका रात्री मला यायला एक वाजला. माझ्या जेवणाचा प्रश्नच नव्हता. बायकोने कंटाळत दार उघडले . आणि ती लगेचच झोपी गेली. आपल्या कष्टांची बायकांना किंमत नसते असा भडक विचार करीत मी संडासला गेलो. आज मी शेजारी कोणी राहतात हेही विसरुन गेलो. येताना मात्र कानावर पडलेल्या संवादाने मी भानावर आलो. मग मागच्या सारखाच दबकत दबकत उघड्या खिडकीच्या तावदानातून डोकावलो. आज तो तिच्यावर का चिडला होता, कोण जाणे. पण त्याने तिला दंडाला धरुन तिला म्हणाला " चल, आज रात्रभर तू घराबाहेर उभं राहायचं, हीच तुझी शिक्षा आहे. अजूनही त्या फसव्या बद्दलचं आकर्षण जात नाही तुझं . तुझा आणि त्याचा पत्रव्यवहार अजून चालूच असणार. चल , हो बाहेर." त्याने दरवाज्याची कडी काढल्याचा आवाज झाला. मी वेळेवर उडी मारुन माझ्या खोलीत शिरलो. आणि अर्धवट उघड्या दरवाज्यातून पाहू लागलो.त्याचा चेहरा अंधाराने दिसला नाही. " अहो नको हो, मी त्याला पत्र नाहीं लिहीलं हो. तुमची शप्पत. " ...." ते काही नाही , हो बाहेर. माझी शप्पत घेऊन मलाच मारायला निघालीस , चांडाळणी. ..." असं म्हणून तिला ढकलंल आणि धाडकन दरवाज्या लावून घेतला. तो आतमध्ये काहीतरी बडबडत असावा. ती बाहेरच्या व्हरांड्यात ओंजळीत चेहरा धरुन रडत बसली होती. माझ्या मनात आलं हिला मदत करायला काय हरकत आहे . पण माझ्या बायकोला ते आवडलं नसतं. या गोंडस कारणा आड मी माझी सामाजिक जबाबदारी टाळीत होतो. खरंतर तिच्याशी बोलून मला फक्त चविष्ट चर्चा करायची होती. माझ्या जबाबदारी कडे मी हेतूपूर्वक दुर्लक्ष करीत होतो. कदाचित तिच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं असतं. मला स्वत: चा राग आला. मला काहीच करायचं नव्हतं. ती मला सकाळी दिसेलच ही खात्री असल्याने मी बायकोजवळच लवंडलो. मी माझा हात बायकोच्या चेहऱ्यावरुन फिरवला. ती जागी झाली किंवा जागी होतीच. माझा हात झटकून टाकीत ती म्हणाली, " जरा भान ठेवा की, मुली झोपल्येत जवळ. " असं म्हणून ती मुलींच्या पलीकडे जाऊन झोपली. मला राग आला. मुलं आहेत म्हणून परस्परांशी प्रेमसंबंध ठेवायचेच नाहीत का ? आपण उरलेलं आयुष्य असंच काढायचं का ?
मला आतल्या वाद नको होता. मी चडफडत राहिलो. बऱ्याच वेळाने झोप लागली. तत्पूर्वी पुन्हा एकदा दरवाज्यातून पाहिलं. तिला झोप लागली असावी. लहान मूल कसं दमून शेवटी झोपी जातं तसं.‌एवढी चांगली स्त्री
तिच्या‌बाबतीत हळहळत तिच्या नवऱ्याला अकारण शिव्या घालत मी अंथरुणावर पडलो. काय बिघडलं लग्नाआधीचं लफडं असलं तर ? त्याला विसरायला काय हरकत आहे ? मग मनात आलं आपल्याला चाललं असतं विशाखाचं ( माझी बायको ) असं काही असतं तर ? अजूनही मला हे कळलं नव्हतं की तिला एक मुलगी होती. माणसाला वस्तुस्थिती माहिती नसते.
हळूहळू माझ्या झोपण्याच्या प्रयत्नाला यश आलं . सकाळी लवकर उठण्याचं ठरवलेला मी सकाळी साडेआठच्या सुमारास उठलो. आता काय डोंबल दिसणार ? बायकोला सगळं सांगितल्यावर सकाळी काय दिसलं असं विचारल्यावर ती काही नाही म्हणाली. याचा अर्थ चारला उठणाऱ्या त्याने तिला घरात घेतलं असणार.

तिला रात्रीच घरात घेतल्याने त्यांची दिलजमाई झाली असावी. कशी ते माहीत नाही. मला अजूनही बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या. लवकरच दिवाळी आली. घडत काहीच नव्हतं. मी मुद्दामच बायकोला म्हंटलं, " तू असं कर ,शेजारणीला दिवाळीचं फराळाचं नेऊन दे. " त्यावर तिची जळजळीत प्रतिक्रिया आली, " नसता आगाऊपणा मी करणार नाही. एवढं आहे तर तुम्हीच नेऊन द्याना. " मी प्रयत्न सोडला नाहीं. " अगं निशाच्या हातून पाठवा ना. "
आता. मात्र तिने निक्षून सांगितलं ," ना मी जाणार , ना माझ्या मुली जाणार. तुम्ही सतत तिचाच विचार करीत. असता का हो ? " . उत्तरादाखल मी मौन बाळगले आणि कामावर जाण्याच्या तयारीला लागलो.दिवाळी नेहमी वाजवते तेवढं दिवाळ वाजवून गेली. बायको नी मी सांगितल्यापैकी काहीच केलेलं नव्हतं. बरेच दिवसात काहीच कळलं नाही. अचानक एक दिवस दोघेही बाहेर जाताना दिसले. मी मुलींना घेऊन बागेत चाललो होतो. तिला पाहिलं होतं पण त्याला नव्हतं. तो काही फार मोठा प्रेक्षणीय आयटेम नव्हता. तिच्यात आणि त्याच्यात बरंच अंतर असावं. निदान दहा वर्षांचं तरी. खरंतर तिच्यापुढे तो
म्हणजे सुंदर कपड्याला लावलेलं ठिगळ. ठिगळ त्याच्या ठिगळ पणामुळे लक्षात राहतं. सिगरेट पिऊन काळे पडलेले ओठ, तळावलेले आणि सतत सूड भावनेनी पेटलेले डोळे व त्यांभोवतालची काळी वर्तूळं , बसके गाल , अशा चेहऱ्याचा माणूस ,लक्षात न राहिला तर बरं अशी भावना त्याला पाहिल्यावर माझी झाली. याच्याशी तिचं लग्न, म्हणजे जबरदस्तीचा रामराम असणारं हे कोणालाही वाटलं असतं. निदान मला तरी असं वाटलं.तिच्या डोळ्यात ‌क्षणभरापुरती ओळख चमकली. पण तिने ती लगेचच पुसल्याचं दिसलं. मला ओळखीचं हसू हसण्याची संधीच दिली नाही.
हळूहळू त्यांना राहायला येऊन वर्ष होत आलं. अजूनही बर्फ फुटत नव्हता......
अशाच एका रात्री त्याच उघड्या खिडकीतून
मला पुढील संवाद ऐकू आले. मी थबकलो. ती नेहमी प्रमाणे खिडकीकडे पाठ करुन उभी होती. तिने आपली नेसण खाली केली असावी. हे तिच्या अर्धवट दिसणाऱ्या नितंबांच्या चढणीवरुन समजत होतं. " ऐकलंत का ,? यावेळी माझी अजून पाळी ......" तिनं वाक्य अर्धवट ठेवलं. तो चपापला आणि म्हणाला ," काय म्हणालीस? परत बोल. .....अगं बोलना. ". .......त्यावर ती चांचरत म्हणाली " .....पाळी आली नाही . त्याचा आटा सटकला असावा. ""फट् ....." असा तिच्या तोंडात मारल्याचा आवाज आला. तिचा तोल जाऊन तिनं पलंगाचा आधार घेतला. तिचे डोळे डबडबले असावेत. तरीही ती सहन करीत कोडगेपणाने म्हणाली, " राहू द्याना , यावेळेस दिवस. आपल्याला एकच पुरे. मी जास्त अपेक्षा ठेवणार नाही. " ती आणखीनही काही बोलत असावी . ते ऐकायला मी थांबलो नाही.माझं रक्त उसळू लागलं. बाईला मारतो स्साला. माझ्या मुठी आवळल्या गेल्या. आता मला तो काय करतो ते पाहायचं होतं. असेच चार-पाच दिवस गेले. निशाचा ताप उतरेना म्हणून आम्ही दोघे आमचे फॅमिली डॉक्टर पावरींकडे गेलो . निशाचं अंग सणसणत होतं. कंपौंडरच्या वशिल्याने आमचा नंबर लागला. आम्ही डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरताना. सहज माझी नजर मागे वळली आणि ते दोघे आत शिरताना दिसले. अर्थातच, मला कांहीही कळतं कठीण होतं. आम्ही आत शिरलो. डॉ. पावरी पन्नाशी ओलांडलेले पारशी गृहस्थ होते.निशाला तपासण्याच्या टेबलावर घेत ते म्हणाले, " अरे बेबी, पावसमदे लई खेळते काय?". डॉक्टरांचं तपासणी वगैरे झालं. औषधं लिहीलेली चिठ्ठी घेऊन मी बाहेर आलो. विशाखा डॉक्टरांशी बोलत होती. मी तेवढ्यात कंपौंडरला आमच्या शेजारणी बद्दल विचारलं. तेव्हा समजलं की ती अॅबॉर्शन करुन घ्यायला आली असावी. नक्की समजलं नाही. पण एकूण त्या दोघांच्या रात्रीच्या संवादावरुन लक्षात आलं ...... ही नक्कीच महत्त्वाची बातमी होती.
विशाखाला घरी गेल्यावर सांगावं हे बरं. आत्ता सांगितलं
तर ती भडकायची. जाता जाता मी विचार केला ही काही विशेष बातमी नाही. त्याला तिच्याशी जवळीक नकोच होती मग दुसरं काय होणार ? कुणालाही बातमी देण्याआधी विचार केला तर बऱ्याचश्या बातम्या बारगळतील. मी विशाखाला सांगण्याचा विचार बाजूला सारला. दोनतीन दिवस असेच गेले. अचानक एका रात्री शेजारणीचा विव्हळताना आवाज आला. आल्या आल्या विशाखानी बातमी दिली. " ऐकलंत काय, शेजारीण आज संध्याकाळपासून रडत्ये. पण नवऱ्याचा आवाज म्हणून नाही... " मला विशाखाला टोला मारण्याची संधी दिसली.
मी विचारलं, " अरे आज तिच्याबद्दल तू बोलत्येस ....". त्यावर तिनी , मला काय करायचंय अशा अर्थी हातवारे केले. मात्र उघडपणे ती म्हणाली, " तुम्हालाच तिचा पुळका फार म्हणून सांगितलं. यापुढे तुम्ही न तुमची शेजारीण , घाला गोंधळ. ". असं म्हणून ती. तोंड फिरवून झोपली. मी नेहमीप्रमाणे फ्रेश होण्यासाठी नळावर गेलो. आता तुम्ही म्हणाल मी काही पाहायला मिळतंय का म्हणून गेलो. मी तर म्हणतो तुम्ही तसं समजा. मी तुम्हाला नाराज करीत नाही. नाहीतर माझी कथा कोण वाचणार ? असो, मी हेतूपुरस्सर गेलो खरा . नेहमीप्रमाणे मी येताना खिडकीच्या उघड्या तावदानाशी येऊन थबकलो. आज नाईट लॅम्प होता. निळसर रंगाच्या उजेडामुळे वातावरण थोडं ब्लू फिल्मसारखं वाटलं. अर्थात थोडं नीट पाहणं आवश्यक होतं. आज ती दोन्ही मांड्यामध्ये हात धरुन कुशीवर पडून रडत होती. तो तिला म्हणाला, त्रास सकाळपर्यंत थांबला नाहीतर जाऊ डॉक्टरकडे. " ती थोडी चिडून म्हणाली ," मी नाही जाणार त्या पारशाकडे. आपण त्याची औषधं घेतली नाही की पुन्हा तपासायला ही गेलो नाही. कुठून गोळ्या आणल्यात कोणाला माहित ,अजून अंगावर जातंच आहे. "
त्यावर तो काही बोलला नाही. पण त्यांच्या पुढच्या बोलण्याने मी स्तंभित झालो.
" आता तरी तू आई होण्याचं स्वप्न विसरशील. मला तुझ्यासारख्या व्याभिचारिणी कडून मूल नकोच आहे. आता तू दोन पुरुषांबरोबर मजा केलीच आहेस. थोड्या जास्त पुरुषांबरोबर केलीस तरी माझी काही हरकत नाही. ". त्यावर ती चवताळून म्हणाली, " मी व्यभिचारी नाही आहे. "
तो तिचे केस धरुन म्हणाला, " अपराधी माणसानी आवाज नसतो करायचा. कुठे आहे तो हरामी प्रोफेसर ? " ......" अगं आई ग , दुखतंय सोडा मला . मला डायव्होर्स द्या हो. " ....
मला वेड लागलं नाही. सोन्याची अंडी देणारी कोंबडी कोण सोडेल ? थोडं थांबून तो म्हणाला, लवकर नॉर्मलला ये. पुढे आपल्याला बरीच कामं करायची आहेत.तयारीत राहा. असं म्हणून तो अंथरुणावर पडला. ब्लॅंक दिवस खूप जातहोते. जेव्हा काही घडत नसे. पण एक दिवस काहीतरी वेगळंच घडलं. मी घरी नव्हतो. विशाखाही फार लक्ष देत नसल्याने अचानक रात्री किंकाळी ऐकू आल्यावर ती त्यांच्या दरवाज्याशी जाऊन ऐकू लागली. त्या दिवशी संध्याकाळीच एक सिंंध्यासारखा दिसणारा माणूस शेजाऱ्याकडे आला होता . तो चांगलाच श्रीमंत वाटत होता. गाडीचा हॉर्न जोरात वाजल्याने विशाखा बाहेर आली. एका मोठ्या श्रीमंत गाडीतून एक माणूस उतरत होता. तसे बरेच लोक जमले होते. आमच्या चाळीजवळ एवढी मोठी गाडी येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्या माणसाने विशाखालाच विचारलं, " इधर मि.राजमाने सामनेवाले रुममेही रहता है नी ." त्याचा रोख आमच्या शेजारच्या खोलीकडेच होता. विशाखाला नाव माहीत नसल्याने तिचं तोंड उघडंच राहिलं. हे नाव तिला माहीत नव्हतं .तिचा रुकार समजून तो हलकेच हसत तिकडे गेला, त्याने बेल वाजवल्यावर शेजारणी ने दार उघडले. .... दहा वाजत होते. हातातलं काम टाकून धावत आलेल्या विशाखाने कान देऊन ऐकायचा प्रयत्न केला तरी रडण्या मारण्याशिवाय कोणताही आवाज ऐकू आला नाही. अचानक दरवाज्याची कडी वाजल्याने विशाखा घरात पळाली. केवढा दम लागला होता तिला. धडधडत्या छातीने तिने अर्धवट उघड्या दारातून पाहिले , तो सिंधी जात होता. आता शेजारणीच्या घरातून दबक्या आवाजात रडल्याचे सूर येत होते. पण विशाखाला तिच्या घरी जाण्याचा धीर झाला नाही. नक्की आत काय चालू होतं, यांचा तिला अंदाज येत नव्हता. आज विशाखाचा स्वैपाक उशिराने होत होता. साडे अकराच्या सुमारास मी आलो. जे घडलं ते मला समजलं. मी नेहमीप्रमाणे फ्रेश होण्यासाठी नळावर गेलो. आता तुम्ही म्हणाल मला शेजारणी घ्या घरात डोकवायचं होतं म्हणून मी गेलो. तसं समजा हवं तर. आश्चर्य म्हणजे आज तिचा दरवाज्या सताड उघडा होता. ती नवऱ्याची वाट पाहात असावी. आज मला दोन्ही खोल्यांमध्ये डोकावता आलं.
मी येताना तिचा दरवाजा उघडा असूनही हाताने वाजवला.

आतल्या खोलीतून ती डोळे पुशीत डोकावली. तिने" या " म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही मी येऊ का विचारलं. ती काहीच बोलली नाही. "तुमचं ओरडणं ऐकलं म्हणून आलो. " मी घाईघाईने बोलून टाकलं. तिने थोडा वेळ जाऊ दिला . मग म्हणाली, " तुमची गरज लागली तर बोलवीन तूम्हाला. हा माझा खाजगी प्रश्न आहे. " यावर ‌मला काहीच बोलता आलं नाही.तिच्या चेहऱ्यावर वेदनांच्या खुणा दिसत होत्या जाताजाता टेबलावर पडलेल्या बऱ्याचशा नोटा मला दिसल्या. बारीक तोंड घेऊन मी घरी आलो. मला तिचं वागणं आवडलं नाही. मी मदतच करायला गेलो होतो. मी स्वतः:शी म्हंटलं. मला जमलं तर मदत ई पडली. कोणी येणारं नसल्याने बाहेरची खोली निर्लज्जपणे उघडी होती. अजूनही मला थोडंही महत्व मिळालं नाही याचं वाईट वाटतं होतं. मी सुद्धा एक संधीसाधू असल्याचं मला जाणवत होतं. पण वस्तुस्थिती दाबून टाकणं हा माणसाचा स्वभाव असतो हेच खरं. विशाखाचा स्वैपाक झाला होता. मुलींना आधीच खायला घातल्याने त्या झोपल्या होत्या. विशाखाला सगळं सांगितल्यावर ती फारसं काही बोलली नाही. मीही जास्त न बोलता जेवायला बसलो. मधेच विशाखा नी विचारलं, " मला तरी इथे राहणं ठीक वाटत नाही. आपल्याला मुली आहेत. ...." तिनी बोलणं अर्धवट सोडलं. मला तिची काळजी समजतं होती. आणि धोकाही . मी एवढंच म्हणालो, " दुसरी जागा घेणं सध्यातरी परवडणारं नाही. " त्यावर तिनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. शेजारणीचा विचार मी आजच्या पुरता तरी सोडला होता. तिनी खरंतर पोलिसांत तक्रार करायला हवी होती. पण मला लगेचच टीपॉयवरच्या नोटा आठवल्या. म्हणजे ही धंदा करणार......की ...काय ? माझं मन नुसत्या विचारानेच थरकलं. विशाखाच्या बोलण्यातलं गांभीर्य मला हळूहळू जाणवलं. खरंच आपल्याला मुली आहेत. आता मात्र तिच्या नवऱ्याला गाठून खडसावून विचारण्याचं मी ठरवलं. त्यांनी जागा ताबडतोब सोडून जावं असं मला वाटू लागलं . माझ्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. मी हे कसं करणार होतो मला अंदाज नव्हता. सध्यातरी मनाला ही भावना आवडत होती. पण मन सापासारखं वळवळत हा विचार समोर आणीत होतं. मला मनाची किळस आली. मी आजूबाजूला पाहिलं. झोपण्याची वेळ असल्याने जाग कुठेच नव्हती. जणूकाही माझे विचार कोणी ऐकत होतं. मनातला विचार तूकड्या तुकड्याने वर येत होता. " धंदा असला तर ...? काय झालं ?. तिनं तुला भाव दिला नाही. कधीतरी तुलाही संधी मिळेल. कशाला नीती अनीतीची नाटकं करतोस ? तूही त्यातलाच आहेस......" माझी झोपच उडाली. मी उशी
भिंतीशी लावून बसून राहिलो. विशाखाचं घोरणं बंद झालं आणि तिनी कूस बदलली. माणसाला आपल्या बरोबरीचा माणूस बसून आहे . ही जाणीव कशी होते कळलं नाही. तिचा श्वास मंद मंद होत होतं थांबला होता. अचानक ती झोपेतून उठली. मला बसलेला पाहून ती काळजीच्या सुरात म्हणाली, " नका काळजी करु. मी उगाचंच जागा बदलण्याबद्दल तुम्हाला बोलले...." आणि ती उठून माझ्या जवळ आली. माझ्या डोक्यावरून हात फिरवित म्हणाली, " जागा सोडून तिनी जायला हवं. ती नवीन आहे. ..." मग हळवी होत मला जवळ घेत ती म्हणाली ," या झोपा माझ्याजवळ ... " आणि मला मिठीत घेऊन थोपटीत ती झोपली. मी गेल्या दोन वर्षांत प्रथमच हे सूख भोगत होतो. तिला जवळ ओढून मी पण झोपेच्या आधीन झालो. सकाळ केव्हा झाली कळलं नाही. विशाखा केव्हाच उठून कामाला लागली होती.
काही दिवस असेच गेले. शेजारणीकडे गिर्हाईक आलेलं दिसलं नाही. कदाचित ते आमच्या अपरोक्ष येत असावं. किंवा ती गिर्हाईकाकडे जात असावी. ज्याची शक्यता मनाने धुडकावून लावली. म्हणजे माझ्या आणि विशाखाच्या अपरोक्ष येत असावं. अजूनतरी शेजारणीचं जग आमच्या शेजारच्या खोलीपुरतंच मर्यादित असावं असं मला वाटत होतं. परंतू तिचे संबंध बाहेर जास्त होते हे नक्की होतं. एक दिवस शेजारीण तीन चार दिवसांसाठी अदृश्य झाली. अचानक दाराला लागलेलं कुलूप पाहून मला आश्चर्य वाटलं. मला वाटलं चला सुंठीवाचून खोकला गेला.हे विशाखानी पाहिलं आणि मी कामावर असल्याने मला फोन करून कळवलं. आता मालकाशी बोलून शेजारची जागा घेण्याचे माझ्या मनात विचार घोळू लागले. पाचव्या दिवशी संध्याकाळी दरवाज्या लोटलेला दिसला. पण विशाखाला. मी घरी नव्हतोच. आत कोण असावं कळायला मार्ग नव्हता. दोन्ही खिडक्या बंद होत्या. रात्री मी घरी आल्यावर मला नेहमीसारखी पलीकडची खिडकी उघडी दिसल्याने मी डोकावून पाहिलं. "तो" आत बसला होता. अंगावर गंजिफ्राक आणि चट्ट्यापट्टयाची हाफ पॅन्ट होती. त्याचा चेहरा उतरलेला दिसला . तसा तो कधीच चांगला दिसला नाही. पण यावेळेस जास्तच खालावल्यासारखा वाटला. मी घरात शिरलो. ती त्याला सोडून गेली असावी. असं वाटून विशाखाला मी तसं म्हंटलं की. पण तिला ते पटलं नाही. तिचं म्हणणं बायका सोडून जात नाहीत तर नवरेच सोडून जातात. मी जास्त वाद घातला नाही. पण ती कुठे गेली असावी याची रुखरुख मात्र लागून राहिली.
(क्रमशः:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सम्पादन अजुन खुले असेल तिथे जाउन कर्ता येइल.

कथा छान चाललिये, आता पुर्ण करा.