अज्ञातवासी! - भाग कितवातरी!

Submitted by अज्ञातवासी on 16 May, 2021 - 17:28

"केस पांढरे झालेत माझे."
"हो दिसायला लागलेत. तरुण बायको असली, तर वय अजून जास्त दिसतं."
श्रद्धा ओठ चावून पलंगाला मागे टेकून उभी राहिली.
"असं..?" मोक्ष तिच्याकडे सरसावला.
"नको... वेडा आहेस का? बाहेर बघ, किती गर्दी जमलीय. कुणीही येईल."
"कडी लावू? म्हणजे नो डिस्टर्बन्स!"
"गप्प बस आणि बाहेर जा. लोक वाट बघतायेत."
"ठीक आहे राणीसरकार. तुम्ही जे म्हणाला ते."
"त्याने आपल्या पांढऱ्या शर्टच्या बाह्या दुमडल्या, समोरच्या फोटोला नमस्कार केला, आणि तो निघाला."
"ऐक ना."
"बोल ना," तो मागे वळून उत्साहाने तिच्याकडे सरसावला.
"पुरे... हे घे." तिने घड्याळ त्याच्या हातात दिलं.
"हे होय." त्याने चेहरा उतरवला.
"काय हे, टीनेज लवरसारखं."
"श्रद्धा...वागू दे वेड्यासारखं. कधी जगताच आलं नाही लहान मुलासारखं. आधी बाबांपासून दूर, मग परत आलो, मग कायमची शह काटशाह. अजूनही हा खेळ चालूच आहे. फक्त तू आहेस ग, माझ्यासाठी. माझी. श्रद्धा तू नसतीस ना, मी वेडा..."
श्रद्धाने त्याला पुढे बोलूच दिलं नाही, आणि सरळ ओठांवर ओठ टेकवले...
"आजसाठी पुरे. जा आता." ती लाजत म्हणाली.
तो बाहेर पडला.
बाहेर तुफान गर्दी जमली होती, चौफेर गुलाल उधळला जात होता.
'दादा आले रे,' मोक्षला गॅलरीत बघून एकजण ओरडला, आणि लोकांच्या उत्साहाचा बांध फुटला.
मोक्षनेही त्यांना अभिवादन केले.
समोरच्या खोलीसमोरच शुभम उभा होता. तोही हसत लोकांना अभिवादन करत होता.
मोक्षने हातानेच त्याला बोलावले. तो घाईघाईतच मोक्षकडे आला.
'दादा.' लोक वेडे झालेत आनंदाने.
"अरे, पहिल्यांदा कुणीतरी आमदार झालंय शेलार घराण्यात. आजपर्यंत आपण रिमोट कंट्रोल होतो, पण आता सत्ता चालवायचीय. कामाला लागायला हवं शुभम."
'दादा,' मागून जोशींनी फोन मोक्षच्या हातात दिला.
"कोण?"
"चंद्रकांत जाधवसाहेब."
"नका देऊ परत." मोक्षने जोशींना सांगितले.
"दादा, अठ्ठावन्न मिस कॉल झालेत."
"तरीही नका देऊ. आणि जोशी, जरा तुम्हीही मिरवणूकीत सहभागी व्हा. घरच्या माणसांनी आनंद लुटायला हवा. जा..."
"जी दादा."
तेवढ्यात काही कार्यकर्त्यांनी वर येऊन मोक्षला पुष्पहार घातला. मोक्षने सुहास्य वदनाने स्वीकार करत तो हार बाजूला ठेवला.
"जेवणाची व्यवस्था केली आहे. आज जेवल्याविना जाऊ नका."
"जी दादा."
मोक्षने दोन्ही हात जोडले.
"शुभम. खानसाहेब?"
"आले नाहीत दादा अजून."
"आजही नाहीत?" मोक्षच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"अभिनंदन... 'दादा"
मोक्षने मागे वळून बघितले.
झोया त्याच्या मागे उभी होती.
"धन्यवाद वहिनी." तो कसाबसा म्हणाला.
"अशीच प्रगती करत राहा दादा," ती फणकाऱ्याने म्हणाली आणि निघून गेली.
"दादा, तू का यांना सांभाळून घेतो इतका? मी सरळ ऐकवलं असतं, एवढा माज..."
"शुभम..." मोक्षचा आवाज चढला. "झोयावहिनीविषयी कधीही वाईट बोलायचं नाही. कळलं?"
"दादा?"
"सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय शुभम. कळेल तुला. सौदामिनीबाई, अप्पा आणि संग्राम सकाळपासून बाहेर नाहीत. कुणालातरी पाठवून एकदा अंदाज घ्यायला लाव. आणि आमदार मॅडम कुठे आहेत?"
"तिला स्वयंपाकघरातून फुरसत मिळायला हवी ना."
"काकू! काय करू मी तुमचं," मोक्ष वैतागला, आणि सरळ स्वयंपाकघरात आला.
"पोरीनो, चहात आलं नीट टाका, आणि दुसरं पातेलं चढवा. लोक किती जमलीत. लवकर लवकर हात चालवा."
"काकू, धन्य आहात तुम्ही." मोक्ष आत येत म्हणाला.
"अहो नाशिक मध्यच्या आमदार तुम्ही, लोक सकाळपासून वाट बघतायेत बाहेर. आणि तुम्हाला चहातून फुरसत नाही.,
"अरे आलेच, थोडा चहा बघत होते... " काकू समाजवणीच्या सुरात म्हणाल्या.
"बरं जेवणाचं?"
"अरे हो, बरं आठवण केली. तो केटरर मेला काय शिजवतोय काहीही कळत नाही... थांब, जरा जाऊन येते..."
"ओ मॅडम, उपकार करा माझ्यावर. श्रेया समजव ना काकूंना तूच. चला बाहेर."
"डोन्ट वरी, मी बघते." श्रेया हसली.
"बरं, चला. सगळं तुमचंच ऐकणार आजपासून मी. काकू लटक्या रागाने म्हणाल्या आणि आत गेल्या."
मोक्ष समाधानाने त्यांच्याकडे बघत राहिला.
◆◆◆◆◆
"टकटक..."दारावर आवाज झाला.
"कोण?" मधून एक रानवट आवाज आला.
"तुझी बायको."
"झोया?" संग्राम घाईघाईने उठला, व झोकांड्या घेतच त्याने कडी उघडली.
झोयाने नाकाला हात लावला.
"दारूच्या तलावात उडी मारून जरी जीव दिला, तरी जे झालंय, ते बदलता येणार नाही."
"जीवच द्यायचाय मला झोया. जीवच द्यायचाय. त्या नीच माणसाने दोनदा घात केला माझा."
"संग्राम, त्याने कधीही घात केला नाही. लोकसभेला तू चाळीस कोटी मागितले, त्याने साठ दिले. विधानसभा लढवायची नाही या अटीवर. तरीही तू हट्टाने सासूबाईंना काकूंविरोधात उतरायला लावलं. दोनदा पराभव चाखायला लावला."
"झोया अग मला आयुष्यात जे हवं ते मिळणार नाहीच का? बोल ना झोया. तू तरी जवळ ये ना झोया, ये माझ्या मिठीत. तो अगतिकपणे म्हणाला."
"कधीतरी शब्दाला जागत जा." ती रागाने म्हणाली आणि बाहेर निघून गेली.
"साली हरामखोर..." तो ओरडला, आणि त्याने पुन्हा बाटली तोंडाला लावली.
इकडे काकू बाहेर आल्या...
त्यांच्या एका बाजूला मोक्ष आणि श्रेया, दुसऱ्या बाजूला शुभम आणि दिती उभे होते.
"श्रद्धा कुठेय?" मोक्षने दितीला विचारले.
"किचनमध्ये."
"बरं." मोक्ष जमावाकडे बघून हात जोडू लागला.
'एकच वादा… मोक्षदादा...'
'अरे कोण येणार...सत्यभामा शेलार येणार...'
घोषणा व गुलालाने आसमंत भरून गेला.
कुणीतरी मोक्षच्या हातात माईक दिला.
"अरे, हे काय?"
"दादा, बोला ना. लोकांना बरं वाटेल."
"नाही. आमदार मॅडम बोलतील. काकू?"
"मी काय बोलू? बाबा मला सवय नाही."
"बोला काकू काहीतरी."
"बरं. बोलते. नंतर म्हणू नका, काहीही बोलते."
मोक्ष हसला.
"नमस्कार!"
काकू बोलू लागल्या तसा जमाव शांत झाला.
"मी खूप बोलते घरात. पण अशी सवय नाही हो बोलायची बाहेर. जे मनात आलं ते बोलते. आयुष्यभर मी स्वयंपाक आणि घरच सांभाळत आलीये. यापुढेही सांभाळलं असतं, पण या पोरांनी, तुमच्या दादांनी ऐकलं नाही.
आता तुम्ही निवडून दिलंय, तर जबाबदारी आलीये. आता मी शिकेन. तुमची काकूच आहे मी. काहीही अडचण असली, मला सांगा. मी आहे ना! जमलं तर सोडवेन, नाही जमलं तर दादांना सांगेन. पण सगळे प्रश्न सोडवायचेत मला. पाच वर्ष दिलीत, सोनं करायचंय मला. पाच वर्षांनी आहेच माझं स्वयंपाकघर कायम.
काकू,‌ पुन्हा तुम्हीच. कुणीतरी आवाज दिला.
नाही रे बाबांनो, नाही जमायचं. म्हातारी होईन मी तोपर्यंत. नवीन पिढी आणू पुढे. पण एक सांगते, बाईला स्वयंपाकघर कितीही आवडत असलं, तरी हट्टाने तिला बाहेर काढा. या प्रचारात खूप फिरले मी. जग खूप मोठं आहे, बघू द्या तिला जग. आमचे हे, अजूनही काहीतरी लिहीत बसले असतील. त्यांना काडीचा इंटरेस्ट नाही या गोष्टींमध्ये. सगळं दादावर सोपवून निर्धास्त. पण तुम्ही असं करू नका. चला खूप बोलले. जय हिंद"
काकूंनी हात जोडले. आणि पुन्हा जयघोष चालू झाला.
"काकू, श्रेया, दोघीजणी आता महत्वाच्या कार्यकर्त्यांना भेटा. मला अजून बाकीची कामे आहेत, मी आता रात्री भेटेन. शुभम, सांभाळून घे सगळं इथलं. ओके?"
"हो दादा."
मोक्ष स्वयंपाकघरात आला.
"श्रद्धा..."
"दादा त्या केटररजवळ आहेत."
"काय हीसुद्धा!" मोक्ष पुटपुटत केटररजवळ निघाला.
"श्रद्धा... इकडे ये जरा."
"हो आलेच. जरा भात वाढवा." ती केटररला सूचना देत मोक्षकडे आली.
"काय हे. बाहेर काकू अभिवादन करत होत्या, आणि तू घरात. आली का नाही बाहेर?"
"कारण आता काकू बाहेर असतील मोक्षसाहेब, आणि मी घरात."
"म्हणजे?"
"आता काकूंची जागा मला घ्यावी लागेल. सगळे बाहेर असले, तर कुणीतरी घर सांभाळायला हवं ना?"
"अग लोक आहेत श्रद्धा."
"मोक्ष, मी शेतकऱ्याची मुलगी..."
"जमीनदाराची..."
"तेच ते. आम्ही तीन बहिणी. मी सगळ्यात मोठी. मला असं बसून नाही राहता येत. काम पाहिजेच असतं."
"तुला जर हवं ते कर श्रद्धा. पण सोबत राहत जा ग."
"सॉरी. पुन्हा नाही असं होणार."
"स्वीट गर्ल. चल रात्री भेटतो. कामे आहेत. बाय." मोक्ष निघाला, आणि वाड्याच्या समोर आला.
"दादा, अठ्याऐंशी मिसकॉल. जाधव साहेब." जोशी पुन्हा आले.
"माझ्याकडे फोन द्या जोशी. तुम्ही जरा अरेंजमेंटकडे लक्ष द्या."
"जी साहेब," जोशी गोंधळून म्हणाले.
मोक्ष बाहेर आला. एकदोन लोकांना नमस्कार करून तो गाडीत बसला.
आणि सुसाट गाडी त्याने इगतपुरीच्या दिशेने घेतली.
'द हीडन विलेज, इगतपुरी.'
पाटीच्या बाजूला एक प्रवेशद्वार होतं, तिथून तो आत गेला.
एक गार्ड लगबगीने पुढे आला. त्याने दार उघडलं.
मोक्ष खाली उतरला.
मॅनेजर समोरच उभा होता.
"दादा एकही बुकिंग नाही. सगळं रिकामं आहे." "गुड. मधल्या हॉलमध्ये सगळ्यांना घेऊन या."
"ठीक दादा."
मोक्ष मधल्या हॉलमध्ये गेला. त्याने सर्वप्रथम आपली पिस्तुल चेक केली. त्यानंतर हॉलची बारकाईने तपासणी केली. कुठलाही कॅमेरा किंवा मायक्रोफोन न पाहून तो थोडा निवांत झाला.
त्याने रिमोटच बटन दाबलं. न्यूज चॅनेल लावलं, आणि क्षणार्धात आकडे टीवीवर झळकू लागले.
जकप - 134
अखिल भारतीय काँग्रेस - 82
परिवर्तन काँग्रेस - 72

एक रिपोर्टर तावातावाने बातमी देत होता.
"महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा इतकं मोठं वादळ आलं असेल. नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण सोळा आमदार, जे अखिल भारतीय काँग्रेसकडून निवडून आले होते, ते सध्या बेपत्ता आहेत. मात्र त्यांच्यापैकी सत्यभामा शेलार यांच्या वाड्यावर प्रचंड मोठा उत्सव सुरू आहे. आता सत्ता कोण स्थापन करतं, यावर लक्ष..."
दुसऱ्या चॅनेलवर एक प्रवक्ता अतिशय शांतपणे आपलं मत मांडत होता.
"हे बघा, शेलार घराण्याचा प्रभाव नाशिकच्या राजकारणावर कायम राहिला आहे. म्हणजे, रिमोट कंट्रोल त्यांचा असतोच. पण पहिल्यांदा कुणीतरी आमदारकी मिळवून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केलाय. आता तुम्ही बघाल, तर हे सगळे आमदार शेलारांचे निष्ठावंत आहेत. जकपची हवा असूनही, शेलारांनी काँग्रेसकडून विजयश्री खेचून आणली, ती फक्त स्वबळावर. आता हे पंधरा आमदार म्हणजे फक्त शेलारांच्या बळावर निवडून आल्यावर, त्यांची निष्ठा तिकडेच असणार. आणि जकपची हवा थोपवली, ती शेलारांनीच."
मोक्षने टीवी बंद केला.
पोलीस गाडीचा आवाज आला.
शहाण्णव मिस कॉल.
गाडीतून काही लोक उतरले, व सरळ हॉलमध्ये आले.
"बसा."
सगळे भेदरून खुर्चीवर बसले.
नव्यान्नव मिस कॉल.
"पंधरा..." मोक्षच्या तोंडातून समाधानाने शब्द बाहेर पडले.
आणि शंभराव्या वेळी वाजणारा फोन त्याने उचलला!!!!

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान .. नेहमीप्रमाणे..
भाग हि मोठा लिहिलायं..
चला, देर आए दुरुस्त आए...!!

Changala lihila aahe. Pan kahi doubts aahet,
Ha bhag 33 nahi na? to ajun vegalach asanar aahe ka?
Bhag 32 aani ya bhagachi mala link nahi lagali

छान आहे
उत्सुकता वाढली आहे... पुढील भाग लवकर टाका

या भागात अज्ञातवासी नी आपल्याला भविष्यातील कुठल्या तरी भागाची सफर घडवून आणली आहे. ३३ वा भाग नंतर असेल कधीतरी असे वाटते. जबरदस्त सर !

अज्ञात, हे देखील छानच लिहिलंय!
या भागापर्यंत चा मोक्षचा प्रवास लिहीण्यासाठी तुमच्या लेखणीत शुभेच्छा!