’नायिका महाभारताच्या’ व्याख्यानमाला

Submitted by वावे on 10 May, 2021 - 12:43

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या ’नायिका महाभारताच्या’ नावाच्या एका व्याख्यानमालेला उपस्थित राहण्याची संधी मला नुकतीच मिळाली. ही व्याख्यानमाला अर्थातच ऑनलाईन होती. डॉ. सुचेता परांजपे, डॉ. गौरी मोघे आणि डॉ. अरुणा ढेरे या तीन विदुषींची एकूण सहा व्याख्यानं या मालेत होती. तीन शनिवार-रविवारच्या सकाळी अशा प्रकारे सत्कारणी लागल्या. या व्याख्यानमालेविषयी थोडं लिहावंसं वाटलं.

महाभारत हा ग्रंथ आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेला आहे. अभ्यासक, संशोधक, ललितलेखक, कादंबरीकार, नाटककार, वैचारिक लेखक, कवी, रसिक अशा विविध भूमिकांतील व्यक्तींकडून महाभारताचा अभ्यास आणि आस्वाद शेकडो-हजारो वर्षं सतत सुरू आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने अनेक संशोधकांच्या अनेक वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर महाभारताची ’चिकित्सक आवृत्ती’ म्हणजेच ’क्रिटिकल एडिशन’ सिद्ध केली. या चिकित्सक आवृत्तीला आधारभूत मानूनच या व्याख्यानमालेतली (डॉ. अरुणा ढेर्‍यांचं लोकदेवता द्रौपदी हे एक व्याख्यान सोडून) सर्व व्याख्यानं झाली.

सत्यवती, कुंती, गांधारी, गंगा, माद्री आणि द्रौपदी या महाभारताच्या सहा नायिकांवर ही व्याख्यानं होती. खरं म्हणजे या सगळ्या विविध कालखंडातल्या हस्तिनापूरच्या राण्या. पण प्रत्येकीची कहाणी विलक्षण. लग्नानंतर सुखासीन, सुरळीत आयुष्य यापैकी कुणाच्याच वाट्याला आलं नाही.
मत्स्यगंधा किंवा योजनगंधा सत्यवती ही खरं तर ’उपरिचर’ नावाच्या राजाची मुलगी. पांडव नंतर अज्ञातवासात ज्याच्या दरबारात राहिले, तो विराट हा तिचा जुळा भाऊ. एका कोळ्याला ही जुळी मुलं माशाच्या पोटात सापडली आणि त्याने ती उपरिचराला नेऊन दाखवली. राजाने ओळखलं, की ही आपलीच मुलं आहेत. पण त्याने मुलाला, म्हणजेच विराटाला ठेवून घेतलं आणि मुलीला मात्र त्या कोळ्याला दिलं. अशी ही मुळातली राजकन्या असलेली सत्यवती एका कोळ्याच्या घरी वाढली. महाभारतात सत्यवतीची अशी कथा सांगितलेली आहे. हा कथाभाग मला याआधी माहिती नव्हता. पुढे तिचा लहान वयात पराशर ऋषींशी आलेला संबंध, त्यातून जन्माला आलेला मुलगा कृष्णद्वैपायन, म्हणजेच महर्षी व्यास, नंतरच्या काळात तिच्यावर राजा शंतनु मोहित झाला वगैरे कथा आपल्याला माहिती असतेच. अतिशय चतुर अशी ही स्त्री. आपल्या फायद्याच्या अटींवर हस्तिनापूरची महाराणी बनली, पण नंतर तिच्या आयुष्यात कठीण प्रसंग ओढवले. त्या त्या परिस्थितीत तिने हुशारीने मार्ग काढला, भीष्माच्या मदतीने राज्यकारभार आणि कुरुवंश पुढे चालू ठेवला. डॉ. सुचेता परांजपे यांनी अतिशय ओघवत्या भाषेत सत्यवतीचं व्यक्तिमत्त्व उभं केलं.

गांधारी ही दूरच्या गांधार देशातली. म्हणजेच आजच्या अफगाणिस्तानातली. आपला नवरा अंध आहे हे कळल्यावर तिनेही डोळ्यांवर कायमची पट्टी बांधून घेतली आणि आपल्या या कृतीने ’साध्वी’ म्हणून प्रजेच्या मनात स्थान मिळवलं. परंतु तिच्या हातात सत्ता म्हणावी अशी काहीच नव्हती. नवर्‍याकडे तिच्या शब्दाला मान नव्हताच, पण दुर्योधनादि मुलांनाही ती आपल्या आज्ञेत ठेवू शकली नाही. सख्खा भाऊ शकुनी कपटाचे खेळ करतो आहे हे कळूनही ती ते थांबवू शकली नाही. कुंतीशी मात्र तिचे संबंध सौहार्दाचेच होते. कुंतीनेही गांधारीला मोठी जाऊ म्हणून, सासूच्या जागी समजून कायम मान दिला, तिला सांभाळून घेतलं. पुढे युद्धानंतर जेव्हा ते सगळे वानप्रस्थाश्रम स्वीकारून अरण्यात जाऊन राहिले तेव्हा कुंतीनेच गांधारीची सेवा केली.
डॉ. सुचेता परांजपे यांनी गांधारीविषयी बोलताना एक हृद्य मुद्दा मांडला. तो असा, की जेव्हा तिला मुलं झाली, तेव्हादेखील तिला एकदाही असं वाटलं नसेल का, की आपण आपल्या बाळांना तरी एकदा डोळे भरून पहावं? बाकी धृतराष्ट्राबद्दल आणि एकूणच वाट्याला आलेल्या आयुष्याबद्दल तिच्या मनात राग, उद्वेग असणं स्वाभाविक आहे, पण तिला आपल्या मुलांनाही बघावंसं वाटू नये? इतकी निरिच्छ ती कशी झाली असेल? दुसरं म्हणजे तिने डोळ्यांवर पट्टी बांधून घेण्याऐवजी जर तीच नवर्‍याचे डोळे होऊन राहिली असती, राज्यकारभारात लक्ष घालू लागली असती, तर कदाचित पुढे घडणार्‍या अनेक कटु घटना टळल्या असत्या. पण ती चिडून आयुष्यभर अंध होऊनच राहिली.

कुंतीबद्दल बोलताना डॉ. अरुणा ढेरे यांनी तिचं कर्णाच्या बाबतीतलं दुर्दैव सविस्तरपणे मांडलं. लहान वयात अजाणतेपणी झालेल्या मुलाला दूर करावं लागणं हे एक दु:ख आणि नंतर योगायोगाने तोच मुलगा कायम समोर असूनही हे सत्य कुणालाही सांगता न येणं, त्या मुलाचा स्वीकार न करता येणं हे अजून मोठं दु:ख दीर्घकाळ तिच्या वाट्याला आलं. पण ती नेहमी धीराने, हिमतीने वागली. पतीचा अकस्मात मृत्यू झाल्यावर आणि माद्री सती गेल्यावर पाची मुलांना घेऊन हस्तिनापुरात ती परत आली. तिने नकुल-सहदेवांनाही स्वतःचीच मुलं असल्यासारखं प्रेम दिलं. पुढे लाक्षागृहातून वाचल्यावर मुलांबरोबर जिवाच्या भीतीने वणवण भटकताना, अरण्यात राहताना, एकचक्रा नगरीत रहात असताना भीमाला बकासुराला मारण्यासाठी प्रवृत्त करताना तिने असामान्य धैर्य दाखवलं. शेवटपर्यंत ती खंबीर राहिली. धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुर यांना ती कायम मान देत राहिली.

गंगा आणि माद्री या दोन स्त्रियांविषयी फार सविस्तरपणे कधी बोललं, लिहिलं जात नाही. डॉ. सुचेता परांजपे यांनी या दोघींवरही एक व्याख्यान दिलं. याही हस्तिनापूरच्या राण्याच. गंगा ही मुळातली स्वर्गातली अप्सरा. इंद्रसभेत सगळे देव, अप्सरा वगैरे असताना तिचं वस्त्र वार्‍यामुळे थोडं सरकल्यावर बाकी देवांनी तिच्याकडे पाहणं टाळलं, पण महाभिषव नावाचा ईक्ष्वाकु कुलातला राजा तेव्हा स्वर्गात होता, तो मात्र मोहित होऊन तिच्याकडे पहात राहिला. त्यामुळे ब्रह्मदेवाने त्या दोघांना शाप दिला की तुम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. त्यानुसार गंगेने पृथ्वीवर गंगा नदीकाठी जन्म घेतला आणि महाभिषव हा शंतनूच्या रूपात प्रतीपाच्या घरी जन्माला आला. पुढची सात मुलांना गंगा नदीत सोडण्याची आणि देवव्रत भीष्मांची कथा आपल्याला माहिती असते. नंतर शेवटी भीष्म शरपंजरी ( या शब्दाचा अर्थ बाणांची शय्या असा नसून शर नावाच्या मऊ गवताची शय्या असा आहे, असं डॉ. परांजप्यांनी सांगितलं) पडून मृत्यूची वाट पहात असताना गंगा तिथे परत आली आणि भीष्मांच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिने त्यांना सोबत केली.
माद्री ही मद्र देशाची, म्हणजे आजच्या पाकिस्तानातल्या सियालकोट भागातली राजकन्या. दिसायला नाजूक, सुंदर. तिने पंडूवर मनापासून प्रेम केलं. शेवटी आपल्याबद्दल मोह निर्माण झाल्यामुळे पतीचा मृत्यू झाला हे अपराधीपणाचं ओझं ती सहन करू शकली नाही आणि तिने पंडूबरोबर सहगमन केलं.

द्रौपदी ही खर्‍या अर्थाने महाभारताची महानायिका. अग्नीतून जन्मलेली, सावळ्या वर्णाची ही तेजस्वी, लावण्यवती राजकन्या. डॉ. गौरी मोघे यांनी चिकित्सक आवृत्तीच्या आधारे द्रौपदीच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला. महाभारतात ’धर्म’ या संकल्पनेला प्रचंड महत्त्व आहे. किंबहुना धर्माला मध्यवर्ती ठेवूनच महाभारत रचलं गेलं आहे. या संदर्भात ’धर्म’ या शब्दाचा अर्थ जो आज आपण हिंदू, मुसलमान वगैरे, म्हणजे ’रिलीजन’ असा घेतो, तसा न घेता ’जगण्याचे नियम, पद्धती, कायदे’ असा घेतला पाहिजे हेही त्यांनी आवर्जून सांगितलं. या धर्माचं सूक्ष्म स्वरूप, त्याचा अर्थ, आपला नक्की धर्म काय, याबद्दल महाभारतात वारंवार चर्चा आहे. अधर्माचा भार वाढल्यामुळेच महाभारत घडलं, त्यामुळे अधर्माचं ’भारावतरण’ हे महाभारताचं प्रयोजन आहे आणि या कथेची महानायिका द्रौपदी आहे. नायिका या शब्दाचा अर्थ ’नेणारी’ असा आहे. द्रौपदी खरोखरच आपल्या कृतींमधून, बोलण्यामधून महाभारताच्या कथेला तिच्या योजित शेवटाकडे नेते. द्रौपदीने पित्याच्या घरी असताना बृहस्पतीनीतीमधून धर्मशास्त्राचं शिक्षण घेतलेलं होतं. .

पाच पांडवांशी लग्न करून द्रौपदीने जगावेगळा संसार केला. इंद्रप्रस्थातली सुरुवातीची वर्षं सोडली, तर नंतर तिच्या वाट्याला सुख असं आलंच नाही. भर राजसभेत वस्त्रहरणासारखा, कुणावरही येऊ नये असा प्रसंग या महाराणीच्या आयुष्यात आला. तेव्हा तिने भीष्मद्रोणादि दिग्गज धर्मज्ञांसमोर, ’युधिष्ठिराने स्वतःला पणाला लावून हरल्यावर त्याला पत्नीला पणाला लावण्याचा अधिकार आहे का?’ असा मूलभूत प्रश्न उपस्थित केला. स्वतःच्या बाबतीत होत असलेला अन्याय अजिबात मुकाट्याने सहन केला नाही. ती अजिबात दुर्योधनाला किंवा दुःशासनाला शरण गेली नाही. तिच्या त्यांच्या बाबतीतल्या संतापाची धार कधीच बोथट झाली नाही. आपला हा भरसभेतला अपमान पाहणार्‍या पतींबद्दलही काही तिला कमी संताप आला नसणार, पण तिने त्यांची साथ मात्र सोडली नाही. पांडव वनवासात जायला निघाले, तेव्हा सुभद्रा ही अर्जुनाची पत्नी माहेरी, द्वारकेला निघून गेली. उलूपी आणि चित्रांगदा या अर्जुनाच्या इतर दोन पत्नींचा तर प्रश्नच नव्हता. द्रौपदीने मात्र वनवासातल्या सगळ्या हालअपेष्टा नवर्‍यांच्या बरोबरीने भोगल्या. अज्ञातवासात ती दासी म्हणून वावरली.
विराटनगरीत असताना ती कीचकालाही शरण गेली नाही. आपण अज्ञातवासात आहोत याचं भान ठेवूनही तिने भीमाकरवी कीचकाचा वध करवला. युद्धाच्या शेवटी अश्वत्थाम्याने तिच्या पाचही मुलांना अधर्माने मारल्यावर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असा आग्रह तिने धरला. अखेर पाची पांडवांबरोबरच ती स्वर्गाकडे गेली.

नरहर कुरुंदकरांचं सगळंच लेखन आपल्याला वैचारिकदृष्ट्या बर्‍याच वरच्या पातळीवर घेऊन जाऊन तिथून त्या त्या विषयाचं दर्शन घडवणारं असतं हा माझा अनुभव असला, तरी त्यातल्या त्यातसुद्धा त्यांचे जे काही लेख या बाबतीत अगदी स्तिमित करून टाकणारे वाटतात, त्यातला एक लेख म्हणजे त्यांनी शकुंतलेच्या कथेकडे तीन वेगवेगळ्या दृष्टींनी (महाभारत, पुराण आणि कालिदासाचं शाकुंतल) पाहून लिहिलेला ’ शकुंतला : इतिहास, पुराण आणि काव्य’ हा लेख. एकाच कथेकडे तीन बाजूंनी तितक्याच समर्थपणे कसं बघता येतं, एक बाजू अभ्यासलेली असताना दुसर्‍या, तिसर्‍या बाजूंचाही मनापासून आस्वाद कसा घेता येतो, पुन्हा पहिल्या बाजूकडे येताना इतर दोन बाजूंमुळे कसं प्रभावित होऊ नये, हे त्या लेखनात दिसतं. हा एक अतिशय मोलाचा गुण आहे. अशा प्रकारे एकाच घटनेकडे, व्यक्तीकडे, कथेकडे वेगवेगळ्या दृष्टींनी पाहण्यासाठी केवळ तीक्ष्ण बुद्धिमत्ता पुरेशी नसते, तर विचारांचा खुलेपणाही आवश्यक असतो. या व्याख्यानमालेत महाभारताची चिकित्सक आवृत्ती ही प्रमाण मानली गेली असली, तरी या तिन्ही विदुषींचाही दृष्टिकोन अर्थातच या आवृत्तीपुरता मर्यादित अजिबातच नव्हता. नंतरच्या प्रश्नोत्तरांच्या सत्रांमध्येही याचा प्रत्यय येत होता. उदा. डॉ. भैरप्पांचं ’पर्व’ हे महाभारतावरचं माझं अतिशय आवडतं पुस्तक. सर्व व्यक्तिरेखांकडे ’माणूस’ म्हणून पाहून, शाप, वर, चमत्कार यांना अजिबात स्थान न देता, महाभारतातल्या घटनांची वास्तववादी मांडणी या पुस्तकात आहे. जरी या पुस्तकातली अनेक घटनांची मांडणी चिकित्सक आवृत्तीपेक्षा वेगळी असली, तरी ’पर्व’ चा संदर्भ देऊन विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना डॉ. मोघे आणि डॉ. परांजपे यांनी महाभारताचं एक समर्थ आकलन म्हणून ’पर्व’बद्दल आदराचेच उद्गार काढले.
वेगळ्या बाजूनेही तितक्याच अभ्यासपूर्ण पद्धतीने महाभारताकडे पाहण्याचा अजून एक आविष्कार म्हणजे डॉ. अरुणा ढेरे यांचं ’लोकदेवता द्रौपदी’ हे या व्याख्यानमालेतलं शेवटचं व्याख्यान. शतकानुशतके चालत आलेल्या लोककथा, लोकपरंपरा, देवतांची उपासना हेही संस्कृतीचं एक महत्त्वाचं अंग आहे. सर्वसामान्यांमध्ये प्रचलित असलेल्या समजुती, त्यांना महत्त्वाची असणारी मूल्यं, त्यांची श्रद्धास्थानं यांचं प्रतिबिंब या परंपरांमध्ये पडलेलं असतं. द्रौपदीला या लोककथांमधून काली देवीचं, पार्वतीचं रूप मानलं गेलं आहे. तिची मंदिरंही दक्षिण भारतात कांचीपुरम, कोलार अशा काही ठिकाणी आहेत. तिचं पाच पांडवांशी झालेलं लग्न हा एक विलक्षण असा कथाभाग. त्याचं कारण म्हणजे कामधेनूने पार्वतीला दिलेला, तुला पाच पतींशी लग्न करावं लागेल असा शाप आणि त्यावर महादेवाने, मीच पाच रूपांमध्ये तुझ्याशी लग्न करीन असा पार्वतीला दिलेला दिलासा असं या घटनेचं स्पष्टीकरण लोककथांमधून येतं. पाच पती असणं ही काही रूढ पद्धत नाही. पण ती देवीचा अवतार असल्यामुळे तिला सर्वसामान्यांचे नियम लागू पडत नाहीत. त्याचप्रमाणे तिच्या बाबतीत घडलेल्या घटना या भारतीय युद्धाला कारक ठरल्या, त्यामुळे ती संहारक कालीचा अवतार आहे, अशीही कल्पना रूढ झाली. लोककथांमध्ये कृष्ण हा कधी द्रौपदीचा कैवारी बंधुराया असतो, तर कधी जिवलग सखा असतो. कृष्णाच्या कापलेल्या करंगळीला आपल्या भरजरी वस्त्राची चिंधी सहज फाडून बांधणारी प्रेमळ बहीण द्रौपदी ही लोककथेतच दिसते. वस्त्रहरणाच्या प्रसंगी कृष्ण तिला वस्त्रं पुरवतो, ही कथा तर प्रसिद्धच आहे. तर वनवासात असताना द्रौपदीच्या मनात कर्णाबद्दल क्षणभर अभिलाषा निर्माण झाल्याचं जाणून कृष्ण तिला याची कबुली द्यायला लावतो, अशी कथा जांभूळ आख्यानात येते. अशी द्रौपदीची विविध रूपं लोकपरंपरांमधून पहायला मिळतात.

अशा या महाभारताच्या नायिका. त्या जरी राजकन्या असल्या, राण्या असल्या, तरी त्यांच्या कहाण्या "आणि ते सुखाने नांदू लागले" असा शेवट असणार्‍या नाहीत. संकटांनी, दुःखांनी व्यापलेली आयुष्यं त्यांच्या वाट्याला आली. कुढत बसण्याऐवजी आपापल्या परीने त्या या संकटांना सामोर्‍या गेल्या. डॉ. सुचेता परांजपे, डॉ. गौरी मोघे आणि डॉ. अरुणा ढेरे या विदुषींच्या तोंडून महाभारताच्या या नायिकांबद्दल ऐकायला मिळणं हा खरंच एक मोठा योग जुळून आला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन प्रतिसादकांचे मनापासून आभार!

अमित, व्याख्यानं यूट्यूबवर वगैरे खुली झाली तर इथे लिहीन.

अस्मिता, छान प्रतिसाद. गांधारीचंही तिच्या आईवडिलांनी अंध पतीशी लग्न लावून दिलं म्हणजे मुलीच्या भविष्याचा त्यांनी कितपत विचार केला असेल शंकाच आहे.

वावे,
खूप सुंदर, अभ्यासपूर्ण रसग्रहण. धन्यवाद
ह्या व्याखानाची लिंक मिळाली की नक्की द्या
महाभारत- दरवेळी नवीन काहीतरी माहिती मिळतेच
प्रतिसाद सुद्धा माहितीपूर्ण
सामो, सुंदर लेख
धन्यवाद

जर सत्यवतीचं विवाहापूर्वीचं मूल असणं चाललं तर कुंतीला का लपवावं लागलं.
>> सत्यवतीचे लव मॅरेज होते, कुंतीचे अरेन्ज्ड.

छान लिहिले आहे... आवडले...

महाभारताचे कौतुक वाटते... काय कल्पनाशक्ती आहे महाभारत मूळ लेखकाची... इतक्या गोष्टी व्यवस्थित मॅप केलेल्या आहेत... आपला गेम ऑफ थ्रोन्स बनू शकेल...

डॉ. सुचेता परांजपे, डॉ. गौरी मोघे आणि डॉ. अरुणा ढेरे या तीन विदुषींची एकूण सहा व्याख्यानं या मालेत होती
>> ह्या तिन्ही व्यक्ती माहीत नव्हत्या.. धन्यवाद...

वावे, तुमच्यामुळे त्या व्याख्यानमालेचा शब्दरुपी अमृतवर्षाव आमच्यापर्यंत पोहोचला. महाभारतातील षष्ठनायीकांच्या व्यक्तिरेखांचा चतुरस्र आस्वाद घेता आला हे खरेच खूप आनंददायी वाटले. अर्थात संपूर्ण व्याख्यानमालेचे रसग्रहण याची देही-याची डोळा माबोवर उतरवण्यात तुमच्या दमदार लिखाणाचा निश्चितच तोलामोलाचा वाटा आहे त्यामुळे तुम्ही माबो वरील संजय आहात असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये..! Bw

@ Dj बापरे!! Lol पण आभारी आहे. Happy
सर्व नवीन प्रतिसाददात्यांचे आभार!

लग्नाच्या आधी झालेल्या मुलांबद्दल- 'पर्व' मध्ये भैरप्पांनी कुंतीच्या बाबतीत असं लिहिलं आहे की कुंतीला जेव्हा कर्ण झाला, तेव्हा आर्यावर्तात काळ बदलू लागला होता Happy लग्नाच्या आधी मूल होणं ही गोष्ट प्रतिष्ठितांसाठी, राजघराण्यां साठी जरा लाजिरवाणी समजली जाऊ लागली होती. ती राजकन्या होती. सत्यवती (मत्स्यगंधा) कोळ्याची मुलगी. शिवाय जरा आधीचा काळ.
अर्थात असाच संदर्भ महाभारतात असेलच असं नाही.

तुम्ही माबो वरील संजय आहात असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये..!
+ 1
आणि कितीतरी विविध विषय... खरच कौतुक आहे...

वावे मनापासून धन्यवाद __/|\__
ही व्याख्यानमाला काही कारणांनी मिस केली होती। पण तुझ्या सविस्तर, अभ्यासपूर्ण मांडणीमुळे व्याख्यानं ऐकल्यासारखीच वाटली।
मुळात महाभारत अन त्यातील व्यक्तिरेखा यावर बोलणे, लिहिणे किती अभ्यासाचे अन आव्हानात्मक। त्यातून या तीनही विदुषींच्या व्याख्यानांचा वृत्तान्त लिहिणंही ही अजूनच अवघड गोष्ट। पण तू फार छान मांडलस सगळं। थांकु मनापासून Happy

लेख फार आवडला. सामो यांनी वर दिलेली लिंकही वाचनीय आहे. प्रतिसाद पण आवडले‌.
थोडं अवांतर आहे कदाचित, या लेखामुळे मला मागे सह्याद्रीवर पाहीलेली एक कुंती आणि कर्ण यांचा संवाद असलेली कथा आठवली. रवींद्र मंकणीने ती भूमिका केली होती. परत नक्की बघण्यासारखी होती पण आता कुठेच मिळत नाहीये.
तुम्ही वर लिहिलेले वाचून आता पर्व वाचावंसं वाटतंय.

हो बरोबर हेच नाव आहे. पण ही वेगळी आहे ती दुसरीच आहे रवींद्र मंकणींची. यात रवींद्र महाजनी आहे. बघते ही पण कशीये. धन्यवाद.

वावे, रसग्रहण अगदीच छान.
महाभारताचा केवढा विस्तार आहे, दर वेळी नविन काहीतरी ऐकायला/ वाचायला मिळतं
मुळ व्याख्यानेही आवडतील ऐकायला.

धृतराष्ट्र आंधळा असल्याने त्याचे लग्न ठरत नव्हते , गांधार हे छोटे राज्य होते , मुलगी दे नाहीतर आक्रमण करू , हा भीष्मांने निरोप पाठवल्याने गांधारी लग्नाला तयार झाली

लेख आवडल्याचं कळवणाऱ्या सर्वांना मनापासून धन्यवाद. _/\_
खरं म्हणजे मी हे टिपण लिहिलं याचं एक कारण म्हणजे पुस्तकाचा सारांश लिहून ठेवला की पुस्तकात आपण काय वाचलं हे आपल्याच जास्त चांगलं लक्षात राहतं, तसंच, या व्याख्यानमालेत काय ऐकलं ते आपल्या नीट लक्षात रहावं. दुसरं कारण म्हणजे ज्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना मी या व्याख्यानमालेबद्दल कळवलं होतं, पण त्यांना काही ना काही कारणाने ती ऐकायला जमलं नव्हतं त्यांनाही सारांश कळावा. ते इथे प्रसिद्ध करावं असा माझा मुळात विचार नव्हता. शिवाय यात माझे स्वतंत्र विचार कमी आहेत. (फक्त पर्व आणि नरहर कुरुंदकरांबद्दल लिहिलं आहे तेवढंच) पण लिहिता लिहिता बरंच लिहून झालं, मग वाटलं की मायबोलीवर या विषयाची आवड असणारी बरीच मंडळी असतील, त्यांच्यासमोर मांडूया.
माझ्या अपेक्षेपेक्षा बराच चांगला प्रतिसाद या लेखाला मिळाला. त्याचं मुख्य कारण महाभारताबद्दल आपल्या सर्वांच्या (बऱ्याच जणांच्या) मनात असणारं आकर्षण हे आहे, याची मला कल्पना आहे Happy

महाभारत आवडता विषय
लेख आवडला, प्रतिसाद सुद्धा छान आहेत Happy
महाभारताचे मुळ ग्रंथाचे दोन्ही खंड मराठीमध्ये (भाषांतर )वाचायला मिळाले होते (डेक्कन कॉलेज ग्रंथालयात मिळतील बहुतेक) , नंतर प्रयत्न करूनही मिळाले नाहीत. पुन्हा एकदा वाचायचे आहेत.
मला आठवते त्याप्रमाणे हे ग्रंथ आळंदीच्या माऊली संस्थानं चे वाचनालय आहे तेथे वाचले होते.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने १ जुलैपासून २३ जुलैपर्यंत महाभारतावरच्या एका कोर्सचं आयोजन केलेलं आहे. इच्छुकांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर जाऊन पहावे Happy

Pages