शेवट! (The End Of Relationship )-भाग ७

Submitted by रिना वाढई on 5 June, 2021 - 02:27

त्या प्रसंगानंतर खूप दिवसानंतर पायल आपल्या आईकडे गेली होती.गावाकडे गेल्यावर अर्जुनशी थोडेतरी बोलणे व्हायचेचं .त्यावेळेस सीमाही काही दिवसांसाठी आपल्या बहिणीकडे गेली होती.अर्जुन एकटाच घरी होता.पायल गावाकडे आली हे अर्जुनला कळले होते.रात्रीच जेवण आटोपल्यावर अर्जुनने पायलला मॅसेज केला ,हाय !

पायल-हॅलो,काय म्हणतोस...आज चक्क रात्री मॅसेज केलास तू ?अर्जुन आणि पायल एकमेकांना कधी रात्री वैगेरे मॅसेज करत नव्हते.त्यामुळे पायल ला थोडं वेगळं वाटलं.

अर्जुन-का ? नव्हतो करायला पाहिजे का?

पायल-असं कुठे बोलले का मी.तू केव्हाही मॅसेज करू शकतोस.फक्त बंधन मलाच आहेत रे ...

एकदा सीमाने अर्जुनला पायलशी बोलण्यावरून हटकलं होत.तेव्हापासून अर्जुन आणि पायल मध्ये मॅसेजेस करणे कमी झाले होते.मैत्री कितीही निखळ असली तरी प्रत्येकालाच ती पटेल असे नाही ना ! सीमालासुद्धा अर्जुनची पायलसोबत मैत्री फार रुचली नाही.तेव्हापासून अर्जुनने पायलला मॅसेज,किंवा फोन करायला मना केलं होत.जेव्हा तो एकटा असेल किंवा जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा तोच पायलला फोन करायचा.पायललाही सीमाचे वागणे चुकीचे वाटले नव्हते.म्हणून तिने देखील अर्जुनला आपल्यामुळे त्रास होईल असे काही केले नाही.

त्यादिवशी सीमा घरी नसल्याने अर्जुनने तिला मॅसेज केला होता.शिवाय खूप दिवसांपासून पायलशी बोलताही आले नव्हते.

पहिल्यांदाच दोघे एवढ्या रात्रीपर्यंत चॅटिंग करत होते.मधेच एक क्षण असा आला होता ,कि पायल अर्जुनवर नाराज झाली.पहिल्यांदाच ती अर्जुनसमोर त्याच्यावर नाराज झाली.त्या दिवशी अर्जुनहि एवढ्या मोकळेपणाने बोलत होता,कि ति विसरून गेली होती कि तो अर्जुन तिचा नाही आहे .प्रेमातले रुसवे,फुगवे काय असतात हे तिला माहित नव्हतेच तरीही नकळत अर्जुनच्या एका वाक्याने ती रुसली.त्यावर अर्जुनने तिला रिप्लाय केला .

अर्जुन -"तू नाराज झालेली अजिबात आवडत नाही मला."

या एका वाक्याने त्याच्यावरचा राग कुठल्या कुठे पळाला होता.त्या एका वाक्यात खूप काही लपलेलं होत .

तुटणाऱ्या मैत्रीला सावरणे , दूर जाणाऱ्या प्रेयसीला अडवणे ...आपल्यामुळे झालेल्या त्रासाची माफी मागणे आणि बरंच .....असाच काही अनुभव आला तीला त्याक्षणी आणि ती विरघळली त्याच्या शब्दांसमोर .
दुसऱ्या दिवसाची ती सोनेरी पहाट छानस हसू घेऊन आली होती तिच्या चेहऱ्यावर . एक वेगळाच आनंद त्या दिवशी होत होता.एवढ्या हक्काने पहिल्यांदाच अर्जुन तिच्याशी बोलला होता, ज्यात काळजी , प्रेम स्पष्ट दिसत होते.

हा आनंद मात्र फार काळ टिकणार नाही हे कुठे माहित होते तिला.

२-४ दिवसांनी पायलचा बर्थडे होता , एरव्ही या गोष्टी फार महत्वाच्या वाटत नव्हत्या ,तरी त्यावेळेस पायलला तिचा बर्थडे खूप स्पेशल असणार असं वाटलं होत . त्याला कारण म्हणजे अर्जुनचं ......

अर्जुन काहीतरी निमित्याने घरी येणार,गिफ्टच्या रूपात एकदा शेकहॅण्ड करणार. पहिल्यांदा माझ्या बर्थडे च्या दिवशी तू माझ्या सोबत राहणार....हे भासच ना एक विलक्षण आनंद देत होते तिच्या मनाला . त्यात तीच मन तर अगदीच वेडा होता ....आस ठेवून होता या कल्पना सत्यात उतरण्याची .

दुसऱ्या दिवशीच तिला अर्जुनशी बोलतांना कळलं कि तिच्या बर्थडे ची तर त्याला भनक सुद्धा नाही आहे.हे तर सोडा त्याला ती तिथे थांबलेली फार आवडणार पण नसेन कारण ती गावाकडे असली कि सततचे मॅसेज आणि कॉल्स यामुळे अर्जुनला त्रास होत असेल असेच तिला वाटले होते.

म्हणूनच तिने परत जाण्याचा निर्णय घेतला,अर्जुनला सांगितल्यावर अर्जुन एकदा तरी म्हणेल कि नको ना जाऊ एवढ्या लवकर ....एक वर्षांनी आपण भेटलो , रोज नाही भेटू शकलो तरी जवळ असण्याचा भास सुद्धा आनंदच देतो . पण तेव्हा अर्जुनकडून काहीही एक्सपेक्ट करणे व्यर्थच ठरले.
लग्न झाल्यानंतर असतात मर्यादा ...त्या मर्यादेच्या पलीकडे कधी वळायचं नव्हतेच तिलाही. पण मनातल्या कुपीत दडलेल्या त्या भावनांचं काय ??? ज्या अर्जुनच्या जवळ असण्यानेही त्रास देत होते आणि नसल्याने सुद्धा .

आता दूरच जायचं म्हणून पायलने विवेकला फोन केला,मला नेण्यासाठी या असं सांगितले.विवेक दुसऱ्याच दिवशी गावी गेला तिला घ्यायला.दोघेही बाइकनेच विवेकच्या मूळ गावी जात होते .गाडीवरून जातांना तो गार वारा सुद्धा तिला छेडत होता....मनातच ती अर्जुनला आठवू लागली .

तुझ्यासोबत माझा स्पेशल दिवस अनुभवायचं हे एक स्वप्नच बनून राहून गेलं अर्जुन.तु ज्यावेळी समोर असतोस तो प्रत्येक क्षण, तो संपूर्ण दिवस हा स्पेशलच असते माझ्यासाठी. तरी काहीतरी अर्धवट असल्याचा भास होत आहे रे. त्या वाऱ्यासोबत डोळ्यातून निघणारे अश्रू देखील सुकून जात होते ....आणि त्या वाऱ्याच्या प्रत्येक स्पर्शात तिला अर्जुनचाच भास होत होता.
पायल आणि विवेक घरी पोहचले ,दुसऱ्या दिवशीच ते परत आपल्या शहरात जाणार होते.अचानक विवेकचे कोणीतरी नातेवाईक वारल्याने सासरी अजून ३-४ दिवसांसाठी थांबावं लागलं होत. ज्या दिवशी पायलचा बर्थडे होता त्याच दिवशी त्यांच्यावर क्रियाकर्म करण्यात आलं.त्यामुळे घरी पायल एकटीच होती मुलांना सांभाळत.तो दिवस इतका वाईट उगवला होता , कि विवेकला देखील तिच्यासोबत थांबता आलं नाही.सकाळपासूनच नियती तिच्यावर जणू हसतच आहे हे भास होत होते तिला.

तेवढ्यात दुपारी अर्जुनचा मॅसेज आला "हैप्पी बर्थडे डिअर " , मन थोडं सुखावला पण फक्त एक मॅसेज ...आणि या दिवशी म्हणून ती अजून थोडी नाराज झाली . नंतर थोड्या वेळात अर्जुनचा स्क्रीनवर आलेला कॉल पाहून नाचावं कि रडावं असंच काहीस झालं पायलला.

पण त्या रात्रीच्या गोष्टी आठवल्या आणि अजून मन सुन्न झालं . जे झालं त्यात चूक कुणाची होती ह्या पेक्षाही अर्जुनला आपल्यासोबत थोडा वेळ घालवायलाहि आवडत नाही... का ?, हि गोष्ट दुःख देत होती.

त्या रात्री जेव्हा ते एकमेकांसोबत चॅटिंग करत होते तेव्हा अर्जुनने पायलची थोडी थट्टा केली होती.पायल आपल्या बाबतीत किती भावुक आहे हे अर्जुनला चांगलेच कळत होते, त्यामुळे त्याने सहजच तिला म्हटले ,पायल...मी दूर असतो तुझ्या तरी तू एवढी भावनिक असतेस माझ्याबद्दल,मी एक दिवस जरी तुझ्यासोबत घालवेल तर काय हाल करशील तू माझा.म्हणजे अगदी तुझ्या डोळ्यांच्या समोरून हलूही नाही देशील ना मला.या वाक्यावर दोघेही हसले.थोड्याच वेळात पायलच्या डोक्यात एक प्रश्न आला,तिने बेधडक तो अर्जुनसमोर मांडला.कुठलीही गोष्ट मनात किंवा डोक्यात ठेवून चुळबुळायला आवडत नव्हते तिला,rather तिचा स्वभावच नव्हता तो .जे पोटात ते ओठात अशीच होती ती .

पायल -अर्जुन , समजा देवाने खरचं आपल्याला एक दिवस जर दिला एकमेकांसोबत घालवायला ,तर तुला आवडेल काय रे ?

अर्जुनने क्षणाचाही विलंब न करता हो म्हटलं.

थोड्या वेळाने मात्र त्याचा रिप्लाय आला...पायल,मनात कितीही एकमेकांची ओढ असली तरी परिस्थिती आता बदलली आहे गं.तुझ्या भावना मी समजो शकतो,तुझ्या भावनांमध्ये कुठेही अपवित्रतेचा लवलेश नाही.पण या समाजात राहायचं म्हणजे त्या चौकटी आल्याचं.आणि त्या चौकटीच्या बाहेर जाऊन मी तुझ्यासोबत वेळ नाही घालवू शकणार.

त्याच्या बोलण्यात वाईट असे काही नव्हते तरीही अर्जुन कल्पनांमध्ये सुद्धा "हो" बोलू नाही शकला म्हणून पायल रुसली होती.नंतर तिला दुःख झालं होत कि माझ्या मनात असा विचार का आला असेल.अर्जुनवर ती स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवत होती,त्यामुळे तो सोबत असतांना विपरीत काही घडण्याची शक्यता नव्हती.तिला फक्त अर्जुनच्या सोबत राहायचे होते ,त्याच्या सोबत थोडा वेळ स्पेंड करायचा होता .एकदा त्याच्या मिठीत शिरून त्याचे श्वास अनुभवायचे होते.फक्त एवढंच वाटत होते तिलाही.

मात्र कुणाच्या जवळ राहणें , एकमेकांसोबत थोडा वेळ स्पेंड करणे, हे खरचं एका लग्न झालेल्या व्यक्तीसाठी योग्य नाही ...पण आयुष्यभर ज्याच्याविषयी मनात प्रेम असणे आणि कधीतरी एकदा तो आपल्या मिठीत घेईल ...एक क्षण ज्याच्यासोबत जगायचं आहे हे वाटून त्या व्यक्तीच्या समोर आपल्या भावना मांडणे यात अयोग्य काय होत ...हे कळत नसल्याने खूप अस्वथ होते मन .

पायलला आपण खूप फॉरवर्ड कॅटेगरीतले तर नाही ना ... काय विचार करत असणार अर्जुन माझ्याबद्दल ...अशे १०० प्रश्न मनात येत होते.
तिने अर्जुनचा कॉल उचलला ,तुटकसर बोलूनच फोन ठेवायचा होता तिला.अर्जुन कधीतरी आपल्या भावना व्यक्त करेल हि आशा कधीचीच मोडून पडली होती .

अर्जुनने पायल विश केलं , तिच्या बोलण्यावरून त्यालाही कळत होतेच कि तिच्या मनाची अवस्था काय असेल.त्यामुळे जेव्हा तिने फोन ठेऊ का असं विचारलं तेव्हा अर्जुन तिला नको ठेवूस नाही म्हणू शकला.

पायल तू समजून का घेत नाहीस मला...अ गं तुला जे ऐकायचं आहे ते मी बोललोच पाहिजे का?माझ्या बोलण्याने तुला समाधान मिळेलही पण ...एखादी गोष्ट सांगण्याची एक योग्य वेळ असते ,कदाचित ती वेळ गेलीली आहे आता.अर्जुनच्या मनात विचारचक्र सुरूच होते कि तोच पुन्हा पायलचा फोन आला.

पायलने अर्जुनशी अगदी तुटक बोलून फोन ठेवला होता,पण मन मानत नव्हते आणि म्हणून परत कॉल केली ती अर्जुनला.

ह्यावेळी आता अर्जुन बोलत होता आणि पायल ऐकत होती.अर्जुनच्या समजावण्यामध्ये खूप सामर्थ्य आहे हे कळले तिला.
"प्रत्येक वेळेस व्यक्त होणेचं गरजेचे नसते ,भावना असल्याशिवाय का मी तुझ्याशी वेळ काढून बोलतो." अर्जुनच्या ह्या वाक्याने पायलचे मन ओलावले तरी दुसरीकडे तिच्या मनात आलेच कि ,"कदाचित तुला तरस आला असेल ना अर्जुन आणि म्हणून तू हे बोलून गेलास."

काहीही असो अर्जुन पण एक सांगू , देवाने हा दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस जरी ठरवला ना,तरी माझी काहीही तक्रार नसेल.कारण आज तू अस्पष्टपणे का होईना , पण बोलून गेलास कि तुझ्याही मनात भावना आहेत.

आपण एखाद्यावर इतकं प्रेम करावं आणि समोरचा मात्र त्या प्रेमाची परतफेड म्हणून आयुष्यभर मैत्रीसाठी हात मिळवावे .....हे तरस येऊन मैत्री करणे नाहीतर काय मग... पण या उलट त्या प्रेमाची प्रचिती त्यालाही कधीतरी यावी .....आणि हे आयुष्यातल्या अगदी कुठल्याही टप्प्यावर असो ....तो क्षण किती खास असेल ना त्या व्यक्तीसाठी ज्याने आयुष्यात त्याच्यावर निःस्वार्थ प्रेम केलं.

पायलला ही आपलं आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटत होत.अर्जुनच्या एका वाक्यात तिच्या कित्येक प्रश्नांची उत्तरे दडली होती.जी तिला आज काही प्रमाणात मिळाल्यासारखी वाटत होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users