Patina

Submitted by ज्येष्ठागौरी on 16 May, 2021 - 11:23

Patina

पुस्तकांच्या कपाटातून पुस्तकं काढताना किंवा ठेवताना नेहमीच कुठल्यातरी दुसऱ्याच पुस्तकाची आठवण येतेच येते,मग त्या पुस्तकापर्यंत पोचायच्या वाटेत इतर पुस्तकं भेटत राहतात.ते सापडलं की जाणवतं की जुनं झालंय आता,पानांचे तुकडे पडताहेत पण नवीन प्रत आणायचं धाडस होत नाही,कारण त्या पुस्तकाभोवती असलेलं एक अदृश्य वलय असतं,घेतेवेळेला असलेल्या भावनेचं! त्यावर लिहिलेल्या शब्दांचं. एक सूक्ष्म वास असतो पुस्तकांना. एकेकाळी कोऱ्या पानांचा आणि बांधणीचा,आता वेगळा..विशेषतः इंग्रजी कादंबऱ्यांची पुस्तक, पानं पिवळी पडलेली आणि किंचित कुबट नव्हे पण विवक्षित असा कागदाचा वास!पण तरीही त्यातलं काहीतरी म्हणजे बहुतेक सगळंच हवंहवंसं वाटणारं.काळाचा स्पर्श होऊनही,अस्पर्श काही भावना!ती त्या पुस्तकाच्या आत्ताच्या स्थितीवर अवलंबून नसलेली भावना..
माझ्या माहेरच्या घरातलं एक अष्टकोनी टेबल माझ्याकडे आहे ते जुनं आहे पण इतकं सुंदर आहे की बघता क्षणी कोणीही विचारतं त्याच्याबद्दल!जुनं झालंय, सारखं पुसावं लागतं, पॉलिश करावं लागतं पण it's just worth it..त्याच्या वयाचा आणि सौंदर्याचा काही संबंध नाही.
सणावारी काढली जाणारी चांदीची ताटं भांडी अशीच! वर्षानुवर्षं घासघासून,ओरखडे पडूनही किती तेजस्वी दिसतात.त्याला एक खास झिलई असते,काळाच्या ओघात टिकून राह्यलं त्याची.
व्यक्तिमत्व असतं, नवीन पॉलीश केलेल्या भांड्याना ती सर नाही.
कधी माहिती नाही पण जुन्या तांब्या पितळ्याच्या भांड्यांची हौस अल्लाद मनात शिरली आणि सुदैवानं निघायचं नाव घेत नाहीये.पण ही भांडी सांभाळणं सोपं नसतं, घासून पुसून,हो अगदी अगदी ह्याच क्रमानं ती घासून आणि पुसून उन्हात ठेवावी लागतात.तरीही काही दिवसातंच त्यांच्यावर हवेचा परिणाम होऊन एक हलका हिरवा- निळा, वेड्यावाकड्या संगममरवरी आकारात असलेला थर चढतो,तो थेट पुढच्या घासण्यापर्यंत मुक्काम ठोकतो, थर म्हणा,राप म्हणा तोच हा "Patina" आणि तो न आवडणारी मंडळी आहेतंच पण अशा पद्धतीच्या वस्तू आवडणारी खूप मंडळी आहेत हेही ठाऊक झालं.आपण मात्र घासघासून त्यांना चकचकीत करणारे, प्रसंगी पॉलिश करुन आणणारे.पण काही मंडळी आहेत अशी जी वस्तू जशी आहे तसा तिचा स्वीकार करणारी आणि मुद्दाम अशा पद्धतीचं पॉलिश (patination) करुन घेणारी मंडळीही आहेत ह्याचा शोध मला नुकताच लागलाय!Statue Of Liberty वर सुदधा patina आहे.. असाच Patina चामड्याच्या वस्तूंवर असतो आणि लाकडाच्याही, कधी सूक्ष्म चिरांच्या स्वरुपात,भेगाळलेल्या रुपात मूळ सुंदरपणा थोडा कमी करतो खरा पण तरीही त्यामागे एक व्यक्तित्व आहे हे सदैव जाणवत राहतं.अर्थात त्या Patina असलेल्या वस्तूंचं सौंदर्य ज्याला दिसायचं त्याला दिसतंच.. मूळच्या रुपागुणाला प्रयत्नांतीही लपवता येत नाही.चामड्याच्या वस्तू वापरुन मऊ होत जातात आणि त्याला एक समृद्ध रुप येत जातं. आणि लाकूड Patina 'भेटला' की आणखी संपन्न दिसायला लागतं..काही घरंही अशीच गोड असतात , पिकत जाणारी.कधी कुठे बारीकश्या जागेत उगवलेलं पिंपळाचं रोप आणि कुठं आलेलं शेवाळं, थोडी पडझड झाली तरी ठाम उभी असणारी ! आधार देणारी.जास्त लक्ष द्यावं लागतं त्यांच्याकडे.पण एकदम भारदस्त आणि घरंदाज वाटायला लागतात, वयानुसार..
माझी पणजी मला छान आठवतीये कारण ती गेली तेंव्हा मी चक्क कॉलेजात होते!माझ्या आईची आजी!अगदी बारीक कुडी, गोरी, घारे मोठ्ठे डोळे,त्यावर चष्मा घालणारी होती.बारीक चौकड्याची हलक्या रंगाची नऊवार साडी आणि पांढऱ्या रंगाचं पोलकं.. तोंडावर प्रचंड ताबा, खाण्यात आणि बोलण्यातही.बोलायची कमी आणि नेमकं!शेवटची कित्येक वर्षं रात्री बिलकुल जेवायची नाही संध्याकाळी कुठे लहान थालीपीठ, नातवंड पतवंडांत वाटून इवलं स्वतः खायची..आमच्या घरचं भलं मोठं खटलं.आमच्याकडे कमी वेळा यायची पण आली की आईला भरभर मदतीला लागायची. नवरा गेल्यानंतर सात मुलांचा संसार एकटीनं हिमतीनं ओढला, सून, जावई, मुलं ह्यांचे मृत्यू पाहिले.पण खंबीरपणे उभी राहिली. काळाच्या खुणा तिच्यावरही दिसायच्या पण तरीही त्यामानाने कमीच!तिचं बोलणं एकदम कमी.ती जरा कडक वाटायची,आणि तिचा तसा सहवास कमी, तिची थोडी भीति वाटायची पण तरीही तिच्या आसपास असावं असं वाटायचं.
माझी वडिलांकडूनची आजी, BA अर्थशास्त्र, बनारस हिंदू विद्यापीठातून झालेली, आमच्याबरोवर कुठल्याही सिनेमाला यायची.. घट्ट काचा मारून नदीत पोहायची. ओशोंच्या व्याख्यानाला जायची, बाराक्षाराची औषधं द्यायची..कुठल्याही विषयावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेत बोलू शकायची. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात खूप उलथापालथ पाह्यलेली.धाडसी निर्णय घेतलेली ,थोडी विचित्र पण वेगळीच!काळाच्या बरोबर चालणारी.ही तिच्या पुढच्या वयात आणखी विचित्र झाली पण आधीची हुशारी अगदी तशीच राहिली.
नवऱ्याच्या पणजीनी शंभरी पार केली होती. पाचवी पिढी मांडीवर घेतली होती.त्यांचे अलवण नेसलेले फोटो आहेत आमच्याकडे.आयुष्याच्या लढाईबरोबर कोर्टकचेऱ्या केलेली ही बाई. नवऱ्याला आणि त्याच्या सगळ्या भावंडाना पणजीच्या आठवणींचे पट दिसत असतात नेहमीच!गोडकडूअनुभवांचे किती अमृतबोल ह्या माऊलीनी वाटले असतील.
आमच्या शेतावरची माणसं, उन्हात करपूनही, घट्ट कांबीसारखी!वय लहान असून वयानं मोठी दिसणारी.पण अस्सल खरीखुरी!
आईला आणि बापूंना हळुहळू वय वाढताना बघितलं. आईचे केस लवकर पांढरे झाले विचारलं की हसून म्हणायची, अरे संसार संसार! ते कधी काळे करायचं तिच्या डोक्यातही आलं नाही.बापूंचे मात्र केस निसर्गतःच काळे आणि काळानं जरी खुणा दाखवल्या होत्या तरी त्यांच्या वयापेक्षा दहा वर्षं तरी तरुण दिसायचे.त्या दोघांच्यातही काही बदल झाले वयानुसार..
ह्या सगळ्या माणसांमध्ये वय वाढत असताना ही माणसं ते यथाशक्ती स्वीकारत गेली असं मला वाटतं.शारीर बदलांबरोबर मनंही थोडी बदलली ह्यांची.स्वभाव बदलले, व्यक्तिमत्व थोडी फार बदलत गेली, चांगल्या वाईट दोन्ही अर्थानं..बाकीच्यांना हे मान्य करताना अर्थात अवघड जातं. पण शारीर, मानसिक बदलांबरोबरच भवतालात होणाऱ्या बदलांना सामोरं जात गेले,स्वतःला कधी बदलत, कधी न बदलता पण समोरच्या परिस्थितीचा स्वीकार करत ही माणसं जगली .खूप वेगवेगळ्या संकटांना सामोरं जाऊन रापलेलं आयुष्य, चेहरे, शरीर आणि मनही! रापलेलं म्हणजे जीवनेच्छा गेलेलं, सुकलेलं, उन्मळून पडलेलं नव्हे तर त्या गतकाळाच्या,संघर्षाच्या, लढाईच्या खुणा बिरुदासारखं बाळगणारं आयुष्य..सगळे बदल अगदी चांगले होते असं नाही. पण बदल घडले हे निश्चितच! काळाचा महिमाच तो. त्यांच्यावरही त्या अर्थानं Patina नक्कीच पांघरला गेला असणारे.
अलीकडे आरशात बघितलं की वयाच्या पाऊलखुणा मलाही दिसतात.भरपूर.. आपल्याच आपल्याला.शारीर आणि मानसिक दोन्हीत आपण जुने आणि नवीन ह्यात भरपूर फरक दिसत राहतो.कुठे केसात रुपेरी तारांचं मोहोळ,कुठे सैल पडणारी त्वचा मग"चाँदी उगने लगी है बालोंमें उम्र तुमपर हसीन लगती हैं। असं लिहिणारे गुलजार इतके जवळचे वाटतात..कुठे चष्म्याशिवाय सुईमध्ये अजिबात दोरा न ओवता येणं, कधी लांबचं धूसर दिसणं!कुठे कामाचा वेग कमी आणि विचारांचा जास्त होणं तर कधीतरी भावनांचा पूर तर कधी चक्क दगड!अनुभवांचं खूप डबोल साठलं साठलं म्हणता, अशी एखादी पावसाची अनभिज्ञ सर झोडपणारी .कधी मनात स्वस्थता तर कधी व्याकुळता,दोन्हींचा आवेग वेगळा आणि जास्त!
कधीतरी ह्या सगळ्या शारीर बदलांचं दुःख होतं आणि कधी मनातला निरागसपणा गेल्याचंही दुःखही होतं..पण आता हळुहळू तो स्वीकारण्याचा विवेकही येईल, किंबहुना यायला लागलाय!काळाच्या खुणा अंगावर आणि मनात बाळगणं ही वेगळीच गोष्ट आहे.त्या येणं, त्यांचे शरीर आणि मनावर ठसे उमटणं हेही तितकंच नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे.त्याचा तसाच स्वीकार सहज व्हायला हवा माझ्याकडून,हे मात्र खरं..हा Patina मी तसाच स्वीकारायला हवा कारण तेच सत्य आहे.वर्षानुवर्षं जरासुद्धा बदल नाही असं ज्यांच्याबद्दल म्हणता येईल अशा माणसांना , त्यांच्या जनुकांबद्दल, त्यांच्या प्रयत्नांबद्दल खूप मनापासून दंडवत!पण बदलत जाणं,चांगले आणि काही फारसे चांगले नसणारे बदल होणं,काही अचानक, काही संथगतीने आणि काही गोष्टी तात्पुरत्या आणि बहुतांशी कायमसाठी बदलणं,काही राप तन मनावर बसणं हे किती नैसर्गिक आहे. ह्या रापाची एक गंमत आहे,Patina त्यांनाच लाभतो जे काळाच्या ओघात टिकतात, शरीर आणि मनाला सांभाळतात झंझावातातही!पूर्वसंचित म्हणूनही जिती राहतात, शरीर आणि मनानी!माझ्यासमोर अशी माणसं डोळ्यासमोर आली ज्यांना ही संधीच मिळाली नाही. काळानुसार राप येण्याइतका काळ त्यांना मिळालाच नाही. जे जगतात त्यांना ह्या patina ला सामोरं जावं लागतंच आणि ते अनिवार्य असतं.आणि त्यात नकारात्मक असं काहीच नसतं. असतं ते सगळं नैसर्गिक, काळाच्या गतीमुळे झालेलं.. तो गंज नव्हे कारण गंज म्हणजे एक प्रकारचा ऱ्हास. Patina म्हणजे वस्तूवर काळानुसार आलेला राप, संरक्षक लेपही म्हणता येईल.त्याच्या चांगल्या वाईटासकट स्वीकारणं हे सोपं नाहीये पण मग माझ्या मागच्या पिढीच्या माणसांना हे सहज जमलं का?त्यांच्या स्वतःमधले आणि भोवतालीचे असे राप बसल्यामुळे झालेले बदल त्यांना सहज स्वीकारता आले का!हा Patina त्यांना पेलता आला का सहज!माझ्या आधीच्या पिढ्यांची मनाची बैठक जास्त पक्की होती का!ह्या दोलायमान स्थितीतून त्यांनी कसा मार्ग काढला!चार्ली चॅप्लिनचं वाक्य आहे, if you are truthful to yourself ,it's a wonderful guidance.असं त्यांनी उमजून घेतलं असेल का!
सगळ्याच नैसर्गिक गोष्टींना हा Patina लाभतो,अनिवार्यपणे मिळतो.काहींना तो आवडतो तर काहींना नाही.काहींना लाभतो काहींना नाही..
स्वतःत शारीर आणि मानसिक बदल होताना बघणं कमालीचं बहारदार आहे.Patina हळुहळू आला आहेच, काही गोष्टी भिववणाऱ्या असल्या तरी सगळ्या नाहीत.मूळ काही बरचसं शिल्लक आहे त्याखाली, किंबहुना त्या लेपाखाली सुरक्षित आहे.Patina च्या निमित्तानं स्वतःमध्येही डोकावून बघता आलं.वस्तू आणि माणसं ह्यांच्यावरचा Patina दिसला तर तो स्वीकारायला मदत होईल आता, त्याचं आणि त्यामागचं सौंदर्य नक्की दिसेल..
ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख.
जरा लांबला गेलाय हे मावैम.

मला तुमचं लिखाण फार सुखद वाटतं म्हणजे मी लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत बाल्कनी मध्ये बसून अंगावर गार वारा घेत आवडतं पुस्तक वाचत बसायचे त्यावेळेला जी फिलिंग असायची तसं वाटतं मला.
खूप छान लिहिता तुम्ही.

हे ललित ही आवडलं हे वेगळं सांगायला नकोच Happy

तुमच्या शैलीची मी फॅन आहे. कसं इतकं विविधांगाने न्याहाळत, फुलवत एखादी संकल्पना/शब्द मांडता येतो, तुम्हीच जाणो.