अखेरची भेट...!!

Submitted by रूपाली विशे - पाटील on 2 July, 2021 - 06:12

अखेरची भेट...!!!
_______________________________________

" दिपू, दादाची तब्येत जरा जास्तच बिघडलीये. तुझ्या नावाचा जप धरलायं गं दादाने...जमल्यास तू लवकरात लवकर इथे ये..!" फोनवरचा बेबीआत्याचा घाबराघुबरा आवाज ऐकून दीपिकाची छाती धडधडू लागली.

दिपिकाला काय करावं तेच सुचेना. ती उगाच ह्या खोलीतून त्या खोलीत येऱ्याझाऱ्या घालू लागली. घड्याळात सकाळचा नऊचा ठोका पडला आणि ती भानावर आली.

ते घड्याळ जणू तिला सांगू पाहत होते, कशाला गं पोरी; घरात एवढया येऱ्याझाऱ्या घालतेस. निघ लवकर; जा आपल्या पित्याला भेटायला ... मी काही थांबणार नाही बरं कुणासाठीचं..!

मनीष सकाळीच ऑफिसला निघून गेलेला. तिने त्याला फोन करून बाबांच्या तब्येती विषयी कळवलं आणि लहानग्या पार्थला आपल्यासोबत घेत; तिने मिळेल ती गाडी पकडून माहेरी जायला स्टेशनची वाट धरली.

जीवघेण्या गर्दीत तिला गाडीत कशीबशी बसायला जागा मिळाली. गाडीने विरार स्टेशन सोडलं आणि गर्दीचा पूर ओसरला. तिला मोकळेपणाने गाडीत बसायला मिळालं. गाडीने वेग घेतला आणि गाडीच्या वेगासोबत तिचं मन भूतकाळात जाऊ लागलं.

दोन वर्षांपूर्वी आईला देवाघरचे बोलावणे आले आणि बाबा एकटे पडले.

वर्षभरापूर्वी अंगणात पाय घसरून पडायचं निमित्त झालं आणि बाबांनी खाट धरली. कित्ती दवाखाने झाले, पण त्यांच्या तब्येतीत फरक मात्र शून्य...!

दिपिकाचे डोळे ओलावले.

अंगणाचे फाटक उघडून ती आत आली. घराच्या ओट्यावर बेबीआत्या तिची वाटच पाहत होती. दिपिकाला पाहून तिच्या चिंतेने काळवंडलेल्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

" आत्या, कसे आहेत बाबा ..??"

टेबलवर आपली बॅग ठेवत, कातर स्वरात दिपिकाने बेबीआत्याला विचारलं.

आपल्या लेकीच्या येण्याची चाहूल आतल्या खोलीत खाटेवर असलेल्या अरुणरावांना लागली.

" दिपू, आलीस तू ...?? ये बाळ ...!" बाबांचा क्षीण आवाज तिच्या कानावर पडला. ती तशीच धावत आतल्या खोलीत गेली.

अरुणराव खाटेवर पडले होते. त्यांची चर्या कोमजलेली होती. हाता - पायावरची कृश, सुरकुतलेली कातडी खाली लोंबकळत होती. त्यांचे डोळे खोल गेलेले; पण दिपूला पाहताच ते निस्तेज डोळे विलक्षण तेजाने लुकलुकू लागले.

आपल्या लाडक्या लेकीला पाहून त्यांच्या रया गेलेल्या चेहऱ्यावर हर्ष लहरी उमटल्या. त्यांचा चेहरा टवटवीत दिसू लागला.

दिपिका आपल्या वडिलांच्या शेजारी खाटेवर बसली. तिने त्यांच्या अंगावरचे अंथरूण नीटनेटके केले. आपल्या वडिलांची ही अवस्था पाहून तिच्या घशात हुंदका दाटून आला.

" बाबा, कसे आहात..?? "

अरुणरावांचा जीव लेकीच्या प्रश्नाने कळवळला. त्यांच्या मनात अनेक भावतरंग उमटले. त्यांचे ओठ थरथरले. त्यांनी आपल्या कृश हाताने आपल्या लेकीचा हात धरण्याचा दुबळा प्रयत्न केला. त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू गालावर पाण्याची रेषा उमटवत खाली घसरला. तो अश्रू घरंगळत जात काना पाठी पांढऱ्या झालेल्या त्यांच्या शुष्क केसात अडकला.

दिपिका क्षणभर त्या अश्रूच्या थेंबाकडे एकटक पाहत राहिली. त्या थेंबामध्ये तिला इंद्रधनुष्याचे सप्तरंग दिसू लागले.

__ आणि मग तिच्या बालपणीच्या कडू-गोड आठवणी, त्या अश्रूमधले सप्तरंग उधळत तिच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागल्या.

" धावा कुणीतरी, माझी पोर पाण्यात बुडतेयं हो... वाचवा कुणीतरी तिला ..!! " जिवाच्या आकांताने तिच्या आईने मारलेल्या आरोळ्या तिच्या कानात घुमू लागल्या.

दहा वर्षाची दिपिका तळ्याच्या काठावर कपडे धुणाऱ्या आपल्या आईचा डोळा चुकवून पाण्यात उतरली. खोल पाण्यात जाऊ लागली. पाण्याच्या खोलीचा अंदाज नसलेली दिपिका गळ्यापर्यंत पाण्यात गेली आणि अचानक पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. तेवढ्यात तिच्या आईचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि मग तिची आई वेड्यासारखी पाण्यात धावत जात; मदतीसाठी याचना करू लागली.

तळ्याच्या काठावर बैलांना पाणी पाजणाऱ्या रवी काकाने वंदनाताईंचा आरडाओरडा ऐकून, पाण्यात सूर मारत गटांगळ्या खाणाऱ्या दिपिकाच्या केसांना धरत तिला पाण्याबाहेर काढले.

पोटात पाणी गेल्याने लहानग्या दिपूची शुद्ध हरपू पाहत होती. रवी काकाने काठावर आणून तिला उताणी करून तिच्या पोटात गेलेलं पाणी बाहेर काढलं. घडल्या प्रसंगाने लहानगी दिपिका प्रचंड भेदरून गेली.

साक्षात मृत्यूची अन् तिची आज गाठ पड़ता पडता राहिलेली...!! 'काळ आला होता , पण वेळ आली नव्हती ' , ही म्हण दिपिकाच्या बाबतीत अक्षरशः खरी ठरली.

जीवघेण्या संकटातून वाचल्यानंतर, त्या संध्याकाळी दिपिकाच्या घरी; शेजारीपाजारी, नातेवाईक यांची जणू गोलमेज परिषद भरली होती. सगळे जण आप-आपली मते हिरीरीने मांडत होते.

दिपूची आई किती वेंधळी आहे आणि आज तिचा बेजबाबदारपणा दिपूला किती महाग पडणार होता, यावर सगळ्या महिला सदस्यांचे एकमत झाले होते.

आता अरुणराव वंदनाताईंची कशी चांगलीच खरडपट्टी काढतील ; म्हणून तोंडाला पदर लावून सगळं महिला मंडळ खुसूखुसू हसण्यासाठी सावधान झालेलं...!

दिपूची आई बिचारी इवलसं तोंड करून बसली होती. दिपूला वाटत होतं की, सगळ्यांना ओरडून सांगावं ... पूरे झालं आता...! माझ्या आईला काही बोल लावू नका. चूक तिची नाहीच मुळी... खरंतर चूक माझीच आहे... पण तिच्या तोंडून शब्द काही फुटत नव्हते.

वंदनाताई नजर चोरून अरुणरावांकडे पाहत होत्या.

दिपिकाच्या केसात मायेने हात फिरवत अरुणराव शांत बसले होते.

" गणरायाची कृपा झाली आणि माझ्या पोरीच्या माथ्यावरचे संकट टळले..!" देवाला हात जोडत अरुणराव उठले, तशी घरात जमलेल्या परिजनांच्या गोलमेज परिषदेची सांगता झाली ; आणि सगळी मंडळी आपापल्या घरी पांगली.

दुसऱ्या दिवशी अरुणराव दिपूला घेऊन तळ्याच्या दिशेने निघाले. तळ्याच्या काठाजवळून जाताना दिपूच्या चेहऱ्यावर भीतीच्या लहरी उमटू लागल्या. तळ्यातल्या पाण्याकडे पाहण्याची दिपूला थोडी सुद्धा हिंमत होत नव्हती.

तिला पाण्याची प्रचंड भीती वाटू लागली. तळ्याच्या काठावर येत आपल्या पायातल्या वहाणा आणि अंगातला शर्ट बाहेर काढत अरुणराव लहानग्या दिपूला म्हणाले,

"दिपू , आजपासून तळ्यात पोहायला शिकण्याचा श्रीगणेशा करायचा. चल , माझ्यासोबत तू पण उतर बरं पाण्यात!".

"नको बाबा, मला खूप भीती वाटते..!" तिच्या डोळ्यात पाणी तरळलं.

"भीती हा माणसाचा खरा शत्रू आहे. त्या शत्रूला तुला हरवायला लागेल. माणसाच्या आयुष्यात संकट कुठल्याही रुपात येऊ शकतं... कुठलीही पूर्वसूचना न देता..!! तुला न घाबरता येणाऱ्या परिस्थितीला तोंड देता आले पाहिजे दिपू..!" तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत अरुणराव म्हणाले.

" चल, घे गणपती बाप्पाचे नाव... मार उडी पाण्यात..!"

__ आणि अश्या रितीने दिपूच्या पोहण्याच्या सरावाला सुरुवात झाली. अरुणराव तिचे गुरू आणि दिपू त्यांची शिष्या बनली.

तीन महिन्यांच्या अथक सरावानंतर दिपू सराईताप्रमाणे पाण्यात पोहू लागली. पुरुषभर खोली असलेलं तळं आपल्या वडिलांच्या जोडीने पार करू लागली.

आणि एके दिवशी अरुणरावांच्या ह्या शिष्येने पोहण्याच्या शर्यतीत आपल्या गुरूलाचं हरवलं. अरुणरावांच्या आधीच तिने ते तळं पोहत पार केलं.

" आज 'बाप से बेटी सवाई' निघाली..आता मला माझ्या पोरीची जराही काळजी नाही!" अरुणरावांनी अतिशय आनंदाने दिपूला शाबासकी दिली.

आपल्या वडिलांनी केलेल्या कौतुकाने लहानगी दिपिका हरखून गेली.

नंतर झाडावर सरसर चढणं असो, गाईच्या कासेला धरून तिच्या धारोष्ण दूधाची धार काढणं असो... आपल्या वडिलांच्या हाताखाली दिपिका सगळ्या कामात पटाईत होऊ लागली. त्यामुळे सगळ्यांना तिचं अपार कौतुक वाटत असे.

बालपणीच्या या आठवणींनी दिपूच्या चेहर्‍यावर हलकसं स्मित पसरलं. लेकीच्या चेहऱ्याकडे पाहणाऱ्या अरुणरावांच्या सुरकुतल्या चेहऱ्यावर ते हसू पाहून मंद स्मित झळकलं. जणू त्यांना आपल्या लेकीच्या मनातल्या भावना समजल्या होत्या. त्यांनी तिच्या हातावरची आपली पकड अजूनच घट्ट केली.

"औषध घेतलंत का बाबा तुम्ही.?? आता बरं वाटतंय का तुम्हाला...?? " दिपिकाच्या शब्दांत प्रेमळपणा ओथंबून वाहत होता.

अरुणराव शांत राहिले.

" बाबा, आपण डॉक्टर बदलूया का..??" परत एकदा दिपिकाने विचारलं.

अरुणरावांनी नकारार्थी मान हलवली.

आपल्याला देवाघरचे बोलावणं आलं आहे हे त्यांना कळून चुकलं होतं. आता कसलं औषध अन् कसले दवाखाने ..!! त्यांचे शुष्क नेत्र अज्ञात दिशेच्या वाटेला लागले होते.

त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना आपलं मरण स्पष्ट दिसत होतं. आयुष्यात आपल्या वाट्याला, दैवगती जे काही वाढलं होतं ते त्यांनी निमूटपणे सहन केलं होतं....कुठलीही तक्रार न करता ...! आता देवाला त्यांची भेट घेण्याची इच्छा झाली होती... मग हे देवाघरचं आमंत्रण त्यांना कसं नाकारता येणार होतं ..? देवाची भेट घेणं कसं टाळता येणार होतं..??

आपल्या प्रेमळ माणसांचा सहवास सोडून , आपल्या लाडक्या लेकीला , आपल्या पाठच्या बहिणीला पोरकं करून जाण्यास त्यांचं मन धजावत नव्हतं. आजपर्यंत ज्या मनात साठलेल्या भावना होत्या, त्या आता सगळ्यांपुढे रित्या कराव्यात असं त्यांना प्रकर्षाने वाटू लागलं.

आपण ह्या संसारातून जात असताना, आपल्या पाठी काय व्हायला पाहीजे हे आपण निदान आपल्या लेकीला तरी सांगून जावं असं त्यांना वाटू लागलं. आपलं म्हणणं तिला पटो अथवा न पटो , तिने ते आपल्या माघारी करो अथवा न करो... पण आपल्या मनात इतकी वर्षे कोंडून ठेवलेल्या भावनांना आज तिच्‍यासमोर मुक्त होऊ द्यायचं, असं त्यांनी आता पूर्णपणे ठरवलं होतं.

आता आपलं पृथ्वीवरचं अस्तित्व संपत आलंय ह्या वैषम्याच्या भावनेने त्यांच्या मनात घर केलं. त्यांनी क्षणभर डोळे बंद केले.

आठवणींनी त्यांना भूतकाळात नेलं. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं बालपण तरळू लागलं. त्या आठवणी सोबतच वंदनाताई सोबत केलेल्या संसाराच्या कडू - गोड आठवणी चित्रपटासारख्या पुढे सरकू लागल्या.

दिपूचा जन्म होण्याआधी अरुणराव आणि वंदनाताईंची दोन बाळं जन्माला येऊन, पंधरा दिवसांची होऊन दगावली होती. औषध उपचार आणि देवाच्या कृपेने दगावलेल्या दोन बाळांच्या पाठीवर दिपू जन्मली होती. जन्मतः दिपू तब्येतीने नाजूक होती; पण देवाच्या कृपेने ती बचावली.

लहानपणापासूनच दिपूला अरुणराव आणि वंदनाताई जीवापाड जपत. पण वंदनाताईं पेक्षा अरुणरावांची माया दिपूवर किंचित जास्त होती. त्यामुळे दिपू आपल्या वडिलांच्या खूपच जवळ होती.

वंदनाताईंचं दुःख मोठं होतं. दोन पोटच्या गोळ्यांना गमावल्यामुळे त्या कधीकधी आततायीपणा करत. चिडचिड करत. कदाचित आपल्याला मुलगा नाही ह्याचं दुःख त्यांना सतत टोचत असावं. हे जाणून त्यांच्या दुःखावर, वेदनेवर अरुणराव हळूवार फुंकर घालत. आपल्या सहचारिणीच्या भावना समजून घेत असत.

दिपूच्या पाठीवर मुलगा हवा म्हणून वंदनाताईंनी खूप उपास- तापास केले, नवस म्हटले. शेवटी दवाखाने पण झाले... पण नंतर त्यांची कूस काही उजवली नाहीच. त्यांची इच्छा काही फळाला आली नाही.

अरुणरावांनी मात्र कधीही मुलगा हवाच हा अट्टाहास धरला नाही.

" कशाला हवा वंशाला दीपक ..?? ही माझी दिपू नाहीये का माझ्या वंशाला..?? माझी तेवणारी ज्योत आहे ती; म्हणून तर मी तिचं नाव दीपिका ठेवलंयं...!" अरुणराव मुद्दाम वंदनाताईंना चिडवत.

" हो... हो ... बाय तुमची गुणाची... काय बाई पायगुणाची..!" असे म्हणत वंदनाताई मग कोटी करत असत.

" मग, आहेच की माझी पोर गुणवान..!" दिपूच्या कपाळावर भुरभुरणार-या केसांच्या बटा तिच्या कानाच्या मागे सारत अरुणराव तिचा मायेने गालगुच्चा घेत म्हणत असत.

दिपूला आपल्या आई-वडिलांच्या बोलण्याची त्यावेळी भारी गंमत वाटत असे.

आपल्या आईच्या मनात काय सल आहे , हे समजून घेण्याइतपत तिचं वय नव्हतं, पण वाढत्या वयाबरोबर तिने आपल्या आईच्या भावना समजून घेण्याचा अतोनात प्रयत्न केला.

कधी तरी अंगणातल्या कोपऱ्यावर असलेल्या पारिजातकांच्या दोन्ही झाडाखाली बसून, पारिजातकाची सुगंधित फुले वेचताना आपल्या आईला डोळे टिपताना दिपू पाहत असे.

आपल्या आईला तसे डोळे टिपताना पाहताना लहानगी दिपू भांबावलेल्या प्रश्नार्थक नजरेने आपल्या वडिलांकडे पाहत राही.

त्यावेळी अरुणराव तिची समजूत घालत असत. तुझ्या आईला बरं वाटत नसेल... असं सांगून वेळ मारून नेत.

दोन वर्षांपूर्वी वंदनाताईंनी अवचित त्यांची साथ सोडली आणि देवाचं घर जवळ केलं. आपल्या पत्नीच्या माघारी अरुणराव एकटे पडले. पत्नीच्या आजारपणावर त्यांनी खूप औषधोपचार केले, पण यश काही हाती आलं नाही.

आपल्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या अरुणरावरावांना वंदनाताई म्हणत,
" कशाला दगडावर पाणी ओतत आहात, उगाच पैसा फुकट जातोयं!"

पण अरुणरावांनी प्रयत्न सोडले नाहीत. शेवटी वंदनाताईंनी त्यांची साथ सोडली ती सोडलीच...!!

दैवगती पुढे कोणाचे काय बरं चालणार ...??

आपल्या बाबांना झोप लागली आहे असं दिपूला वाटलं. त्यांच्या शांत पापण्या मिटलेल्या चेहऱ्याकडे ती मायेने पाहू लागली. त्यांच्या हाताची तिच्या हातावर असलेली पकड सैल करत ती अलगद तिथून उठू लागली; पण अरुणरावांनी तिचा हात घट्ट धरत तिला तिथेच बसायला लावले. तिच्याकडे पाहत ते म्हणू लागले,

" दिपू, माझ्या माघारी तुझ्या आईला नवमीला भरणी श्राद्ध आठवणीने घाल बरं ..! सवाष्ण गेलीयं तुझी आई...!"

" बाबा...!" दिपूला हुंदका आवरेना.

" तुम्ही बरे होणार आहात बाबा, उगाच काही अभद्र नका बोलू ...!"

" पोरीला का रडवतोयं रे दादा...?" बेबीआत्याने पदर डोळ्यांना लावला.

अरुणराव क्षीण हसले.

" दिपू, तुझ्या ह्या बेबीआत्याला माझ्या माघारी सांभाळ. लग्नाच्या वर्षभरात दुर्दैवाने तिच्या पदरी वैधव्य आलं ... आणि त्यानंतर आजतागायत आपल्या भावाच्या संसारात मायेने खपलीयं ती...! तिला अंतर नको देऊ..!"

बेबीआत्या डोळ्याला पदर लावत आतल्या खोलीत निघून गेली.

दिपूला आता खूपच रडू येऊ लागलं. तिला तसं रडताना पाहून अरुणरावांना अतिशय वाईट वाटलं. लहानपणी हट्ट करत रडणारी, आपल्या चिमुकल्या हाताच्या दोन्ही लालबुंद पंज्यांनी गालावर ओघळणारे अश्रू आणि नाकातून वाहणारे पाणी पुसणारी शेंबडी, चिमुकली दिपू त्यांच्या डोळ्यासमोर दिसू लागली.

त्यांना क्षणभर वाटलं की, असंच उठावं आणि तिचे अश्रू आपण आपल्या हातांनी पुसावेत. तिच्या केसांच्या कपाळावर भुरभुरणाऱ्या बटा कानामागे सरकवाव्यात. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवावा , पण आता ते करणं त्यांना शक्य नव्हतं. त्यांच्या मनातल्या त्या हळव्या भावना पूर्ण करायला त्यांचं कृश शरीर असमर्थ होतं.

त्यांच्या मस्तकात भूतकाळातल्या कितीतरी आठवणी भ्रमण करीत राहिल्या. लहानगा पार्थ आजोबाकडे आणि आपल्या आईकडे टक लावून पाहत होता. त्यांचं बोलणं कान देऊन ऐकत होता.

अरुणरावांनी त्याला खुणेनेच आपल्या जवळ बोलाविलं. त्याच्या तोंडावरून आपला थरथरता हात मायेने फिरवला.

अरुणरावांनी आपल्या बहिणीला जवळ बोलावीत कपाटातून शंभर रुपयांच्या नोटांचे बंडल बाहेर काढण्यास सांगितले. त्यातल्या दोन नोटा लहानग्या पार्थच्या हाती सोपवित ते म्हणाले,

" घे बाळा.. हे पैसे... या पैशातून खाऊ खा..!"

नंतर त्या बंडलमधून पाच नोटा आपल्या लेकीच्या हातात देत म्हणाले,

" दिपू, बाळ... हे घे तुला ..!"

"आजोबा, माझी आई काय लहान बाळ आहे का...? तिला कशाला देता तुम्ही पैसे...!" तोंडावर हात ठेवत खुदूखुदू हसत, बोबड्या स्वरांत पार्थ म्हणाला. त्याला आपल्या आजोबांच्या बोलण्याची भारी गंमत वाटली.

" तुझी आई जरी असली ना, तरी माझ्यासाठी माझं लहान बाळचं आहे ती अजून..!" खोल गेलेल्या आवाजात म्हणत, अरुणराव कौतुकमिश्रित नजरेने आपल्या नातवाकडे पाहू लागले.

___ अचानक अरुणराव धपापत्या ऊराने हसू लागले. हसता हसता त्यांना जोरात ठसका लागला. त्यांना तसं हसताना पाहून दिपू घाबरली.

" बाबा, काय झालं ..? पाणी प्या..!" तिने पाण्याचा प्याला त्यांच्या तोंडाजवळ नेला.

त्यांनी हाताने तो दूर सारला. आपलं हसू आणि लागलेला ठसका आवरत घेत, ते कापऱ्या आवाजात म्हणू लागले,

" ह्या बेबीला वाटतं की, मला भ्रम होतायेतं, मी असा एकटाच हसत असतो म्हणून ; पण माझं डोकं ठिकाणावर आहे बरं.. मला काही वेडं लागलेलं नाही. !"

"तुला सांगतो दिपू, तुझ्या आईचं आणि माझं नवीनच लग्न झालं होतं. लग्नानंतरचा पहिला सण म्हणून घरी गणपती - गौरीची जोरदार तयारी सुरू होती. सामान घेण्यासाठी म्हणून तालुक्याच्या गावी मी काकांसोबत गेलो होतो. दुसऱ्या दिवशी घरातल्या सगळ्या महिला वर्गाचा हरतालिकेचा उपवास होता. पिशवीभर केळी आणि सामान घेऊन स्टेशनवरून टांगा घेतला... पण हाय रे कर्मा ...! अर्ध्या रस्त्यात आलो आणि अचानक घोडे बिथरले आणि टांगा पलटी मारून फरार झाले. टांगेवाल्या सोबतच मी आणि काका; आम्ही तिघांनी जमिनीवर अक्षरश: लोळण घेतली. आम्हांला मार वगैरे लागला नाही , परंतु सगळी केळी इथे तिथे विस्कटून रस्त्यावर पडली. त्या अवघड परिस्थितीतही आम्हाला आमचं हसू आवरत नव्हतं. घरी आल्यावर आमचा अवतार पाहून आणि घडलेला प्रसंग ऐकून समस्त महिला वर्गाने पदरात तोंड लपवून आमच्यावर खुसूखुसू हसून घेतलं. तुझ्या आईने तर खूप दिवस चिडवलं मला... सगळ्यांना चांगलाच उपवास घडवला म्हणून...!"

__ आणि मग अरुणराव वेड्यासारखे हसत सुटले अगदी आपल्या खोल गेलेल्या डोळ्यात पाणी येईपर्यंत...!!

दिपू कावऱ्याबावऱ्या नजरेने आपल्या वडिलांकडे पाहत राहिली.

" बाबा, आता शांत झोपा पाहू तुम्ही... बोलून त्रास होईल तुम्हांला..!" अरुणरावांचा खाटेवरून लोंबकळणारा हात वर उचलून घेत दिपू म्हणाली.

पण अरुणरावांना मनात कोंडून ठेवलेल्या भावनांना आज मुक्त करायचं होतं. ते आज बोलायचे थांबणार नव्हते.

" बेबी, ह्यातले हजार रुपये चिंतूला दे बरं..! तुला चिंतूकाका आठवतो का गं.. दिपू..?"

" हो बाबा, मी कसं विसरेन चिंतूकाकाला..?"

" त्याच्या नशिबी देवाने वनवास लिहिलायं. बायकोने अर्ध्यावर साथ सोडली आणि आता मुलगा दारूपायी वाया गेलायं.. हाल आहेत त्याचे.!!. म्हणायला आपल्या शेतात राबणारा गडीमाणूस तो , पण गडीमाणूस नाही तर पाठच्या भावासारखा सुखदुःखात माझ्यापाठी उभा राहिलायं चिंतू..!! माझ्यावर खूप उपकार आहेत त्याचे. त्याला कधी मदत लागली तर करत जा..!"

दिपूच्या डोळ्यांसमोर चिंतूकाका उभा राहिला. तिच्या घरी शेतात काम करणारा एक गडीमाणूस. शेतात राबणारा मजूर जरी असला तरी, अरुणराव आणि वंदनाताईंनी त्याला कधी गडीमाणूस म्हणून वागणूक दिली नाही. आपल्या घरातलीच एक व्यक्ती म्हणून त्याला आपल्या कुटूंबात सामावून घेतलं.

सकाळच्या वेळी न्याहारी आणि चहा घेताना नक्षीदार चिनी मातीच्या कपाकडे विलक्षण कौतुकाने पाहत, त्या कपातून फुरक्या मारत चहा पिणारा चिंतूकाका तिला आठवला.

गावात इतर ठिकाणी काही लोकं गडी माणसाला कान तुटक्या कपातून बिनदुधाचा चहा देत असत; हे तिला माहित होतं. शेतात राबणाऱ्या मजुराला तुच्छतेची वागणूक देत, हे ती जाणून होती. पण अरुणरावांचं वागणं इतरांपेक्षा वेगळं होतं आणि लहानग्या दिपूला तो फरक अजाणत्या वयात समजला होता.

बालपणीच्या त्या आठवणीनीं दिपू कौतुकमिश्रित नजरेने आपल्या वडीलांकडे पाहू लागली.

"दिपू , तुला अजून एक काम सांगणार आहे मी ..!"

"सांगा ना बाबा ...!"

"बलिप्रतिपदेला आपल्या गोठ्यातल्या जनावरांची, शेतातल्या अवजारांची पूजा करत जा. वाकड्या बांधावरच्या ताडाच्या झाडाखालच्या पऱ्हाड देवाला पावसाळ्याआधी एकदा नारळ फोड. आपल्या शेताचा, त्या जमिनीचा रक्षक आहे तो ...! आपल्या लाली गायीला गोड जेवणाचा नैवैद खाऊ घाल. तिला मनोभावे आरती करत जा... लाली म्हणजे तुझी थोरली बहिणच आहे बरं दिपू...!"

"बाबा ...!" डोळ्यातले पाणी पुसत दिपू हसू लागली.

दिपूच्या बालपणी अरुणरावांनी तिच्या दुधाची सोय व्हावी म्हणून काबऱ्या रंगाची एक कालवड आणली होती. तिचे वासरू म्हणजेच लाली ...! अरुणरावांनी त्या वासराचं प्रेमाने लाली हे नामकरण केलं होतं.

" बाबा , माझ्यापेक्षा जास्त लालीचे लाड करता तुम्ही... मी नाही तुमच्याशी बोलणार...!" लहानगी दिपू फुरंगटून बसत असे.

कित्ती त्या आठवणी.....! गोड अन् कडू.. पुसट होऊ पाहणारी भूतकालीन स्मृतीचित्रे जणू ती....!

आज अरुणराव आणि दिपिकाच्या उरात भूतकाळातल्या आठवणींचा नुसता कड फुटला होता.

थोडा वेळ अरुणराव आणि दिपिका शांतच राहिले.

___ आणि अचानक अरुणरावांचे डोळे पाझरू लागले. दिपूने आपल्या वडिलांचा हात घट्ट धरला.

" दिपू ...!" अरुणरावांचा खोल गेलेला आवाज कातर झाला.

" बोला बाबा, मी ऐकतेयं...!" दिपूने आपलं डोकं त्यांच्या जवळ नेलं.

"लहानपणी तू नेहमी विचारायचीस ना की, तुझी आई त्या अंगणातल्या कोपऱ्यावरच्या पारिजातकाच्या झाडाखाली आसवं का गाळते ते..??"

" हो , बाबा...!"

" तुझ्या आईचं दुःख अफाट होतं. अंगणातल्या त्या दोन्ही पारिजातकांच्या खाली, तुझ्या भावडांना ; हे जग न पाहिलेल्या तिच्या पोटच्या गोळ्यांना तिथे पुरलंय गं... !! हे जग न पाहू शकलेल्या बाळांच्या स्मृती सतत डोळ्यासमोर तेवत राहाव्यात म्हणून; पारिजातकाची झाडं लावली तिने त्यावर..!!
त्या झाडांना मोठं होताना ती पहात होती.. जणू ती सोडून गेलेली बाळं मोठी होत आहेत.. असा भास तिला होत होता. पारिजातकांच्या फुलांच्या सुगंधात तीचं हरवलेलं मातृत्व अनुभवत होती. एक आई म्हणून खूप मोठं दुःख होतं तिचं. त्या झाडांशी बोलून, त्या फुलांचा सुगंध घेऊन जणू ती त्या गमावलेल्या आपल्या पोटच्या गोळ्यांशी संवाद साधत होती. तिला त्यातून समाधान मिळत होतं. त्या झाडांवर कधीच कुऱ्हाडीचे घाव घालू नकोस दिपू.!..! .त्या झाडांची जमेल तेवढी काळजी घे... तुझ्या आईचा आणि माझाही जीव अडकलायं त्या पारिजातकांच्या झाडांत..!"

__आणि मग आपले कातडी लोंबलेले, कृश हात जोडत अरुणराव रडू लागले.

__ मग दिपिकाला आपले अश्रू आणि भावना दोन्ही आवरता आल्या नाहीत. आईच्या आठवणीनीं तिला दुःखाचे उमाळे येऊ लागले.

ती रात्र चिंतेने सरली. दिपिकाने फोन करून मनीषला दुसऱ्या दिवशी बोलावून घेतलं.

दिवसभर अरुणराव खोल गेलेल्या आवाजात बोलू पहात होते.. पण आज त्यांचे उच्चार सुस्पष्ट नव्हते. पण तरीही त्यांना आज रिकामं- रिकामं वाटतं होतं. आपल्या मनात साठलेल्या भावना आपल्या लेकीसमोर अखेरच्या भेटीत व्यक्त केल्याने; आता कुठल्याही क्षणी आपला श्वास थांबला; तरीही त्यांना त्याचं वाईट वाटणार नव्हतं.

त्या दिवशीच्या रात्री दिपिका आपल्या बाबांच्या उशाशी बसून जागीच होती. श्वासाने खाली - वर होणाऱ्या आपल्या वडीलांच्या छातीकडे ती एकटक पाहत होती.

बसल्याजागी दिपिकाचा डोळा लागला. घड्याळ्यात पहाटेचा पाचचा ठोका पडला अन् तिच्या जडावलेल्या पापण्या खाडकन् उघडल्या. तिने आपल्या वडिलांकडे पाहिलं. त्यांना शांत झोप लागली होती. त्यांचा श्वास धीम्या गतीने सुरू होता.

दिपिका बाहेर घराच्या व्हरांड्यात आली. ढगातून डोकावणारं पहाटेचं चंद्राचं क्षीण चांदणं आता पुसट होऊ लागलेलं. वातावरणात गार हवा सुटलेली. दूर चंडीका मातेच्या मंदिरातून येणारा पहाटेच्या आरतीचा आणि घंटेचा नाद कानावर पडत होता. पारिजातकांच्या फुलांचा सुगंध हवेत पसरलेला...!!

तिला बाहेर आलेलं पाहून मनीष तिच्या पाठोपाठ व्हरांड्यात आला. दिपिकाची मनस्थिती मनीष जाणून होता. त्याने तिच्या खांद्यावर प्रेमाने थोपटले.

अंगणातले फुललेले दोन्ही पारिजातक आणि आकाशात लुकलुकणाऱ्या तारका पाहून दिपिकाला बालपणीच्या आठवणी येऊ लागल्या.

लहानपणी आकाशातले अगणित तारे पाहून दीपिकाला प्रचंड आश्चर्य वाटायचं. मग ती विस्मयाने आपल्या आईला विचारत असे , " आई, हे आकाशात एवढे तारे कुठून येतात गं..??"

मग तिची आई तिला उत्तर देत म्हणत असे, " आपलं प्रिय माणूस आपल्यातून हे जग सोडून गेलं ना की, वर आकाशात जाऊन तो जीव लुकलुकणारा तारा बनतो आणि मग तो तारा वरून अवकाशातून लुकलुकत खाली जमिनीवरल्या आपल्या
प्रियजनांना पाहतो ..!"

आईच्या ह्या उत्तराने चिमुकल्या दिपिकाचे समाधान होई.

___ आणि तिची आई हे जग सोडून गेल्यानंतर; गेल्या दोन वर्षापासून दिपिकाला जणू नादच लागला. घराच्या गॅलरीतून, गच्चीवरून आकाशात लुकलुकणाऱ्या ताऱ्यांकडे पाहण्याचा....!

आकाशात पूर्व दिशेला लुकलुकणारी एक चांदणी जणू तिची आईच आहे असं तिला भासू लागलं. आज सुद्धा ती त्या लुकलुकणाऱ्या चांदणीकडे एकटक पाहू लागली.

___आणि तत्क्षणी अचानक लुकलुकणाऱ्या त्या चांदणीच्या बाजूला एक नवीन तारा उगवला... तो स्वयंमः प्रकाशाने लुकलुकू लागला. दीपिका त्या दोन्ही लुकलुकणाऱ्या ताऱ्यांकडे विलक्षण आश्चर्याने पाहू लागली.

___आणि आत घरात सारं काही शांत झालेलं..!!

___ आणि त्या दोन्ही लुकलुकणाऱ्या ताऱ्यांकडे पहात असतानाच दीपिकाच्या तोंडून एकच हुंदका फुटला....!

" बाबा...!"
____________________ XXX________________

समाप्त..!

धन्यवाद...!

©रूपाली विशे - पाटील
rupalivishepatil@gmail.com
__________________________________________
( टिप - सदर कथा काल्पनिक असून कथेचा वास्तविक जीवनाशी कुणाचा काहीही संबंध नाही. कथेत साध्यर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. )

_________________XXX_________________

.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नेहेमीप्रमाणेच मनाला भिडणारे कथानक. राजकारणच्या धाग्यावर आम्ही जाम गोंधळ घालतो, चिडतो, भांडतो. पण रुपाली, सांज, सुजाता, बिपीन यांच्या कथा (अजून कुठले नाव राहीले असेल तर क्षमस्वः ) वाचल्यावर एका हळव्या, माणुसकीच्या जगात प्रवेश केल्यासारखे वाटते.
Submitted by रश्मी. on 5 July, 2021 - 07:28

वाचक दखल घेतात , हे जाणवलं की लिहावंसं वाटतं ....
तुमच्या या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी
आपल्या ऋणात राहणं पसंत करतो .
आभार

बिपिनजी धन्यवाद, तुमच्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी...

वाचक दखल घेतात , हे जाणवलं की लिहावंसं वाटतं .>>> हे अगदी.. मनातलं लिहिलंत बिपिनजी..!

अविकुमार, तुम्हांला कथा आवडली आणि तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिलात त्यासाठी आभार तुमचे..!

नाही वाचू शकले पुर्ण.. आजकाल असं काही हळवं वाचू शकत नाही, करोना ने खूप भोगायला
लावले आहे आणि माझ्या वडिलांचे नाव ही अरूण आहे.

आशू, कथा वाचून तुमच्या हळव्या मनाला झालेल्या त्रासाबद्दल आणि योगायोगाने तुमच्या वडिलांचे नाव कथेतल्या नावाशी साध्यर्म्य साधत असल्याने तुमचं मन दुखावलं गेलं असेल तर...त्याबद्दल मी तुमची मनस्वी दिलगीर आहे.

Pages