सोस केवढा जगावयाचा!

Submitted by निशिकांत on 11 May, 2021 - 12:10

सोस केवढा जगावयाचा !

सभोवताली असून परके, सोस केवढा जगावयाचा !
प्रयत्न असतो मेल्यावरही किर्तीरुपाने उरावयाचा

सुखात जगलो मायबाप अन् पत्नीसंगे तरी कशाला
मिथ्या हिणवत त्यांना, ईश्वर ना दिसलेला पुजावयाचा

तुळशीची घालून माळ का शुचित्व मिळते कधी कुणाला?
आचरणाने शुध्द व्हावया, प्रयत्न असतो करावयाचा

दाखवतो का माध्यान्हीचा सूर्य दरारा जगास इतका?
माझी छाया प्रयत्न करते पायाखाली लपावयाचा

संकट आले आज असे की, एकी असणे घातक आहे
रहा वेगळे कोविदसाठी मंत्र नेहमी जपावयाचा

चिमटीमधुनी सुटून गेले सुवर्ण क्षण ते आयुष्याचे
आठवणींच्या जळमटातुनी मार्ग दिसेना निघावयाचा

प्रकाश करतो प्रवास हल्ली हात धरोनी अंधाराचा
उजेड शिकला काळोखाचा कसा कवडसा बघावयाचा

"रोज प्यायचे बरे नव्हे हे" असे सांगता म्हणे बेवडा
 कुणास आहे जगावयाचे? सराव करतो सरावयाचा

तुझे कसे "निशिकांत "आपुले? तुला हिणवती उठता बसता
पंख छाटले वरून म्हणती प्रयत्न कर तू उडावयाचा

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझे कसे "निशिकांत "आपुले? तुला हिणवती उठता बसता
पंख छाटले वरून म्हणती प्रयत्न कर तू उडावयाचा

छान. आवडले. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे