पायात मोडलेला काटा निघे सुरीने ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 23 May, 2021 - 05:37

माझे भविष्य बघतो त्याच्या बरोबरीने
कोणीतरी असेही जपतो परोपरीने

स्वप्नातल्या सुखावर भाळीत जन्म गेला
स्वप्नात प्रेम केले स्वप्नातल्या परीने

पदरामधील नक्षी दिसते असेच नाही
साडी मनात भरते काठावरिल जरीने

रस्त्यात मध्यभागी अपघातग्रस्त पिल्लू !
असल्यास शक्य त्याला आवर्जुनी घरी ने

अगदीच हीन दर्जा देवू नये सुईला
पायात मोडलेला काटा निघे सुरीने ?

मानीपणा तुझा ती जपते म्हणून फुलतो
उत्तुंग पर्वतांना बघ सांधले दरीने

पडतो वरून कोठे ह्यावर भविष्य ठरते
भरते विहीर अथवा झिजते जमिन सरीने

अर्धा म्हणत रिकामा... किंवा म्हणून भरला
प्याल्यास पीत जावू आपापल्या परीने

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults