चालते जिथे तिथे चंद्र गाठतो मला

Submitted by सुप्रिया जाधव. on 1 June, 2021 - 10:22

रात्र रात्र हिंडतो, गुंड वाटतो मला
चालते जिथे तिथे चंद्र गाठतो मला

सागरास भेटण्या धावते नदीच का?
उत्तरे मिळूनही प्रश्न जाळतो मला

कोणती लिपी अशी शोधलीस नेमकी?
वाचल्याशिवायही पूर्ण जाणतो मला

रोज हात जोडते, वाट बघत थांबते
रोज हात हालवित काळ टाळतो मला

तू मला नि मी तुला दुरुन ओळखायचो
चाल बदलली तुझी वेळ लागतो मला

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान