भारताच्या या भागावर चार देशांनी राज्य केले

Submitted by प्रसाद70 on 12 May, 2021 - 05:40

भारताच्या या भागावर चार देशांनी राज्य केले

© प्रसाद शेज्वलकर
भारतातील एखाद्या भागावर चार देशांनी राज्य केले होते असे कोणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल? पण हे खरं आहे. भारतातील अंदमान निकोबार बेटांपैकी निकोबार बेटांवर चार देशांनी राज्य केले होते .
प्रथम डँनिश लोकांनी 'डँनिश इस्ट इंडिया 'तर्फे निकोबार बेटांवर वसाहत करण्याचा प्रयत्न केला. 'माँरीशस मिशनरी 'यांनी दिलेल्या माहितीनुसार निकोबार बेटांवर , 'मिरी ,ऊस, काँफी, सिनेमाँन आणि कापूस ' यांचे पिक येऊ शकते. तसेच नारळ, सुपारी आणि भरपूर लाकूड उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे हा भाग जहाज बांधणी उद्योगासाठी अगदी योग्य असल्याचे म्हटले होते. डँनिश, मोरियन मिशनरींनी 1795- 1851 निकोबार बेटांवर वसाहती करण्याचा प्रयत्न केला. पण मलेरिया आणि डँनिश सरकारच्या उदासीनतेमुळे यात ते पूर्णपणे यशस्वी होऊ शकले नाहीत. सुरवातीच्या काळात डँनिश लोकांनी नानकवरी, कामोरेटा या बेटांवर वसाहती केल्या त्यानंतर त्यांनी टेरेसा, बांबूका आणि कार निकोबार बेटांवर वसाहती केल्या, पण मलेरिया आणि तेथील वातावरणाला कंटाळून मिशनरी भारतात परत आले. डँनिश सरकारने कार निकोबार मध्ये 8 डँनिश सैनिक पाठवून त्या बेटांचा ताबा आपल्या कडेच राहील असे बघितले. डँनिश सरकारने या वसाहतींना ''फ्रेडरीक आयलंड' नाव दिले होते. डँनिश सरकारने डेन्मार्क मधे पेपरात जाहीरात देऊन कार निकोबार बेटांवर राहायला येणाऱ्यांना चार वर्षे फुकट अन्नधान्य व इतर जरुरीच्या गोष्टी पुरवण्याची हमी दिली. पण या जाहिरातीला प्रतिसाद मिळाला नाही, शेवटी डँनिश लोकांनी 16 आँक्टोबर 1868 ला या वसाहती ब्रिटिश सरकारला विकल्या. दरम्यान (1756-1768)डँनिश लोकांनी दूध आणि मांस यासाठी आणलेल्या 50 गाई व डुकरे तिथेच सोडून निघून गेले.
निकोबार बेटांवरील लोक दूध व मांस खात नसल्यामुळे या गायींची संख्या वाढली. 2004 च्या सुनामीचा फटका या ट्रिंकलेट बेटाला बसला, त्यामुळे भारत सरकारने या गायींना कामोत्रा बेटावर नेऊन सोडले. आता पूर्णपणे जंगली असलेल्या या गायींची संख्या 2018-19च्या रिपोर्ट नुसार वाढून 150 पर्यंत पोचली आहे.
1776 मधे बोल्ट नावाच्या माजी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांने ऑस्ट्रियाच्या राणीच्या सहाय्याने ' ऑस्ट्रिया एशियाटीक कंपनी आँफ ट्रीस्टे ' स्थापन केली. बोल्ट ने काढलेल्या अनेक मोहीमांपैकी एका 1778 च्या मोहीमेत तो, जोसेफ व थेरेसिया नावाच्या जहाजातून निकोबारला आला. त्याने सर्व 24 बेटे ऑस्ट्रियाने ताब्यात घेतल्याचे जाहीर केले. बोल्टने येथे 'स्थल ' नावाच्या सहकाऱ्याला या वसाहतींच्या प्रमुख पदी नेमले. 1783 मध्ये स्थलचा म्रुत्यू झाला आणि ऑस्ट्रियाने निकोबार बेटांचा ताबा सोडून दिला. ऑस्ट्रिया ने 1886 मध्ये पुन्हा निकोबार बेटांचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच ब्रिटीशांनी ही बेटे डँनिश सरकारकडून ताब्यात घेतल्याने त्यांचा हा प्रयत्न असफल ठरला.
1864- 1868 च्या दरम्यान इटालियन मंत्री 'लुईगी टोरेली' यांनी निकोबार बेटे डँनिश सरकारकडून विकत घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांची राजकीय कारकीर्द अनपेक्षितपणे संपुष्टात आल्याने या गोष्टीला पूर्ण विराम मिळाला.
दुसर्या महायुद्धात ही बेटे 1942-1945 पर्यंत जपानच्या ताब्यात होती. जपानने शरणागती पत्करल्यावर ब्रिटीशांनी पुन्हा ही बेटे ताब्यात घेतली. भारत स्वतंत्र झाल्यावर ब्रिटीशांना या बेटावर त्यांच्या देशातील, अँग्लो इंडीयन व अँग्लो बर्मीज लोकांची वसाहत करावयाची होती, पण त्यात ते असफल झाले.
भारत स्वतंत्र झाल्यावर सुरुवातीच्या काळात निकोबार बेटांना भारत सरकारने फारसे महत्त्व दिले नाही. त्यामुळे लोकवस्ती असलेल्या बारा बेटांवर आणि लोकवस्ती नसलेल्या तीन बेटांवर भारत सरकारचे फारसे अस्तित्व जाणवत नसे. त्याकाळात पन्नास च्या दशकात एकदा निकोबार बेटाचे कमिशनर ए. के. घोष दक्षिण निकोबार मधील कोंडूल , छोटे निकोबार बेटाला भेट द्यायला गेल्यावर तेथील खेड्याचा मुख्य ब्रिटिश युनियन जँक झेंडा घेऊन भेटायला आला. त्याला ब्रिटिश सरकारची निकोबार वरील सत्ता संपुष्टात आल्याचे माहिती नव्हते. नंतर त्याला युनियन जँक काढून भारताचा झेंडा देण्यात आला.

Ref-: 1. https://en.wikipedia.org/wiki/Nicobar_Islands
2.Book on Andaman and Nicobar islands India’s untapped strategic assets by Sanat Kaul

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वेगळी माहिती आहे.
इतके देश राज्य करायला येत जात असताना स्थानिक जनतेने अजिबात प्रतिकाराच प्रयत्न केला नाही का? त्या सेंटिनल वगैरे इतक्या भितीदायक ट्राईब्स असून?

ग्लोबल वोर्मिंग होऊन निकोबारमधील काही बेटे आधीच बुडाली आहेत , उर्वरित बेटेदेखील अजून 50,100 वर्षात समुद्रात अर्पण होतील

स्थानिक जनतेकडे प्रगत शस्त्रं आणि तंत्र नसणार.
१७६८ (की १८६८?) साली पन्नासच्या संख्येने असलेल्या गायी आणि डुकरं २००४ मध्ये १५० झाली या माहितीचं महत्त्व कळलं नाही.

@ वावे लेख वाचल्या बद्दल प्रथम धन्यवाद.
खरं तर हि अवांतर माहिती आहे पण वेगळी वाटली म्हणून दिली.1768 ला जरी डॅनिश लोक सोडून गेले तरी बेटाचा ताबा अधिकृतपणे डॅनिश सरकारकडेच 1868 पर्यंत होता.

छान माहिती आहे
अंदमान आणि निकोबार किंवा दोन पैकी एक बेट हे सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मीकडेही काही काळ होते, जपान्यांनी ते आय इन ए च्या ताब्यात दिले होते . जपानचा पराभव झाल्यावर ते पुन्हा ब्रिटीशांकडे परत गेले.
हे सगळे नेमके कुठे वाचलेय ते आठवत नाहीये. इतर कुणी याची सत्यासत्यता सांगू शकत असेल तर सांगा.