सकाळ पेपर्स मध्ये प्रसिद्ध झालेला टू लेट या तामिळी चित्रपटावरील लेख

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 28 May, 2021 - 02:17

To let

मी घर माझे शोधाया वाऱ्यावर वणवण केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते .. सुरेश भट

चेजीयान लिखित आणि दिग्दर्शित तामिळ भाषेतील वेगळे कथानक असलेला २०१७ सालचा “ टू लेट” हा एक अप्रतिम चित्रपट. ६५ व्या “national films awards” मध्ये बेस्ट तमिळ फिचर फिल्म”, त्याचप्रमाणे ४९ व्या “ international film festival of India Goa” मध्ये स्पेशल जूरी अवार्ड आणि कलकत्ता येथील international film festival मध्ये बेस्ट इंडियन फिल्म म्हणून या चित्रपटाने पुरस्कार मिळवले होते.

चेन्नई शहरात २००७ साली घडणाऱ्या या काल्पनिक कथेला त्या वेळच्या आय. टी इंडस्ट्री मध्ये घडणाऱ्या स्थित्यंतराची पार्श्भूमी आहे, जेव्हा या क्षेत्रात अचानक तेजी आली होती आणि घरभाडे देण्यासाठी मोठ्या रकमेचे चेक्स घर मालकाना मिळत होते. याचा परिणाम सर्वसामान्य लोकांना भाड्याने राहण्यासाठी जागा मिळण्याबाबत झाला. नवीन जागा मिळत नव्हती आणि पहिली जुनी जागा सोडण्याचे घरमालकांच्या कडून दडपण मात्र सातत्याने येत असायचे. याच समस्येचा बळी आहे चित्रपटाचा नायक इलांगो आणि त्याचे कुटुंब.

इलांगो ( संतोष श्रीराम ) त्याची पत्नी अमुधा ( शीला राजकुमार ) आणि सात ते आठ वर्षाचा छोटासा मुलगा सिद्धार्थ ( धरून ) असे हे परिस्थितीने सर्वसामान्य असलेले छोटेसे कुटुंब, चेन्नई मधील भाड्याच्या घरात राहत आहे. इलांगो फिल्म लाईन मध्ये लेखक म्हणून स्ट्रगल करत आहे तर अमुधा हाउस वाईफ.

त्या दिवशी संध्याकाळी तिघेजण बाहेरून आलेले आहेत. अनेक दिवसांनी सर्वजण एकत्र बाहेर गेल्याने दोघाही नवरा बायकोचा मूड आनंदात आहे. अमुधा रात्रीचा स्वयपाक करत आहे आणि अचानक अमुधाला घरमालकीण बोलावून घेते.

काहीच वेळात अमुधा घरी येते आणि मघाशी घरी असलेले आनंदी वातावरण नाहीसे होते आणि त्याची जागा चिडचिडीने होते. घरमालकिणीने बोलवून घर सोडण्याच्या आदेश दिलेला असतो. नियमानुसार तीन महिन्याची नोटीस वगैरे सोपस्कार गरजेचे असते पण घरमालकीण असले काही करत नाही. इलांगो आपण कोर्टात जाऊ अशी चिडचिड करतो. पण अमुधा स्वाभिमानी आहे. घरमालकिणी समोर तिला अपमानित वाटलेले असते. आणि एकाच आठवड्यात दोघेही घर मिळवण्याचा निर्णय घेतात. मघाशी तव्यावर टाकलेला डोसा करपलेला असतो आणि अमुधा तवा करपल्यामुळे त्याला लागलेली काजळी घासून घासून काढत असते . त्या क्षणापासून त्यांच्या संघर्षाची सुरवात झालेली असते.

दुसऱ्या दिवसापासून एकीकडे नवीन जागा शोधण्याचे काम चालू होते तर दुसरीकडे त्यांचे राहते घर दुसऱ्याला भाड्याने देण्याचे ठरले असल्यामुळे जागा बघण्यासाठी लोकही घरी येत असतात. त्यातच नवीन घराला भाडे जास्ती द्यायला लागेल याचीही विवंचना. इलांगोला जागा शोधण्याचे दडपण आहेच पण त्याशिवाय त्याला चित्रपट क्षेत्रात आपला जम बसवायचा आहे आणि त्यामुळे आपण लिहिलेली कथा कधी प्रोड्यूसरला दाखव अशा मोठ्या गोष्टीपासून ते एखाद्या छोट्याशा जाहिरातीचे लिखाण कर अशा छोट्या गोष्टीपर्यंत त्याची धडपड चालूच असते. दोघेही सातत्याने एका दडपणाखाली आहेत. जागा मिळवताना कधी घरमालकांच्या व्हेज नोन व्हेज या अटी आडव्या येतात तर कधी चित्रपट क्षेत्रात असणारी अस्थिरता. त्यांच्या बजेटच्या बाहेरचे भाडे हे तर नेहमीचे झालेले असते. पण एक दिवस त्यांच्या बजेट मधले घर मिळण्याची शक्यता निर्माण होते.
त्या घरमालकांच्या कोणत्याच अटी नाहीत. जुन्या भाडेकरूला काढून तो त्यांना जागा देण्यासाठी तयार आहे . त्याला फक्त भाडे वेळच्यावेळी मिळावे एवढीच त्याची अपेक्षा. दोघेही ते घर बघण्यासाठी जातात. घराची एक खिडकी उघडी असते. त्या खिडकीतून बघितल्यावर एक करुण दृश्य त्यांना दिसते. एक वृद्ध आजोबा आणि त्यांना औषध देणाऱ्या म्हाताऱ्या आजी. त्या जोडप्याला बाहेर काढून आपण तिथे राहयचे हे दोघांना पटत नाही आणि ते तेथून तसेच बाहेर पडतात. जी वेदना ते स्वत: सहन करत आहेत ती दुसऱ्याला विशेषत: त्या म्हातार्या जोडप्याला द्यावी असे त्यांना वाटत नाही.

दुसऱ्या एके ठिकाणीहि त्यांना जागा मिळत असते. भाडे, डीपोझीट थोडे जास्ती आहे पण इलांगो त्याला तयार होतो. कारण त्याच्या हातात त्याने लिहिलेली कथा आहे.आपली कथा कुणीतरी घ्यावी म्हणून त्याचा संघर्ष सुरूच असतो. त्या दिवशीही ती घेऊन तो एका प्रोड्युसर कडे जातो. पण या प्रोड्युसरची अट आहे. ती कथा तो पन्नास हजार रुपयात घ्ययला तयार आहे पण नाव मात्र इलांगोचे नाही.
लागोपाठ येणारे दोन प्रसंग. एका प्रसंगात वृद्ध जोडप्यांबद्ल इलांगो आणि अमुधाला वाटणारी कणव दिसते तर दुसऱ्या प्रसंगात एका लेखकाची असहायतेतून आलेली अपरिहार्यता दिसून येते.

आपली कथा आपल्या नावाशिवाय आपल्याला विकावी लागते आहे म्हणून इलांगो घरी आल्यवर अस्वथपणे बसला आहे. आणि दुसरीकडे अमुधा मात्र पैशांचा हिशोब त्याला सातत्याने सांगत आहे. आधीच अस्वस्थ असलेल्या इलांगोला सारे असह्य होते आणि त्याची परिणीती भांडणात होते. दोघांचे आवाज वाढतात. परिणाम, इलांगो अमुधाच्या श्रीमुखात भडकावतो.. नवरा बायकोत हा संघर्ष जरी झाला असला तरी दोघांच्यात प्रेम आहे. दुसऱ्या दिवशी तो छोटी मोठी कामे करून अमुधाला पैसे आणून देतो. ती उदास आहे पण नवर्याचा चेहऱ्यावरचे अपराधीपणाचे भाव बघून ती हळवी होते आणि दोघांच्यातील तणावाचे वातावरण निवळते.

रात्रीची वेळ. सर्व सामसूम आहे पण अमुधा आणि इलांगो मात्र जागे आहेत. अमुधाचे एक स्वप्न आहे ते ती इलांगोला सांगत असते. दहा वर्षे लागु देत पण तिला स्वत:चे घर असावे, छोटीशी बाल्कनी असावी, फुलझाडे असावीत , इलांगोसाठी लिहिण्याची स्वतंत्र खोली असावी. मग सिद्धू शिकून मोठा होईल, परदेशात जाईल, आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न करेल.सिद्धूचा उल्लेख होताच अचानक तिचा स्वर हळवा होतो. मोठा झाल्यवर तो विचारेल? तिचे मन शंकेने भरून येते आणि ज्या गालवर इलांगोने मारलेले असते त्याच गालावर तो प्रेमाने तिला थोपटतो.

शेवटी एके ठिकाणी त्यांना जागा आवडते, भाड्यासाठी सुद्धा तडजोड होते. दुसरे दिवशी घर मिळणार का नाही याचा त्यांना निर्णय मिळणार असतो. मनाची घालमेल वाढवणारा त्यांचा हा दिवस असतो. फोनची रिंग वाजते आणि घराच्या बाहेर फोनवर बोलणाऱ्या इलांगोच्या चेहऱ्याकडे भेदरलेल्या नजरेन अमुधा बघत असते. अनेक वेळेला निराशा पदरी पडल्यामुळे तिचे मन आशंकेने भरून गेले आहे. दुसऱ्या क्षणाला इलांगो आत येतो आणि घर मिळाल्याचे सांगतो. आनंदाचा एक चित्कार.इतक्या दिवसांचे कष्ट सार्थकी लागल्यामुळे झालेला तो आनद आहे पण त्याचवेळी त्या कष्टाची आठवण येऊन ती हमसून हमसून रडते. त्यात आठवत असलेले हाल आहेत आणि आता होणारा आनंद.

त्या क्षणापासून पैशाच्या जुळवा जुळवी साठी त्या दोघांचे प्रयत्न चालू होतात. इलांगो आपली कथा विकायला तयार आहे तर त्याने विकू नये म्हणून अमुधा आपले उरले सुरले अंगावरचे दागिने त्याला देते . नवीन घरात जायचे म्हणून जुने घर सोडण्याची त्यांची तयारी चालू आहे. एकीकडे सामानाची आवराआवर तर आपल्या घराचे नुकसान काही झाले नाही न हे बघण्यासाठी जुन्या घरमालकांची तपासणी साठी घरी येणारी माणसे. पण या साऱ्या धावपळीत आनंद आहे. आणि या आनंदात छोटा सिद्धू सुद्धा सामील आहे.

बालमन किती गोष्टी टिपून घेत असते हे अतिशय मार्मिकपणे दिग्दर्शकाने सांगितले आहे. घर शोधण्याच्या या साऱ्या खटाटोपात अमुधा आणि इलांगो यांच्या बरोबर सिद्धू असतोच आणि या साऱ्या वातावरणाचा त्याच्या मनावर परिणाम झालेला असतो. जागा शोधत असताना लिफ्ट मध्ये बसण्यापासून ते जागा कशी शोधतात, भाडे कसे मागतात या साऱ्या गोष्टींची नक्कल छोटा सिधु करून दाखवतो. आणि त्याच्याकडे कौतुकाने बघत असतात त्याचे आईवडील.

एक दिवस त्या नवीन घरमालकाचा इलांगोला फोन येतो. त्याला त्यांचे जुने घर बघायचे आहे. ते आपले घर कसे ठेवतात त्याच्यावर नवीन घरमालक त्याचे घर इलांगो चांगले ठेवेल कि नाही हे ठरवायचे असते. आता पुन्हा काळजी आली. कारण छोट्या सिद्धूने घरातल्या सर्व भिंती रंगवून ठेवलेल्या असतात. भिंतीवर काढलेली चित्रे पुसून पुसून किती जाणार? अमुधाच्या मनात त्याच शंका, तोच गहिवर पण तरीही मनातल्या शंका बाजूला ठेऊन घर आटोपणे चालूच ठेवते.

शेवटचा दिवस उजाडतो. घरातील सामान आटपून ठेवले आहे. अमुधा रोमटीक मूड मध्ये बसली आहे. पण इलांगो मात्र काळजीत. अमुधा त्याच्या जवळ जाते. प्रेमाने आलिंगन देते. आणि उदास आवाजात इलांगो तिला सांगतो नवीन घरमालक आपल्याला घर देत नाहीय. आपण आगाऊ दिलेली रक्कम ती परत द्यायला तयार आहे. आंनदाची जागा दु:खाने घेतलेली असते. असहाय होऊन ती बसलेली आहे. घरात सगळीकडे अंधार. आणि अंधारात बसलेल्या दोन सावल्या आणि आता झोपलेला सिद्धू. हुंदके देऊन रडलेला आवाज आपल्याला ऐकू येतो.

दुसऱ्या दिवशी शहरापासून दूर कुठेतरी राहण्याचे ठरते जिथे थोडी गैरसोय असेल पण भाडे कमी असेल. जडवलेल्या अंत:करणाने उरले सुरले दोघेजण सामान आवरतात. दारातली फुलझाडे, सिद्धूची खेळणी तशीच असतात. त्या घरातल्या त्या सुखद आठवणी आहेत. बाहेर वेळेवर सुरु न होणार्या गाडीला इलांगो किक मारत आहे, जणू नव्या संघर्षाची पुन्हा एकदा सुरवात आणि घराकडे पुन्हा एक नजर टाकून ती अमुधा घराचा दरवाजा बंद करते आणि चित्रपट संपतो.

चित्रपट संपल्यावर लक्षात राहते ते अप्रतिम कथा आणि अभिनय. संघर्ष, राग अपराधीपणाची भावना, प्रेम आणि मनाचा हळवेपणा अशा अनेक भावभावना व्यक्त करणारे प्रसंग अतिशय सुंदर पद्धतीने चित्रपटात व्यक्त झाले आहेत. जागा मिळवण्यासाठीची अथक धडपड चालूच असते पण ती चालू असतना त्यांच्या मनात चालणारे वादळ प्रतीकात्मक पद्धतीने आपल्या समोर येते. जागा शोधण्यासाठी जेव्हा इलांगो बाहेर जात असतो तेव्हा त्याच्या समोर एक जुने घर घाव घालून पाडत असतात. ते घर पाडताना बघत असताना त्याची नजर आपल्याला सांगत असते “मला राहण्यसाठी घर नाही आणि कुणाचे तरी घर माझ्यासमोर पाडत आहेत.” एके ठिकाणाहून घरभाडे जास्ती आहे म्हणून त्या घरातून दोघेजण बाहेर पडतात. इलांगोची टू व्हीलर सिग्नल जवळ उभी आहे आणि त्याच्याच शेजारी एक चारचाकी गाडी. गाडीमध्ये हातात खेळणी घेऊन खेळणारा श्रीमतीच तेज असणारा मुलगा आणि त्याच्याकडे आशाळभूत पणे पाहणारा सिद्धू. श्रीमंती आणि गरिबी मधला हा फरक आहे. पुढच्याच वळणावर त्याची गाडी बंद पडते तेव्हा त्याचवेळी चार भिकारी तेथून गाणे म्हणत जात असतात. त्या गाण्याचा मतितार्थ असतो “ या जगात मी शंभर वर्षे राहणार असेल तर मला फक एक दिवस तुझ्या त्या पवित्र जागेत राह्यच आहे. हे प्रभू तुझ्याशिवाय आमचे कोण आहे?” इलांगो आणि अमुधाची परिस्थिती त्या भिकाऱ्यासारखीच आहे. त्यालाही राहण्यसाठी घर पाहिजे आहे.घरमालकीण बाई जेव्हा घरी येतात तेव्हा सिधूने भिंतीवर चिकटवून ठेवलेले घराचे चित्र आणि त्याच्यावर लिहिलेले “to let” शब्द. घरमालकीण तो कागद चोळामोळा करून फेकून देते. आपल्या मुलाच्या त्या चित्राकडे अमुधा साश्रू नयनांनी बघते आहे. घरातील वातावरणाचा लहान मुलावर हि परिणाम झालाय पण त्या सर्वाकडे निर्दयी पाहणारी घरमालकीण.

उत्तम दिग्दर्शनाच्या खुणा आपल्यला जागोजागी दिसतात पण तितक्याच ताक्तीचा अभिनय संतोष आणि शीलाने केलेला आहे. या दोघांच्या भूमिकेत अनेक पैलू व्यक्त होतात. सर्वसामन्य माणसाची असहायता, त्यांचे हळवेपण, तडजोड, करुणा आणि तितकाच स्वाभिमान. या सार्या गोष्टी समर्थपणे आपल्यासमोर दोघांनी व्यक्त केलेल्या आहेत. चित्रपट पाहताना अनेक पैलूनि नटलेला एक अप्रतिम चित्रपट पहिल्याचा अनुभव आपल्याला येतो हे निश्चित !!!!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आजच पाहिला..
सुंदर सिनेमा..
फार इमोशनल करून गेला..साधी सोपी स्टोरी पण अप्रतिम दाखवले आहे..आवडलाच.