नवीन लेखक/लेखिकांनी सोशल मीडियावर लिहिताना कोणती खबरदारी घ्यावी?

Submitted by बोकलत on 12 May, 2021 - 02:37

धाग्याचं शीर्षक स्पष्ट आहे. अनेकांना वाचण्याची लिहिण्याची हौस असते. मी जेव्हा जॉब करायला सुरवात केली त्यावेळी माझा एक रूम पार्टनर होता त्याला लिहिण्याची हौस होती. त्याने लिहिलेले एक दोन लेख मी वाचले. खूपच सुमार दर्जाचे होते. पण मी त्याच्या तोंडावर छान आहे मस्त लिहिलंय असच बोलत असे, किंबहुना तसं बोलायला लागत असे. तो ते लेख कंपनीतल्या काही लोकांना पण वाचायला देत असे ते लोकंसुद्धा त्याच्या तोंडावर वाहवा करत असत पण पाठ फिरली कि हाणत असत. तर त्यावेळी तो लेख सोशल मीडियावर टाकत नसे. समजा जर त्याने ते सोशल मोडियावर टाकले असते तर लोकांनी चांगलंच फटकारलं असतं. तर सांगायचा मुद्दा हा कि जे नवीन लेखक सोशल मीडियावर येतात त्यांना खऱ्या प्रतिक्रिया झेलाव्या लागतात. खऱ्या लाईफमध्ये त्याच्या लिखाणाला वाहवा मिळत असते त्यांना अचानक दुसऱ्या टोकाच्या प्रतिक्रिया मिळाल्या तर एकतर त्याची लिहिण्याची ईच्छा संपून जाते किंवा संताप राग येऊन ते दुसर्यांना पत्युत्तर देतात. जे लेख चांगले आहेत त्यांनाही सोशल मीडियावर वाईट प्रतिसाद झेलावे लागतात. जे जुने मुरलेले असतात ते यामधून तरून जातात पण नवीन लेखक/लेखिकांचे खच्चीकरण होते. तर नवीन लेखक/लेखिकांनी सोशल मीडियावर लिहिताना कोणती काळजी घ्यावी आणि माइंडसेट नक्की कसा ठेवावा याबद्दल हा धागा आहे.

Group content visibility: 
Use group defaults

छान धागा.
हे माझ्याशीही झालेले.
जेव्हा ऑर्कुट मरायला आलेले तेव्हा काही समूह मायबोलीच्याच धर्तीवर सक्रिय होते. तिथेही मी असेच भारंभार धागे काढायचो. एकदा गडचिरोलीला जाऊन आलो तर त्याच्या अनुभवावर धागा लिहायला घेतला. काहीतरी ईंटरेस्टींग करायला त्या खर्‍याखुर्‍या अनुभव कथनात नक्षलवादी घुसवले आणि बघता बघता त्याची कथा झाली. पहिल्याच प्रयत्नाच्या मानाने छान जमले म्हणून लोकांनी कौतुक केले आणि मी स्वतःला चक्क लेखक समजू लागलो. त्यानंतरही बरेच जिलब्या पाडल्या, पन्नासेक लेख कथा लिहिल्यावर चार पाच जमतातही. त्या मासिकात छापूनही आल्या. त्याचे पैसेही मिळाले. तेव्हा तर मला अगदी निवृत्तीनंतर आपण हेच करायची असे स्वप्नेही पडू लागली.

आणि मग तेच झाले जे माझ्या लेव्हलच्या लेखकांचे होते. लिखाणात तोचतोचपणा येणे, आयुष्यातील बरेचसे अनुभव लिहून होणे, नवीन कल्पना संपणे, एका मर्यादेपुढे लिखाणात सुधारणा होणे बंद होणे, आधीसारखे उत्स्फुर्तपणे लेखन न होणे वगैरे ....

हे कुठेतरी आपल्या लक्षातही येते. पण लिखाणाची हौस जोपर्यंत फिटत नाही तोपर्यंत लेखक लिहीत राहतात. आणि लिखाणावर आधीसारखे प्रतिसाद येत नाहीत म्हणून चिडचीड करत राहतात.

प्रत्येक लेखकाने स्वतःच आपल्या मर्यादा ओळखणे गरजेचे - वरवर म्हटले तर फार सोपे आहे हे. पण कोणालाही जमणे तितकेच अवघड.

नेहमी स्वानंदासाठी लेखन करावे - हाच यावर ऊपाय. म्हटले तर सोपा पण जमणे तितकेच अवघड.

माझ्यापुरते सांगायचे झाल्यास एखाद्या सोशल मिडीया लेखकाच्या कारकिर्दीत येणार्‍या या सर्व फेजेस पार करत मी सध्या माझ्या मर्यादा ओळखून स्वानंदासाठी लिहिणे चालू आहे असे म्हणू शकतो. कोणीही जितके लवकर तिथे पोहोचेल तितके त्यासाठी चांगले असते. अन्यथा याचा वैयक्तिक आयुष्यावरही विपरीत परीणाम होऊ शकतो. एखाद्याशी ते होऊ नये म्हणूनच मी माझ्या परीने अश्या फेजमधून जात असलेल्या लेखकांना कधी नकारात्मक प्रतिसाद देत नाही किंवा ईतरांनीही तसे करू नये अशी विनंती करतो. सगळ्याच व्यक्ती एकसारख्या काळजाच्या नसतात.

नवीन लेखक/लेखिकांनी सोशल मीडियावर लिहिताना कोणती खबरदारी घ्यावी? >> CAPS LOCK चेक करावे. कीबोर्ड कोणत्या भाषेत आहे ते पहावे. आत्ता आपण कोणत्या अवातारात आहोत याची एकदा खात्री करावी आणि मगच लिहावे. नाहीतर काशीच्या राणीचा प्रतिसाद वाशीच्या राजासारखा येतो.

नवीन लेखक असताना बरेचदा आपण आपल्या लिखाणाविषयी वस्तुनिष्ठ विचार न करता भावनिक विचार अधिक करतो. "खूप मेहनत घेतली आहे, खूप मनापासून लिहीले आहे, सर्वाना आवडणार हे यात वादच नाही" इत्यादी. त्यामुळे ते आपल्याला स्वत:ला चांगलेच वाटायला लागते. आणि हे केवळ लेखनालाच नाही तर गाणे/चित्रकला/अभिनय व सगळीकडेच लागू पडते. पण होते काय कि असे भावनिक होऊन कलाकृती/लिखाण सादर केल्याने जे आपणास ओळखत आहेत ते केवळ आपले मन राखण्यासाठी त्याला चांगले म्हणतात. किंबहुना त्यात अनेक गोष्टी चांगल्या असतात सुद्धा तो प्रश्न नाही. पण त्यातल्या ज्या चुका आपल्या आंधळ्या प्रेमापोटी आपल्याकडून दुर्लक्षित झालेल्या असतात त्या खरेतर बऱ्याच खटकणाऱ्या (blunder mistakes) असतात. व हे लोक त्या लक्षात येऊनसुद्धा आपल्याला दाखवत नाहीत. कारण त्यांना आपल्याला दुखवायचे नसते.

पण हेच लेखन/कलाकृती जेंव्हा सोमि किंवा पब्लिक फोरमवर जाते, तेंव्हा आपल्याला व्यक्तिगत ओळखत नसणारे वाचक/श्रोते/प्रेक्षक त्याकडे केवळ एक साहित्य/कलाकृती म्हणून बघतात. आणि त्यांना त्यातल्या या खटकणाऱ्या गोष्टीच आधी लक्षात येतात. मग येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रिया साहजिकच आपल्याला दुखावतात. खरतर अशा प्रतिक्रिया आपले लेखन/कला सुधारण्याच्या दृष्टीने गरजेच्याच असतात. पण विनाकारण भावनिक झल्याने आपण त्या अव्हेरतो आणि त्याचा आपल्यावर नकारात्मक परिणाम होतो.

तात्पर्य: आपले नवीन लेखन/कला सादर करताना आपण त्याबाबत नाहक भावनिक होणे टाळावे. आपण कितीही काळजीपूर्वक प्रेमाने मनापासून वगैरे केले असले तरी त्यात भयंकर चुका असणार आहेत हे गृहीत धरलेले बरे असते.

<<
लोकंसुद्धा त्याच्या तोंडावर वाहवा करत असत पण पाठ फिरली कि हाणत असत. >>
काही जण कोडगे असतात. तोंडावर सांगितले तरी सुधरत नाहीत. अश्यांकडे दुर्लक्ष केलेले उत्तम.

<< सध्या माझ्या मर्यादा ओळखून स्वानंदासाठी लिहिणे चालू आहे असे म्हणू शकतो. >>
जरा स्पष्ट लिहितो, राग मानू नये. लेखन बऱ्याचदा चांगले असते, पण लिखाणातील नार्सीस्टिक टोन कमी केला, तर अजून चांगले लिहू शकाल असे माझे मत आहे.

सोशल मीडीयात लिहीताना धाग्याचा विषय सोडून कॉमेडी प्रतिसाद द्यावेत ज्यामुळे धाग्याचा बाजार उठू शकेल. पण हेच आपल्या बाबतीत झाले की संबंधिताच्या धाग्यावर जाऊन अमक्या तमक्याची आठवण आली, शैली फलाण्याची आहे असे स्कोअर सेटल करावेत. ही कला कष्टसाध्य असली तरी अशक्य नाही.

पहिल्यांदा अक्षर सुवाच्य असेल ही खात्री करुन मगच लिहायला सुरुवात करावी.
काही जणांच अक्षर इतकं खराब असतं जणु कोंबडीच्या नख्या. तस्मात पाटीवर गिरवुन मग अक्षर चांगले झाले की लिहावे.

सोशल मीडीयात लिहीताना धाग्याचा विषय सोडून कॉमेडी प्रतिसाद द्यावेत ज्यामुळे धाग्याचा बाजार उठू शकेल. पण हेच आपल्या बाबतीत झाले की संबंधिताच्या धाग्यावर जाऊन अमक्या तमक्याची आठवण आली, शैली फलाण्याची आहे असे स्कोअर सेटल करावेत. >>> माझा काही स्कोअर सेटल करण्याचा विचार न्हवता. आपल्यात काही वादच नाही झाला तर स्कोअर सेटल कशाला करू मी. तरीपण त्या कमेंटने तुम्ही दुखावला असाल तर तुमची माफी मागतो.

तरीपण त्या कमेंटने तुम्ही दुखावला असाल तर तुमची माफी मागतो. >>> हे काही समजले नाही. धाग्याच्या अनुषंगाने दिलेला प्रतिसाद आहे तो. स्वतःवर घेऊ नये हे सांगणे न लगे. Wink

स्वतःच्या अनुभवात बुडी मारुन मारुन असे कितीसे मोती हाताला लागणार त्याला मर्यादा असणारच. आपले अनुभव सान्त असतत. पण तेच जर लोकांचे नीरीक्षण केले आणि त्यावरती लेख / कथा बेतल्या तर अनंत संधी आहेत.

जरा स्पष्ट लिहितो, राग मानू नये. लेखन बऱ्याचदा चांगले असते, पण लिखाणातील नार्सीस्टिक टोन कमी केला, तर अजून चांगले लिहू शकाल असे माझे मत आहे.
>>>>>>

राग कश्याला मानावा. मला स्वतःलाही याची कल्पना आहे. पण माझा मूळ स्वभावर तसा आहे त्याचे एका पर्यादेपलीकडे काही करू शकत नाही. म्हणजे आवर घालू शकतो अध्येमध्ये, पण कायमचा बदलू शकत नाही.
गेले दोन दिवस कामात तुडुंब बिजी आहे, अन्यथा यावर एक जनरल चर्चेचा धागा काढायचा आहे मला...

>><< सध्या माझ्या मर्यादा ओळखून स्वानंदासाठी लिहिणे चालू आहे असे म्हणू शकतो. >>
जरा स्पष्ट लिहितो, राग मानू नये. लेखन बऱ्याचदा चांगले असते, पण लिखाणातील नार्सीस्टिक टोन कमी केला, तर अजून चांगले लिहू शकाल असे माझे मत आहे.<< +१
परंतु नार्सिस्टिक टोन बाबत माझं थोडं वेगळं मत आहे; काय ते सांगतो - इथे माबोवर सिझन्ड नार्सिसिस्ट आहेत, काहि सटल, तर काहि नॉयझी; काहि ओपन फोरम मधे (एफ्यु मोड मधे) लिहिणारे, तर काहि आपापल्या बंदिस्त कंपुत लिहिणारे, डाइंग टु गेट रेकग्नाय्झ्ड. Wink मुद्दा तो नाहि, कारण त्यात वावगं काहि नाहि . पण जाहिररित्या आपलीच तुतारी वाजवणे, आणि लेखनाच्या ओघात आपली प्रायवसी (जी इतरांना अ‍ॅस्ट्रानामिकली ब्रॅगिंग वाटु शकते) उघडी करणे यात फरक आहे, असं मला तरी वाटतं. ऋन्म्या, या दुसर्‍या प्रकारात मोडतो, हे माझं निरिक्षण आहे... Proud

हे माझं निरिक्षण आहे>> राज भाई वीकांताला मस्त सुरुवात केलीत सिक्सर मारून. माह्या तर्फे तुम्हास्नी
Callaway Strata Plus 2019 14-Piece Club Set घ्या.

इतका त्रास करून कशाला लिहितात हे पब्लिक. नीरस जीवनाचे धुरकट कवडसे?

रिसर्च करून एक चांगले पुस्तक लिहा मेहनत करा ते नाही. साधे प्रूफ रिडिन्ग पण करत नाहीत. एडिट करत नाहीत.

छान धागा आहे, चर्चा सकारात्मक चालू आहे. माझ्यासारख्या नवख्यांना शिकण्यासारखं खूप आहे.... तुमचे अनुभव, तुमचे विचार मी नक्कीच ध्यानात घेईन

मी असं सुचवेन की नवीन लेखकाने /लेखिकेने स्वत:चे कुठलेही लेखन सोशल मिडियावर प्रकाशित करण्याअगोदर , इतर लेखकांच्या लेखनावर प्रतिसाद देऊन सुरुवात करावी. त्यातून तुम्हाला जसे जमेल, जितके जमेल तितके लिहण्याची सवय होईल. सहसा प्रतिसादांकडे इतर वाचक खूप टिकाकाराच्या दृष्टीतून पहात नाही. एखाद्याने मुद्दाम खोचक प्रतिक्रिया तुमच्या प्रतिक्रियेवर दिलीच तरी आपण दुसर्‍या दिवशी जिवंत राहतो हे लक्षात येईल. सुरुवातीच्या काळात आपल्या लेखनावर वाईट प्रतिक्रिया आली तर खूप दु:ख होतं पण आपल्या प्रतिक्रियेवर वाईट प्रतिक्रिया आली तर तितकं होत नाही. उलट कातडी जाड व्हायला मदत होते.

हळुहळु ते प्रतिसाद जास्त सकस , मूद्देसूद कसे होतील हे पहावे. त्यातुन तुमच्या प्रतिसादांचा (आणि पर्यायाने तुमचाही) वाचकवर्ग तयार होईल. जर प्रतिसाद खरोखर प्रामाणिक आणि वरवरचे नसतील तर तुम्ही त्या लेखकांच्याही लक्षात रहाल.

आणि मग काही आठवड्यांनी तुमचे लेखन प्रकाशित करा. तो पर्यंत तुम्हाला प्रोत्साहन देणारा वाचकवर्ग तयार झाला असेल. त्यांच्या प्रतिक्रिया वाचून तुम्हालाही नवीन लिहायला हुरुप येईल.