खुळी

Submitted by deepak_pawar on 3 June, 2021 - 08:53

         शनिवारी सकाळची शाळा, त्यात नुकतीच थंडी सुरु झालेली. सकाळ सकाळ उठायला जीवावर यायचं. तरी बरं आमची वाडी डोंगरावर, हा डोंगर म्हणजे चंद्रकोरीप्रमाणे टक्कल पडलेल्या डोक्यासारखा, म्हणजे टाळूवर आमची वाडी बाजूला डोंगर उतार, उतारावर चांगली दाट झाडी. उतार संपल्यावर सगळा भाग सपाट त्या पलीकडं गावची नदी, नदी शेजारील वाड्या थंडीनं नुसत्या कुडकुडणार. त्या वाड्यातून येणाऱ्या मुलांना चांगलं अर्धा पाऊण तास चालावं लागायचं, त्यामुळे थंडीच्या दिवसात हि मुलं जास्तच कंटाळायची. आमच्या वाडी पासून शाळा दहा मिनिटांवर तरी शनिवारी आमची स्वारी उशिरा. तसं आई मला सहा वाजता उठवणार, अजून पाच मिनिटं, अजून पाच मिनिटं करता करता साडे सहा कधी वाजायचे कळायचं  नाही. मग नुसती धांदल, पण या शनिवारची आम्ही दोन-चार दिवसापासून वाट पाहत होतो. शेतीची काम झाल्यानं मैदान तयार झालेलं, शनिवार पासून क्रिकेट खेळायला सुरुवात करायची होती. अकरा वाजता शाळा सुटली, कि न्याहारी करून तडक मैदानात यायचं पहिलंच ठरलं होतं.

शाळा सुटताच शर्यत लावली, ती वाडीत येईपर्यंत. वाडीत आल्यावर जो तो आपआपल्या घराकडे वळला. मी अंगणात आलो तर ओट्यावर खुळी बसलेली. तसं तिचं खरं नाव खुळी नव्हतंच, तिचं खरं नाव लक्ष्मी, पण थोडीशी वेडपट असल्यानं सगळी तिला खुळी म्हणायचे. रंगानं काळी, पसरट चेहरा त्यावर चपटं नाक, मुलांसारखे भादरलेले केस, बघावं तेव्हा डोकं खाजवत असायची. अंगावर मळकी साडी ती सुद्धा ढोपराच्यावर नेसलेली. कधी कुणाशी बोलायची सुद्धा नाही. बरेच दिवस मला वाटलेलं ती मुकी असावी. ती दिसली कि घाबरून आम्ही मुलं दुसऱ्या रस्त्यानं पळायचो. कधी कुणी चिडवलं, वेडावून दाखवलं तर, मिळेल तो दगड उचलून मारायची. पण! आज हि आमच्या घरी कशी? अंगणात उभा राहून, पाठच्या दरवाज्यानं जावं का? विचार करत असताना; आई ताट घेऊन बाहेर आली. आईला पाहून पुढच्या दरवाज्यानं घरात शिरलो. आईनं हातातलं ताट खुळीच्या पुढ्यात ठेवलं, तशी ती गालातल्या गालात हसली, पण ते हसणं सुद्धा मला भीतीदायक वाटलं. मी तडक आतल्या खोलीत गेलो, आई आल्यावर तिला म्हणालो,"अग, तिला घरात कशाला घेतलंस?"

"मग, घरात आलेल्या माणसांना हाकलून द्यायचं?" आई म्हणाली.

"अगं, ती येडी हाय,बघ किती घाणेरडी दिसतेय, आठ-दहा दिवसात आंघोळ पण केली नसल,"

"असू दे, ती तिथं बसलेय ना, तुला काय होतं,"आई रागानं म्हणाली. "

"एकदा भाकर दिलीस तर सारखी सारखी येल, बघ मी सांगून ठेवतोय,"मी काकुळतीला येऊन म्हणालो.

"येव दे, एका भाकरीनं काय कमी होत नाय," मला भाकर वाढता वाढता आई म्हणाली.

मी मुकाट्यानं पाठच्या दरवाज्यानं बाहेर गेलो, हात पाय धुतले, अन् भाकर खायला बसलो.

                  खुळीचं आपलं म्हणावं असं कुणीच नव्हतं. आई वडिलांची एकुलती एक लेक, लग्न सुद्धा झालेलं, पण वेडपट बाईला कोण नांदवणार, तिचा रागरंग पाहून नवऱ्यानं सोडून दिली. पुढं आई वडील मरून गेले, अन् खुळीच्या आयुष्याचा वनवास सुरु झाला. पावसाळा सुरु झाला कि खोताच्या म्हशी चरवायला न्यायची. त्या बदल्यात खोत तीन वेळचं जेवण द्यायचा. पावसाळा संपला कि गुरं उनाड सुटायची अन् खुळी कधी याच्याकडे, तर कधी त्याच्याकडे जाऊन बसायची. कुणाला दया आली, तर अर्धी भाकर मिळायची. तेव्हढीच खाऊन निमूट उठून जायची . कितीही भूक लागली तरी, कुणाकडं स्वताहून मागणार नाही. तिचा राहण्याचा सुद्धा ठिकाणा नव्हता, आई वडिलांचं घर केव्हांच मोडून गेलेलं. शाळा बंद असेल तर शाळेत, नाहीतर ग्रामपंचायतीच्या इमारतीत, महिना महिना तर दिसायची सुद्धा नाही. त्या दिवसापासून ती सलग आठ दहा दिवस आमच्याकडं येत होती, ती आली कि आई तिला भाकर वाढायची, पण मला खूप राग यायचा, एकतर आम्ही मुलं तिला जाम घाबरायचो आणि दुसरं म्हणजे ती एव्हडी घाणेरडी दिसायची कि वाटायचं हि आंघोळच घेत नसणार.  

            एकदा आम्ही मुलं मासे पकडायला गेलेलो. पऱ्याचा एक एक डोह पालथा घालत खाली नदीपर्यंत जाऊन पोहचलो. चांगली दुपार झालेली. इकडं आजूबाजूला सगळं रान. वाऱ्यामुळं झाडं एकमेकांवर घासत करकर आवाज करत होती. वानरांची टोळी या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत होती. कुठेतरी एखादी टिटवी ओरडून शांतता भंग करत होती. भर दुपारी अशा ठिकाणी कुणी एकटा माणूस येणं शक्य नव्हतं. पण खालच्या बाजूला कुणीतरी कपडे धुवत असल्याचा आवाज येत होता. आम्ही थोडं घाबरलो, पण खाली कोण आहे पाहिल्या शिवाय राहणार नव्हतो. लांबूनच कुणी दिसतंय का बघायचं ठरवून खाली गेलो. तर ती खुळी होती. आपले कपडे धुवत बसलेली. आम्हाला प्रश्न पडला, हिला एकटीला भीती कशी वाटत नाही? जर तिथं एखादं भूत असतं, तरी त्याला दगड मारून पळालो असतो, पण खुळी असल्यानं तिला दिसायच्या आत आम्ही घराकडे धूम ठोकली.    

               एकदा तर प्रकाशची चांगलीच फजेती झाली. आम्ही शाळेतून येत होतो. खुळी म्हशी चारवायला आलेली, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चोंढ्यातून म्हशी चरत होत्या आणि ती रस्त्यावर उभी. तिला पाहून दया म्हणाला,"चला खालच्या बाजूनं जाऊ, इथं खुळी उभी हाय."

त्यावर प्रकाश म्हणाला,"काय रे तुम्ही एवढं खुळी ला घाबरता, मी नाय घाबरत."

"खरंच नाय घाबरत?"दया म्हणाला.

"हाट, तिला काय घाबरायचं?"

"पकडा रे याला,"दया म्हणाला.

तसं आम्ही सगळ्यांनी प्रकाशाला पकडला. दया ओरडून म्हणाला,"ये खुळे, हा बघ तुला घाबरत नाय, धर याला."

खुळीनं आमच्याकडं पाहिलं. नेहमीप्रमाणे गालातल्या गालात हसली, जणू तिला सुद्धा मस्करी करायची हुक्की आली असावी. आपल्या हातातील काठी उगारत आमच्या दिशेने येऊ लागली. प्रकाश चांगलाच बोंबलायला लागलेला, ती जवळ येताच प्रकाशाला सोडून आम्ही पळालो, प्रकाश सुद्धा आमच्या पाठोपाठ पळू लागला.

"वसाडयांनो बघा, ती आता मला कधीच सोडणार नाय."

वाडीत येईपर्यंत प्रकाश आम्हाला शिव्या देत होता.

             खुळीची एक सवय आम्हाला चांगली ठाऊक झालेली. ती म्हणजे कुणी तिच्याकडे न बघता तसाच निघून गेला. तर ती त्याला काही करणार नाही, पण तिला कळलं हा मुलगा आपल्याला घाबरतोय, तर ती मुद्दाम त्याला घाबरवणार. तिला आता कळलं होतं, प्रकाश आपल्याला घाबरतो, त्यामुळे प्रकाश कुठेही दिसला, तर ती त्याला घाबरवणार. याचीच प्रकाशला जास्त भीती वाटू लागलेली.

             आम्ही थोडं मोठं झालो, थोडा समजूतदार पणा आला, अन् खुळी बद्दल वाईट वाटू लागलं. कधी आम्ही शाळेत जात असताना ती म्हशी चरवायला आलेली असायची. आम्हाला पाहून ओळखदाखल हसायची. आता आम्ही तिला घाबरत नव्हतो, आम्ही मित्र तिची मस्करी करायला लागलेलो. पण ती दगड उचलून मारत नव्हती. हातात असणारी काठी दगडावर आपटत मारू का? मारू का? म्हणत आमच्या दिशेनं यायची आम्ही पळायचो, ती गालातल्या गालात हसत राहायची, आम्हीच सुद्धा हसत हसत निघून जायचो.

पुढं दहावी झाल्यानंतर गाव सुटला, दोन तीन वर्षांनंतर गावी गेलो असताना आईला विचारलं,"खुळी येते का ग कधी?"

"मेली ना रे बिचारी!"आई चुकचुकत म्हणाली.

"कशी ग? तिचं तर अजून वय पण झालं नव्हतं ?"

"काय म्हाईत? पावसाळ्यात सकाळी पोरं शाळेत गेली, तर बिचारी मरून पडलेली."आई म्हणाली.

त्या दिवशी तिचा चेहरा डोळ्यासमोरून हलत नव्हता. गावातल्या मित्रांजवळ चौकशी केली, तर कुणी म्हणत होतं "रात्री झोपेत असताना साप चावला, तर कुणी सांगत होतं "गावातल्या एका बड्या माणसाला, एका बाई बरोबर नको त्या अवस्थेत पाहिलं म्हणून मारून टाकलं" कुणी काही, कुणी काही सांगत होतं, पण सगळेच म्हणत होते ,"बरं झालं मेली, बिचारीचा वनवास तरी संपला.  

  

 

 

  

 

 

 

 

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाईट वाटलं खुळीबद्दल..!
काही अश्राप माणसं कुणाच्या खिजगणतीतही नसतात. त्यांचा असा शेवट मनाला चटका लावून जातो.

अशा लोकांच जिवन खरच खुप ञासदायक. आमच्या गावात पण तिघेजण आहेत. नशीब की जेवन कोणी ना कोणी रोज देतात.

लावण्या, जाई, रुपाली, वावे, प्रविण आपले मनापासून आभार,
खरेतर या माणसांचं दुःख खुप मोठं असतं, शब्दात पकडता येण्या पलिकडचं.
पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार....