आपण नाकपुड्या का फेंदारतो?

Submitted by ऋन्मेऽऽऽष on 6 June, 2021 - 03:22

एकदा आरशा समोर बसा आणि आपल्या नाकपुड्या हलवून पहा. आपण तिथे असलेले स्नायू वापरून नाकपुड्यांचे प्रसरण करू शकतो. पण त्यांचे आकुंचन नाही करू शकत. श्वास आत घेत असताना, बाहेर सोडत असताना आणि रोखलेला असताना असे तिन्ही वेळेस आपण नाकपुड्या फेंदारू शकतो.
आकुंचन करण्यास आपल्याला श्वास खूप जोराने आत ओढावा लागतो. नेहमी सारखा श्वास घेत असताना, श्वास बाहेर सोडत असताना आणि रोखलेला असताना आपण नाकपुड्यांचे आकुंचन करू शकत नाही.
थोडक्यात नाकपुड्यांचे प्रसरण करणे, म्हणजे त्या फेंदारणे यावरच आपला ताबा आहे आणि त्यासाठी आपल्याला स्नायू मिळाले आहेत.

मग या नाकपुड्या फेंदारण्याचा उपयोग काय आहे?
कशाचा वास घेताना वासाचे कण अधिक नाकात जावे म्हणुन आपण फेंदारतो का? तर नाही. मी माझ्या हाताच्या बोटाला गुलाबाच्या पाकळीचा रस लावला आणि घरात माझ्या बोटाला कसला वास येतोय ओळखा म्हणुन सांगितले. माझे बोट हुंगताना कुणीही नाकपुड्या फेंदारल्या नाहीत.
मग मी दुसऱ्या हाताचे बोट पुढे केले त्याला काहीच लावले नव्हते. ते जास्त हुंगतानाही कुणीही नाकपूड्या फेंदारल्या नाहीत. म्हणजे नाकपुड्या फेंदारणे याचा वास घेण्याशी संबंध असेल असे वाटत नाही.

कुणी चिडले / रागावले म्हणजे त्याने/तिने नाक फेंदारले असे म्हणतात. पण यात कितपत तथ्य आहे? मी स्वतः लौकर चिडत नाही आणि चिडलो तरी दाखवत नाही. तरी मी चिडल्याचा अभिनय करत आरशा समोर उभा राहिलो पण नाकपुड्या आपोआप फुगल्या नाहीत.
मग मी माझ्या बायकोला खूप चिडवले, ती चिडे पर्यँत. आणि ती चिडल्यावर मी तिच्या नाकाचे निरीक्षण केले. तिनेही नाकपुड्या फेंदारल्या नाहीत. पण मी शांतपणे तिच्या चेहऱ्याकडे बघत आहे हे पाहून ती भडकली आणि तिने जोराने माझे केस ओढले आणि मला ढकलून दिले आणि मी पडलो. त्यामुळे मी ही चांगलाच चिडलो आणि उठून तिला काही बोलणार तेवढ्यात माझ्या लक्षात आले आपण खरंच चिडलोय आणि लगेच वळून आरशात पाहिले. पण माझ्या नाकपुड्या आताही फेंदरल्या नव्हत्या.
तेव्हा रागामुळे आपण नाकपुड्या फेंदारतो या बाबत मी साशंक आहे.

मग काय प्रयोजन आहे असले स्नायू आणि त्यावर आपल्याला हवे तेव्हा वापरण्याचा ताबा असण्यामागे?

तुमचा काय अनुभव आहे?
तुम्ही नाक फेंदारता का? असल्यास किती वारंवारतेने आणि कुठल्या कारणास्तव? की तुमच्या न कळत तुम्ही नाक फेंदारता?
आणि नक्की काय शास्त्रीय कारण आहे आपल्या नाक फेंदारण्याच मागे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते टॉम ॲण्ड जेरी कार्टूनमध्ये दाखवतात चिडले की नाकपुड्या फेंदारतात. पाश्चात्य फॅड आहे हे. नाकपुड्या फेंदारल्या, गाल गुलाबी झाले, ओठ रसीले झाले, डोळे नशीले झाले, कानशीले तापली, आपल्याकडे असे काही नसते.
तरी जाणकारांकडून आणखी जाणून घ्यायला आवडेल. मी यातला तज्ञ नाही. आणि हा आयडीसुद्धा माझा नाही.

अतिशय रोचक विषय आहे!

मी १ हर्ट्झ इतक्या वारंवारितेने नाकपुड्या फेंदारू शकतो. मला राग येतो तेव्हा माझ्या चेहऱ्याचं अंतर्गत तापमान थोडं वाढतं. त्याला थंड करण्यासाठी जास्तीच्या गार हवेची गरज असते. कदाचित त्यासाठी नाकपुड्या त्यांचं आंतरच्छेदीय क्षेत्रफळ वाढवतात ज्यामुळे त्या फेंदरल्या जातात.

दुसऱ्या व्यक्तीच्या नाकपुड्या फेंदारलेल्या दिसल्या म्हणजे ती चिडली असावी अशी अंतःप्रेरणा बघणाऱ्या व्यक्तीमध्ये निर्माण होते. बचवाच्या दृष्टीने निसर्गाने मानवाला दिलेली ही देणगी असावी.

आता तुमचा प्रश्न - नाकपुड्या आकुंचित का करता येत नाहीत हा. नाकपुड्यांचा उपयोग हवा/गंध आत घेणे आणि बाहेर सोडण्यासाठी आहे. त्याचे प्रमाण वाढवायचे असल्यास नाकपुड्या फेंदारण्या खेरीज पर्याय नाही. परंतु प्रमाण कमी करावयाचे असल्यास तोंडाचा चंबू किंवा ऊ किंवा पाऊट करून वरचा ओठ थोडा आणखी वरती उचलून धरून नाकपुड्या झाकायची सोय आहे. ज्यांना मिश्या असतात त्यांना तर हा प्राणायाम आणखी सोपा जातो. अश्या सोयीसुविधा असल्यामुळे माणसाला कधी नाकपुड्या आकुंचित करायची गरज पडली नसावी आणि त्यामुळे नाकपुड्या आकुंचित करायची क्षमता उत्क्रांत झाली नसावी.

मला राग आला की माझ्या नाकपुड्या फेंदारतात.
त्यामुळे काही माणसांच्या बाबतीत हे खरं आहे असं मानायला हरकत नाही.

रानभुली, ऋन्मेष, हरचंद पालव, किट्टू२१ प्रतिसादा साठी धन्यवाद.

@ ऋन्मेष: आणि हा आयडीसुद्धा माझा नाही. >> हा म्हणजे कोणता, आणि तुझा कुठला आयडी असो/नसो त्याचा इथे काय संबंध?

@हरचंद पालव: छान प्रतिसाद.
परंतु आपल्याला जेव्हाही जास्त हवेची (ऑक्सिजनची) गरज पडते आणि आपण जोराचे/मोठे श्वास घेतो तेव्हा आपण नाक फेंदारत नाही. नाक फेंदारुन जेवढे टिचकीभर क्षेत्रफळ वाढते त्या तुलनेत आत घेतल्या जाणाऱ्या हवेचे प्रमाण आणि श्वासाची वारंवारता कितीतरी जास्त वाढवता येते आणि त्याच्या होणाऱ्या कुलिंग इफेक्टच्या तुलनेत टिचकीभर क्षेत्रफळ वाढून होणारा कुलिंग इफेक्ट नगण्य असेल.

आणि दुसरे असे की मी अजून एक प्रयोग करून पाहिला. मुद्दाम नाकपूड्या फेंदारून घरात वावरलो सगळ्यांनी माझ्याकडे त्या अवस्थेत नीट आणि अनेकवेळा बघे पर्यन्त.
पण कुणालाही मी चिडलो आहे असे वाटले असावे असे वाटले नाही. एरव्ही जेव्हा कधी मी क्वचित चिडतो तेव्हा मी गप्प असतानाही सगळ्यांच्या लक्षात येते की हा चीडला आहे.
तेव्हा आपण चीडलो आहोत हे आपल्या चेहरा, कपाळ, डोळे, ओठांची ठेवण यात झालेले काही दृश्य बदल यावरून लक्षात येत असावे.

मायबोलीचे स्क्रीनशॉट फेसबुकवर टाकून स्वतःची लाल करणाऱ्या लोकांचे नाक गोरिलासारखे फेंदारते असे निरीक्षण नोंदवून खाली बसतो अध्यक्ष महोदय.

बाकी सर्व जाउदे
तुमच्या बायको ने तुम्हाला केस ओढून ढकलुन पाडले हे वाचून मज़्ज़ा आली...

झम्पू Happy मी फेसबूकवर नाही तेव्हा याची कल्पना नाही.
@अनिश्का: ते पाहुन आमच्या घरातल्याही सगळ्यांना लइ मज्जा वाटते नेहमी. : (

नेहमी सकारात्मक विचार करावा. आपल्याला फेंदारण्यासाठी काही तरी (नाक) मिळालेय ना ? मग जे आहे ते फेंदारा. ते आकुंचन का पावत नाही असा विचार करूच नये.

नकारात्मक विचार कुठे दिसला?
नाकपुड्या आकुंचन पावत नाहीत हे फक्त निरीक्षण नोंदवले आहे. त्याबद्दल तक्रार नाही केलेली.
प्रश्न आपण नाकपुड्या का फेंदारतो असा आहे.

काकेपांदा, तुम्ही योग्य प्रयोग करत आहात. फक्त त्यात अजून सिस्टिमॅटिक एक्स्पेरिमेंट्स्ची गरज आहे.

१. पण कुणालाही मी चिडलो आहे असे वाटले असावे असे वाटले नाही >> पुढच्या वेळी व्हर्नियर कॅलिपरने राग आलेला असताना किती फेंदारले जाते ते मोजून ठेवा. त्यानंतर राग आलेला नसताना मुद्दामून प्रयत्न केल्यास जास्तीत जास्त किती फेंदारता येते हे मोजा.
२. आपण चिडलो आहोत हे दाखवणारी इतर लक्षणे किती आणि नाक फेंदारण्याचा भाग किती हे बघायला हवे. एक दिवस इतर लक्षणे (मोठे डोळे, लाल होणे, थरथरणे - असे काही असल्यास) दर्शवून नाक न फेंदारता घरात फिरा. जर तुम्ही चिडल्याचा आव आणता आहात असे वाटल्यास मग पुढच्या प्रयोगात फेंदारणे अ‍ॅड करून प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेत काही फरक पडतो का बघा. नसल्यास तो हायपोथिसिस चुकीचा आहे हे बिनधास्त सांगायला हरकत नाही. ह्या प्रयोगात रागदर्शक इतर शरीरलक्षणे आणि फेंदारणे आयसोलेट करणे महत्त्वाचे आहे.
३. टिचकीभर क्षेत्रफळ वाढते त्या तुलनेत आत घेतल्या जाणाऱ्या हवेचे प्रमाण आणि श्वासाची वारंवारता >> बरोबर मुद्दा आहे. आता एक प्रयोग करा. शरीराचे तपमान मोजा (समजा - त१) आणि त्यानंतर नाक न फेंदारता सेकंदास दोन इतक्या वारंवारितेने हवा आत घ्या आणि सोडा. हवेचे किती प्रमाण आत घेतले जात आहे हे मोजणे अवघड आहे, पण तुम्ही श्वासांचा आवाज ध्वनिमुद्रित करून एखाद्या अ‍ॅपवर डेसिबल मोजू शकलात तर उत्तम. एक मिनिटानंतर शरीराचे तपमान पुन्हा मोजा (त२). आता एखाद्या दुसर्‍या वेळी, जेव्हा तुमचं शरीर त१ इतक्या तपमानास स्थिरावलं असेल, तेव्हा हाच प्रयोग नाकपुड्या फेंदारून करा (व्हर्नियर कॅलिपर वापरा हे सांगणे नलगे). ह्यात वारंवारिता आणि डेसिबल आधीच्या प्रयोगाइतकीच रहायला हवी. त्यानंतरच्या तपमानास त३ म्हणा. आता त२ आणि त३ मधील फरक बघा. नगण्य असेल (<१०% - हे आपण ठरवू), तर तो हायपोथिसिस बाद करायला हरकत नाही.

स्टॅटिस्टिकली रिझनेबल रिझल्ट्स साठी हे प्रयोग अनेकवेळा करून सरासरी काढावी लागेल.

शुभेच्छा!