कळीची पाकळी झाली

Submitted by निशिकांत on 27 June, 2021 - 08:31

कळीची पाकळी झाली
दवांनी चिंब ती न्हाली

जसे तारुण्य तिज आले
हसे ती एकटी गाली

पदर ढळता तिचा होतो
जगाचा श्वास वरखाली

फुलांच्या गावची का तू?
लगडलेली जणू डाली

तिचे अर्धोन्मिलित बघणे
मिळे लज्जेसही लाली

जमान्याची नजर तिजवर
कुठे गेली? कधी आली?

जगाला ती नकोशी का?
तिला गर्भात द्या ढाली

नसे अबला, खरे तर ती
असे अंबा कधी काली

तुला "निशिकांत" ती बघता
नको ती चौकशी झाली!

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त---महामाया
लगावली---लगागागा X २

Group content visibility: 
Public - accessible to all site users