तू किती जखमा दिल्या, मी नोंद नाही ठेवली
कोरले ह्रदयावरी जे क्षण दिले तू मखमली
का वियोगाचे कुणाला दु:ख व्हावे एवढे?
तृप्त मी मिळताच तुझिया आठवांची सावली
आस आहे एक माझी, स्वप्न मी व्हावे तुझे
खाक झालेल्या मनी का पाकळी गंधाळली?
आठवातिल माय माझी, फाटक्या लुगड्यातली
पण तिने आभाळमाया काय असते दावली
वानवा दिसली सुखाची उच्चभ्रू वस्तीत अन्
मी कलंदर एवढा की वेदना कुरवाळली
काल स्त्री आरक्षणाची घोषणा केली तरी
काय झाले देव जाणे प्रक्रिया थंडावली
पुस्तके होती नवी पण त्यातल्या विभुती जुन्या
नोंद घेण्या योग्य नवखी माणसे ना गावली
धीट झालेली भुतावळ जात नाही, मी जरी
जानव्याची गाठ माझ्या जीव तोडुन दाबली
दु:ख का "निशिकांत"झाले शब्द सुचणे थांबता ?
श्वास घेण्याची गतीही वाटते मंदावली
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--देवप्रिया
लगावली--गालगागा X ३+गालगा
मस्त
मस्त