माणूस !

Submitted by Swati Karve on 23 May, 2021 - 12:54

माणूस !

माणूस - एक बेट...
प्रत्येक माणूस एकाद्या बेटा सारखा असतो.
स्वतःची तत्व, मनातले पूर्वग्रह, प्रत्येक नात्याबद्दलचे माणसाने स्वतः ठरवलेले काही निकष, अहंकार, ही आणि अशी अनेक कुंपणं, कधी समजून उमजून, तर कधी स्वतःच्याही नकळत, माणसाने स्वतःच्या मना भोवती घालून घेतलेली असतात. या सगळ्या कुंपणांची हद्द ओलांडून, स्वच्छ मनाने, हात जोडून अगदी अगत्याने इतरांना आपल्या बेटावर येण्याची विनंती करणारी व्यक्ती सापडणं ही फारचं दुर्मिळ गोष्ट आहे. किंबहूना, अशी व्यक्ती अस्तित्वात असलीच तर त्या व्यक्तीला माणूस म्हणायचं की नाही हा एक प्रश्नच असेल. तर्कशुद्ध विचार करायला भाग पाडणारी बुद्धी, तर्क सोडून अनेक गोष्टी करायला भाग पाडणारे मन आणि मन आणि बुद्धी या दोन्ही गोष्टींना न जुमानणारा अहंकार, या परस्पर विरोधी गोष्टींचे अतभूत रसायन ज्याच्या ठायी आहे तो माणूस !
नात्यांमुळे माणसं जवळ येतात, जोडली जातात, पण ती काही अंशीच. नात्या-गोत्यांचे किती ही पाश आपल्या आयुष्यात असले तरीही प्रत्येक माणूस आपापल्या बेटावर एकटाच असतो.

माणूस - एक हिमनग...
हिमनग जेवढा आपल्याला पाण्यावर तरंगताना दिसत असतो, त्यापेक्षा त्या हिमनगाचा कितीतरी जास्त भाग पाण्याखाली असतो. माणसाचं ही तसंच असतं. ज्या रूपात एखादी व्यक्ती सगळ्यांमध्ये वावरत असते, ती त्या व्यक्तीची संपुर्ण छबी नसते. एखाद्या व्यक्तीला संपूर्णपणे ओळखणं ही फार कठिण गोष्ट आहे. किंबहूना, आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तींना सोडाच पण आपण " स्वतः स्वतःला संपूर्णपणे ओळखतो का?" या प्रश्नाचे ही खात्रीलायक उत्तर देणे तेवढे सोपे नाही. बरेचदा आपली एखादी छटा, किंवा अव्यक्त भावना, अगदी बेमालूमपणे, अनपेक्षितपणे प्रकट होते आणि त्याचे इतरां सकट आपल्यालाही आश्चर्य वाटून जाते. मन नावाच्या अथांग सागरात तरंगणाऱ्या आपल्या व्यक्तिमत्त्वाचे मूळ रूप नेमके कसे आहे, याचा शोध ज्याचा त्याने घ्यायला हवा. चारचौघात वावरणारे व्यक्तिमत्त्व आणि केवळ एकांतात प्रकट होणारी त्याच व्यक्तीचे मूळ रूप ह्यात बरेचदा खुप अंतर असते.

माणूस - एक इंद्रधनुष्य...
प्रत्येक माणूस म्हणजे एक अनोखे इंद्रधनुष्यच!
जन्माला आल्यापासून ते म्हातारपणा पर्यंत, भावनांचे किती असंख्य रंग लेवून माणूस जगत असतो. त्यातले काही प्रमुख रंग म्हणजे, बालपणातला खट्याळपणा, निरागसता, किशोर वयातील आकर्षण, कुतूहल, तारुण्यातील प्रेम, आत्मविश्वास, कर्तृत्व गाजवण्याची जिद्द, संसारात गुरफटल्यावर मनात सतत तेवणारी कर्तव्यनिष्ठा, जवाबदाऱ्यांची जाणीव, संसार बहरायला, फुलायला लागल्यावर ओसंडून वाहणारे समाधान, संसारातून निवृत्ती घेताना मन व्यापून टाकणारी भयाण रिकामेपणाची भावना आणि सरते शेवटी निर्वाणाच्या अवस्थेत, त्या निर्गुण निरकाराच्या प्रति दाटून आलेल्या समर्पणाच्या रंगात पूर्णपणे न्हाऊन निघाल्यावर, अवघा रंग एक झाला म्हणत परमेश्वर चरणी विलीन होणारं इंद्रधनुष्य म्हणजे माणूस !

माणूस - एक महाभारत...
प्रत्येक माणूस म्हणजे एक महाभारत. कधी षड्रिपूंच्या आहारी जाऊन, उपभोग आणि भोगविलासाकडे नेणारे कौरवरूपी विचार मनात तांडव करीत असतात, तर कधी आत्मज्ञान आणि विवेकाकडे नेणारे पांडवरूपी विचार मन व्यापून टाकतात. जन्माला आल्यापासून पुढे आयुष्यभर माणसाच्या आत कौरव आणि पांडवातले हे द्वंद्व अखंड चालूच असतं. या संघर्षातल्या चढ-उतारांना आणि हेलकाव्यांना सामोरे जात, माणूस कधी श्रेयसा कडून प्रेयसाकडे भरकटत जातो तर कधी प्रेयसाकडून श्रेयासाकडे नेणाऱ्या वाटेकडे वळतो. महाभारतातल्या अश्वत्थाम्या प्रमाणे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक तरी भळभळणारी जखम असतेच जी अखेरच्या श्वासापर्यंत माणसाच्या मनात ठसठसत राहते. अर्जुना प्रमाणे अनेकदा अतिशय हताश, निराश व्हायला होते.
अर्जुनाला योग्य ती वाट दाखवण्यासाठी, भगवान श्री कृष्णाने युद्धभूमीवर भगवत गीतेच्या माध्यमातून उपदेश आणि मार्गदर्शन केलं होतं. त्याचं भगवत गीतेची कास धरून, अंतर्मनाच्या प्रकाशात, आत्मशोध आणि आत्मबोधाच्या वाटेकडे प्रयाण करणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या आत सुरू असणाऱ्या महाभारतात विजयी होणे.

- स्वाती

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users