पोसण्यासाठी मुले खोप्यातली

Submitted by निशिकांत on 6 May, 2021 - 11:25

पोसण्यासाठी मुले खोप्यातली

जीव तोडुन पोसण्यासाठी मुले खोप्यातली
वादळे मी पेलेली सत्त्यातली, प्याल्यातली

ती असो राणी कदाचित खेळता पत्त्यातली
संपली उपयोगिता अन् आम ती जगण्यातली

वासराला पाजतांना गाय हंबरते कशी!
शेवटी आईच ती! वाड्यातली, गोठ्यातली

पैज जे लाऊन हरले, कौरवांना पण दिले
ती नसावी वाटली पाचासही नात्यातली

खंजिराची कर्मभूमी पाठ असते सर्वदा
मारणारी, भोगणारी खास ती अपुल्यातली

चित्र होते काढले मोनालिसाचे मी कधी
पण चितारावी कशी जादू तिच्या हसण्यातली?

व्हर्च्युअल मित्रात होत्या शेकड्याने मैत्रिणी
खास पण का एक वाटे आपुल्या भाग्यातली

पोलिसांनो चालते दुर्लक्ष चोरावर कधी
सक्त ठेवा मंडळीवर नजर जी खात्यातली

का असे " निशिकांत " थिजले एवढे डोळे तुझे?
माय गेली, संपल्याने आसवे आसवे डोळ्यातली

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users