वेल सुकल्यासारखी

Submitted by निशिकांत on 28 May, 2021 - 07:49

तू अशी दिसतेस का अपुल्यात नसल्या सारखी?
काय सलते अंतरी, तू वेल सुकल्या सारखी

भोवती तुझियाच मैफिल रंगते मी जाणतो
तेवणारी तू शमा का आज विझल्या सारखी?

का उगा जोहार करसी मारला जाता पती?
तू लढावे, कडकडावे वीज असल्या सारखी

सोसणे अन्याय आहे ही जुनी ओळख तुझी
आज तुझिया आतली का नार हरल्या सारखी?

तूच चंडी, तूच झाशी, चाँदबीबी तू तरी
वागसी का सांग वेडे धीर खचल्या सारखी?

आज गर्भाशय स्त्रियांचे का रणांगण जाहले?
माय वागे स्त्री-भ्रुणाशी वैर धरल्या सारखी

"मातृदेवोभव" बनवला सोनियाचा पिंजरा
सोड तू अन् घे भरारी श्वास भरल्या सारखी

का तुझा उध्दार करण्या राम लागे सांग ना !
आखलेल्या वर्तुळी जगतेस फसल्या सारखी

अंध धृतराष्ट्रास देण्या साथ गांधारी उगा
पत्करावी जिंदगी का नेत्र नसल्या सारखी?

का पिसे "निशिकांत" आहे लागले वेड्या तिचे?
भासते नसली तरी ती साथ असल्या सारखी

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users