गेले विकोपाला

Submitted by निशिकांत on 17 June, 2021 - 07:41

गौण होते वाद पण गेले विकोपाला
आत्मप्रौढी बाधली होती समेटाला

मान्य आहे त्रस्त तुझिया मी वियोगाने
आठवांची बाग आहे दरवळायाला

चाहुलीनेही सखे गंधाळतो मी पण
वाटते का दरवळावे सोनचाफ्याला?

हार होता दोष झटकाया म्हणावे की
तेच घडते जे हवे असते विधात्याला

सर्व स्वप्ने पूर्ण झाली, त्या अभाग्यांच्या
जीवनी ना ध्येय उरते धडपडायाला

चार भिंती, चौकटी, गुदमर कशासाठी?
तोड अबले! चक्रव्यूहाच्या परीघाला

ना दिले भक्तास दर्शन तू कधीही पण
विरहिणी दिधलीस देवा गुणगुणायाला

हात माझे, पाय माझे, कष्टही माझे
फायदा का एवढा टाटा नि बिर्लाला?

जीवनाची नाव डगमगता नको चिंता
काळजी "निशिकांत" रे!असते खलाशाला

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users