संपीचा निकाल.. (भाग २)

Submitted by सांज on 19 May, 2021 - 09:16

मोजून दहा कम्प्युटर असलेल्या त्या छोटेखानी नेटकफे मधल्या एका कम्प्युटर स्क्रीन समोर संपी बसली होती. भिंतीला चिटकुन. तिच्या बाजूला संपीचे बाबा. आणि त्यांच्या बाजूला उभा होता त्या कॅफेचा तो पोरगेलासा मालक. आत शिरल्या शिरल्या उजव्या हाताला त्याचं टेबल होतं. आणि त्याच्यामागे डावीकडे पाच आणि उजवीकडे पाच असे कम्प्युटर पार्टिशन करून ठेवलेले. प्रत्येक पीसी समोर एका माणसाला बसता येईल न येईल अशी arrangement. तो पोरगेलासा मालक संपीच्या बाबांसमोर जवळपास वाकून कर्सर फिरवत होता. संपी तिरकस नजरेने सारा प्रकार पाहत होती. तिने आधी प्रयत्न केला होता पण साइट वर एकदम लोड आल्याने ती जॅम झाली होती. आणि रिजल्ट काही केल्या दिसत नव्हता. संपीला मुळात इथे यायचंच नव्हतं. दुपारी कळेलच की शाळेत निकाल म्हणून तिने सगळ्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण तिच्या रिजल्ट विषयी ती सोडून सारेच अति उत्सुक असल्याने तिला मनाविरुद्ध यावं लागलं होतं. त्यात तिच्या बाबांचं बोलणं. ‘आता माझं mscit झालंय हे त्या नेटकफे वाल्या पोराला सांगायची काय गरज होती!’ ती मनातल्या मनात चरफडली. तो पोरगा आपण सॉफ्टवेअर इंजीनियरच आहोत अशा आविर्भावात बोलत-वागत होता.

चार-पाच मिनिटं खटपटी केल्यावर एकदाचा स्क्रीनवर निकाल झळकला.

‘संपदा मिलिंद जोशी.. 89.09%’

निकाल पाहून संपी चाट पडली. तिचे विस्फारलेले डोळे आणि उघडलेल तोंड मिनिटभर तसंच राहिलं. ‘एवढे मार्क पडलेयत आपल्याला?’ तिने पुन्हा एकदा नाव चेक केलं. संपीचे बाबा तर एकदम ढगात.

‘मग हुशारच आहे आमची संपी..’ त्या पोराकडे पाहून ते म्हणाले. संपीने एव्हाना तोंड मिटलं होतं.

घरी आल्यावर एकदम सगळं वातावरणच पालटलं. रोज तिचा यथेच्छ शिव्याभिषेक करणारी संपीची आई आज चक्क तिचं कौतुक करताना थकत नव्हती. संपीची धाकटी बहीण न भूतो न भविष्याती इतक्या आदराने तिच्याकडे पाहत होती. एक-दोनदा तर भावनेच्या भरात ती चक्क संपीला ताई वगैरे म्हणाली. ‘एवढी ताकद असते दहावीच्या निकालात?’ संपी मनातल्या मनात खुश होत स्वत:शीच पुटपुटली.

तो पूर्ण दिवस मग काही विचारू नका, दिवाळीला लाजवेल असा थाटमाट होता. दिवसभर नातेवाईकांचे फोन. संपीच्या आवडीचा बेत. शेजार-पाजर्‍यांच येणं-जाणं. आणि त्या प्रत्येकासमोर आईची पुन्हा-पुन्हा सेम इंटेंसिटीने वाजणारी एकच टेप.

‘मग. उगाच दिसत नाही रिजल्ट. वर्षभर अगदी इकडचे तिकडे झालो नाही आम्ही. टीव्ही बंद. कुठे जाणं-येणं नाही. आणि संपीनेही मान मोडेपर्यंत अभ्यास केला बरं. पहाटे चारला उठायची रोज..’

यावर संपीने जरासं दचकूनच आईकडे पाहिलं. तिला तर ते काही आठवत नव्हतं. हम आता गणिताची शिकवणीच सकाळी सहाची लावली असेल तर करणार काय ती तरी बिचारी. पूर्ण वर्ष तिथे जाऊन पेंगल्याचं मात्र तिला छान आठवत होतं. मुकाट्याने पेढे खात ती शांतपणे सगळ्यांचं बोलणं ऐकत बसली.

‘अमुकचा अमुक पण होता ना हो यावर्षी दहावीला?’

‘होता तर. काठावर पास आहे.’ शेजारच्या काकू.

‘हम्म.. गावभर भिशी पार्ट्या करत फिरायची त्याची आई. काय वेगळं होणार होतं.’ संपीची आई.

‘नाहीतर काय! भारी हौस बाई त्यांना डामडौल दाखवण्याची. घराकडे लक्ष तसं कमीच असतं म्हणे.’ काकू.

‘हम्म.. स्वत: झिजावं लागतं. मग घडतात मुलं. सोपं नाही ते. जाऊदे आपल्याला काय करायचंय.’ आई.

‘हो ना.. आपल्याला घेऊन काय करायचंय.’

दुपारी मग रीतसर मार्कशीट आणायला संपी तिच्या मैत्रिणींसोबत शाळेत आली. बॅच मधल्या सगळ्यांची तिथे गर्दी. कोणाला किती पडले पाहण्याची उत्सुकता. जिथे-तिथे मुलांचे नि मुलींचे घोळके जमलेले. अर्थात मुलींचे वेगळे नि मुलांचे वेगळे. काही हजारांमध्ये लोकसंख्या असलेलं ते तालुका वजा गाव. अशा ठिकाणी तेव्हा तरी मुलं-मुली एकमेकांना सहज बोलण्याचा प्रघात नव्हता. आडून आडून चौकशा. चोरून पाहणं वगैरे प्रकार सर्रास. एखादी मुलांशी बोलणारी धीट मुलगी असलीच तर ती पूर्ण शाळेचा चर्चेचा हॉट विषय ठरायची. संपी तर काय फक्त तिच्या चार मैत्रिणींमध्येच पोपटासारखी बडबडायची. बाकी मुलं किंवा शिक्षक दिसले की हिची घाबरगुंडी उडालीच म्हणून समजा. मुलं हा तर परग्रहावरून आलेला कोणीतरी परग्रहीय प्राणी असल्यासारखा ती त्यांच्यापासून दहा हात लांबच राहायची.

मार्कशीट घेऊन बाहेर आल्यावर संपी खुश दिसत होती. तिच्या लाडक्या मुळे मॅडम नि तिचं भरपूर कौतुक केलं होतं. ती बाहेर आली तेव्हा तिच्या ग्रुप मध्ये ह्या विषयात तुला किती अन त्या विषयात मला किती अशा चर्चा चालू होत्या. त्यांच्यात, प्रत्येक ग्रुप मध्ये असते तशी इकडच्या-तिकडच्या सगळ्या चटपटीत बातम्या असणारी एक मैत्रीणही होती. तिला स्वत:ला मार्कांमध्ये तसा रस अतिशय कमीच. फर्स्ट क्लास मिळाला म्हणजे गंगेत घोडं न्हालं असा प्रकार. इंजीनियर किंवा डॉक्टर होणे वगैरे फालतू स्वप्नं तिची नव्हती.. तर ही नेहा, जोरात संपीची ओढणी खेचून हळूच सगळ्यांच्या कानात कुजबुजली,

‘ए.. ते बघ ते बघ.. तो राणे कसा बघतोय त्या शिल्पाकडे. मी म्हटलं नव्हतं, त्यांचं काहीतरी सुरूये. आणि ती बघ ती शिल्पा पण कशी खुणा करतेय..’

नेहा दाखवत होती त्या दिशेला संपीने पाहिलं. बरंच लक्ष देऊन पाहिल्यावर तिला राणे आणि शिल्पा दिसले. पण ते काय खुणा करत होते, होते की नाही ते तिला शष्प समजलं नाही. जाऊदे म्हणत तिने शेजारच्या मधुला विचारलं,

“ए फर्स्ट कोण आलय काही कळलं का गं?”

मधुने चणे खात म्हटलं,

“अगं ती गम्मतच झालीये. सगळ्यांना वाटत होतं, ती oversmart सायली पहिली येईल. किती आव आणायची. पण झालय उलटच. तो अवचट पहिला आलाय. सायली पहिल्या पाचात पण नाही. ते बघ ते बघ तो अवचट.. भारीचे बाबा हा.. याला कधी अभ्यास करताना पाहिलं नाही मी. पण चक्क पहिला?”

संपीने एकवार त्याच्याकडे पाहिलं. आणि जणू पाहणं सुद्धा पाप असतं अशा विचाराने मान लगेच खाली वळवली. मग त्यांच्या चर्चा कुठलं कॉलेज, कोणता ग्रुप, इथेच राहणार की जिल्ह्याला जाणार वगैरे वगैरे अंगांनी पुढे जात राहिल्या. पण, त्यांचं गावातलं कॉलेज तसं बर्‍यापैकी नावाजलेलं असल्याने त्या अवचट सकट बरेचजण संपीप्रमाणे तिथेच अॅडमिशन घेणार होते.

‘आता आपण ‘कॉलेज’ला जाणार’ या इतके दिवस विशेष न वाटणार्‍या पण आता अचानक अंगावर आलेल्या जाणिवेने जराशी धाकधूक मनात घेऊन संपी उशिरा कधीतरी झोपी गेली..

क्रमश:

www.chaafa.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मस्तच..
पुढील भागाच्या प्रतिक्षेत !

उत्तम छान रंगवलय निकालाचं वातावरण!
एकूनच दहावीचा रीझल्ट प्रत्येकासाठी नविन अनुभव असतो!आणि अनपेक्षित निकाल हां एक निराळाच आनंद देउन जातो!
पुलेशु