सुग्रण नवरा

Submitted by jpradnya on 9 May, 2021 - 01:07

काही माणसं जात्याच सुग्रण असतात. म्हणजे त्यांनी अगदी नुसती कांदा टोमॅटो ची कोशिंबीर केली तरीही ती चविष्ट लागते. माझा नवरा त्यांच्यापैकीच एक. त्याउलट दुसऱ्या प्रकारच्या माणसांनी तीन तीन तास खपून, पाककृती तंतोतंत पाळून एखादा पदार्थ बनवला तरीही तो चवीला अपूर्णच राहतो. मी त्यांच्यातली. थोडक्यात सांगायचं तर मी "Eat to Live" आणि तो "Live to eat " कॅटेगरी.

सुट्टी च्या दिवशी माझ्या डोक्यात प्लॅन्स येतात कि आज इथे फिरायला जाऊ, मुली बरोबर अमुक ऍक्टिव्हिटी करू, पण हा मात्र "आज काय नवीन बनवायचं" ह्या विचारात गढलेला असतो. त्यातून पदार्थ जितका कठीण, वेळखाऊ आणि किचकट तितकाच तो बनवण्याचा त्याचा उत्साह जास्त!
नवरा केक्स बनवण्यात पटाईत ! मध्यंतरी केक्सचं भूत डोक्यावर इतकं जास्त सवार होतं की एका निवांत रविवारी आपल्या तसल्याच एका बेकर मैत्रिणीला ह्यानं तिचा पोर्टबल ओव्हन घेऊन आमच्या घरी बोलावलं. दोघांनी आक्खा दिवस नाही नाही ती पिठं चाळली, अंडी फेसली आणि केक ची मिश्रणे ढवळत घालवला. बरं एक काय तो केक करावा आणि गप्प बसावं कि नाही, पण नवऱ्याला इतक्यात सुटका कसली मान्य असणार? मग कुठे स्ट्रॉबेरीच घाल, कशात ड्राय फ्रुटसच चाल तिसरा चॉकोलेट चा कर असले द्राविडी प्राणायाम. ओव्हन मधून गरमागरम खरपूस भाजलेला केक बाहेर काढताना त्याच्या चेहेऱ्यावर इतकं असीम समाधान आणि कौतुक असतं जसं एखाद्या पहिलटकरणीला गुटगुटीत बाळ आपल्या नवऱ्याच्या हातात सोपवताना असेल. तिने "जावळ किती छान आहे बघ" किंवा "तुझ्यासारखी गालावर खळी पडतेय बरं का" असा काही सांगावं अश्या थाटात "वरचा crust एकदम क्रिस्पी असला तरी आत छान मऊ आहे" असं म्हणत त्या केक कडे प्रेमभराने बघत मला तो दाखवला. मला त्यातलं ढिम्म काही कळत नसल्याने मी निर्बुद्धपणे "म्हणजे चांगलं असतं की नाही?" असं विचारल्यावर त्याची माझ्याकडे अतीव कारुण्यपूर्ण नजर. असंच एकदा पेस्ट्री, ब्राउनी, केक, शॉर्टब्रेड ह्यांमधील फरक समजावताना त्याला ब्रह्मांड आठवलं होतं.
त्याची बेकिंग प्रति असलेली भक्ती लक्षात घेऊन मला अगदीच ऑड वने आऊट वाटायला लागलं. शेवटी त्याच्या स्वतःच्या वाढदिवशी तो केक करणार नाही ही technical difficulty लक्षात घेऊन मीच ते शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करण्याचं ठरवलं. रेडिमेड केक मिक्स, रेडी तो युज आईसिंग वगरे सामग्री घेऊन घरी आले. अर्ध्या दिवसाची सुटी मारून केक मिक्स च्या खोक्यावरची कृती डोळे बंद करून पाळून केक सारखा दिसणारा पदार्थ बनवला. त्यावर ओबडधोबड आईसिंग थापून नवरा घरी येण्याची वाट बघत बसले. केक चवीला बरा लागला असावा बहुतेक. खाल्ल्यावर नवऱ्याला वाटलं असेल कि चला बायको सुधारली एकदाची. त्याने उत्सुकतेने डिटेल्स विचारले "बेकिंग पावडर किती घातलीस आणि फॉन्डन्ट ची आयडिया चांगली आहे ". फॉन्डन्ट म्हणजे काय बोंबलायला कुणाला माहित होतं? "मी रेडी टू यूज आयसिंग वापरलं त्यात काय आहे माला माहित नाही नक्की" असा प्रामाणिक कबूली जबाब दिला आणि मी "सुधारल्याचा" नवऱ्याचा भ्रम लगेच दूर झाला.
नाही म्हणजे मी अगदीच इन एडिबल स्वयंपाक करते असं नाही. पण माझं बनवणं म्हणजे निव्वळ ताटभरती असते. पहिला घास तोंडात गेल्यावर खाणाऱ्याच्या तोंडून "व्वा!" अशी दाद मी फार कमी मिळवते. नोकरीनिमित्त घराबाहेर पडल्यावर एकटी राहताना स्वातंत्र्य आणि स्वकमाईचा पुरेपूर उपभोग घेत मॅगी, ऑम्लेट, सँडविच आणि खिचडी असा माझा संपूर्ण आहार मी बनवला होता. स्वयंपाकघरात राबण्यापेक्षा गावभर भटकणे जास्त पुण्यप्रद वाटत असे. लग्नाआधी तर ऑफिस, लष्करच्या भाकऱ्या, ट्रेक्स, मैफली, नाटकं , सिनेमे, वाचन, मित्रमैत्रिणी ह्यातून वेळ मिळालाच तर उदरभरण एवढंच त्याचं महत्त्व. तल्लफ यायची ती सुद्धा पावभाजी, वडापाव, आईस कँडी, फाईव्ह स्टार कॅडबरी एवढीच धाव. पोळी-भाजी-आमटी-भात एवढ्या जुजबी ट्रेनिंग वर लग्नानंतर कर्तव्यभावनेने मी नवऱ्यासाठी डबा बनवू लागले. माझ्या पोळ्या ह्या बहुधा भाकऱ्यांशी स्पर्धा करत. नवर्याच्या ऑफिसमधील त्याच्या लंच बडीस च्या नजरेतून सुद्धा त्याच्या डब्याच्या क्वालिटी मधला फरक सुटला नाही. अन्नाला नावं ठेवायची नाहीत ह्या अंगी बाणलेल्या संस्कारांमुळे तो मला काही बोलला नाही पण "कूक बदलली आहे" अशी मखलाशी करून त्याने घरकी इज्जत राखली.
आमच्याकडे जेव्हा कुणी जेवायला येणार असेल तेव्हा मला तशी काळजी नसते. मी आता त्याची सू शेफ म्हणून कामगिरी बजावायला मात्र शिकले आहे. त्याने सांगितलेल्या आकारात भाज्या चिरून देणे, इतर पूर्व तयारी, आधीची आणि नंतरची साफसफाई, भांडी घासणे असली थॅंकलेस कामं मला उत्तम जमतात. त्यातून कधी अंगावर पडलंच तर मी पावभाजी, मिसळ, पिझ्झा, खीर असले त्यातल्यात्यात सोपे पदार्थ करून वेळ मारून नेते.
मास्टर शेफ चे कार्यक्रम तो तो तासंतास बघतो. आता त्याच्या बरोबरीने बसून माझी नजर सुद्धा तऱ्हे तऱ्हेचे लाल गुलाबी मांसखंड शिजताना बघायला सरावली आहे. मिरॅन्ग, मिडीयम रेअर, ब्लांच, डीसीड, गोळीबंद, अर्धबोबडे वगरे टर्मिनॉलॉजिज उमगायला लागल्यात. तरीपण प्रत्यक्ष नसते उपदव्याप करायला गेले तर तोंडघशी पडेन ह्या भीतीने मी पुढचं पाऊल टाकत नाही. कारण स्वयंपाकासाठी लागणारी एक उपजत जाणीवच माझ्या ठायी नाही हे मी समजून चुकले आहे. नवरा प्रयोगशील आहे. इटालियन, मेक्सिकन, साऊथ इंडियन , नॉर्थ इंडियन, मराठमोळा सगळे पदार्थ झकास बनवतो आणि माझी चैन होते नक्कीच!

ह्यात म्हटलं तर एक डाउन साईड आहे. भांडी स्वछ घासली किंवा ओटा छान चकचकीत केला म्हणून कुणी कधी कौतुक करीत नाही. बऱ्याच वेळा ग्रुप जमले अजूनही बऱ्यापैकी पुरुषच आपापल्या बायकांच्या स्वयंपाकाचे कौतुक करतात. ती कसं काय छान बनवते असं काही मिरवायची संधीच माझ्या नवऱ्याला मिळत नाही आणि मला कधी कसली शाबासकी! आम्ही दोघे कसनुसं हसून प्रसंग साधतो. म्हणूनच एखाद्या ऐतिहासिक दिवशी मी काहीतरी सुरेख बनवावं आणि त्याने त्याच्या चवीवर बेहद्द खूष व्हावं असं स्वप्नं मी उराशी बाळगून आहे. ते कधी सत्यात उतरेल कि नाही ते देवी अन्नपूर्णेलाच ठाऊक!

- प्रज्ञा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हाहा.. छान लिहलं आहेस..
स्वच्छ ओटा पुसणे, भांडी चकाचक घासणे, स्वयंपाकघर नीटनेटक ठेवणे ही सुद्धा स्किल्स आहेत.. सगळ्यांनाच ते जमतं असं नाही Happy

छान लिहिलं आहे!
बऱ्याच वेळा ग्रुप जमले अजूनही बऱ्यापैकी पुरुषच आपापल्या बायकांच्या स्वयंपाकाचे कौतुक करतात, ती कसं काय छान बनवते असं काही मिरवायची संधीच माझ्या नवऱ्याला मिळत नाही आणि मला कधी कसली शाबासकी! >> तुम्ही नवऱ्याचं कौतुक करत जा अशा वेळी...हाकानाका!

छान हलकंफुलकं लिहीलं आहे !

पुरुषच आपापल्या बायकांच्या स्वयंपाकाचे कौतुक करतात, ती कसं काय छान बनवते असं काही मिरवायची संधीच माझ्या नवऱ्याला मिळत नाही आणि मला कधी कसली शाबासकी! >>> किती लकी आहात तुम्ही. Lol

छान लेख. एंजॉ य. त्यांना एक स्टँ ड मिक्सी गिफ्ट घेउन द्या . रेसीप्या टाका त्यांच्या फोटो वगैरे केकचे . इथे उत्तम बेकर्स आहेत

हाहा.. मस्त. तुम्हाला कुकींगची जास्त सवय किंवा आवड नाही म्हणून तर सुगरण नवरा मिळालाय Lol सही आहे.

हाहा.. मस्त. तुम्हाला कुकींगची जास्त सवय किंवा आवड नाही म्हणून तर सुगरण नवरा मिळालाय सही आहे.>>>+++१११
अगदी
छान लिखाण हलकं फुलकं.

मस्तं लेख.
तुम्हां दोघांचही कौतुक!

छान लिहिलंय.
सुग्रण हा शब्द स्त्रीलिंगी आहे.

मस्त लिहीलंय
आता यातल्या काही रेसिपीज चे फोटो पण येऊदे म्हणजे डोळ्यांना थंडावा.

छान.
सुग्रण हा शब्द स्त्रीलिंगी आहे >> मग शब्दकोश अपडेट केला पाहिजे.

मस्त लिहलय!
नवरा बायकोनी असेच असावे.... एकमेकांना पूरक!

https://www.youtube.com/watch?v=f_pJ2qf6j0I मस्त लिहीले आहे. तुमचे आणि मिष्टरांचे खूप अभिनंदन.
खवचट काकू मोड ऑनः
तुला 'सू शेफ' धड म्हणता येत नाही तू सूस शेफगिरी तरी धड करणार का? Wink Happy
खवचट काकू मोड ऑफ.

तुमची लिखाणाची शैली सहज सुंदर आहे.. लिहीत रहा.

सहचरानी एकमेकांना पूरक असणे महत्त्वाचे......

तुम्हाला कला , प्रवास , भटकंती ची आवड आहे... मग नवऱ्याला त्या विश्वाची सफर घडवत रहा..जीवन बहुस्पर्शी , आकर्षक आणि आनंदी होईलच !

@सांज तूच गं तूच माझी आपली !! Happy तुझ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! बोहोनी केलीस _/\_

@वावे हा लेख त्याच्या कौतुकाचाच आहे !

@रानभुली , @भाग्यश्री १२३, @मी_ऋचा, @पीनी, @तेजो , @स्वरूप , @अमितव , @वर्णिता , @म्हाळसा , @जिज्ञासा , @sonalis खूप खूप धन्यवाद!_/\_

@भरत @वावे विनोदाच्या अंगाने मुद्दामच "सुग्रण" असा उल्लेख केला आहे. त्यामुळे विनम्रपणे आपली सूचना स्वीकारत नाहीये. क्षमस्व!_/\_

@सीमंतिनी ताई खवचट काकूंशिवाय मजा नाही हो. चूक सुधारली लगेच! नाहीतर पुन्हा टोमणे माराल !!! Lol

@बोकलत अगदी अगदी!

@पशुपत उत्तेजनासाठी खूप आभार _/\_

मस्त लेख jpradnya.
माझा नवरा ही पाककुशल. शुक्रवारी संध्याकाळी ठरवतो शनिवार रविवार काय करायचं.वीकेंडला मी फक्त स्वयंपाक घर आवरते. Mother’s Day चा मेन्यू मटर पनीर, पालक डाळ ( तेलुगू डिश spinach pappu) खीर, बटर नान, टोमॅटो चटणी, मसूर भात. हे सारे त्याने स्वःताच बनविले, आणि मला साधा फोटो ही अपलोड करता नाही येत माबोवर.
तू बोलल्या सारखी म्हणजे त्यांनी अगदी नुसती कांदा टोमॅटो ची कोशिंबीर केली तरीही ती चविष्ट लागते.>>>> हो खर आहे. यांनी सांध पाणी जरी दिल तरी ते गोड लागत.

विनोदाच्या अंगाने मुद्दामच "सुग्रण" असा उल्लेख केला आहे. त्यामुळे विनम्रपणे आपली सूचना स्वीकारत नाहीये. क्षमस्व!_/\_
>> मीही गंमतच केली हो! Happy

भन्नाट..pls photo द्या इथे त्यांच्या पाककृतींचे म्हणजे लेखाला चार चाँद लागतील Happy

छान लिहीले आहे.
>>>>>>>>ओव्हन मधून गरमागरम खरपूस भाजलेला केक बाहेर काढताना त्याच्या चेहेऱ्यावर इतकं असीम समाधान आणि कौतुक असतं जसं एखाद्या पहिलटकरणीला गुटगुटीत बाळ आपल्या नवऱ्याच्या हातात सोपवताना असेल. तिने "जावळ किती छान आहे बघ" किंवा "तुझ्यासारखी गालावर खळी पडतेय बरं का" असा काही सांगावं अश्या थाटात "वरचा crust एकदम क्रिस्पी असला तरी आत छान मऊ आहे" असं म्हणत त्या केक कडे प्रेमभराने बघत मला तो दाखवला.
अर्रे मस्त मस्त लिहीलय.

सुग्रण ही कलाकार पक्षावरुन आलेली उपमा आहे ना? मला वाटते ती नेहमी बायकांवर वापरल्याने स्त्रिलिंगी विशेषण झाले आहे. पुल्लिंगी वापरायला हरकत नसावी.

लेख एकदम मस्त लिहिला आहे. माझाही एक मित्र असाच सुग्रण आहे आणि त्याच्या बायकोकडून असेच किस्से ऐकले होते, त्यांची आठवण झाली.

जाता जाता... खरं म्हणजे सुगरण ही उपमा स्वयंपाकापेक्षा स्थापत्यकलाविशारदांना वापरायला हवी. सुगरण पक्षी काय सैपाक करतो माहीत नाही, पण घर उत्तम बांधतो एवढं नक्की. Wink

मस्त लेख. मिसला होता. नशिब लागतं असला नवरा मिळायला Happy

खवचट काकू मोड ऑन
जळ्ळं मेलं आमचं नशिब, स्वैपाक तर धड जमत नाहिच, भांडी घासणार ती पण कचरा जाळीवर तसाच Lol
खवचट काकू मोड ऑफ!

Pages