मानभावी गाणी

Submitted by माझेमन on 8 May, 2021 - 12:51

हिंदी चित्रपटातील गाणी कुणाला आवडत नाहीत? काही वेळा आपल्या भावना आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारे व्यक्त करतात ही गाणी. पण कधीकधी याच भावनांचा अतिरेकही करतात. बरेचदा हिरो-हिरॉइन्स नेहमी larger than life असतात किंबहुना सद्गुणांची खाण असतात. आणि हे दर्शवण्याच्या नादात गाण्यातल्या भावनाही कृत्रिम होत जातात, हास्यास्पद होतात. अशीच काही गाणी नमुनेदाखल...
 
आशा पारेखचे नुतनला उद्देशुन ‘मै तुलसि तेरे आंगनकी, कोई नही मै तेरे साजनकी'. तुझ्या लेखी त्या पवित्र भावना असतील, नुतन त्याच्या आयुष्यात नंतर आली असेल कदाचित पण लग्न करुन आलीय, त्यामुळे जग याला विवाहबाह्य संबंधच म्हणणार. त्यातून ज्या बाईच्या नवर्यावर आपलं प्रेम आहे तिला 'काहे तु मुझसे जलती है, मुझको तो तू लगती है कोई सहेली बचपनकी' वगैरे म्हणणं हे जरा मानभावीपणाचचं नाही का?
 
 यातून नुतनने काही धडा घ्यावा? तर नाही...ती आपली गातेय
'छोड दे सारी दुनिया किसी के लिये, ये मुनासिब नही आदमी के लिये'. बाई गं, तू केलायस प्रेमभंग त्याचा. त्याला जरा सावरू दे. ‘प्यार से जरुरी कई काम है’ का नाही हे तो ठरवेल ना.  उगिच दुनियाभरची अक्कल नको शिकवू त्याला.
 
आशा पारेखला तर सवय झाली असणार मानभावीपणाची. उगाच का कटीपतंगमधे गातेय 
'ना कोई उमंग है'. तुच पळुन गेलीस ना स्वतःच्या लग्नातून. काय झालं असेल त्या वेळी त्या राजेश खन्नाचं? आता तू दुसर्या नावाने वावरताना परत राजेशला भेटली आहेस आणि त्याच्या प्रेमात पडली आहेस तर जगाला कशाला दोष देतेस? आम्ही सांगितलं होतं पळून जा म्हणून?

काय मजा येते या बायकांना पळून जाण्यात काही कळत नाही. 
अम्रुता सिंग पण जाते 'आईना' मधे मॉडेलिंग का चित्रपटात करीअर करण्यासाठी. ठीक आहे, तुझी मर्जी. पण काही बॅकप प्लान असतो की नाही? तिथे डाळ शिजत नाही म्हटल्यावर परत येते ते डायरेक्ट आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराकडे
'ये रात खुशनसिब है' गाण्यासाठी. आत्ता आठवलं का हे?

बरं या मानभावीपणाला भाषा किंवा भुभागाच्या काही सीमा नाहीत. 

आणि आपल्या मराठी तारकाही अज्जिबात मागे पडत नाहीत. काय पण हौस आशा काळेला
'अरे मनमोहना रे मोहना' गाण्याची? विक्रम गोखले जेव्हा single होता त्यावेळी तू आपलं प्रेम कधी व्यक्त केलं नाहीस त्याच्याकडे. त्याच्या आईकडे वशिला लावत बसलीस. आणि आता त्याचा प्रेमविवाह झालाय तर भर स्टेजवरून त्याला उगिच कानकोंडं करतेय, तेही त्याची बायको बरोबर असताना. आणि म्हणे बालपणीची मैत्रिण. अश्या वागतात मैत्रिणी?

बायकांचाच कॉपीराईट नाही बरं का इथे!! आपले नायक पण काही कमी नाहीत. 

निकाहचा दीपक पराशर घ्या. रागाच्या भरात तू बायकोला सोडलंस, परत वळुनही बघितलं नाहीस की ती कशी जगतेय, काय करतेय. आणि आत्ता कुठे तिच्या आयुष्यात चार सुखाचे क्षण येताहेत तर तु पुन्हा हजर. गुलाम अलिच्या आवाजात 'चुपके चुपके रात दिन' म्हणत आलास तरी चुकीला माफी नाही.
 
पण या कॅटेगरीत खरी कमाल केलीय ती मनोज कुमारने. सायराबानोला हा पठ्ठा म्हणतो,
'कोई जब तुम्हारा ह्रिदय तोड दे, तडपता हुआ जब कोई छोड दे, तब तुम मेरे पास आना प्रिये'... म्हणजे तिने तुला नकार दिला म्हणून इतका कडवटपणा, इतका तिरस्कार की तिने आयुष्यात हरून का होईना तुझ्याकडे परत यावं. आणि याला तू तिच्यावरचं प्रेम म्हणतोस? मग बरंच झालं तिने तुला नारळ दिला ते.

तुम्हाला आठवतात का अशी कुठली गाणी?

वि. सु. : हा लेख माझ्या ब्लॉगवर प्रकाशित झाला आहे. 

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मनोज कुमार चे 'कोई जब तुम्हारा' माझ्या वडिलांचे आवडते गाणे. त्यांच्या लग्नाआधी त्याना कॉलेजमध्ये एक मुलगी आवडायची. पण त्याकाळी प्रेम विवाह खूप कमी होत. तिच्या आठवणीत हे गाणे ऐकायचे Happy

मानभावीपेक्षाही ब्रुटली प्रामाणिक असं एक गाणं आठवलं.

तेरे पास आ के मेरा वक्त गुजर जाता है

प्रेम बिम काय नाय .. फक्त टाईमपास असं चक्क स्पष्ट सांगतोय तो माणूस तरीही हिरॉईन त्याच्याशी प्रेमाच्या गोष्टीच करतेय.

मामी Lol

लेखात लिहिलेली निरिक्षणं खरी आहेत की. गाणी अप्रतिम आहेत म्हणून लक्षात नाही आली. Lol

ह्या यादी उच्चतम स्थानावर - तुम मुझे यूं भूला ना पाओगे.... (वैधानिक इशारा: शम्मी-रफी होते म्हणून सुटले. बाकी कुणी ट्राय करू नका!! निदान आधी 'नेक्स्ट इन लाईन' कोण आहे त्याची माहिती काढा मग असलं काही गा.)

खरंच वरील गाण्यांवर जे लिहीलयं ते कमाल आहे Lol .

आणि आत्ता कुठे तिच्या आयुष्यात चार सुखाचे क्षण येताहेत तर तु पुन्हा हजर. गुलाम अलिच्या आवाजात 'चुपके चुपके रात दिन' म्हणत आलास तरी चुकीला माफी नाही>>>>> हो मग काय, स्वत: बायकोला सोडून दिले आणि आता का रडत बसलाय‌ मॅड कुठला Lol
याच कॅटॅगिरीत जिंदगिके सफर में गुजर जाते है.... पण येईल...पण अप्रतिम लिरीक्स आणि किशोरदा म्हणून या गाण्याला माफ Wink

असेच आणखी एक आशा काळेचे देवता चित्रपटाचे, खेळ कुणाला दैवाचा कळला,, कायच्या काय अचाट स्टोरी आणि ड्रामा, स्वत:च्या हाताने त्याच्या रक्ताचा टिळा लावून घेतला आणि आता दैवाला काहून दोष हो आशाताई.... Lol
असेच एक ,, उनसे कभी ना होना दूर.. हां मांग में भर लेना सिंदूर ,,, अगं बाई तु तिच्याकडे माती घ्यायला गेलीस तेव्हा किती बोलून घेतलं तिला आणि आता एकदम सवत माझी लाडकी काय ?? अरे भाई कहना क्या चाहती हो Lol