कॉन्स्टॅन्टीनोपल ते इस्तंबूल - ०२

Submitted by Theurbannomad on 6 June, 2021 - 16:19

भाग ०१- https://www.maayboli.com/node/79178

ख्रिस्ती धर्मात अकराव्या शतकात पडलेली फूट पुढे रुंदावत गेली. केवळ पोपच्या वर्चस्वाला आव्हान दिल्यामुळेच नव्हे, तर ख्रिस्ती धर्माच्या काही मूलभूत तत्वांवरही पूर्वेकडच्या ऑर्थोडॉक्स चर्चने आपला मतभेद दाखवून दिलेला होता. ' holy spirit ' च्या तत्वानुसार मनुष्य ' प्रेषितावस्थेत ' जातो तो ईश्वराने नेमून दिलेल्या पवित्र आत्म्याच्या मार्फत...इथे ईश्वर सर्वशक्तिमान असून त्याखालोखाल पिता, मुलगा आणि ही दैवी शक्ती अशा ' ट्रिनिटी ' संकल्पनेचा ख्रिस्ती तत्वज्ञानात पुरस्कार केला गेला आहे.

पाश्चिमात्य लॅटिन चर्चने यावर असा सिद्धांत पुढे आणला, की पवित्र आत्म्याला पिता आणि पुत्र अशा दोहोंकडून दैवी प्रवास घडू शकतो...तर ग्रीक चर्च मूळ बायबलनुसार हा प्रवास फक्त पित्याकडून पुत्राकडे होऊ शकतो. पिता पुत्रापेक्षा उच्च असतो..लॅटिन चर्चच्या पोपच्या धर्मव्यवस्थेत पोपचा उच्चाधिकार आणि त्यांची ही बायबलच्या सिद्धांतातली ढवळाढवळ ग्रीक ऑर्थोडॉक्स मान्य करत नसत.

अखेर १०६३ साली पोपने इटलीच्या दक्षिण प्रांतातील चर्चना फक्त लॅटिन पद्धतीचं अनुसरण करण्याची सक्ती फर्मावली आणि ख्रिस्ती धर्माच्या दोन शाखा आमनेसामने आल्या. कॉन्स्टॅन्टीनोपलच्या मायकल सारुलारियास याने आपल्या भागातली लॅटिन चर्च बंद पाडली. या संघर्षात ख्रिस्ती धर्मीयांच एकत्रीकरण हा मुख्य उद्देश असल्यामुळे दोन्ही बाजू आपली खिंड लढवत राहिल्या. अखेर १२०२ साली चौथ्या कृसेडच्या आडून पोप इनोसंट तिसरा याने एक खेळी केली. इराकच्या भागातलं आयुबिड मुस्लिम साम्राज्य लक्ष्य करण्याच्या उद्देशाने आपली ख्रिस्ती सेना त्याने आशिया खंडात उतरवली आणि त्या निमित्ताने कॉन्स्टॅन्टीनोपलवर चढाई करून तिथल्या ऑर्थोडॉक्स व्यवस्थेवर घाला घातला. ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चच्या भूभागाचे तुकडे करून त्याने अनेक छोटी राज्ये जन्माला घातली. या सगळ्यामुळे प्रत्यक्ष कॉन्स्टॅन्टीनोपलच्या भागात जरी ऑर्थोडॉक्स पंथ तगला तरी त्याचा विस्तार मात्र खुंटला. अशा प्रकारे दोघांपैकी एक ख्रिस्ती पंथ दुबळा झालं आणि त्याचं अस्तित्व कॉन्स्टॅन्टीनोपलच्या भागात एकवटून आलं.

मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मीयांमध्ये या काळात धर्मयुद्ध सुरू होती. कृसेड्स या नावाने ओळखली जाणारी ही युद्ध आशिया आणि युरोप खंडातील प्रबळ शक्तींमध्ये होत होती. एकीकडे पोपचा आदेश मानून ख्रिस्ती धर्माचा झेंडा घेऊन युरोपीय आशियात खोल मुसंडी मारायच्या प्रयत्नात होते तर दुसरीकडे मुस्लिम धर्मीय हा हल्ला थोपवून धरून युरोपियन सैन्याला जमेल तसं तोंड देत होते. १०९८ साली पहिल्या क्रूसेडमध्ये ख्रिस्ती सैन्याने मोसूल भाग आपल्या ताब्यात आणला. १०९९ साली जेरुसलेम पडलं.

पुढे तुर्किक प्रांतातल्या इमाद अल दिन झेंगी याने पुन्हा मुस्लिम सैन्य घेऊन जेरुसलेम, मोसूल, अलेप्पो, हामा आणि एदेसा इतक्या प्रचंड भागावर आपली सत्ता आणली आणि स्वतःला या भागाचा सर्वेसर्वा - अताबेग - घोषित केलं. पुन्हा पोपने ख्रिस्ती सेना पाठवली आणि दुसऱ्या कृसेडला सुरुवात झाली. याही वेळी जेरुसलेम आणि दमास्कस या भागात रण पेटून दोन्ही बाजूंचे सैनिक भिडले...पण स्थानिकांनी मुस्लिम सैन्याला पाठिंबा देऊन युरोपीय सैन्याला पिटाळून लावलं.

तिसऱ्या कृसेडमध्ये मात्र मुस्लिमांनी चांगलाच पराक्रम गाजवला. या वेळी इजिप्तमध्ये सत्तेत असलेले फातीमिद - जे प्रेषित मोहम्मद यांचे थेट वंशज होते - या संघर्षात उतरले. त्यांना मदत करायला आला सलाहुद्दिन नावाचा एक तरुण, जो अताबेगच्या खास आदेशानुसार पौगंडावस्थेतील फातीमिद राजाला संरक्षण द्यायला आला होता. हा सद्दाम हुसेन ज्या तिक्रित गावचा होता, तिथे एका कुर्द घरात जन्माला आलेला होता. कुर्द लोक डोंगराळ भागातले. जात्या टणक. लढाईला चिवट. या सलाहुद्दिनने कुर्द आणि फतिमिद सैन्याच्या साहाय्याने ख्रिस्ती आक्रमण थोपवून त्यांना इतकं झोडपून काढलं की युरोपीय सैन्य चक्क पळून गेलं.

युरोपमध्ये या सलाहुद्दिनचा इतका धसका घेतला गेला की त्याच्या नावाने ' सलाहुद्दिन टाईद ' नावाचा कर लावून पोपने लोकांना धार्मिक युद्धाचा खर्च उचलायला भाग पाडलं. जर कर भरायचा नसेल तर सैन्यात भरती होण्याचा एकमेव पर्याय होता....पण उपयोग झाला नाहीच. सलाहुद्दिन आणि मुस्लिम सैन्य तयार होतच...त्यांनी पुन्हा युरोपीय सैन्याला तडाखा दिला. अखेर पोपने हात टेकले आणि कृसेड्स थांबल्या.

या धामधुमीत १०७१ साली सेलजुक तुर्की लोकांनी बायझेंटाईन ऑर्थोडॉक्स साम्राज्याशी दोन हात करायला सुरुवात केली. हे सेलजुक तुर्की लोक सुन्नी मुस्लिम. १०३७ साली तुघ्रील बेग आणि चाघ्री बेग या भावांनी अरालच्या समुद्रापासून थेट खोरासन आणि पर्शिया भागात आपला अंमल बसवून जे साम्राज्य स्थापन केलं, तेच हे सेलजुक साम्राज्य. या सेलजुक सैन्याने मंझिकर्ट येथे बायझेंटाईन सैन्याचा पाडाव केला. पुढे १३ व्या शतकात या सेलजुक साम्राज्याला घरघर लागली आणि त्यातून या साम्राज्याचे प्रांतीय सरदार आपापल्या भागाचे स्वयंभू राजे झाले. त्यातलाच एक होता पहिला उस्मान. याने अनातोलिया भागात आपलं वर्चस्व वाढवलं आणि हळू हळू युरोपच्या बाल्कन प्रदेशात आपला साम्राज्यविस्तार केला. तेराव्या शतकाच्या अखेरीस या नव्या साम्राज्याचा उदय झाला आणि या उस्मानच्याच नावावरून या साम्राज्याला ' ऑटोमन साम्राज्य ' असं नाव पडलं.

या पहिल्या उस्मानच्या पुढच्या पिढीत जन्मलेल्या मेहमत याने जो पराक्रम करून दाखवला, त्याला जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेेलं. केवळ विशीतला हा धाडसी आणि महत्त्वाकांक्षी तरुण थेट बायझेंटाईन साम्राज्याच्या सर्वशक्तिमान केंद्राला जाऊन भिडला...त्याने तोपर्यंत अभेद्य आणि अजिंक्य समजल्या गेलेल्या कॉन्स्टॅन्टीनोपलच्या तटबंदीला भेदून त्या शहरावर मुस्लिम झेंडा फडकावला. या त्याच्या अचाट कामगिरीवर पुढच्या काही भागांमध्ये बोलायचं आहेच...पण तोवर अलविदा !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ईश्वर सर्वशक्तिमान असून त्याखालोखाल पिता, मुलगा आणि ही दैवी शक्ती अशा ' ट्रिनिटी ' संकल्पनेचा ख्रिस्ती तत्वज्ञानात पुरस्कार केला गेला आहे
>>
ईश्वर हाच पिता, मुलगा आणि ही दैवी शक्ती अशा ' ट्रिनिटी ' ने बनलेला आहे असे ख्रिस्ती तत्वज्ञानात आहे मला वाटते.
बाकी उत्तम! पुभाशु!