आभाळमाया..!! (पूर्वार्ध)

Submitted by रूपाली विशे - पाटील on 2 June, 2021 - 12:23

आभाळमाया..!! (पूर्वार्ध)
_________________________________________

कोणती - कोणती भाजी घ्यावी बरं..??

विशाल उद्या दीक्षाला घेऊन घरी येतोयं ... हं ..दुधी घेऊया का बरं.. दुधी हलवा बनवायला..??
लहानपणापासूनच दुधी हलवा खूप आवडतो माझ्या विशालला....!!

अळूवड्या बनवायला पाहिजेत दीक्षासाठी.. तिला खूप आवडतात माझ्या हातच्या अळूवड्या..! नव्या सुनेचे सासूबाईच्या नात्याने थोडे लाड करायला नको का..??

एकाच शहरात लांब - लांब राहतो बरं आम्ही..!

लग्न झाल्यावर विशालला ह्यांनी, त्याला त्याचा वेगळा संसार मांडायला सांगितलं. मला हे जराही पटलं नव्हतं. मी विरोध केला, पण ह्यांनी माझं जराही ऐकलं नाही.

__आणि म्हणे जगातले सगळे नवरे आपल्या बायकांचं सगळं ऐकतात ..भ्रामक कल्पना आहे सगळी..!!

नव्याची नवलाई संपली की, तू माझ्या कानी सुनबाईच्या कागाळ्या सुरु करशील; त्यापेक्षा त्यांना वेगळा संसार मांडू दे...."दुरून डोंगर साजरे"...असतात नाही का..???

ह्यांनी मला खट्याळ टोमणा मारला.

दोघांच्या आवडीची भाजी घेऊन झाली बाई एकदाची..!

__ आणि आता ह्यांच्यासाठी काय घ्यावं बरं ..?? कारली..?? हं.. रक्तात पिढीजात साखर वाहते नुसती भरभरून.. अख्ख्या आयुष्यात चुकूनही जिभेवर, बोलण्यात कधी साखर पेरणी झाली नाही, शरीरातंच साचून राहिली नुसती...!!

आता त्यावर डॉक्टरने दिलेला हा कारल्याचा उतारा... खा म्हणावं, आता कारल्याची भाजी... घ्या आता कारल्याची कडू चव...!

मी पण किती बाई दुष्ट ..!!. इतका दुष्ट विचार करावा का बरं माणसानं.??

__आणि आता हा विचार करून ओठात हळूच उमटू पाहणारं हसू लपवायचं तरी कसं..?? कुणाचं लक्ष गेलं माझ्याकडे, तर बघणारा विचार करेल , बाई जरा विक्षिप्त दिसतेयं.. एकटीच स्वतःशीच हसतेयं.. आणि आता ह्या विचाराने सुद्धा मला हसू येतेयं.... कुणी मला बघत तर नाहीये ना...?

मी हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून पहात आजूबाजूचा कानोसा घेतला.

" मॅडम, १४० रुपया हुआ..!!" भाजीवाल्याला पैसे देतच
होते तेवढ्यात___

" सुजाता ताई..!!"

माझ्या नावाने कुणी हाक मारली, म्हणून मी मागे वळून पाहिलं.

आवाज काही ओळखीचा वाटेना. तेवढ्यात ती समोर आली. तिचा चेहरासुद्धा मला ओळखीचा वाटेना. मी नुसती मख्खपणे तिच्या चेहर्‍याकडे पाहत राहिले.

समोर उभी असलेली ती शरीराने कृश होती. साधारण माझ्या वयाचीचं असावी. मूळचा सुंदर आणि घरंदाज वाटणारा चेहरा निस्तेज जाणवत होता. त्या चेहऱ्याला तोलून धरणाऱ्या तिच्या कृश मानेवरची शिर उठून दिसत होती. केसांच्या चंदेरी बटा तिच्या कपाळावर महिरप घालत होत्या.

असं एखाद्या माझ्या वयाच्या स्त्रीचं मी निरीक्षण करू लागले की, माझ्याही नकळत मी समोरच्या स्त्रीची माझ्याशी तुलना करू पाहते.

आता भरल्या सुखी संसारात मी अंमळ शरीराने सुटलीच आहे... आणि काय झालं... शरीर सुटलं तर..?? आता जावई आलायं, नवीन सूनबाई आलीयं घरात, सगळं कसं गोडी - गुलाबीत चाललंय माझं..!

भरल्या संसारातल्या तृप्ततेने मन भरलंय , तर शरीराने का बरं मागे रहावं... तेही बापुडे अंमळ सैलावणारचं ना..??

वाढलं वजन तर वाढू दे.... पण तुम्हांला सांगते, मला ना ते डाएट - बिएटच फॅड बिल्कूल पसंत नाही... माणसानं कसं पोटभरून खावं - प्यावं.. विनाकारण का हाल करावे आपल्या निष्पाप शरीराचे..??

तसं पण ह्या उतार वयात आपल्याला कुठे सौदर्य स्पर्धेत भाग घ्यायचायं म्हणा..??

माझं ना, हे नेहमी असंच असतं... विचार करता - करता विचारांची नौका भलतीकडेच भरकटते आणि मग भलत्याच दिशेला वळू पाहते.

"मीच हाक मारली तुम्हांला..!" माझ्याकडे पाहत ती ओळखीचं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली.

" माफ करा, पण मी ओळखलं नाही तुम्हांला..!" माझ्या चेहऱ्यावरचे अनोळखी भाव काही पुसले जात नव्हते.

" कसं ओळखणार म्हणा...? आपली भेट कधी अशी झालीच नाही..!" ती माझ्याशी मुक्त संवाद साधू पाहत होती.

" पण आपलं नातं खूप जवळचं आहे बरं!" ती उद्‌गारली.

काय अशी कोड्यात बोलतेयं ही बाई..?? एखाद्या माणसानं जे सांगायचं ते स्पष्टपणे सांगावं... उगाच आढेवेढे घेत आणि एखाद्याशी ओळख ना पाळख असताना, जास्त सलगी दाखवून चिकटू पाहणारी माणसं मला जराही आवडत नाहीत.

"अस्सं होय..!" मी उगाच चालता-चालता मनात नसताही प्रतित्त्युर दिलं.

"घाईत आहात का ?? थोडा वेळ थांबा ना ..!" तिच्या स्वरात विलक्षण आर्जवं.

" रागावू नका, पण मी खरंच तुम्हांला ओळखलं नाही!" मला माझ्या पाठी लागलेला तिचा ससेमिरा सोडवायचा होता.

" देवकी आणि यशोदा सारखं नातं आहे आपलं..!" ती अचानक एका दमात उद्‌गारली.

मला आता तिचा राग येऊ लागलेला. सारखं - सारखं काय कोड्यात बोलावं माणसानं... स्पष्टपणे बोलायला जीभ जडावलीयं का हिची..??

" माझा विशाल कसा आहे..?"

तिच्या ह्या प्रश्नावर माझ्या मेंदूत लख्ख प्रकाश पडला.

__आणि माझी छाती अनामिक ताणाने धास्तावली.

"तुम्ही... इथे...??" मी एवढ्या जोराने किंचाळले की, आजूबाजूची माणसं थांबून आम्हां दोघींकडे पाहू लागली.

" चला, ओळख पटली बाई एकदाची ..!" तिने समाधानाचा निश्वास सोडला.

खरं तर मी तिला तिथेच झटकून टाकायला हवं होतं, पण का कोण जाणे मला तसं नाही करता आलं. इतरांसारखं तोडून तोकडं नाही करता येतं मला.. जमतचं नाही मुळी मला तसं वागणं...!!

"रागावू नका सुजाता ताई, तुमच्याशी जरा बोलायचं होतं..!" ती आता काकुळतीला आली होती.

आता ह्या बाई वर मी का बरं रागवेन...??

राग, लोभ , माया, तिरस्कार करण्यासारखं ह्या बाईने काय बरं जोडून ठेवलं होतं माझ्याशी आणि माझ्या कुटुंबाशी ..??

स्वतःच्या हाताने सगळं संपवलं होतं हिने बऱ्याच वर्षापूर्वी..! मी तर आज पहिल्यांदाच पाहत होते तिला माझ्यासमोर. अवचित येणाऱ्या वावटळी सारखी ती समोर आली होती माझ्या...!

तिच्याबद्दल फक्त ऐकूनच होते मी... आणि जे काही ऐकलं होतं तिच्याबद्दल ; ते फारसं काही चांगलं नव्हतं. तिच्या विरोधातचं ऐकलं होतं सगळं..!!

"माझ्या विशालचं लग्न झालं ना..?? सूनबाई अगदी नक्षत्रासारखी लोभस आहे. लक्ष्मी- नारायणाचा जोडा शोभतो नाही का दोघांचा..?" मी तिला टाळत होते, हे जाणून सुद्धा ती मला चिकटू पाहत होती.

हिला कसं समजलं हे सगळं..?? म्हणजे ही बया आम्हां सगळ्यांच्या पाळतीवर आहे की काय..?? सारखं विशाल - विशाल काय लावलंय हिने..??

माझं डोकं भणभणू लागलं.

आत्ता हिला पुळका आलायं का आपल्या लेकाचा ...??

ही बाई तीन-चार वर्षाच्या आपल्या अजाण लेकराला, नवऱ्याला सोडून, संसाराचा डाव अर्ध्यावर मोडून घर सोडून निघून गेली. आपल्या नवऱ्याशी काडीमोड घेतला, तेव्हा नाही आठवलं हे सगळं हिला..??

ह्यांचं एवढं मोठं , अख्ख्या पंचक्रोशीत नावाजलेलं घराणं. आजे-पणजे पिढीजात गावचे प्रमुख.. पण हिने सगळी प्रतिष्ठा, इज्जत धुळीस मिळवली ह्यांच्या घराण्याची. समाजात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही हिने ...!!

__ आणि आज नाकाचा शेंडा उंच करून , माझ्यासमोर उभी राहून मला विचारते की; माझा विशाल कसा आहे..??

लाही- लाही झाली माझ्या जीवाची नुसती .. तिच्या ह्या प्रश्नाने..!!

"माझं इवलसं लेकरू, आता अगदी राजबिंडा तरुण दिसतोय ...!" ती काही माझी पाठ सोडेना.

" हं...!" मी चालता - चालता हुंकार भरला.

"कसा चाललायं माझ्या लेकाचा संसार?" ती उत्साहाने विचारू लागली.

ह्या तिच्या प्रश्नावर मात्र माझं डोकं फिरलं.

"काय सारखं सारखं माझं लेकरू, माझा विशाल... माझा विशाल लावलंय तुम्ही..?? आज एवढं प्रेम ऊतू चाललंय तर का टाकून गेलात, त्यावेळी त्या इवल्याश्या जीवाला..?"

माझ्या बोलण्याने ती प्रचंड दुखावली. तिच्या डोळ्यातून आपलं घळाघळा पाणी वाहू लागलं.

तिला तसं रडताना पाहून मला माझी लाज वाटली. मी असं खरं तर बोलायला नको होतं. तसं मी कधी कुणाला असं रागाने, फणकाऱ्याने उत्तर देत नाही कधी ; पण आज ह्या बाईच्या बोलण्याने माझं भान सुटलं.

" सुजाता ताई, खूप केलंत तुम्ही माझ्या लेकाचं. त्याला जन्म देऊन मी फक्त देवकी ठरले, पण माझ्या कृष्णाचं यशोदा होऊन तुम्ही पालन केलंत. मी सुद्धा देऊ शकले नसते एवढं प्रेम दिलं तुम्ही त्याला. तुमच्या पायावर लोटांगण घालण्याचीही लायकी नाही माझी... माझं सगळं आयुष्य तुमच्या पायावर वाहिले ना, तरी माझ्यावरचे उपकार फिटणार नाहीत तुमचे. सावत्रपणा काय असतो ते जाणवू दिलं नाही माझ्या लेकाला तुम्ही!" ती डोळे पुसू लागली.

"सावत्रपणा..?? काय म्हणायचं आहे तुम्हांला..? मी त्याला फक्त जन्म दिला नाही, म्हणून मी सावत्र ठरले का..?? तो मलाचं त्याची आई समजतो.. मलाचं आई म्हणतो.. आता खरंच तुम्ही माझ्यावर उपकार करा आणि कृपा करून जा तुम्ही इथून ..!" मी तिच्यासमोर हात जोडले.

मी झपाझप पाय उचलत तिथून निघाले.

उद्या विशाल दीक्षाला घेऊन घरी येणार होता. कित्ती आनंद झालेला मला ... !!

पण असं नेहमी का होतं ते समजतं नाही.

माणूस प्रमाणाबाहेर आनंदी झाला ना की, अनपेक्षितपणे एकदम त्याच्या पुढ्यात ताणाचा, दुःखाचा झटका येण्याचा संभव असतो. एका उत्कट, आनंदी अनुभवाचं क्षणार्धात मनाला टोचणी देणाऱ्या अनुभवात रुपांतर होऊ शकतं.

का..कोण जाणे, पण घडतं असं कधी - कधी आयुष्यात..!!

मी तिरीमिरीतचं घरी आले. डोकं भयंकर ठणकू लागलेलं. डोक्याला गच्च कापडाने बांधून मी अंमळ गादीवर पडून राहिले.

मला काही सुचतचं नव्हतं. मेंदूत विचारांच्या असंख्य ठिकऱ्या उडू लागलेल्या. माझा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोरून झरझर एखाद्या चित्रपटासारखा सरकू लागला.

भूतकाळातल्या आठवणींनी मला फार - फार मागे नेलं. पुसट होऊ पाहणारी भूतकालीन स्मृतीचित्रे अचानक गडद रंगाने उजळून निघू पाहू लागली.

कैलासवासी झालेले माझे उंचपुरे वडील माझ्या डोळ्यांसमोर दिसू लागले. सोसाट्याच्या वार्‍यात एखादं झाड उन्मळून पडावं, तसं एके दिवशी माझ्या वडिलांना अवचित मरणानं घेरलं.

आई, मी आणि धाकटा विजय एका झटक्यात पोरके झालो. वडिलांच्या पश्चात आमचं आयुष्य खूप कष्टप्रद गेलं. पुढे मी शिक्षण कसंबसं पूर्ण केलं आणि वाऱ्यावर पडलेल्या आईच्या संसाराला हातभार लागावा, म्हणून लहानशी नोकरी धरली. धाकट्या विजयला चांगला शिकवला.

पण एवढं सगळं करत असताना माझं वय वाढत चाललेलं.. हे माझ्या लक्षात आलंच नाही.

विजयचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत, त्याचं आयुष्य मार्गी लागेपर्यंत मी लग्न टाळलं. येणारी चांगली स्थळ नाकारली. पण ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना, मी वयाची तिशी कधी ओलांडली हे कळलंच नाही. पंचवीस - तीस वर्षापूर्वीचा काळ ही आजच्या सारखा पुढारलेला नव्हता.

त्या काळी तिशी ओलांडलेल्या मुलीला बिजवर, घटस्फोटित , थोराड मुलांचीचं स्थळ चालून येत होती. माझी गतही तशीच झाली. येणारी स्थळं ही त्याच गटातली होती.

लांबच्या नात्यातल्या एका मावशीने ह्यांचं स्थळ माझ्यासाठी सुचवलं. पण ह्यांचा पहिल्या पत्नीशी काडीमोड झालेला. पदरी एक चिमुकला...!!

ह्यांचं घराणं तसं प्रतिष्ठित होतं. नोकरी चांगली सरकारी होती. पहिलं लग्न तुटलेलं हा एवढा एक ठपका सोडला, तर स्थळात नाव ठेवण्यासारखं काहीही नव्हतं. माझी द्विधा मनस्थिती झाली.

"आता काय लंडनच्या राजकुमाराची वाट पाहत बसणार आहेस का लग्नासाठी..?? आयुष्यभर अठवर राहायचा विचार आहे का ..?? आपल्या वाढत्या वयाचा विचार कर... एकट्याने आयुष्य काढणं कठीण असतं पोरी..! भावाने वेगळा संसार मांडल्यावर, भाऊ- भावजयीच्या संसारात काडीची किंमत उरणार नाही तुला .. माझं ऐक, नाकारू नकोस हे स्थळ!"

तोंडाळ असलेल्या पण स्पष्टपणे वास्तव दर्शवणाऱ्या मावशीने रोखठोकपणे सल्ला दिला.

मी ह्यांच्या स्थळाला होकार दिला आणि ह्यांच्याशी लग्न करून ह्यांच्या संसाराची अधिष्ठात्री देवता बनले.

लग्नानंतर गावच्या मोठ्या बिऱ्हाडात ह्यांनी मला जास्त दिवस राहू दिलं नाही. लग्नानंतर एक महिन्यातच लहानग्या विशालला घेऊन आम्ही ह्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आलो. तिथेच आमचं चांगलं बस्तान बसलं.

आईच्या मायेला पारख्या झालेल्या विशालला, मी माझ्या मायेच्या पदरात घेतलं. त्याला सावत्रपणा काय असतो हे कधीच जाणवू दिलं नाही.

तो मला त्याची सख्खी आईच समजू लागला. मला आई म्हणू लागला. त्याला त्याच्या सख्ख्या आईचा चेहराही आठवत नव्हता.

दोन वर्षांनी नेहाचा जन्म झाला. दोघं बहिण-भाऊ प्रेमाने वाढू लागली.. मोठी होऊ लागली. मी कधीही नकळतपणेही दोन्ही मुलांत दुजाभाव केला नाही. मला ते कधी जमलंच नाही. कधी रागाने एखादी चापट नेहाला मारली असेल, पण चुकूनही विशालला हात लावला नाही. निष्पाप मनाच्या विशालला जर चुकून कधी आपला भूतकाळ समजला, तर माझ्यापासून तो दुरावेल ; ही भीती कायम माझ्या मनात ठाण मांडून राहत असे.

पण म्हणतात ना, ह्या दुनियेत विघ्नसंतोषी माणसांची काहीही कमी नाही.

एका सुट्टीत हे विशालला घेऊन गावी गेले होते. त्यावेळी मी त्यांच्यासोबत गावी जाऊ शकले नव्हते. तेव्हा विशाल साधारण आठ- नऊ वर्षाचा असेल.

सुट्टी संपली आणि विशाल घरी आला तोच मुळी अंगात ताप घेऊन. माझ्या जीवाची घाबरगुंडी उडाली नुसती..!!.

रात्र - रात्र त्याच्या उशाशी बसून राहिले मी. पोराच्या डोक्यावर चढलेला ताप उतरायचं काही नावचं घेईना. डोक्यावर चढलेल्या तापात तो असंबद्ध बडबड करू लागला. हे सुद्धा खूप घाबरले. दुसऱ्या दिवशी तातडीने दवाखान्यात दाखल केलं त्याला. महालक्ष्मीची कृपा झाली आणि आमच्या जीवाला घोर लावणाऱ्या त्या आजारपणातून आमचं लेकरू बरं झालं.

महालक्ष्मी नवसाला पावली आमच्या..!!

पण त्यानंतर माझं लेकरू खूपच शांत झालं. उत्साहाने दिवसभर माझा पदर धरत माझ्या मागे 'आई -आई ' करत, माझ्या भोवताली पंख फडफडवणारं , चिवचिवाट करणारं माझं पाखरू माझ्याशी तुटकपणे बोलू लागलं. चिडचिड करू लागलं.

मला काही उमजेना. माझा भ्रम असा झाला की , आजारपणामुळे अशक्तपणा आल्याने त्याच्या वागण्यात हा असा बदल घडला असावा; पण नाही.. ते कारण नव्हतंच मुळी.. त्याच्या अश्या वागण्यामागे..!!

एके दिवशी कशावरून तरी हे त्याच्यावर खूप चिडले. काहीच न बोलता विशाल आपल्या खोलीत बिछान्यावर गुपचूप पडून राहिला.

हे मुलांवर रागवले ना की, मला पण खूप भीती वाटते ह्यांच्या रागाची... मुलांच्या आणि ह्याच्यांमध्ये मी कधीच चुकूनही पडत नाही. तूच मुलांना पाठीशी घालते, म्हणून विनाकारण ह्यांचा सगळा रोष माझ्यावर निघतो मग..!!

मी जरा अंमळ उशिरानेच विशालला जेवायला बोलवायला त्याच्या खोलीत गेले. त्याच्या उशाशी बसले. त्याच्या डोक्याखाली असलेली उशी मला जरा गरम, ओलसर जाणवली.

त्याच्या निरागस अश्रूंनी उशी चिंब भिजलेली..!

"काय झालं बाळा..??" मी त्याच्या केसांवरून मायेने हात फिरवला.

तत्क्षणी त्याने माझा हात तिरस्काराने झिडकारून टाकला.

मला अत्यंत वाईट वाटलं. मी पुन्हा एकदा हिंमत करून त्याला उठवू लागले, तसा तो बिथरला.

" तू माझी सख्खी आई नाहीयेसं. जा तू इथून...तुम्ही सगळे खोटारडे आहेत. मला नाही बोलायचं तुमच्याशी..!" त्याचा संतापाने बेभान झालेला आवाज ऐकून हे आत आले. हे सुद्धा त्याचं बोलणं ऐकून स्तंभित झाले.

माझे डोळे पाण्याने भरले.

"नाही रे राजा... मी तुझी सख्खी आईच आहे.. कुणी सांगितलं तुला की, मी तुझी सख्खी आई नाही म्हणून ??" मी बाहेर येऊ पाहणारा हुंदका आतल्या आत गिळू पाहत होते. भरून आलेल्या गळ्याने मी त्याची समजूत घालू लागले.

"गावी सगळे हेच म्हणतात की, तू माझी सख्खी आई नाहीये. माझी सख्खी आई मला टाकून गेली माझ्या लहानपणी..!" तो ओक्साबोक्शी रडू लागला.

अच्छा...! आत्ता माझ्या लक्षात सगळा प्रकार आला. तर हा असला नतद्रष्टपणा करण्याचा पराक्रम सग्या - सोयऱ्यांकडूनच झाला होता तर ...!

किती हा वाच्छाळपणा..?? अजाण पोराच्या मनात कुणी तरी माझ्याबद्दल वाईट भरवून देण्याचं पातक केलं होतं ..!!

हे तर, झाल्या प्रकाराने भयंकर संतापले. म्हणाले, उद्या असाचं जातो गावी आणि चांगली खरडपट्टी काढतो एकेकाची. मग मी ह्यांना समजावले की, जाऊ द्या.. कधी नाही तर कधी त्याला आपण खरी परिस्थिती सांगायला हवीच.

आम्ही त्याला हे सगळं विश्वासात घेऊन सांगणार होतोच, पण योग्य वेळेआधीच अभद्रपणे त्याच्या डोक्यात कुणी तरी चुकीच्या मार्गाने भरवून देण्याचं पाप केलं होतं.

दोन दिवस घरातलं वातावरण गंभीर झालेलं. मी माझ्या परीने कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत होते, पण यश काही हाती येत नव्हतं. घरातली गढूळलेली परिस्थिती काही निवळत नव्हती.

मग ह्यांनी विशालला व्यवस्थित सगळं समजाविलं. तसे हे खूप समजूतदार आहेत. गंभीर परिस्थिती कशी हाताळायची, हे त्यांना बरोबर समजतं.

विशालही यातून हळूहळू सावरला. उपजतचं गुणी आणि समजूतदार मुलगा आहे तो ..!

काळ जसा-जसा पुढे सरकत गेला, तसं मी त्याच्या हळव्या भावना, त्याचं मन जपत गेले आणि जस-जसा तो मोठा होत गेला; त्याने ही माझ्या भावना, माझं मन जपायचा पुरेपूर प्रयत्न केला.

त्याला माझ्या पोटी जन्म देणारी मी जरी देवकी नसले, तरीही पोटच्या पोरासारखी त्याला माया करणारी यशोदा माता मी बनले. काळानुरूप आमचं माय-लेकाचं नातं अधिकच बहरत गेलं. आमच्या नात्याची वीण घट्ट होत गेली. तिला चुकूनही कधी पीळ पडला नव्हता.

__ आणि आज अचानक ही बाई भुतासारखी माझ्यासमोर अवतरून , शहाजोगपणे माझ्या विशालवर हक्क दाखवू पाहू लागलीये. ..!

'माझा विशाल, माझं लेकरू' असं म्हणत, माझ्या ऊरात साठलेल्या विशाल प्रती असणाऱ्या माझ्या आभाळमायेला आव्हान देऊ पाहतेयं. माझ्या विशालला माझ्यापासून हिरावू पाहतेयं.

नाही .. नाही..!!. मी नाही घडू देणार हे असं काही विपरीत...!!

तुम्हीच सांगा आता, कसं सहन होईल मला हे सगळं..??

पूर्वार्ध.....

धन्यवाद...!

©रूपाली विशे - पाटील
rupalivishepatil@gmail.com

___________________XXX____________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद रानभुली...
नक्की कथा वाच आणि मला नक्की प्रतिसाद दे...

मातृत्वाचं नातं नसलं म्हणून काय झालं! ही मायेने शाल पांघरणारी आभाळमाया आहे मातेच्या हृदयात!
खूप मर्मस्पर्शी आहे कथेची संकल्पना! फार वास्तववादी चित्रण आहे!
पुलेशु