कधी फटकारला गेलो

Submitted by निशिकांत on 6 June, 2021 - 09:29

कधी चुचकारला गेलो, कधी फटकारला गेलो
तरी नाराजगीचा सूर नाही गायला गेलो

जसे जमले तसे जगलो, न जमले खंत ना केली
सदा मी जीवनाशी फक्त मिळते घ्यावया गेलो

गुन्हेगारीस रुतबा! सांगती ते ताठ मानेने
जसा मी बेलवर सुटलो, किती सत्कारला गेलो

पिरॅमिडच्या जरी शिखरावरी जगलो तरीही पण
खुशीने सांज होता जीवना! उतरायला गेलो

असोनी सर्व माझे, अस्तिनीच्या आत लपलेले
अचानक आपुल्याकडुनी कसा फुत्कारला गेलो!

सदा मी माळ कवड्यांची गळा घालून फिरताना
हसे अंबा! बघोनी पोट मी जाळायला गेलो

उसासे दाबल्यावरती, दगा का आसवे देती?
मनीचे भाव लपवाया कधी अंधारला गेलो

शशी ना भेटला पण सागरा भरती कशासाठी
कधी नैराश्य नाही पाहिले सांगायला गेलो

उगा "निशिकांत "का जावे सभेला राज्यकर्त्यांच्या?
कशा ते भूलथापा मारती ऐकायला गेलो

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वियदगंगा
लगावली--लगागागा X ४

Group content visibility: 
Public - accessible to all site users