एक होता अवचट ...भाग १

Submitted by देवभुबाबा on 19 June, 2021 - 07:30

शाम्भवी गोरीपान, नाकी डोळी सुंदर, शरीराने नाजूक, साधारण मध्यम उंचीची परंतु कुणाच्याही मनात भरेल अश्या थाटाची. तिच्या सौन्दर्याला शोभेल असाच तिचा कोमल मृदू आवाज आणि मितभाषी स्वभाव.

शाम्भवीचे वडील भुरकटराव. नावाने भुरकट असले तरीही रंगाने मात्र नाही. थोडे वेंधळे परंतु घरामध्ये त्यांचाच धाक चालतो.

शाम्भवीची आई मीनाक्षीदेवी बडबड्या स्वभावाची, त्यामुळे घरात कधी शांतता नसली तरीही वातावरण तस ज्वालीच.

गेल्या दोन वर्षांपासून शाम्भवीला स्थळ चालून येत होते. पण या ना त्या कारणाने लग्न कधी जुळत नव्हतं. कधी शाम्भवीला आणि घरच्यांना पसंत पडत नव्हते. आता शाम्भवीचे वय वाढतंय म्हणून तिचे आई-वडीलही चिंतीत होते. त्यातच त्यांच्याच area मधील गल्लीनायक "अवचट" शाम्भवीच्या मागे हात धुवून लागलेला. अवचट तसा स्वभावाने फारच खुळचट होता पण स्वतःला खूप शहाणा, सलमान खान समजणारा.

येता जाता या ना त्या बहाण्याने शाम्भवी आणि तिच्या घरच्यांना impress करण्याच्या मागे लागलेला. मग कधी सामानाची पिशवी घरी पोचवायला मदत करणे असो, कधी कुठल्या कार्यक्रमाची वर्गणी असो नाहीतर शेजारच्यांच्या पवळ्या कडे येण्याचं निमित्त असो, भुरकटरावांवर आणि मीनाक्षीदेवींवर भुरळ पाडण्यासाठी त्याने स्वतःला वाहून घेतले होते. शाम्भवीच्या पुढे पुढे करण्यासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो हर एक प्रकारे प्रयत्न करत असायचा. परंतु शाम्भवीने कधीही त्याला भाव दिला नाही आणि देणारीही नव्हती.

तर अश्या या खट्याळ अवचट च्या गंमती आपण पुढे पाहुयात.

मोबाइलचा अलार्म होतो तसा सकाळी ६.३० ला अवचट उठतो. अवचटचे घर शाम्भवीच्या घरापासून काही अंतरावर चौकामध्येच, शाम्भवीच्या घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यास जोडणारा. आणि शाम्भवीचे घर चाळीमध्ये पहिल्या माळ्यावर, त्यामुळे रस्त्यावरून घर आणि घरातून रस्ता सहजच नजरेत येत होता. अवचट रोज सकाळी उठून morning walk ला जात असे. (म्हणजेच शाम्भवीच्या घरासमोरून तिच्या दर्शनासाठी वारंवार येरझऱ्या मारत असे.) आणि त्याच्या येण्यामुळे गल्लीतील कुत्रें जोरजोरात भुंकून सर्वांना जागे करत असत. अवचट येरझाऱ्या मारता मारता कधी कुत्र्यांना हाकलत तर कधी लहान पोरांना रस्त्याच्या बाजूला बसू नये म्हणून गुपचूप खडे फेकत असे.

शाम्भवी सकाळी उठून बाल्कनीत येत असे. चिमण्यांची चिवचिव, सकाळची मन प्रफुल्लित करणारी हवा, जागे होणारे शहर पाहण्यासाठी. मोकळे केस विंचरताना बाल्कनीच्या एका कोपऱ्यात ती उभी राहून केसांची झालर एका हाताने सावरत दुसऱ्या हाताने फणी फिरवताना अवचट दुरूनच तिला पाहून खुश होत असे आणि मगच घरी जात असे. पुन्हा अंघोळ वगैरे आटोपून, टापटीप होऊन (म्हणजेच डॅशिंग कपडे, goggle, बुट आणि fogg च्या जाहिरातीने प्रेरित होऊन थोडा fogg शिंपडून) पवळ्या कडे गप्पा मारायला (अर्थातच शाम्भवीला पाहायला) येत असे.

नेहमीप्रमाणे आजही ६.३० च्या गजराला अवचट ला जाग आली. त्याची आई घरामध्ये सकाळच्या नाश्त्याची तयारी करत होती.

अवचट उठून तोंड धुवायला गेला. त्याची आई आवाज देऊन येताना त्याला दुधाची पिशवी आणायला सांगते. अवचट ला निघायची नेहमीच घाई असते. आपल्याच तंद्रीत असलेल्या अवचटचे त्याच्या आईच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. अवचट शाम्भवीच्या घरासमोरील रस्त्यावर कुत्र्यांच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष करत, त्यांना हुसकावत कानाला हेडफोन लावून येरझऱ्या मारत असतो (थोडक्यात morning walk करत होता.) तिकडे बराच वेळ झाला तरीही अवचटने दूध आणलं नाही म्हणून अवचट ची आई त्याला शोधतच तिथपर्यंत आली. अवचटला दुरूनच शिव्या देत आरोळ्या देत अवचट ची आई त्याच्या जवळ पोहोचली तरीही अवचट हेडफोन च्या नादामध्ये शाम्भवीच्या बाल्कनीकडे बघून फेऱ्या मारतच होता.

शेवटी चिडलेली त्याची आई त्याचे केस धरून त्याचा हेडफोन काढून फेकून देत, "मेल्या तुला दुधाची पिशवी आणायला सांगितली तर morning walk च्या नावाखाली इकडे टवारक्या करतोय, कोण बोलतोय त्याच्याकडे लक्ष नाही. बोंबलून दमले तरी ह्याच आहे आपल्याच नादात. .... जा लवकर आणि दूध आणून दे पहिलं. "

ज्या जोरात आली त्याच तोऱ्यात अवचटची आई बडबड करत निघून गेली.

आई निघून गेल्यावर अवचट हळूच मान वळवून शाम्भवीच्या बाल्कनीकडे नजर फिरवतो. कुणीही आपला पोपट होताना पाहिलं नाही याच समाधान मानून हळूच तेथून काढता पाय घेतो.

दुधाची पिशवी आईकडे देत आईला बोलतो, "रस्त्यात कश्याला बडबड करत सुटतेस? लोक बघतील तर काय बोलतील"

अवचटची आई :- (हसतच) बोलतील, एवढा मोठा झालाय तरी, घरातली कामं करत न्हाय .

आईच्या बोलण्याकडे अवचट दुर्लक्ष्य करून अंघोळ वगैरे करून चहा पिता-पिता पवळ्या ला फोन करतो.

पवळ्या :- (फोन उचलत...जांभई देत) "अव्या... झोपू दे रे थोडावेळ.

अवचट:- अरे उठ गप्प लवकर. गच्चीत येतोय, गप्पा मारायला...

पवळ्या :- हा...हा.... (बोलता बोलता फोन काटतो)

अवचट पवळ्या कडे पोहोचला तरीही पवळ्या अंथरुणात असतो.

अवचट :- (conti.) कंबरेवर (मस्तीखोरपणात) लाथ मारून

"उठ रें घोड्या , कधीचा फोन केलाय, ये लवकर गच्चीत"

अवचट गच्चीमध्ये उभा राहून पवळ्याची वाट पाहत असतो. आणि तिरकसपणे हळुवार शाम्भवी च्या दाराकडे नजर फिरवत असतो.

तुळशीमध्ये अगरबत्ती लावायला भुरकटराव बाहेर येतात.

अगरबत्ती लावता लावता " काय अवचटराव, आज सकाळी सकाळी इकडे कुठे?"

अवचट :- नाही हो .. अण्णा , ते पवळ्याकडे आलो होतो, गप्पा मारायला.

भुरकटराव :- काय चाललंय मग सध्या? काही कामधंदा वगैरे?

अवचटच्या चेहऱ्यावर भलताच आनंद चढतो. (मनातल्या मनात सासरेबुवा आपली चौकशी करताहेत अशी समजूत करून, छाती फुगवून तो सांगू लागतो)

अवचट:- अण्णा मी Business चालू करतोय लवकरचं ...

भुरकटराव :- (आश्चर्याने) हो... अरे व्वा ... भारीच... कसला रे ?

अवचट:- (थोडा गोंधळत, हसण्यावर घालवत) हेच... असच ... सांगेन ... आत्ताच सांगितलं तर गोंगाट होईल ना आधीच. कळेल ना तुम्हाला.

भुरकटराव:- कळेलच म्हणजे?... बोलावणार नाहीस?

अवचट:- (हसत, अडखळत) बोलवेन ना... आ ~ .. तुम्हाला...शाम्भवीला ... नानींना (मनातल्या मनात पुटपुटत , "बास्स रे किती विचारणार ")

तेव्हढ्यात मीनाक्षीदेवी बाहेर येतात.

मीनाक्षीदेवी:- अरे व्वा ... अवचट कसला उद्योग करतोस?

(अवचट पुरा फसलाच होता, तेव्हढ्यात पवळ्या मागून आवाज देतो)

पवळ्या :- अरे अव्या... ये ना... बस... चहा घे.

अवचट:- (मीनाक्षीदेवींबरोबरचे बोलणं तोडत) पवळ्या किती रे वेळ... (दोघेही आत गप्पा मारत बसतात)

मीनाक्षीदेवी:- (भुरकटरावांना, हलक्या आवाजात) काय हो... कसला उद्योग करतोय हा आता?

भुरकटराव :- काही बोलला नाही. म्हणतोय, आत्ताच सांगितलं तर गोंगाट होईल.

थोड्या वेळानंतर अवचट तेथुन निघून जातो.

मीनाक्षी देवी अवचटला जाताना पाहून बाल्कनीत येतात.

पवळ्या ला आवाज देऊन बोलावतात.

पवळ्या :- (बाहेर येत) काय झालं नानी ?

मीनाक्षीदेवी:- काय रे... हा अवचट कसला उद्योग करतोय?

पवळ्या :- कसला उद्योग? (काहीतरी आठवतं, मीनाक्षीदेवी काहीतरी मस्करी करत असतील या समजुतीत, हो ला हो मिळवत आणखी रंगवून सांगू लागतो.) हो .. नानी ... अवचट हार-फुलांचा धंदा चालू करतोय आपल्या चौकात.

मीनाक्षीदेवी:- हो का...? बरं होईल चला... आपल्याला घरच्या घरी हार-फुले पोच होत जातील ....

पुढील भाग
https://www.maayboli.com/node/79338

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults