शेवट!(The End Of Relationship)-अंतिम भाग

Submitted by रिना वाढई on 8 June, 2021 - 07:22

एके दिवशी अचानक पायलची तब्बेत बिघडली .नॉर्मल ताप असेल म्हणून तिने इग्नोर केलं . ४-५ दिवस झाले तरी ताप काही कमी होत नव्हता.तेव्हा कुठे ती डॉक्टरकडे गेली.डॉक्टरांनी २-३ टेस्ट करायला सांगितले.टेस्टचे रिपोर्ट पॉसिटीव्ह आले होते.तिला टायफाईड झालं होतं.ज्या दिवशी रिपोर्ट आले त्या दिवशी तिला अर्जुनसोबत बोलण्याची तीव्र इच्छा झाली होती.तरीही सयंम राखून तिने त्याला फोन केला नाही .एवढ्या दिवसांत एकदाही अर्जुनला स्वतः कॉल करावं असं वाटलं नसेल का....जर खरचं नसेल वाटलं तर मग आता या वेळी फोन करून आपली तब्बेत सांगून अर्जुनला त्रास का द्यायचा.म्हणून ती त्याला फोन करणार नव्हतीच.

हळूहळू पायलचा अशक्तपणा वाढतच होता.
औषधांचाही काही परिणाम दिसत नव्हता.तब्बेतच एवढी खराब झाली कि आतून ती खूप खचून गेली . मनात भीतीही वाटत होती कि या संकटातून आपण बरे होणार कि नाही. अशावेळेस अर्जुनची खूप आठवण येऊन देखील ती त्याच्याशी बोलणे टाळत होती.

"माझ्या हृदयाची हाक कधीतरी तुझ्यापर्यंत पोहचेल आणि तू स्वतः मला फोन करशील या आशेवर आलेला दिवस ती ढकलत होती.
अशातच जयूने तिला फोन केला .पायलच्या बोलण्यावरूनच तिची तब्बेत किती खराब असेल हे सहजच जयूला कळून गेले.

जयू-अर्जुन दा चा फोन आला?त्याला माहिती आहे का तुझ्याबद्दल.

पायल-नाही जयू,त्याला काही कळावे अशी इच्छा पण नाही माझी.

जयूला माहित होते कि पायल कधीच त्याला आपल्या तब्बेतीबद्दल सांगणार नाही.मात्र त्याच्याशी बोलल्यावर तिचा अर्धा आजार नक्कीच बरा होईल.

पायलने जयूला अर्जुनला काही कळू द्यायचं नाही हे स्पष्ट सांगूनही जयूने अर्जुनला फोन केलाच.

अर्जुन-बोल जयू,काय म्हणतेस.

जयु- दा तुला पायलच्या तब्बेतीबद्दल खरचं काही माहिती नाहीये का.

पायलची तब्बेत हा शब्दचं ऐकून अर्जुन जरा अवाकच झाला.

घरी सीमाही होती त्यामुळे जयूशी जास्त बोलणे त्याला जमले नाही .जयूने पायलच्या तब्बेतीबद्दल अर्जुनला सविस्तर सांगितले.

"पायल ने आपल्याला का नाही सांगितले?"या विचारातच तो घराच्या बाहेर पडला.

पायलच्या मोबाईलवर अर्जुनचा आलेला कॉल पाहूनच तिला खूप आनंद झाला होता.पण जेव्हा अर्जुनने सांगितले कि जयूकडून त्याला आपली तब्बेत कळली त्यावेळेस पायल नाराजच झाली.पण काहीही का असेना , अर्जुनच्या एका फोनमुळे तिच्या तब्बेतीमध्ये नक्कीच सुधारणा झाली होती.त्यांनतर अर्जुन न चुकता तिला एक फोन नाहीतर मॅसेज करत होता.औषधीपेक्षाही कितितरी पटीने ती अर्जुनच्या बोलण्याने बरी होत होती.

तिची तब्बेत आता बऱ्यापैकी सुधारली होती.अर्जुनचेही फोन येणे थांबले होते.२-३ दिवस झाले अर्जुनने काही मॅसेज पण केला नव्हता.दिवसभर तिला काही त्रास झाला नव्हता मात्र रात्री तिचे अंग तापाने फणफणत होते.एवढ्या दिवसांपासून आपली तब्बेत बरी झाली हा केवळ भ्रम होता तिचा.अर्जुनशी बोलून झाल्यावर तिच्या मनाला मिळणारा जो आनंद होता , कदाचित त्यामुळे तिला बाकीचे त्रास जाणवत नव्हते.४ -५ दिवसांनी अर्जुनने जेव्हा फोन केला तेव्हा कुठे तिला बरं वाटलं होत.

एक क्षण तिला असेही वाटून गेले कि "जर आपल्याला ठीक नसल्याने अर्जुनला आपली एवढी काळजी असणार, तो रोज फोन , मॅसेज करत असेल तर ती आयुष्यभर त्यासाठी बिमार राहायला तयार होती." मात्र दुसऱ्याच क्षणी तिला तिच्यावर असलेल्या जबाबदारीची आठवण झाली आणि त्यामुळे तिला असं बिमार राहून चालणार नव्हते.तिच्या संसारात तिची किंमत खूप मोठी आहे हे तिला कळत होते. अर्जुनबद्दलच्या भावना आणि तिचा संसार या दोन्ही गोष्टी खूप भिन्न होत्या ज्याची बरोबरी ती एकमेकांसमोर नव्हती करू शकत.त्यामुळे तिने एक निर्णय घेतला.
अर्जुनमुळे आता आपण दुखावणार नाही हे तिने मनोमन ठरवून टाकले.मैत्रीच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले नाते नव्हतेच त्यांच्यात तरीही या भावनांच्या खेळांनाही तिला आता आवरायचं होत.अर्जुनची जेव्हा इच्छा होईल आपल्याशी बोलण्याची त्यावेळी तो करेल फोन.त्यामुळे उगाच त्याच्या फोनच्या प्रतीक्षेत दिवस काढायचे नाहीत हे ठरवूनच टाकले तिने.

सकाळी पूजेची वेळ झाली होती,ती देवघरात जाणार तोच तिला अर्जुनचा मॅसेज आलेला दिसला.तिने लगेच त्याला रिप्लाय केला.अर्जुननेही जास्त वेळ न लावता पहिल्यांदा इतक्या फास्ट तिला मॅसेज केला होता.त्यातच तिला कळले कि वातावरणाच्या बदलांमुळे सीमाची तब्बेत खराब झाली आहे.अर्जुनला किती टेन्शन असेल हे त्याच्या रिप्लायवरून कळलेच तिला.होईल सगळं व्यवस्थित म्हणत चॅटिंग बंद केली तिने.देवाजवळ बसून तिने सीमाच्या तब्बेतीसाठी प्रार्थना केली.त्याच्या फॅमिलीला काहीही होणे म्हणजे माझ्या अर्जुनला दुःख होणार आणि हे दुःख निवारण्यासाठी तिने आयुष्यभर मी अर्जुनसाठी प्रार्थना करेल असा निश्चय केला.कितीही नाही म्हटलं तरी अर्जुनला होणारा त्रास ती बघू शकत नव्हतीच.त्याच्या कठीण काळातही त्याने आपली आठवण केली , म्हणजे त्याच्या जीवनातल्या एखाद्या कप्प्यात नक्कीच आपली थोडीशी जागा असेल हे वाटून पायल सुखावली.

पायलला अर्जुन आणि तिचे नाते काय आहे याची जाणीव होतीच.मैत्रीच्या पलीकडे जायचे नसले तरीही एक मात्र तिच्या मनात वाटत होतेच कि आपले नाते कसे असावे.

जिथे शब्दांची गरज नसावी,भावना सहज टिपल्या जातील.

जिथे माझे -तुझे हे शब्द नसावे , तुझे दुःख हे माझ्या डोळ्यांत दिसावे.

जिथे अधिकार अन हक्क हि भाषा नसावी,वेळ येता विसाव्याची...तुझे खांदे हे मला अलगद मिळावे.

सुकलेल्या या मनाच्या आर्तवाला, थोडासा ओलावा तुझे शब्दही द्यावे.

---------------------------------------------------------------------------------------------

सीमा बरी होऊन खूप दिवस झाले.अर्जुन आणि पायल मध्ये आता बोलणेही कमी झाले.आपल्यामुळे अर्जुनला त्रास व्हायला नको याचा विचार करून पायलही त्याला फोन करत नव्हती.बोलणे बंद झाल्याने मैत्रीच्या भावना थोडेच कमी होणार म्हणून पायल अर्जुनच्या बर्थडेची वाट पाहू लागली.त्याच्या बर्थडेच्या दिवशी आपण त्याला काहीतरी स्पेशल भेटवस्तू द्यायची हे पायलने ठरवले.पण काही कारणांमुळे ते शक्य होणार असे तिला वाटत नव्हते.
कधीतरी भेटल्यावर त्याला खरचं छानसं गिफ्ट देऊ पण आता त्याच्यासाठी काहीतरी लिहायचं आणि त्याला पाठवायचं या विचारातच पायल होती.नक्कीच तो आपल्याला विचारेल..."पायल आज काय देशील मला?" मग त्याच्याबद्दल लिहिलेली कविता आपण त्याला देऊ असे कित्येक विचार पायल आपल्या मनात साठवून त्या दिवसाची वाट बघत होती.

गेल्या काही दिवसांचं घटनाक्रम पाहता पायलला हे हि वाटायचे कि नको , आता आपण अर्जुनला आपण असण्याची जाणीव नको करून द्यायला.बघू या अर्जुन मला आठवण करेल काय?तो नेहमी म्हणतो तसा या स्पेशल व्यक्तीकडून जेव्हा त्याला फोन नाही जाईल तर तो थोडातरी भावुक होईल काय? कि आता मैत्रीही आमच्या नात्यातून निघून गेली आहे.या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तिला त्याच्या बर्थडेच्या दिवशीच मिळणार होते.

मनाला समजावूनही ती स्वतःला अर्जुनला बर्थडेच्या दिवशी फोन करण्यापासून नाही थांबवू शकली.अर्जुन जर माझ्या फोनमुळे खुश होईल तर अजून काय हवंय ...या विचारातच तिने अर्जुनला फोन केला.

पायल-हॅप्पी बर्थडे अर्जुन!

अर्जुन -थँक यु पायल.तुझा बर्थडे मॅसेज मिळाला,खूप स्पेशल होता तो.

पायल-खरचं स्पेशल वाटलं तुला ...मग स्पेशल वाटलं तर थँक यू चा रिप्लाय का केलास तू?

अर्जुनला कळतच नव्हते कि थँक यु चा मॅसेज केल्याने काय झालं ते .

पायल-आठवते तुला,मागच्या वर्षी मी मॅसेज केला होता तुला आणि तुला मला थँक यू म्हणायचं होत... पण माझ्याशी बोलून , त्यामुळे तू पूर्ण दिवसभरात रिप्लाय नाही केलास .सायंकाळी फोन केली तेव्हा बोललास कि ,तुझा फोन नाही आला असता तर मी स्वतः फोन करणार होतो तुला.दिवसभर तुझ्या फोनची वाट पाहत होतो मी...

"आज वाट नव्हती का रे माझ्या फोनची?"

अर्जुन-असं होतं का....मला आठवत नाहीये गं.आज आता तू मॅसेज केलीस त्यामुळे फोन येण्याची शक्यता नव्हती.

अर्जुनच्या बोलण्यावरून पायलला कळले कि तो अजिबात तिच्या फोनची वाट बघत नव्हताच.कुठेतरी मन ओरडून सांगत होते कि , बस...बस झाले पायल आता...तू ज्या मैत्रीची कल्पना करत आहेस ,त्या केवळ तुझ्या भावना आहेत .त्यात कुठलाच गंध नाही अर्जुनचा.अ गं त्याला तर कल्पना पण नसेल तुझ्या असण्याची.आठव प्रत्येक क्षण ज्यावेळी तुम्ही दोघे भेटलात , त्या भेटीची आतुरता हि फक्त तुलाच होती आणि त्या भेटीनंतरचा आनंद हि केवळ तुलाच झाला असेल कदाचित.कारण तो आनंद अर्जुनला झाला असता तर कधीतरी तुला भेटायची ओढ त्याच्या डोळ्यांत तुला दिसली असतीच ना !

एखाद्याला खूप वर्षांनी भेटलं कि आपोआपच त्याच्याशी बोलण्याची ओढ निर्माण होते आणि त्या व्यक्तीच्या मनात आपले काय स्थान आहे हे माहित असल्यावर तर नक्कीच.अर्जुनलाही तीच ओढ होती,पण कदाचित ती ओढ कायमच प्रत्येक भेटीत त्याच्या मनात टिकू शकली नाही.त्यात त्याचाही काय दोष !!!

मानवी मनच ते , आज या गोष्टीमुळे सुखी होते तर उद्या दुसऱ्या सुखाची अपेक्षा करते .मैत्रीचं नातं हे तू तयार केली आणि आजपर्यंत या नात्याला तूच जपत आलीस.बघ एकदा या नात्याची परीक्षा करून.नक्कीच फेल होशील.कारण कोणतेही नाते समोर टिकण्यासाठी समतोल पाहिजे , जर काटा एका बाजूने जरी कमी पडला ना कि त्या नात्यांचे बंध तुटायला सुरुवात होते...
पायलाही तिच्या मनातून आलेले आवाज योग्यच वाटत होते.तुटलेले बंध जोडायला पायल मागे पाहणार नव्हती मात्र कुणासाठी.....?अर्जुनला या नात्याचे बंध तरी कळत होते का ?तो तर आजपर्यंत पायलला गृहीत धरत आलेला कि पायलला काहीही फरक पडणार नाही.

समुद्र कधी आटू शकत नाही हे जेवढं सत्य आहे ना ...तेवढेच सत्य हे हि आहे कि, पायलच्या मनातल्या अर्जुनच्या भावना कधी मिटू शकणार नाही.तरीही पायलने ठरवलेच कि त्या भावनांना आता कधीही व्यक्त होऊ द्यायचे नाही...जरी या नात्याचे बंध तुटले तरी आता आपण तुटणार नाही...आपल्याला आता काहीही फरक पडणार नाहीच.

समाप्त!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users