आपल्यात साखरपुडा का करतात?

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 May, 2021 - 20:12

साखरपुडा ज्याला ईंग्रजीत Engagement असे म्हणतात. ज्या नावातच अर्थ स्पष्ट आहे की हा सोहळा पार पडल्यावर मुलगा आणि मुलगी एकमेकांसोबत Engage झाले. दोघे एकमेकांसाठी बूक झाले. आणि म्हणूनच त्या डीडीएलजे'मध्ये राजवर प्रेम करणारी सिम्रन आपला साखरपुडा पारंपारीक नियमानुसार होऊ नये म्हणून मुद्दाम ज्या हातात अंगठी घालायची असते तेच बोट दुखवून घेते आणि अंगठी चुकीच्या बोटात कशी घातली जाईल हे बघते. जणू काही अंगठी योग्य बोटात जात परपुरुषाशी एंगेजमेंट झाली असती तर हिरोईन पवित्र राहिली नसती वा हिरोने तिच्या प्रेमात असणे पापच ठरले असते Happy

असो, तसे तर लग्नानंतरही कायदेशीर पद्धतीने घटस्फोट घेऊन दुसरा विवाह करणे किंवा बेकायदेशीर पद्धतीने जुन्या प्रेयसी प्रियकराबरोबर पसार होणे हे समाजात घडतेच. मग या एंगेजमेंटमागचा नेमका हेतू काय असतो?

आज हा प्रश्न पडायचे कारण म्हणजे परवाच आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला. म्हणजे हॅपी (असं म्हणायची पद्धत असते) वेडिंग अ‍ॅनिवर्सरी. बघता बघता तब्बल अकरा वर्षे झाली. काळ खरेच किती वेगवान असतो. म्हणजे माझे गर्लफ्रेंडसोबतचे फिरणे, मग लग्न, मग संसार, पोरंबाळं.. अगदी काल परवाच सारे घडल्यासारखे वाटते.
असो, बालविवाहाचे फायदे तोटे या सदराखाली हे पुन्हा कधीतरी..
तर आमच्यापेक्षा जास्त आमची मुलगीच एक्सायटेड होती. तिचे हे सर्व मैत्रीणींना सांगून झाले. त्यात तिला समजले की तिच्या एका मैत्रीणीच्या आईवडीलांची एंगेजमेंट अ‍ॅनिवर्सरीही त्याच दिवशी आहे. मग पर्यायाने आम्हाला अँगेजमेंट म्हणजे काय हे विचारणे आले. ते काय असते हे सांगितल्यावर तुमची नाही का झाली हा पुढचा प्रश्न आला. तेवढाच तिला अजून एक दिवस सेलिब्रेशनला मिळाला असता, आमच्या एंगेजमेंटच्या अ‍ॅनिवर्सरीलाही एक केक आणखी कापला गेला असता, हा तिचा यामागचा हेतू..

पण हाय रे तिचे दुर्दैव.. आमचा साखरपुडा त्याच दिवशी झाला होता. म्हणजे सकाळी साखरपुडा, दुपारी पुण्यवचन, संध्याकाळी शुभविवाह आणि रात्री स्वागतसमारंभ असे एकाच दिवसभरात सारे उरकून टाकले होते...

झालं, आता ईथे पुन्हा कन्फ्यूजन ..

जर एंगेजमेंट म्हणजे नवरा बायकोने एकमेकांना एंगेज करणे, अ‍ॅडवान्स बूकिंग करणे, आपला क्लेम लावणे याचसाठीच असेल तर आमची एंगेजमेंट वा साखरपुडा मुद्दाम म्हणून सकाळी का केला गेला.. असे कोण होते आमच्यात जे भर दुपारी उन्हात लग्न सोडून पळून जाणार होते, जे या एंगेजमेंटची गरज भासली Happy

आता यातही आणखी एक गंमत म्हणजे त्या सकाळच्या साखरपुड्याच्याही नऊ महिने आधी आम्ही गपचूप रजिस्टर मॅरेज केले होते, मात्र साथिया चित्रपटाप्रमाणे आपापल्या घरी राहात होतो. पण नंतर पारंपारीक पद्धतीने केलेल्या या विवाहाआधी हे उघड झाले होते म्हणा. त्यामुळे रजिस्टर का असेना, लग्न झालेल्या दोन जीवांचा पुन्हा साखरपुडा करण्यात काही लॉजिकच नव्हते. ते सुद्धा त्याच सकाळी..

याचाच अर्थ हि साखरपुड्याची प्रथा वा परंपरा फक्त बूकिंगसाठी नसून यामागे काही धार्मिक शास्त्रही असावे. ते जाणून घ्यायला हा धागा.

यानिमित्ताने देशोदेशीच्या गावोगावच्या साखरपुड्याच्या पद्धतींबद्दल माहिती मिळाली तर ऊत्तमच.

आमच्यात एकमेकांना रिंग घालण्याव्यतिरीक्त नेमके काय केले होते हे आता फारसे आठवत नाही. कारण दिवसभरात साखरपुडा, पुण्यवचन, शुभविवाह, स्वागत सोहळा असे चार समारंभ आणि चार वेळा चार कपडे घालून तयार होणे यातच माझा सारा दिवस संपला. ती अंगठी सुद्धा मी त्या दिवसानंतर जी बोटातून काढली ती मला दागदागिन्यांची बिलकुल हौस नसल्याने आयुष्यात पुन्हा कधी घातली नाही. कधी पुन्हा पाहिलीही नाही.
पण ज्यांना हौस आहे त्यांनी मतदान केल्यावर बोट दाखवणारा सेल्फी शेअर करतात तसे त्या अंगठीचा बोट दाखवणारा सेल्फी ईथे शेअर केला तरी चालेल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
पूर्वी मुलगी लहान वयाची अगदी ६-७ वर्षाची असे तेव्हा साखरपुडा करत. मग १२-१३ व्या वर्षी यथावकाश लग्न होत असे. ह्या मुलीची सोयरिक जमलेली आहे हे समाजाला कळण्यासाठी साखरपुडा करत म्हणजे नंतर कुठल्या बाजूच्या पालकांनी नकार देता कामा नये.

माझी पहिल्या प्रतिसादाची हॅट्ट्रीक झालेली आहे !!! (आता त्यात काय मोठंसं... हापिसाचे कंटाळवाणं काम करत असताना असे अजून कंटाळवाणे प्रतिसाद देण्यात फार गंमत असते)

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
साखरपुडा करण्याचं कारण काहीही असो तेव्हापासून लग्नापर्यंतचा काळ काही आवडले /पटले नाही, असुरक्षित वाटले तर लग्न मोडायला वापरावा , आता कसं सापु तर झाला वगैरे मनात आणू नये..!! काही मुलींना नंतर कळतात बऱ्याच गोष्टी तरीही सापु झाला आता कसं बरं दिसेल असं वाटतं. (मैत्रीणींचा अनुभव) परंपरा, धर्म, शास्त्र, लोक/नातेवाईक काय म्हणतील यागोष्टींच्या दबावापेक्षा आपलं आयुष्य किती तरी महत्त्वाचे असते!!
-------
सी , आठवड्याला एक हॅट्ट्रीक करू शकतेस की, सर्वात जास्त संख्येने धागा काढण्याचे ऋचे रेकॉर्ड गिनीज बुक मधे जेव्हां नोंदवले जाईल तेव्हा तुझेही सातत्याने दिलेल्या पहिल्या प्रतिसादाचे उत्तेजनार्थ रेकॉर्ड आपोआपच होईल. Lol

Lol एक हमें आपकी लड़ाई मार गई
दूसरी ऋ धागों की जुदाई मार गई
तीसरी लॉकडाऊन की तन्हाई मार गई
चौथी ये रस्तों की ख़ुदाई मार गई
बाक़ी कुछ बचा, तो सीताई प्रतिसाद मार गई

माझी एक मैत्रीण म्हणायची, साखरपुडा ते लग्न हा काळ म्हणजे 'विथ लायसन्स' एकमेकांबरोबर फिरण्याचा काळ! मजा करण्याचा काळ.
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हा दोघांनाही शुभेच्छा!

त्यामुळे रजिस्टर का असेना, लग्न झालेल्या दोन जीवांचा पुन्हा साखरपुडा करण्यात काही लॉजिकच नव्हते. ते सुद्धा त्याच सकाळी..

>>

बहुतेक सर्वांना माहीत असलेली गोष्ट सांगते.
खूप वर्षांपूर्वी जेंव्हा ऋषीमुनी होते, यज्ञ होते, शिष्य गुरुगृही राहत त्यावेळची गोष्ट आहे.

एकदा एक ऋषी यज्ञ करत होते, आपल्या शिष्यांना त्याचवेळी यज्ञ कसा करायचा, साहित्य काय , पद्धत कुठली वगैरे शिकवत होते. त्यावेळी एक मांजर कुठूनतरी आले आणि तिथल्या पदार्थांवर उडी मारून, खाऊन, सांडून नासधूस करायला लागले. गुरूंनी शिष्यांना त्या मांजराल बाजूला करायला सांगितले. कितीही लांब सोडले तरी ते मांजर पुन्हा पुन्हा परत येतच होते. शेवटी वैतागून गुरूंनी त्या मांजराला एका पोत्यासारख्या पिशवीत घालून त्याचं तोंड बांधून बाजूच्या झाडावर तो पिशवी दोरीने बांधून ठेवायला सांगितले.
हुशार शिष्यांना काय "आणि का" घडले हे कळले, जे कॉपी टू कॉपी , माशी टू माशी होते, त्यांनी स्वतःचे अर्थ लावून घेतले.
मग त्यांनतर जेंव्हा स्वतंत्र यज्ञ केले तेंव्हा एक मांजर आणून, पोते आणून ते झाडाला बांधण्याची पद्धत सुरू झाली. मांजराचे वय , रंग, पोत्याचा रंग, कुठल्या झाडावर बांधायचे, किती उंचीवर ठेवायचे वगैरे मध्ये मतभेद होऊ लागले.

बऱ्याचशा प्रथा अशाच सुरू झाल्या.

धागा भरकटू नये ही कळकळ एव्हढ्यात जाणवली आहे. तरी हा धागा नेमका कशावर आहे हे लोकांना नीट समजावे व धागा न भरकटता नेमका विषयावर प्रतिसाद यावा यासाठी विषय नेमका काय आहे हे स्पष्ट करावे. जर विषय शीर्षकाचा असेल तर भरकटवणारी वाक्ये लेखातून काढून टाकावीत. लेखकानेच धागा भरकटवला नाही कि प्रतिसादात तो भरकटत नाही. तरी तो न भरकटण्यासाठी अनावश्यक वाक्ये काढावीत असा प्रस्ताव ठेवत आहे. कृपया बोल्ड केलेली वाक्ये डिलीट करावीत. किंवा तीच ठेवावीत.
--------------------------------------------------------------------------------------------------
आपल्यात साखरपुडा का करतात?
(माहिती हवी आहे - देणे नाही)

साखरपुडा ज्याला ईंग्रजीत Engagement असे म्हणतात. ज्या नावातच अर्थ स्पष्ट आहे की हा सोहळा पार पडल्यावर मुलगा आणि मुलगी एकमेकांसोबत Engage झाले. दोघे एकमेकांसाठी बूक झाले. आणि म्हणूनच त्या डीडीएलजे'मध्ये राजवर प्रेम करणारी सिम्रन आपला साखरपुडा पारंपारीक नियमानुसार होऊ नये म्हणून मुद्दाम ज्या हातात अंगठी घालायची असते तेच बोट दुखवून घेते आणि अंगठी चुकीच्या बोटात कशी घातली जाईल हे बघते. जणू काही अंगठी योग्य बोटात जात परपुरुषाशी एंगेजमेंट झाली असती तर हिरोईन पवित्र राहिली नसती वा हिरोने तिच्या प्रेमात असणे पापच ठरले असते Happy

असो, तसे तर लग्नानंतरही कायदेशीर पद्धतीने घटस्फोट घेऊन दुसरा विवाह करणे किंवा बेकायदेशीर पद्धतीने जुन्या प्रेयसी प्रियकराबरोबर पसार होणे हे समाजात घडतेच. मग या एंगेजमेंटमागचा नेमका हेतू काय असतो?

आज हा प्रश्न पडायचे कारण म्हणजे परवाच आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला. म्हणजे हॅपी (असं म्हणायची पद्धत असते) वेडिंग अ‍ॅनिवर्सरी. बघता बघता तब्बल अकरा वर्षे झाली. काळ खरेच किती वेगवान असतो. म्हणजे माझे गर्लफ्रेंडसोबतचे फिरणे, मग लग्न, मग संसार, पोरंबाळं.. अगदी काल परवाच सारे घडल्यासारखे वाटते.
असो, बालविवाहाचे फायदे तोटे या सदराखाली हे पुन्हा कधीतरी..
तर आमच्यापेक्षा जास्त आमची मुलगीच एक्सायटेड होती. तिचे हे सर्व मैत्रीणींना सांगून झाले. त्यात तिला समजले की तिच्या एका मैत्रीणीच्या आईवडीलांची एंगेजमेंट अ‍ॅनिवर्सरीही त्याच दिवशी आहे. मग पर्यायाने आम्हाला अँगेजमेंट म्हणजे काय हे विचारणे आले. ते काय असते हे सांगितल्यावर तुमची नाही का झाली हा पुढचा प्रश्न आला. तेवढाच तिला अजून एक दिवस सेलिब्रेशनला मिळाला असता, आमच्या एंगेजमेंटच्या अ‍ॅनिवर्सरीलाही एक केक आणखी कापला गेला असता, हा तिचा यामागचा हेतू..

पण हाय रे तिचे दुर्दैव.. आमचा साखरपुडा त्याच दिवशी झाला होता. म्हणजे सकाळी साखरपुडा, दुपारी पुण्यवचन, संध्याकाळी शुभविवाह आणि रात्री स्वागतसमारंभ असे एकाच दिवसभरात सारे उरकून टाकले होते...

झालं, आता ईथे पुन्हा कन्फ्यूजन ..

जर एंगेजमेंट म्हणजे नवरा बायकोने एकमेकांना एंगेज करणे, अ‍ॅडवान्स बूकिंग करणे, आपला क्लेम लावणे याचसाठीच असेल तर आमची एंगेजमेंट वा साखरपुडा मुद्दाम म्हणून सकाळी का केला गेला.. असे कोण होते आमच्यात जे भर दुपारी उन्हात लग्न सोडून पळून जाणार होते, जे या एंगेजमेंटची गरज भासली Happy

आता यातही आणखी एक गंमत म्हणजे त्या सकाळच्या साखरपुड्याच्याही नऊ महिने आधी आम्ही गपचूप रजिस्टर मॅरेज केले होते, मात्र साथिया चित्रपटाप्रमाणे आपापल्या घरी राहात होतो. पण नंतर पारंपारीक पद्धतीने केलेल्या या विवाहाआधी हे उघड झाले होते म्हणा. त्यामुळे रजिस्टर का असेना, लग्न झालेल्या दोन जीवांचा पुन्हा साखरपुडा करण्यात काही लॉजिकच नव्हते. ते सुद्धा त्याच सकाळी..

याचाच अर्थ हि साखरपुड्याची प्रथा वा परंपरा फक्त बूकिंगसाठी नसून यामागे काही धार्मिक शास्त्रही असावे. ते जाणून घ्यायला हा धागा.

यानिमित्ताने देशोदेशीच्या गावोगावच्या साखरपुड्याच्या पद्धतींबद्दल माहिती मिळाली तर ऊत्तमच.

आमच्यात एकमेकांना रिंग घालण्याव्यतिरीक्त नेमके काय केले होते हे आता फारसे आठवत नाही. कारण दिवसभरात साखरपुडा, पुण्यवचन, शुभविवाह, स्वागत सोहळा असे चार समारंभ आणि चार वेळा चार कपडे घालून तयार होणे यातच माझा सारा दिवस संपला. ती अंगठी सुद्धा मी त्या दिवसानंतर जी बोटातून काढली ती मला दागदागिन्यांची बिलकुल हौस नसल्याने आयुष्यात पुन्हा कधी घातली नाही. कधी पुन्हा पाहिलीही नाही.
पण ज्यांना हौस आहे त्यांनी मतदान केल्यावर बोट दाखवणारा सेल्फी शेअर करतात तसे त्या अंगठीचा बोट दाखवणारा सेल्फी ईथे शेअर केला तरी चालेल

आज एक गोष्ट माझ्या लक्षात आली, मी पण लग्नाच्या दिवशी अंगठी घालून त्याच दिवशी काढली, ती आजपर्यंत परत घातली नाही.(आता बारा वर्षे झाली. मला पण दागिन्यांची अजिबात आवड नाही.) सणसमारंभात या दागिन्यांमुळेच अवघडल्यासारखे होते. मोकळेपणाने वावरता येत नाही. लहान मुले अंगाखांद्यावर खेळत असताना तर ते सगळे दागिने एकदाचे काढल्यावरच मोकळा श्वास घेता यायचा.

आमच्या कडे असं मानतात की शुभ कार्याची सुरुवात तोंड गोड करुन झाली पाहिजे ना म्हणून साखर वाटुन सुरुवात करत असतील कदाचित,

किंवा तसंही हळद लागली तर कोणाच्या नावाची हळद लागली हे समजलं पाहिजे ना म्हणून करत असतील कदाचित,

आमच्या कडे माञ पैसा खुप आहे आणि तो खर्च कसा करावा हा प्रश्न येतो कदाचित म्हणूनच करत असतील.

अशी वेगवेगळी कारणे आहेत जे आवडलं ते घ्या.

मला असे वाटायचे कि- काही कारणाने त्या वेळी लग्न करणे जमत नसेल (जसे कि आर्थिक अडचण, कुटुंबात इतक्यात झालेला मृत्यू, मुलगा-मुलगी शिकत आहे, इ.) तर यांचे लग्न ठरले आहे व नंतर लग्न करावयाचे आहे हे ठसवण्यासाठी एक तात्पुरता कार्यक्रम म्हणून साखरपुडा करत असावेत. आणि नंतर ती प्रथा पडली असावी.
रच्याकने, ग्रामीण भागात लग्न ठरवताना- ठरवल्यावर "याद्या करणे" नावाची एक प्रथा आहे असे ऐकून आहे. ते सुद्धा साखरपुड्यासारखेच असते का?

अनेक लोक एरव्ही नसत्या प्रथांची टिका करत असले तरी स्वतःची वेळा आली की घाबरतात आणि मग शास्त्र म्हणुन विधी उरकून घेतात. तुमचा लग्नाच्या दिवशीचा साखरपुडा हा असाच प्रकार वाटतो.

बाकी एरव्ही लग्न ठरले की साखरपुडा करणे मग लग्न यात फार विचार करण्या सारखे काही नाही, कारण अगदी उघड आहे.

सीमंतिनी, अस्मिता, वावे .. शुभेच्छांबद्दल धन्यवाद
खरे तर लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायची प्रथा कशी पडली हे सुद्धा शोधायला हवे. म्हणजे लग्नाच्या शुभेच्छा देणे एकवेळ समजू शकतो. कारण अजून त्या दोघांनी लग्नाचा अनुभव घेतला नसतो. पण ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांना शुभेच्छा देणे म्हणजे... Happy

असो, धागा साखरपुड्यावरच राहिलेला ऊत्तम Happy

मग १२-१३ व्या वर्षी यथावकाश लग्न होत असे
>>>

वाह, १२-१३ यथावकाश होते. तेव्हाही जर सारेच या वर्षी करतात म्हणून आपणही आपल्या मुलांचे लग्न याच वयात करायचे असाच विचार सारे करत राहिले असते तर आजही हेच चालू असते. समाजात समाजाला न जुमाणनारी माणसे असणे फार गरजेचे आहे ते याचसाठी Happy

काही मुलींना नंतर कळतात बऱ्याच गोष्टी तरीही सापु झाला आता कसं बरं दिसेल असं वाटतं.
>>>>

अगदी खरेय.
आमच्या जुन्या बिल्डींगमधील शेजारची एक फॅमिली होती. त्यांच्या मुलीचे लग्न ठरलेले. साखरपुडा झाला. मग मुलीला कळले की त्या मुलाचे एक प्रेमप्रकरण चालू आहे. आणि साखरपुड्यानंतरही भेटणे बोलणे रोज कॉल करणे चालू आहे. पण त्या दोघांच्या घरचे त्यांच्या लग्नाला तयार नाहीत म्हणून आता हा हिच्याशी लग्नाला तयार झालाय.
आता हिने हे समजताच घरी सांगितले. लग्नाला अजून दोन अडीच महिने बाकी होते. हिच्या घरचे त्याच्या घरच्यांशी बोलून आले. पण आता हॉल वगैरे बूक करून थाटामाटात साखरपुडा झालाय तर मोडू नये असे दोन्ही कुटुंबाने ठरवले. आम्ही आमच्या मुलाला समजावतो, पुन्हा तो आपल्या प्रेयसीचे नावही काढणार नाही याचे आश्वासन दिले. लग्नाची तयारी पुन्हा उत्साहात सुरू झाली.

अजून दोन महिने गेले. लग्न आठवड्यावर आले. आणि मुलगा आपल्या प्रेयसीसोबत पळून गेला. लग्नही केले. विषय संपला. पण लग्नाची सारी खरेदी आणि पत्रिकाही वाटून झाल्याने आता जास्तच बदनामी करून संपला.

काय मिळाले साखरपुडा जपण्याच्या नादात. उलट याने सोयरीक टिकवण्याचा दबाव येत असेल तर साखरपुडा होऊच नये. घरातल्या घरात गवगवा न करता चहापोहे खात एकमेकांच्या चहात चमचाचमचा भर साखर टाकून हि प्रथा पार पाडली असती तर असा साखरपुडा मुलीच्या घरच्यांना सहज मोडता आला असता. कारण मुलीचे लग्न ठरलेय हे गावभर झाले नसते.

@ वावे,
माझी एक मैत्रीण म्हणायची, साखरपुडा ते लग्न हा काळ म्हणजे 'विथ लायसन्स' एकमेकांबरोबर फिरण्याचा काळ! मजा करण्याचा काळ.
>>>>

हो, हे मात्र खरेय. आमच्या केसमध्ये रजिस्टर लग्न ते पारंपारीक लग्न या काळात आम्ही हे मिक्स पद्धतीने अनुभवलेय. म्हणजे आमच्या रजिस्टर मॅरेजबद्दल आमच्या घरात काही जणांना माहीत होते तर तिच्या घरात काही जणांना माहीत होते. त्यामुळे त्यांच्यातर्फे लायसन होते. पण तरी जगजाहीर नसल्याने काळजी घेणेही चालू होते.. पण तरीही पकडले गेलो असतो आणि जगाला कळले तरी मुळात लग्नच झाले असल्याने पकडले जाण्याची तितकी भितीही नव्हती.

या काळात जे फिरलो, अगदी चार दिवस गोव्यालाही जाऊन आलो त्याची सर नंतर एकत्र राहायला सुरुवात केल्यानंतरचे जे फिरणे झाले त्याला येऊच शकत नाही Happy

@ पिनी
बऱ्याचशा प्रथा अशाच सुरू झाल्या.
>>
हि प्रथा अगदीच अंध आहे अश्यातला भाग नाही. काही बाबतीत लॉजिक आहे. तसेच सर्व धर्म देश प्रांतात विविध रुपात आढळते ना..?

@ वेलांटी
तर ते सगळे दागिने एकदाचे काढल्यावरच मोकळा श्वास घेता यायचा.
>>>
अगदी...
अंगठी चैन तर दूरच मला तर अंगावर साधा धागा दोराही आवडत नाही. मोबाईलचा शोध लागल्यावर मी घड्याळही वापरणे सोडले. मध्ये मेहुण्यांनी महागडे ब्रांडेड घड्याळ भेट दिलेले ते काही काळ घालायचो. अन्यथा आता वेळ बघायलाही मोबाईलच वापरतो. एक बहिणीची राखी मात्र वर्षभर वा तुटेपर्यंत हातात राहते. मुद्दाम काढावी तोडावीशी वाटत नाही. एकुलता एक असल्याने बहुधा थोडा भावनिक असेन या बाबतीत.

@ प्रविण,
आमच्या कडे माञ पैसा खुप आहे आणि तो खर्च कसा करावा हा प्रश्न येतो कदाचित म्हणूनच करत असतील.
>>>>

येस्स.. किंवा मग नुसती आवड. हौस. वगैरे... एक सोहळा थाटामाटात करायची..
जसे ते आता प्री वेडींग फोटोशूट करतात आणि जे बघता बघता फार कॉमन झालेय..

@ व्यत्यय
बाय द वे ऋन्मेषचे पप्पा, तुमच्या मिसेस बंगाली आहेत का?
>>>

नाही
बंगाली तर दूर
कोकणातल्याही नाहीत.

@ मानव
अनेक लोक एरव्ही नसत्या प्रथांची टिका करत असले तरी स्वतःची वेळा आली की घाबरतात आणि मग शास्त्र म्हणुन विधी उरकून घेतात.
>>>

हो ना, आमच्या पत्रिकेत मृत्युयोग दिसला म्हणून माझे लग्न एका झाडाशी लावले होते. मग ते झाड विसर्जित केले. मृत्युयोग टळला असे डिक्लेअर केले Happy

जेवढे समारंभ जास्ती तेवढे होतकरू मुला मुलींना लग्नाचे प्रपोजल येण्याचे मिरवण्याचे चान्सेस जास्ती. कारण वधूवरसूचकमंडळे कमी होती.

---------------
स्थळातून माझे ( होकार) ठरले. मग एक दिवशी तिच्याशी बोलण्या निमित्ताने हॉटेलात चा पिताना पाच तोळे सोने दिले. माझ्या दृष्टीने झाला साखरपुडा.

मग ते झाड विसर्जित केले. मृत्युयोग टळला असे डिक्लेअर केले >> Sad झाडाचा मृत्यूयोग होता म्हणायचे!!
(अर्थात, तुमचा मृत्यूयोग टळला ते बरे झाले. )

आपल्याकडे का करतात ते माहीत नाही पण लग्न ठरलं , हे दोघे आता बुक झाले त्यामुळे इतर कोणी सोयरीक घेऊन येऊ नये हे सांगायला साखरपुडा असणार.

माझं लग्न ठरलं तेंव्हा माझा नवरा अमेरिकेत होता आणि मी भारतात. तो लग्नाच्या 4 दिवस आधी भारतात येणार होता त्यामुळे तेंव्हा आम्ही साखरपुडा वगैरे करणार नव्हतो. डायरेक्ट लग्नच होणार होतं.

नंतर मी अमेरिकेत आले आणि मग आम्ही दोघं मिळून लग्नाच्या 4 दिवस आधी भारतात जायचं असं ठरवलं होतं पण तेंव्हाही सापु लिस्ट मध्ये नव्हताच . मग नवऱ्याचा visa issue आल्यामुळे लग्न पुढे ढकललं गेलं. पत्रिका वाटल्या होत्या, कार्यालय बुक झालेलं होतं पण तरीही लग्न पुढे ढकललं गेलं आणि पुढे म्हणजे कधी ती तारीख fix नव्हती म्हणून मग आम्ही सापू करायचं ठरवलं त्याचं साधं कारण हे की लग्न पुढे ढकललं म्हणून अनेक लोकांना वाटलं आमचं लग्न मोडलं आणि मग सगळीकडे कुजबुज सुरू झाली. काही नातेवाईकांनी नवीन स्थळ पण आणायला सुरुवात केली तेंव्हा आमची मुलगी आणि मुलगा बुक झालेले आहेत हे सांगण्यासाठी दोन्ही पालकांनी आम्हाला अमेरिकेत सापु उरकून घ्या म्हणून सांगितलं. आम्ही त्या दिवशी गणपतीची पूजा केली, अंगठ्या घातल्या, शंपेन उडवली, जवळच्या मित्रांना जेवायला घेऊन गेलो आणि सापू झाला म्हणून declare केलं.

पुढे नवऱ्याची भारतात यायची वेळ काही फिक्स होईना आणि लग्न पुढे पुढे चाललं होतं म्हणून आई जरा रेस्टलेस होत होती तेंव्हा याच नातेवाईकांनी 'आता सापू झालाय ना मग होईल लग्न पण कधी ना कधी' असं म्हणून आईची समजूत काढलेली

लग्नाच्या दिवशी सापू करणारे केवळ एक पद्धत आहे म्हणून सापू करतात असं वाटतं मला. खरंतर पाश्चात्य देशात मुलगा मुलगी एकमेकांना लग्नाची मागणी घालताना अंगठी देऊन प्रपोज करतात. आपण पण ती अंगाठीची प्रथा उचलली बहुदा.
तामिळ लोकांमध्ये साखरपुड्याला मुलगा मुलगी उपस्थित नसले तरी चालतात. आई वडील एकमेकांच्या कुंडल्या exchange करतात. पूर्वी त्यांच्याकडे एकच पत्रिका बनवण्याची प्रथा होती, बाळाच्या जन्मानंतर ती बनवली जायची. लग्न ठरवताना ती match होतेय का ते पाहिलं जायचं . जर तुम्ही तुमची कुंडली दुसऱ्या पार्टीला देऊन टाकली तर तुम्ही इतर कोणाशी ती जुळवू शकत नाही आणि इतर ठिकाणी लग्न ठरवून मुलीची अथवा मुलाची फसवणूक करू शकत नाही. अशा प्रकारे लग्न secure करण्यासाठी सापु केला जाऊ लागला. त्यांच्यात अंगठी exchange करण्याची प्रथा नाही, हौस म्हणून आता लोकं करू लागले आहेत पण कुंडली exchange हाच मुख्य विधी
This makes sense to me rather than exchanging rings. हे नुसतंच परदेशी लोकांची कॉपी करण्याचा प्रयत्न.

त्यामुळे लग्न ठरल्यापासून लग्न होईपर्यंत एकमेकांना नात्याची खात्री देण्यासाठी बनवलेली एक प्रथा म्हणजे सापु असं मला वाटतं. शिवाय दोन्ही कुटुंब एकत्र येऊन तेंव्हा लग्नाचा मुहूर्त काढतात त्यामुळे त्याआधी देवाची पूजा करण्याची पद्धत आणि म्हणून त्याला कार्येक्रमाचं स्वरूप असा तो प्रवास असावा

सापु केला म्हणून लग्न मोडू नये हा विचार चुकीचा. मग असं असेल तर सापु का करावा हा विचार मान्य. मला वाटतं आताच्या काळात सापु फक्त आवड आणि हौस म्हणून करायचा विधी आहे.

आणखी एक गोष्ट म्हणजे पूर्वी जेंव्हा हुंड्याची प्रथा होती तेंव्हा काय हुंडा देणार वगैरे ठरवण्यासाठी सापुची बैठक होत असावी असं वाटतंय. वरती कोणी तरी याद्या करतात म्हणजे काय करतात ते विचारलं आहे तर हुंडा किती द्यायचा, लग्नाचा खर्च कोणी करायचा, किती माणसं असणार, कोणाला कोणाला आहेर करायचा वगैरे लिखित स्वरूपात ठरवण्यासाठी याद्या केल्या जातात.
माझ्या सासरी याद्यांची प्रथा नाही त्यामुळे आम्ही करणार नव्हतो पण माझी आजी म्हणाली आपल्याकडे प्रथा आहे शिवाय यांचा मुलगा पण अमेरिकेत आहे तेंव्हा फसवणूक नको म्हणून आपण याद्या करून घेऊ. दोन्ही कडच्या आई बाबांना ते पटलं नाही पण आजीचं मन नको मोडायला म्हणून ते तयार झाले.
माझ्या याद्यांमध्ये व्यवस्थित कोणाला कोणाला आहेर करायचा, कुठे लग्न करायचं, कुठल्या दिवशी करायचं , खर्च कोणी किती करायचा, किती लोकं येणार वगैरे व्यवस्थित लिहिलं होतं पण लग्नच पोस्टपोन झाल्याने त्या याद्यांनुसार काहीच झालं नाही आणि म्हणून आमचं कोणाचं काही अडलं नाही . याद्यांची काही गरज नसते आणि काही उपयोग नसतो हे आमचं मत ठाम झालं पण आमची आजी मात्र " पटत नव्हतं तरी मुलांनी ऐकलं हो माझं" म्हणत समाधानाने जगली. अगदी जाताना पण तिने माझ्या नवऱ्याची आणि सासाऱ्यांची आठवण काढून हा किस्सा तिथे हॉस्पिटलमध्ये सगळ्याना सांगितला.

रीया छान पोस्ट

पण आमची आजी मात्र " पटत नव्हतं तरी मुलांनी ऐकलं हो माझं" म्हणत समाधानाने जगली.
>>>>
चांगले केलेत. असे निर्णय व्यावहारीक आणि भावनिक दोन्ही पातळ्यांवर खरे ठरतात.
मलाही वर उल्लेख केलेला झाडाशी विवाह केवळ घरच्यांच्या समाधानासाठी आणि कसलेही किंतु मनात न ठेवता लग्नाला परवानगी मिळावी म्हणून करावा लागलेला. यावर सविस्तर पुन्हा कधीतरी.

यात फक्त एक शंका,
>>>>
.पूर्वी त्यांच्याकडे एकच पत्रिका बनवण्याची प्रथा होती, बाळाच्या जन्मानंतर ती बनवली जायची. लग्न ठरवताना ती match होतेय का ते पाहिलं जायचं . जर तुम्ही तुमची कुंडली दुसऱ्या पार्टीला देऊन टाकली तर तुम्ही इतर कोणाशी ती जुळवू शकत नाही आणि इतर ठिकाणी लग्न ठरवून मुलीची अथवा मुलाची फसवणूक करू शकत नाही. अशा प्रकारे लग्न secure करण्यासाठी सापु केला जाऊ लागला.
This makes sense to me rather than exchanging rings.
>>>>>

यात एका पार्टीला मधल्या काळात लग्न तोडायचे असेल आणि दुसर्‍याला ते रुचले नाही तर तो समोरच्यांची कुंडली अडकवून त्यांची गोची करू शकतो ना..

तेच थोडंस आता झाला साखरपुडा आता काही लग्न तुटत नाही किंवा तोडणं योग्य नाही या विचारसरणीतून आलेली ती प्रथा आहे. आपण कितीही काहीही म्हणलं तरी पूर्वी लग्न मोडणं हा so called गुन्हा होताच की.

काही लोकांच्या भाषेत 'आजकालच्या मुली अति शहाण्या झाल्या आहेत. लग्न मोडायला मागे पुढे बघत नाहीत' अशा मुलींना लगाम घालण्यासाठी च्या या प्रथा. खरंतर हे मुलांकडच्याना पण लागू होईला हवं पण मुलाने लग्न मोडलं म्हणजे बरोबर ही असलीच तर विचारसरणी होती पूर्वी.तेंव्हा बनलेल्या या प्रथा. मी म्हणल्या प्रमाणे आताच्या परिस्थतीत सापु झाला काय किंवा नाही काय काहीच फरक नाही पडत.

आजकाल मला वाटतं लग्न मोडणार असेल तर दोघांच्या संमतीने मोडलं जातं. आजकाल बहुदा लोकांकडे पत्रिकेच्या आणखी कॉप्या असतील सुद्धा किंवा अगदीच नसतील आणि दुसरी पार्टी देत नसेल तर रीतसर नवीन पत्रिका बनवून घेत असतील लोकं. किंवा अगदी खरंच दोन्ही कडे पत्रिका एकमेकांना दिल्या जात पण असतील की नाही माहीत नाही. काय करतात माहीत नाही....विचारायला हवं एकदा मित्राला.

Pages