Submitted by _आदित्य_ on 13 June, 2021 - 07:19
अधून मधून शंकेची चुकचुकते पाल..
मनालाच मन माझं विचारतं सवाल !
तू भास तर नाहीस ना? खरा आहेस ना बाबा?
आहे ना? कि ढळला तुझा तुझ्यावरचा ताबा?
उजेडातून अचानक मन अंधारात जातं..
सगळं काही ठीक असतं तरी असं होतं !
उत्तरांना पडू लागतात प्रश्न असे तसे..
उमगत नाही स्वतःला सावरावे कसे !
कुणी नाव पुकारल्याचा क्षणिक भास होतो?
कुणाची चाहूल लागते? कसला त्रास होतो?
हसता हसता मधेच कसं डोळ्यांत पाणी येतं?
सगळं काही ठीक असतं तरी असं होतं !
मन माझं मनामधून मन काढून घेतं..
लक्ष दिलं नाही तरी पुन्हा लक्ष जातं !
हा काय प्रकार आहे? नेमकं चाललंय काय?
सोडवता सुटण्याऐवजी अडकत जातोय पाय !
बराच वेळ दळतं मन मनाचं हे जातं..
सगळं काही ठीक असतं तरी असं होतं !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा